[४९१] अलिफ. २२ जून १७५७.
पो छ ५ सवाल सन ११७० हिजरी,
आषाढ मास शके १६७९. असल पत्र मुद्दाम
काशीद अजुरदाराबरोबर पंतप्रधान यांजकडे
चार घटका दिवस रहातां पाठविलें.
ऐबादत व इजलाल दस्तगाह वासुदेव बावा दीक्षित मुष्फक मेहेरबान करम फरमाय मुखलेसान सलामत :-
दरीविला. आपलें कृपापत्र आलें तें पावलें. रावसाहेबाला मुनाकब बाळाजीपंत यांचा हेतू सविस्तर ध्यानीं आला. आज्ञा जाल्याप्रमाणें येथील सर्व अमीरउमराव यांची सला घेतली. शहानवाजकान वगैरे उमराव आपले आज्ञेबाहेर कोणी नाहीं. नवाब निजामअल्लीखा हे नवाब सलाबतजंग बहादूर यांचे मनांत विपर्यास आणून काय कमजवाद करतील, हा मात्र संशय आहे. तत्रापि त्यांचा विचार बहुतकरून आपले स्नेहांतील अमीरउमराव यांचे मर्जीबाहेर जात नाहीं. तरी आपले आज्ञेनुरूप त्यांस मामूल करणेंप्रकारें करीन. माझेविषयीं व शहानवाजखान व इतर सरदार यांजविषयीं बिलकुल संशय आणूं नये. खातरजमा असो द्यावी. मजविशीं आसाहेब मनोमय जाणीत असतील या सेवकानें अधिक ल्याहावेसें काय आहे ? आजपर्यंत मजवर अनेक वेळा कठिण प्रसंग आले. त्या त्या प्रसंगांतून आमेहेरबानानींच पार पाडिलें. ते उपकाराच्या कोटी जाहाल्या. त्या त्या देहापासून कधीहि फिटणार नाहींत. जास्त काय लिहूं ? आंगाच्या कातडयाच्या वाहाणा केल्या तरी उपकार फिटणार नाहीत. आपलेंच आशीर्वादें या सेवकाचे सर्व हेतू पूर्णतेस जातील. सारांश, आपण इकडील उमारावांविशीं मनांत बिलकुल संशय आणू नये. इतकियावर नवाब निजामअल्लीखा यांचा दुराग्रह पडून ते न ऐकतील तर त्याचें फळ त्यांस प्राप्त होईल. त्याबद्दल मजकडेस व आपल्याकडेस काय आहे ? नवाबसाहेबास योग्य विचार असेल तोच सांगावा हें आमचें कर्तव्य आहे. ज्यादा काय लिहूं ? प्यार असो दीजे. आपणास कळणेकरितां हें पत्र मराठी मुद्दाम खिजमतगाराबरोबर पाठविलें आहे. मेहेरबानी असावी. छ ४. सवाल. *