[३८३]A श्रीपांडुरंग. १२ मे १७५१.
सुभेदार
श्रीमत्ममहाराज राजश्री वासुदेवभट दीक्षित मु॥ कायगांव सेवेसी :-
सेवक सैद हसन मु॥ लष्कर दंडवत विनंति येथील क्षेम त॥ वैशाख वदि १३ पर्यंत जाणोन स्वकीय क्षेम लिहून सांभाळ केला पाहिजे. विशेष. मौजे जामगांव येथील कामकाजाविषयीं भाई सैदलष्करखान यांसी व भाई मुरादखान व तुह्मांस ऐसे तिघाजणांस,पत्रें श्रीमत्साहेब यांनीं लिहिलीं आहेत. तर आपण मौजे मजकुरास येऊन, ज्यांशीं त्यांशीं पत्रें प्रविष्ट करून, वडीलपणें गांवाचा निर्गम केला पाहिजे. खंडणी गुदस्ताप्रमाणें करून वसूल देविला पाहिजे. जाजती तोशिस न लागेल तें करावें. अशानशी न ऐकतील तर आह्मी आलियावर सर्व गोष्टींचें पारपत्य होईल. येथील वर्तमान तर:- मनसूरअल्ली वजीर यासी मदत होऊन पठाणावर चढाई केली. मग यमुनापार होऊन भागीरथीचे तीरीं पठाणांची गांठ पडली. मग खळयांमधून झुंज देऊं लागला. दाणापाणी पलीकडून येत असे. यास्तव दिरंग लागला. मग भागीरथीस पूल बांधून रा. गंगाधर यशवंत यांजबरोबर फौज देऊन पलीकडे गेलों. उभयता श्रीमंत अलीकडे पठाण होता त्याजवर राहिले. मग ईश्वरकृपेकरून पलीकडील फौज मोडून तारांगण केलें. ईश्वरें यश दिल्हें. अलीकडीलही मोडला. सदरहू पठाणाची फौज बुडविली. खासा ती राउतांनसीं पळोन गेला. ईश्वरें आपल्यास यश दिलें. आतां देशाकडे ढाला दिल्या. मनसूरअल्लीनें काशीची व प्रयागची क्रमणा केली. यंदा लष्करें देशास येतील. कळलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दिजे. हे विनंति.