[४६४] श्री. २० सप्टेंबर १७५५.
तीर्थस्वरूप राजश्री वासुदेव बावा दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
अपत्य महादजी रघुनाथ पटवर्धन साष्टांग नमस्कार विनंति येथील वर्तमान ता कार्तिक शुध्द १५ मु पुणें वडिलांचे आशीर्वादेकरून सुखरूप असों विशेष. राजश्री हरि दीक्षित येथें नाहींत. ते श्रीमंतांचे लष्करांत गेले. लष्कर मोरेश्वरावरी आहे. पुढें सातारियासी जावयाची बोली आहे. पहावें. जातील कीं नाहीं कळेना. मल्हारजी होळकर याचे चित्तांत आहे कीं, सख्य करून द्यावें. या नंतर राजश्री जानोजी बावाचे वर्तमान तरी आजपावेतों प्रथम दिवसच आहे. बोलीचाली कांहीं नाहीं. दोघे भाऊ निराळे निराळे आहेत. पुढें पहावें, कसें होईल. राजश्री मोरेश्वर दीक्षित यांणीं जानोजी बावाची पोतदारी केली. वो हरि दीक्षितांनीं आह्मांकडील बोलीचाली श्रीमंत नानांजवळ पडली तरी रा नागोराम भागवत यांसीं सांगितलें आहे. त्यांनीं मान्य केलें आहे, आह्मांस घरास जावयाची आज्ञा श्रीमंतांनीं दिली; वस्त्रेंहि दिलीं. परंतु जानोजी भोसले याकडील व फत्तेसिंग भोसले यांकडील कामकाजाचा बंदोबस्त होणें आहे. यास्तव आठ चार दिवस राहिलों. हेही स्वार होऊन मोरेश्वरास जात आहेत. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.