पै॥ छ २९ रबिलावल, सन समानीन. लेखांक ९०. १७०१ फाल्गुन व॥ ६
मयावआलफ ऊर्फ फा।। मास. श्री. २६ मार्च १७८०.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। कृष्णाराव बल्लाळ सं॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल त॥ छ १९ माहे रबिलावल जाणून वर्तमान यथास्थित असे. विशेषः-- तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. नवाबसाहेब यांणीं मसविदे पाठविले त्याप्रमाणें तहनामा व मध्येस्ताचीं पत्रें आहादशर्तीनसीं आलीं ह्मणजे, ऐवजासहित आमची रवानगी करून, आपण चेनापट्टणाकडे जाणार. सर्व तयारी जाली आहे. पत्राची मात्र प्रतीक्ष्या. नवाबसाहेब यांचा आपला पुरातन स्नेह, सबब सरकारांत तोड जोड समजाऊन यांचे मनोदयानरूप घडे तें करावें, ह्मणोन लिहिलें. ऐसियांस, तुह्मांकडील पत्र व मसविदे आले, तेच समईं विचार केला. करारांत तों अंतर आहे. सरकारची नुकसानी होती. परंतु, नवाबबहादूर यांचे दोस्तीवर व इंग्रजाचे तंबीचे मसलतीवर नजर ठेऊन मसविद्याप्रमाणें करारनामा व निभावणीचीं पत्रें छ २१ माहे सफरीं रवाना केलीं, तें पावलीं असतील. इकडील गुंता राहिला नाहीं. एक राजश्री पाटीलबाबा यांचें निभावणीचें पत्र येणें तें आणविलें आहे. लौकरच येईल. उपरांतीक रवाना होईल. गुजराथ पल्ला लांब, वाटेंत नाना प्रकारें दिक्कती जाल्या, याजमुळें दिवसगत लागली आहे. आलियावर पाठवण्यांत येईल. त्यासाठींच अडून राहाण्याचें कारण नाहीं. मोहीमचे दिवस फार थोडे राहिले, याजकरितां सत्वर नवाबांनीं निघोन चेनापट्टण प्रांतीं नमूद व्हावें. इंग्रजास तंबी करावी. कुमशेलवाले आले ते कांबूची बहुतां प्रकारें बजीदी करतील, लालूच दाखवितील, त्यांची जात मकरी, ह्मणोन नवाबबाहदूर च लिहित आहेत. तेव्हां त्यास खूब चाल वाकफ आहे. सारांष, त्यांस ठेवणें सलाह नाहीं. चेनापट्टणाकडे त्यांस नवाबबहादूर यांणीं सत्वर जाऊन करारप्रमाणें गुंते उगऊन तुह्मीं मंडळीसहित लौकर यावें. इकडील लढा कोणेविशीं राहिला नाहीं. सर्व गोष्टी त्यांचे मनोदयानुरूप करून दिल्ह्या. अदवानीकरास मुसा लाली यांचे तलबे ब॥ तगादा आहे, ह्मणोन ऐकितों. त्यास, मुसा लाली यांचे तलबेचा तगादा न व्हावा. मिरजकर वगैरे सरकारी जरूरीचीं कामें उगऊन घेऊन यावीं. सर्व राजश्री नाना यांचे पत्रावरून कळतच असेल.
र।। छ माहे रबिलावल. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंति.
स्वामींचे सेवेसीं गोविंद भगवंत सं॥ नमस्कार. आपलीं पत्रें फार आलीं. परंतु माझें स्मरणच न जालें, ऐसें नसावें. हामेश ममतेनें व कृपेनें पत्रीं संतोषवीत जावें. सविस्तर इकडील श्रीमंत राजश्री नानांचे पत्रावरून कळतच असेल. यश पुर्ते घेऊन कार्यें उगऊन लौकर यावें. लोभ कीजे. हे विनंति.