[३७९] श्री. १७ मार्च १७५१.
पै॥ चैत्र शुध्द ११ मंगळवार,
शके १६७३ प्रजापति नाम संवत्सरे
हुंडीपत्र मित्ती मजकुरी रवाना
केलें, ब॥ सकवारजी जासूद.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी त्रिंबकराव विश्वनाथ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल त॥ चैत्र शुध्द १ प्रतिपदापर्यंत स्वामीचे आशीर्वादेंकरून सुखरूप असो. विशेष. काल सातारियाहून पत्र राजश्री नाना पुरंधरे यांचें आलें. तेथें लिहिलें कीं, गायकवाड फौजेसह वर्तमान सातारियास जाऊन, वेणेवर जाऊन मुक्काम केला. आह्मी जाऊन कृष्णेवर दुसरे दिवशीं मुक्काम करणार. त्यास, गायकवाड फौज तयार करून, वेणा उतरून आले. आह्मीही कृष्णा उतरोन पलीकडे गेलों. त्यांचें आमचें शुक्रवारी झुंज प्रहरभर जालें. त्यांचा मोड जाला. ते पळून चालिले, तेव्हां सातारापर्यंत आह्मी पाठलाग केला. यांचा गोट लुटून फस्त केला. पालख्या, उंटें, घोडी घेतली. स्वामीचे आशीर्वादें यश श्रीमंतांचे फौजेस आले. वर्तमान संतोषाचें कळावें ह्मणून लि॥ असे. याउपरही नवल विशेष होईल तें लिहून प॥. मौजे साकूर, प्रांत नाशिक येथील मात्र एक कार्य स्वामीस करावयाविशी विनंति केली. तेही स्वामीनें कबूल केली, ह्मणून वारंवार स्मरणार्थ लिहितों. खानही थोर आहेत. त्यांनी एकदां दिल्हें तयास हरकोणाचे लि॥ वरून संदेहांत पडावें ऐसें नाहीं. X X X X न स्वामी आहेत. त्याचा आह्मास वारंवार संशय होईल न होईल, होतों हेंच अपूर्व आहे ! आह्मी आपले स्वकीय कार्याविशी इतके ल्याहावें, मग स्वामीनी भीड खर्चून करावें, हेंच उचित दिसत असेल तर लिहीत जाऊं. परंतु याउपर तरी हे पत्र बहुत पत्रांचे जागा मानून हें कार्य सर्व प्रकारें भीड खर्चून अगत्यरूप करून घेतलें पाहिजे. तुह्माखेरीज आह्मी आणीक कोणास ल्याहावें ? जेव्हा सुलभ होतें तेव्हांच आह्मीं ह्मणत होतों. तेव्हां स्वामी बोलिले कीं, हें कार्य आमचे जिम्मे, मग आह्मी काय ह्मणावें ? तर याउपरि लौकर लि॥ प्र॥ निखालस करणें. नवा आमील गेला, त्यास व जमीनदारास व गांवकरी यांस ऐशी पत्रें घेऊन पाठविली पाहिजेत. बहुत काय लिहिणें हे विनंति.