[३८२] श्री. ९ एप्रिल १७५१.
से ॥ विद्यार्थी नरसिंगराऊ सा॥ नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम चैत्र वदि ९ जाणोन स्वामींहीं स्वानंदवैभव लिहित असिलें पाहिजे. विशेष. बहुत दिवस जाले कीं, आशीर्वादपत्रें सांभाळ न केला. हें कृपादृष्टीपासून दूर आहे. सदैव पत्रद्वारें परामर्श करीत असिलें पाहिजे. आमचें वर्तमान तर:- आपले आशीर्वादेकरून लेकरेंबाळें समस्त मंडळी सुखरूप आहेत. राजश्री राजा रघुनाथदासजीची कृपा आह्मावर बहुत. या उर्जित दशेमध्यें आह्माशीं स्नेह केला ऐसा कोण्हाशीं केला नसेल. त्याचे थोरीस अंतर नाहीं. पेषकारी पातशाही व मुतसदीगिरीं, बुऱ्हाणपूर दोन्ही चिरंजीव उत्तम राऊजीचे नांवें व मुशरफी व खजानचिगिरी, वकीली दडारीपरसाई, हे चिरंजीव अच्युतरायाचे नांवें करून दोन इनायतनामे पाठवून दिले. दखलकार जालों. लौकिकांत भूषणास कारण जालें. सुभेदार वगैरे सर्व, त्यांची कृपा आह्मावर जाणोन खुषामत करतात. ईश्वर त्यांजला बहुसाल करो ! सैन्यांतही सर्वांशीं स्नेह व कृपा संपादिली, याजमुळें लोक राजी व यजमानाची कृपा विशेष. आह्मांस बहुताप्रकारें लिहिलें कीं, तुह्मीं सत्वर येणें येविशीं कृपापत्रें यजमानांचीं येतात, व दोन सहस्र रुपये वाटखर्चासही पाठविले. इतकें कोणास अगत्य आलें आहे ! वैकुंठवासीमागें आजीपावेतों विप्राचे प्राबल्यामुळें श्रमतच राहिलों. आतां भगवान् या गृहस्थास कांहीं दिवस विराजित ठेवो कीं आमचे श्रमाचा परिहार करतील. सैन्य भागानगराहून चालिलें ह्मणजे औरंगाबादेस येईल, ह्मणजे मीही तेथें येईन. भेटीचा लाभ होईल. बहुता दिवसांपासून इच्छा आहे कीं दर्शनाचा लाभ व्हावा. वरकड सर्व खुशाल असे. हे विनंति.