[४८८] श्री. ८ मे १७५७.
पौ. ज्येष्ठ शुध्द ६ बुधवार
शके १६७९.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान सा नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत असिलें पाहिजे. विशेष. बहुत दिवस आपणाकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. ऐसें नसावें. सर्वदा आपणाकडील कुशलार्थ लिहीत जावा. अबदाली दिल्लीस येऊन, तेथील वाताहत करून आगऱ्यास आला. मथुरा मारिली. बहुत जनांस पीडा केली. येविशींचें वर्तमान तेथें येतच असेल. तरी सविस्तर ल्याहावें. इकडील वर्तमान तर : श्रीरंगपट्टणचा मामला विल्हेस लावून शिऱ्यास आलों. पंधरा रोजांत तुंगभद्रा कृष्णा उतरून येतों. सर्व दाटी हिंदुस्थानचे मनसुबियावर आहे. जसजसा विचार प्राप्त होईल तसें करावें लागेल. आपण उत्तरेकडील व अवरंगाबाद वगैरे वर्तमान लिहीत जावें. सैदलष्करखानास सख्खा भाऊ आहे किंवा नाहीं ? लेक तो नाहींच. सर्व द्रव्य नवाबांनी जफ्त करविलें कीं काय ? आपण कांहींच वर्तमान लिहिलें नाहीं. निरंतर कृपापत्र येत नाहीं ऐसें नसावें. छ १९ साबान. बहुत काय लिहिणें. हे विनंति.