[४७३] श्रीशंकर. १७ मार्च १७५६.
पौ चैत्र शुध्द १
शके १६७८ धातानाम.
विनंति. दुसरें पत्र लष्करचें आलें फाल्गुन शुध्द १५ भोमवारचें. तेथें राजकी वर्तमान तर : श्रीमंतांनीं हल्ला करून तीन टेकडयावर मोर्चे होते ते उठवून दोन तीनशे माणसें ठार कापिलीं, व दोन तीनशें जखमी झालीं. आठा तोफा, जेजाला वगैरे, बंदुखा वगैरे, कुल घेऊन तेथें मोर्चे आपले कायम करून ठेविले. दुसरें दिवशीं पहाटे हल्ला करोन जावें तों रात्रीं मुरारजी व मुजफरजंग व पठाण यांनीं बाहेरील मोर्चे उठवून, सावनुरांत जाऊन, कुल मोर्चेबंदी केली. दुसरे दिवशीं श्रीमंतांनीं हल्ला करून, बाहेरील मोर्चे उठवून, आपले मोर्चे सावनुरा भोवते बसविले. आणि दुसरे दिवशीं खंदकावर मोर्चे भिडले. आणि तीन दिवस तोफांचा मार श्रीमंतांनीं केला, तो श्रीहरि जाणे, त्याजमुळें कुल जेर झाले. आंत रयत फार. ब्राह्मणांचीं घरें दीड हजार. उदमी मातबर फार. आणि कुल पठाणाचे कबिले. शिवाय बाहेरील रयत आणि फौज. त्याजमुळें अनर्थ फारच झाला, आणि नाशही बहुतच झाला. तो पत्रीं काय ल्याहावा ? त्यास, हालीं रदबदलीस प्रारंभ जाला आहे. त्यास, तह ठहरल्यावर वर्तमान लिहून पाठवूं, परंतु आतां फार दिवस लागणार नाहींत. दो चो दिवसांत फडच्या होईल. नबाब सलाबतजंग यांचीं पत्रें आलीं होतीं. त्यास, येथून साठ कोसांवर आहेत. त्यांस पुत्र झाला* यास्तव राहिले होते. त्यास, हालीं येतील. तहनंतर काय मनसुबा होईल तो लिहून पाठवूं. येणेंप्रमाणें चिरंजीव कृष्णाजीचीं पत्रें आलीं होतीं. स्वामीस बातमी कळावीबद्दल पत्रांची नक्कल लिहिली असे. हे विज्ञापना.