[४७१] श्री. ५ मार्च १७५६.
पौ वैशाख शुध्द ११ सोमवार
शके १६४८.
तीर्थस्वरूप राजश्री दादा वडिलांचे सेवेसी :-
अपत्यें बाळकृष्ण दीक्षित कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम जाणून स्वकीय कुशल लिहिलें पाहिजे. यानंतर बंदल काशीद याजबरोबरी चिरंजीव राजश्री गोविंद दीक्षितांनीं माघ वदि १० दशमीचें पत्र पाठविलें तें चैत्र शु॥ २ पावलें. वर्तमान कळलें. भावी होणार तें कधी न चुके. उभयता कजिया शांत होत नाहीं. ज्यांचीं मरणें आलीं ते मरतील, गाव लुटले जातील तेव्हांच यांचा त्यांचा सलूख होईल. येथें आह्मीं सांप्रतीं कुशल आहों. वडिलांची रात्रंदिवस चिंता वाटते ते श्री जाणें ! तरी वडिली बहुत खबरदार असावें. मी काय लिहूं ! वजीर फरुकाबादेस आले. बरोबरी हरिभक्त आहेत. पठाणहि आहेत. रोहिलेहि आहेत. रोहिले यांचा मुलूख रोहिले यांसी दिल्हा. साठी लाख रुपये करार केला. त्यांत पस्तीस हातास आले. रोहिले याची कन्या आपले पुत्रास नबाबानें केली. पठाण याचे तीस लाख रुपये ठराविलेत. फरूकाबादेस येऊन घ्यावे. मध्यस्तीस आहेत. पठाण त्यांचे सैन्याजवळी उतरता निमे पठाणाचा मुलूख हरिभक्तांस दिला, निमे पठाणास दिला. राजश्री आपाजी जिवाजी सिरखंडे समशाबाद महू पठाणाचा परगणा होता. तो परगणा पठाणाकडे वाटणीस गेला. इकडील हें वर्तमान. दुसरें : काशीची सनद नबाबवजीरानें दिली. एकशे चाळीस गाव व काशी जाली. अंमलदार गोपाळपंत गोविंदभट बरवे गराडेकर,-नासरजंग याचे वेळेस रा बाबूजी नाइकाकडे कर्ज, ते आपणास विदितच आहेत, त्यांचा पुत्र, राजश्री रघुनाथ बाजीराव यांचे मेव्हणे,-येताती. दोन हजार स्वार समागमे आइकतो. कळलें पाहिजे. रा लक्ष्मण शंकर तिरस्थळी करून प्रयागावरून आपले कालपीस गेले. त्याणीं उत्तर दिलें कीं, आमचे स्वाधीन ढाकुणी कर्तव्य आहे, तरी मृगसाल पंधरा दिवस अगोदरच पाठवणें. हें वर्तमान पूर्वीं वडिलांस लिहिलें आहे. चित्तास वडिलांचे येईल तैसें करावें. गृहस्थ एकवचनी शपथ केली, तुमचा रुपया खाणार नाहीं. याजवर वडिलांचे चित्तास येईल तें कीजे. जातेवेळेस पाचशे रुपये व दोन पितांबर स्त्रियांचे दिले. आह्मी त्यांसी नवदां रुपयांचीं वस्त्रें दिलीं. यावेगळे आह्मांस प्रथम दुशाला उंच व पागोटे, धोत्रजोडा, पैठणी उंच व चंदेरी ताफता दिला. गृहस्थ भला. जो दानधर्म कर्तव्य तो वडिलांचे वाडियांत बसोन दीड हजार रुपये वाटले. आह्मीं जीं नांवें लिहून दिलीं त्याप्रमाणें दिलें. राजश्री दामोदर महादेव हिंगणें यांणीं तुला केली होती. त्यांणीं जातेसमयीं तुळेतील पंधराशे रुपये ठेवून गेले ते वाटणें ह्मणून सांगितलें होतें. ते वाटले. काशींत धान्य महाग जालें. गहू मण १, दाळ तुरीची
सर्व जिन्नस महाग जाला. इ० इ० इ० हे विनंति. मित्ती चैत्र शु॥ ५ सोमवार.