[४६३] श्री. २० सप्टेंबर १७५५.
वे. शा. सं. रा. रा. दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विनंति सेवक बाबूराव बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल ता भाद्रपद शुध्द पौर्णिमा जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत गेलें पाहिजे. विशेष. रा. मल्हारराव होळकर खानदेश दरोबस्त जहागिरीच्या पातशाही सनदा आणिल्या आहेत. श्रीमंतांजवळ मामलेदार जाऊन मामलती करीत आहेत. नशिराबाद परगणा वगैरे महाल राजश्री वासुदेव जोशी यांणीं केला. कांहीं परगणे त्रिंबकराव विश्वनाथ यांणीं केले. कितेक जाऊन उभे राहिले आहेत. ह्यास्तव सेवेशी विनंतिपत्र लिहिलें आहे. आपण पडीप्रसंगीं आहेत. आह्मांसाठीं खानदेश प्रांतीं एखादा महाल शेंदुरणी, लोहारें वगैरे हरकुणी एक महाल, आह्मांसाठीं केला पाहिजे. आपणही आठ पंधरा दिवसां भेटीस येऊं. आज्ञा कराल तरी श्रीमंतांचीही भेट स्वामीच्या विचारें घेणेंच आली तरी घेऊं. परंतु, एक दुसरा आह्मांसाठीं अगत्यरूप करून घेतला पाहिजे. बनोन आलें लक्ष्य प्रकारें करावें. स्वामीचे नांवें करून आमचें ऊर्जित होईल. स्वामीचें नांव वगळूं. स्वामी ह्मणतील, सोयरे लोकांशीं कांहीं गोष्टी कामाची नाहीं, ऐसें चित्तामध्यें न आणावें. सेवाचाकरीचें नातें, त्याप्रमाणें चाकर लोक सेवा करितील. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति.