[४९२] श्री. २२ जून १७५७.
पौ भाद्रपद शुध्द ७
शके १६७९.
वेदमूर्ति राजश्री वासुदेव दीक्षित स्वामी गोसावी यांसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष - शहानवाजखानाविषयी लिहिलें तें कळलें. ऐशियास, सर्व प्रकारें त्यांचे अगत्य आहे त्यांनी दतबा येऊन पोहोंचत तों पंधरा दिवस लागतील तों दम धरावा. घाबरें होऊं नये. आह्मांस सर्व प्रकारें त्यांची अब्रू राखून आपलें काम कर्तव्य आहे. दरगाहकूलीखान यांचा तुमचा लगाम पहिल्यापासून आहे. तुह्मी त्यास समजावून सांगून शहानवाजखानाची समजाविशी नवाबांशी होय तें करणें. वरचेवर विशेष वर्तमान लिहीत जाणें. छ. २९ जिलकाद. हे विनंति.