[३२५] श्री. २४ मार्च १७२९.
श्रीमत्भृगुनंदनस्वरूप परमहंस बावा स्वामीचे सेवेसी :-
चरणरज बाकाजी नाईक महाडिक कृतानेक विज्ञापना विनंती येथील संतोष स्वामीचे कृपेनें चैत्र शुध्द षष्ठी इंदुवारपावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. स्वामीनें आशीर्वादपत्रें पाठविली ती प्रविष्ट होऊन लिहिलें वृत्त सविस्तर कळोन संतोष जाहला. वरकड येथून रवाना करावयाची आज्ञा जाहली आहे त्याप्रमाणें रवानगी केली आहे व मागाहून करूं त्याचें सविस्तर वृत्त श्रीमंत सौभाग्यादिप्रसन्न मातुश्री बाईसाहेबांचे पत्रीं लिहिलें आहे. त्यावरून सेवेसी निवेदन होईल. सेवक आज्ञाधारक आहे. आज्ञेप्रमाणें वर्तणुकींत अंतर होणार नाहीं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.