[३८२]A श्री. ९ एप्रिल १७५१.
सेवेसी नरसिंगराऊ सा नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता छ ३ रोज शुक्रवार जाणोन आपलें कुशल आनंद लिहीत असिलें पाहिजे. विशेष. इंद्रप्रस्थाहून अग्निहोत्री यजमानस्वामींचें पत्र डाकेमध्यें ता छ १७ जमादिलावल माझे नांवें आलें. त्यांत लिहिलें आहे कीं, येथून विप्राचे नांवें, वडील पुत्राचे मुद्रेनशीं, कृपापत्रें दोन पाठविलीं कीं सत्वर हजूर येणें. त्यास, बहुधा ते तेथून तापीपुरास आले असतील. तर तुह्मीं शोध करून त्याजला लौकर इकडे पाठवून देणें. कितीक कामें त्यांचे आल्यावर मवकूफ आहेत. यास्तव सेवेसी विनंति केली जाती कीं, वर्तमान कोणे प्रकारचें आहे यांसी बरें विचारलें पाहिजे. कितीक स्थळीं शोधास मनुष्यें पाठवून गोष्ट ठिकाणीं लावली पाहिजे. ऐसें न होय कीं ते सुरक्षित चालले जात. जर भुलावा देऊन गेले तर मोठा उपद्व्याप करतील. या कार्यानिमित्य एकांतीं, प्रगट तर न होय. अंतस्थ मनुष्यें लावून पत्तेवार गोष्ट लिहिली पाहिजे कीं, कोठें आहेत, काय विचार करितात. येविशीं निश्चित न राहावें. जधीपासून हें वर्तमान ऐकिलें, चैन नाहीं. आह्मींही शोधांत आहोंत. कळलें पाहिजे. लष्कर भागानगरास आलें. तेथून स्वार जालें ह्मणजे आह्मीं येथून स्वार होऊन येऊं. तुह्मीं सातारियाचे कामासाठीं लिहिलें. त्यासी, जर ते लौकरीच येतात, तर समक्षच लागू होऊन करून घेतों. जर न आले तर जें लिहिणे तें पूर्वीं लिहिलें आहे. आतांही लिहिलें जाईल. चिंता न करावी. आपले कार्यांत अंतराय करणार नाहीं. हें पत्र वाचून फाडून टाकावें. राजश्री गोपाळपंतासही सूचना करावी. हे विनंति.