[३८३] श्री. ७ मे १७५१.
पै॥ ज्येष्ठ वद्य ३० बुधवार
शके १६७३ प्रजापतिनाम.
तीर्थस्वरूप दादा वडिलांचे सेवेसी :-
अपत्यें बाळकृष्ण दीक्षित शिरसाष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम वडिलांचे आशीर्वादें समस्त सुखरूप असों. विशेष. वडिलांचीं पत्रें माघ शुध्द ११ व एक फाल्गुन शुध्द १ शुक्रवारचीं पाठविलीं तीं पावोन बहुत संतोष जाहला. यानंतर या प्रांतींचें वर्तमान :- आह्मीं गयेस गेलों होतों. तीर्थरूपांचें गयावर्जन उत्तम रीतीनें केलें. दोन सहस्र रुपये लागले. ब्राह्मण गयावळ यज्ञोपवीत होते. सर्वांस भोजन घातलें. दीड सहस्र पात्र जाहलें. तीन मास तेथें होतों. गयावळांस दक्षणा साशत रुपये दिल्हे. वरकड ब्राह्मणभोजन, वाटखर्च सर्व दोन सहस्र लागले. परंतु उत्तम नांवाप्रमाणें करावें लागलें. परंतु रागास न येणें. जातेसमयीं वाटेस दाऊद नगरी उतरलों होतों. तेथें अकस्मात् निळोपंत वैशंपायन यांचे फक्त स्वार तीन चारशें येऊन दाऊद नगरचा गंज मारिला. चहूं लक्षांची मालमत्ता घेऊन गेले. आह्मांवरही हात फिरविला. वस्त्रेपात्रें व एक साखळी बारा तोळयांची गेली. सरदार कोणी नव्हता. मानाजी भागवत ह्मणऊन होता, तो ह्मणों लागला जें, मुकाम होते तर वस्तभाव येती. मग गयेस गेलों. निळोपंत व रघूजीचा पुत्र हे रामगडाकडे होते. या प्रांतीं येते तर भेट होती. परंतु तेथूनच फिरोन गेले. गयेमध्यें होतों येव्हढयामध्यें प्रयागीं पठाण रोहिले आले. प्रयागचें शहर मारिलें, हें काशीमध्यें लोकांहीं आयकिलें. तसे येथें भयाभीत लोक जाहले. राजानेंही लिहिलें जें ज्यास जिकडे सुभीता होईल तिकडे जाणें. त्यावरून सर्व लोक बहुत गडबड जाहली. सर्व लोक ज्यास जिकडे वाट फावली तिकडे गेले. दोन दिवस मनुष्य नाहीं. बाजारचें नहर उघडिलें असें कधीं जाहलें नव्हतें ऐसें धैर्य लोकांचें गेलें. राजा जाऊन प्रयागी पठाणास भेटला. साता लक्षांवर मामला करून आला. कोतवाल पठाणांचा येथें येऊन बसला. मग स्वस्थ जाहले. प्रयागच्या किल्ल्याशी भांडत होते. इतकियामध्यें नवाब मनसूरअल्ली मल्हारजीस घेऊन फरुकाबादेस आले. हें वर्तमान आयकोन पठाण प्रयागींहून फिरोन गेले. फरुकाबादेजवळ युध्द मोठें जाहलें. मल्हारजी व गंगोबा यांहीं दोन प्रहर युध्द केलें. पठाण व रोहिलें कापून काढिले. दहा पंधरा सहस्र खेत आलें. मुख्य सरदार अहमतखान पळोन गेला. लूट सर्व गनीमास देविली. हस्ती, घोडे, तोफखाना, वस्तभाव सर्व मल्हारजीचें. कोणास माफ केली. नवाब बहुत मेहेरबान जाहले. लोकोत्तर यश मल्हारजीस आलें. तीन क्रोडी द्रव्य देऊं केलें व पंचवीस लक्षी मुलूख अंतर्वेदीमध्यें देऊं केला आहे. वैशाख शुध्द ५ युध्द जाहलें. कालच पत्रें आलीं. मल्हारजी ग्रहणाकारणें प्रयागास येणार ऐसें आहे. पहावें. प्रयाग, काशी होणार ऐसें वर्तामान आहे. पहावें. अमृतराव काशीस आला आहे. येथें आमच्या घरी आला होता.