[४८४] श्री. १३ नोव्हेंबर १७५६.
पौ छ २२ माहे सफर
सन ११६६, कार्तिक वद्य ८ सोमवार.
पु॥ वेदमूर्ती राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विनंति उपरि. फिरंग्यांशी सलूख नवाबांनी पारपत्य नीट न होई यांसाठी केला. याजमुळें हैदरजंग चढी लागून मुजफरखानास घालवून दिल्हे. शोकतजंगाची दिवाणगिरी दूर करविली. पुढें शहानवाजखानास जरब देऊन दूर करून आपणच व्हावें ऐसा डौल दिसतो. त्यास, मुजफरखानास घालविणें, या गोष्टीस मात्र आमचें संमत होतें. वरकड गोष्टी आह्मांस संमत नाहींत. गु॥ शहानवाजखानांनी नवाबास आमचे कामास आणिले. असल्या पदार्थांत प्रमाणिक वजनदार तोच बरा आहे. हैदरजंग गुंडा आहे. त्यास बहुत वाढणें. फावल्यास पुढें येईल हि. फिसादीस अंतर करणार नाहीं. केलियास काय होणें ? फजितच श्रीकृपेनें आपल्या आशीर्वादें पावतील. परंतु मोठे पदायोग्य नव्हे. सांप्रत सैदलष्करखानास नवी जागीर दिल्ही. समाधान केलें. त्यास त्यांचे मतें शहानवाजखान असावे, किंवा हैदरजंग फिरंगीच सर्व व्हावें; याचा मनोभाव कोणीकडे कसा आहे हा शोध घेऊन लिहिणें. आमचें मत तों शहानवाजखान बरें. हैदरजंगांनी फिरगियांनी पूर्ववत् चाकरी करून असावें. मागें सैदलष्करखानास दबावून काढलें; आतां शहानवाजखानास काढलें. ह्मणजे मोंगल मंडळीचा वक्रच उडून गेला. दुसरें तो फिसादी मनुष्य आहे. एतद्विषयीं खानाचा भाव काय ? आह्मांस काय उपयोगी, हे खानास एकांती पुसून सविस्तर लिहिणें, सांप्रत नवाबाचा भाव कसा आहे ? शहानवाजखानाशी नवाबाचें अंतर पडिलें असेल तर इलाज नाहीं. तेथील आंतील वर्तमानें कशी आहेत ? सर्व विस्तारे जरूर खानास पुसून लिहिणें. छ १९ सफर हे विनंति.