[४८५] श्री. २१ जानेवारी १७५७.
पौ माघ शुध्द २ शुक्रवार
शके १६७८.
स्वामीजीचे सेवेसी विज्ञापना जे :-
अजंठियास सरकारचे छकडे अखंड कोळसे आणावयास जात असतात. आतांहि छकडे कोळशियासी गेलेहेत. त्यास श्रीमंत रघुनाथराऊ इकडून गेले त्यांणी छकडा नेला. तेंथें दरगाहकुलीखानाचा नायब होता. त्याणें श्रीमंत मजकुरास खत लिहिलें की, छकडा नवाब रुकुनदौलाचे सरकारचा आहे. त्यांणी त्यास जाब लिहिला कीं, नवाबाची आमची दोस्ती आहे, यामुळें छकडा सोडून दिधला. ऐसें खत लिहिलें; परंतु छकडा न दिधला. ऐशियासी यजमानांनी आज्ञा केली की स्वामीजीस या गोष्टीची सूचना करणें की, आपण त्यास लिहीत कीं, श्रीमंतांशी व आपणांशी व नवाबाशी ऐसा स्नेह असतां याचा छकडा न्यावा आणि पत्री दिधला ऐसें ल्याहावें आणि न द्यावा, हे गोष्ट तुह्मापासून दूर आहे; छकडियाची मालियत काय ? जर मागते तर आह्मीं न देतों ऐसें नवतें; परंतु इष्टत्वांत ऐशा गोष्टी घडूं आलिया लौकिक खोटा होतो, हें आपणच विचारावें; ऐसें पत्र लिहून पाठवून जाब आणवावा. यांचे फिरंगी पळून येथें आले. त्यांचे पत्र येतांच आह्मीं बांधून त्यांपाशीं पाठविले. आमचा शिद्दी पळून त्यांचे तोफखानियांत गेला, त्यासाठी आह्मी लिहिलें. त्याचें उत्तरच न दिलें. आह्मी तो आपला शिद्दी धरून आणिला. या गोष्टी आपणच त्यांस ल्याहाव्या. बहुत काय लिहिणें. हे विज्ञप्ति.