लेखांक ९३.
१७०२ चैत्र शु. ८ श्री. १२ एप्रिल १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। बाळाजी जनार्दन सं॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेषः-तुह्मीं दोन पत्रें पाठविलीं तें पावलीं. आपणाकडून करारनामे व निभावणीचीं पत्रें पावलीं. त्यांवरून नवाबबहादूर यांणीं, चेनापट्टणचे कुमसेलवाले आले होते, त्यांस रुकसत दिल्ही. फाल्गुन वद्य सप्तमीस डेरे बाहेर दिल्हे. खासाही सत्वरच डेरेदाखल होऊन चेनापट्टणाकडे जाणार. आतां कांहीं गुंता राहिला नाहीं. आह्मांसही निरोप देण्याची सर्व तर्तुद केली. लौकरच निरोप देतील, ह्मणोन लिहिलें. ऐसीयास, इंग्रजाची मसलत भारी. सरकारच्या फौजा व सरदार जाऊन लढाया नित्य होतात. इंग्रज बतंग केले आहेत. याचा त।। अलाहिदा लिहिला आहे. नवाबबहादूर यांस याउपरी जावयास दिवसगत न लागावी. हांगामाचे दिवस हेच आहेत. लांब लांब मजलीनें दरकुच चेनापट्टण प्रांतीं नमूद व्हावें. सरंजामी कांहीं नवी होण्याची नाहीं. सर्व सिद्धता जालीच आहे. आतां ढील नसावी. चैत्र अखेर पावेतों इंग्रजास जाऊन बतंग केलें, मकानें (णें) घेतलीं, असें वर्तमान लौकर यावें. ह्मणजे केले मसलतीचें सार्थक. वारंवार हाच मजकूर काय ल्याहावा? सर्व नवाबबहादूर यांचे ध्यानांत आहे. र।।छ ६ रबिलाखर. *बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.
पै।। छ २२, रबिलाखर, सन सनानीन.