पो। छ २२ रबिलाखर, लेखांक ९४. १७०२ चैत्र शु।। ८.
सन समानीन. श्री. १२ एप्रिल १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं: -
विनंति उपरी. सरकारच्या फौजा व सरदार गुजराथ-प्रांतीं जाऊन बडोद्या नजीक इंग्रजासीं गांठ घातली. नित्य घेराघेरी होऊन गोळागोळी होतच आहे. भोंवताला तमाम मुलूक मारून ताराज केला. इंग्रजाचे सैन्यांत दाण्याचा-याची मोठी तसदी. एक दोन वेळ कही ही सरदारांनीं मारली. फाल्गुन वद्य पंचमीस लढाई मोठी जाली. इंग्रजाचा आराबा पिऊन फौजा आंत धसल्या. हत्यार चालिलें. इंग्रजी लोक बहुतेक कापून काहडले. त्यांस बरीच जक दिल्ही. इतकियांत इंग्रज यांणीं संभाळून बच्याव करून हटून राहिले. गाईकवाड यांचें सूत्र पक्कें आहे. परंतु, अदियाप इंग्रजापासोन निघाले नाहींत. राजश्री गोविंदराव गाइकवाड यांस सरदारांनीं आणविलें. ते आले. पांच हजार फौजनसीं आहेत. फत्तेसिंग गाइकवाड यांस मोठें च वर्म आहे. त्याचें ही राजकारण आहे. न बनल्यास हें ही आहे. लौकर च काय ठरणें तें ठरेल. एकूण गाइकवाड बहुत करून फुटून येतील, एसें आहे. राजश्री गणेशपंत बेहरे दाहा हजार फौजनसीं तमाम सुरत-प्रांतीं जाऊन जाळून खाक केले. शेहरची बंदी केली आहे. इंग्रजांनीं सरकारचे महाल वगैरे ठाणीं घेतलीं होतीं, तें सर्व सोडऊन बंदोबस्त केला. कळावें नवाबबहादूर यांस सर्व वर्तमान सांगावें. *तुह्मीं दोन पत्रें या पूर्वीं पाठविलीं, तीं पावलीं. र छ ६ रबिलाखर. हे विनंति.