Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री.
मौजे मोशी येथें शेत करावयाची तजवीज चोपडथळापैकी खंडी १ हल्ली वाहतो. हर माळी मेराळ वाहत आहे.
जांबूळथळपैकीं गंगनाक महार दीड खंडी वाहत आहे.
तिसरे नारोपंत खरे वाहत आहेत. चोपरथळापैकी वरपाटी मोहपाटी ह्मणून नांव आहे. दीड खंडी ह्मणोन ह्मणतात. परंतु पावणेदोन खंडी आहेत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री.
स्मरण. छ २ साबान अधिक जेष्ठ शु॥ ३ बुधवार ते दिवशीं श्रीचें पत्र चिंचवडीहून लक्षुमणपंत ह्यांच्या नावें आलें आहे की, श्रीमंत राजश्री पंत प्रधान यांचे पत्र आलें आहे कीं, खोल्यास प्राश्चित्त देणें, त्यास आठघरियाचा व धर्माधिकारियाचा कलह लागला आहे, याचा विचार काय करावा तो लि॥. त्याजवरून तेंच श्रीचें पत्र राजश्री जिवाजीपंत आण्णा यास नेऊन रामाजीपंत परसांत अंघोळीच्या जागियाअलीकडे दाखविलें. तें त्यांनी वाचून पाहिलें आणि सांगितलें की, श्रीमंतांनीं श्रीस पत्र दिल्हें आहे त्याप्रमाणें श्रीनीं करावें आणि ब्राह्मणांस मुगत करावें, कोण्हाचा उजूर धरूं नये. ऐसें सांगितलें. त्याजवरून ऐसेंच पत्र श्रीस लेहून लक्षुमणपंताच्या नांवें दिल्हें. सन ११६४.
सन ११६५ शके १६७७ युवानाम संवछरे आषाढमास.
आषाढ वद्य १० मंदवारीं राजश्री शिदोजी नरसिंगराऊ शितोळे देशमूख प्रा। पुणें याचे घरीं श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांनी चौकी बसविली. कारण कीं, देशमूख मजकूरांनीं कलवंतीण राखली आहे, हे खबर त्यास कळली. त्याजवरून चौकी बसविली कीं, कलवंतीण पा। देणें. त्यास, चौकी तिसरा प्रहरपावेतों बसली. दोन चार वेळां श्रीमंताजवळ बहिरोबांनीं विनंति केली; परंतु त्यांणीं ऐकिलें नाहीं. शेवटीं मातुश्री लाडूबाई व जगन्नाथपंत व नरसिंगराऊ दि॥ पागा हुजूर ऐसे भाऊकडे जाऊन चौकी उठवावयाची परवानगी घेऊन चौकी उठविली. भाऊनीं लाडूबाईस ताकीद करून सांगितले कीं, याउपरि ऐसें ऐकलें तरी कामास येणार नाहीं. ऐसें जालें.
आषाढ वद्य १० मंदवारीं वासू देव यासी एकाएकीं तरळेची भावना होऊन मृत्य पावले. त्याचें कर्मांतर निळोबा देव, आपा देवाचे नातू यांनी केलें.
श्रावणमास.
शुद्ध ३ रविवारी श्रीमंत राजश्री रघुनाथपंतदादा हिंदुस्थानांतून स्वारी करून आले. ते रोजमजकुरीं मांजरी बु॥ येथें नदी उतरून अलीकडे आले. त्यांचे भेटीस श्रीमंत राजश्री बाळाजीपंडित व राजश्री भाऊ ऐसे बहुत समारंभेकरून गांवांतून निघोन सामोरे गेले. वानवडीजवळ दीपदर्शनीं भेटी जाल्या. आणि तैसेच देवदेवेश्वराच्या दर्शनास गेले. तेथून दर्शन करून रात्रीं मिरवत समारंभेकरून आपल्या वाडियांत आले. ते दिवशी त्याजला नजर करावयासी राजश्री शिदोजी नरसिंगराऊ व गोविंदराऊ शितोळे देशमुख प्रा। पुणें हे नजर करावयाकरितां पुढें गेले होते. बरोबर राघो विनायक गेले होते. तेसमयीं नजरेचा प्रकार येणेंप्रा। जाला ( पुढें कोरें.)
श्रावण शुद्ध ४ सोमवारीं श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान यांची स्त्री सौ। गोपिकाबाई प्रसूत जाली. पुत्र जाला. श्रावणमासचे दक्षणेकरितां ब्राह्मण जमा जाले होते. त्यास पुत्र जाला ह्मणोन एकएक रु॥ ब्राह्मणास दक्षणा दिल्ही.
श्रावण शुद्ध ६ बुधवारीं श्रीमंतानीं श्रावणमासचे दक्षणेस रमणियांत दक्षणा द्यावयाचा प्रारंभ तिसर्या प्रहरा केला. दक्षणा बरीच उत्तम प्रकरें दिल्ही. ब्राह्मण शुक्रवारी संध्याकाळी सुटले.
शुद्ध ९ मंदवारी राजश्री राघोबादादा, श्रीमंताचे भाऊ, याची स्त्री प्रसूत जाली. कन्या जाली. ती संध्याकाळी वारली.
शुद्ध १२ सोमवारी जयाजी शिंदे याजला माळ्यानें देवपूजा करितेसमयीं मारिलें. ठार केलें ह्मणोन खबर रोजमजकुरीं आली. व राजश्री राघोबादादा यांचे स्त्रीस बरें वाटेना ह्मणोन श्रीमंतानीं हस्तिदान वगैरे दानें गणेशभटाचे घरीं दिल्हीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री.
स्मरण, मानाजी पोकळे मौजे धायरी याणें येऊन विदित केलें कीं, रखमाजी पोकळा याची ह्मैस १ व टोणगा १ ऐशीं आवाडामध्यें भुसावर आलीं होती. त्यास दसु पोकळा याणें ढोरास पिटतेसमयीं भुसावर चढोन ह्मैस पडली. त्यामुळें फाटली. मग तीस उठवावयासी लामला तो उठेना. मग त्याचे घरास जाऊन रखमाजीचा भाऊ परसोजी पोकळा यासी आणोन ह्मैस दाखविली. मग खंडोजी बोलला कीं, आपल्यास ह्मैस लागत नाहीं. तूं बरें कर, वाईट. ऐसें ह्मणोन तैशी रात्री तेथें पडली. मग दुसरे रोजी खंडोजीचे दारी उचलोन नेली. रात्री मेली. त्यास मोकाशियाकडे फिर्याद रखमाजी व खंडोजी जाऊन सांगितलें. त्यांनी गांवकरी मिळून वर्तमान पुसिलें. त्यावर आवजी पोकळे व कुळकर्णी व मोकाशी यांसी बोलिले की, ज्याने ह्मैस मारली त्यास प्रायश्चित्त देऊं. त्यावर पारावर येऊन दसू पोकळा व मानसिंग पोर यासी आणोन चौकशी केली. केली तेव्हां दसूकडे प्राश्चित्त ठरवलें. मानसिंगाकडे कांहीं नाहीं. दसू पोकळा एक महिनाभर बोडका हिंडतो. मोकाशी गंगेस गेले आणि गांवकरी निकाल करून सोयीस लावीत नाहीत, ह्मणोन मानाजी पोकळे याणें सांगितले. शके १६७७ युवानाम संवछरे, चैत्र वद्य ८, गुरुवारी येऊन सांगितले. छ० २० जा।खर.
वद्य १४ गुरुवार. राजश्री जिवाजीपंत अण्णा यास उभयतां देशमुख व बाई व बहिरोपंत व रामाजीपंत याजकडील विठोबा व आबाजी बाजी, सटवोजी वाणी ऐसे फरासखाना होता तेथें गेले. नजरेचा मजकूर गकारपूर्वकास पुसिला. त्याणीं पूर्वी पा। गुमास्ते आहेत त्याणीं पागोटें बांधावें, आणि उभयतांनीं रामराम करावा, नाहींतर दोन करीत आलों, ऐसे सांगितले. जाबसाल उभयतांचे जाले. शेवटीं सिधांत कीं, श्रीमंताचे भेटीस जावें, त्यांस पुसोन भेटीचा निर्वाह होणें तो होईल. ऐसे करार आण्णानीं केला असे.
शुक्रवार वद्य ३०.
अबूलखेर पीरजादे दर्गा शेख सल्ला याजकडोन कर्ज राजश्री जिवाजी आण्णा याचें विसावरसाचें होतें. मुद्दल रु॥ २०० दोनशें होते.
त्याबद्दल बुरजपट्टी व सेवापट्टी गहाणवट होती. त्यांना मध्यें खात होते. सांप्रत्य रदबदल करून दोनशें रुपये देऊन फारकती लेहून घेऊन, शेत अबुलखेर याचा लेक शेख चांदपीरजादे याच्या हवाला करूं, असें सदरहूचें खत अगर वहीवर हिशेब कितेब आहेत, त्यांचे ठिकाण लागलें नाहीं. मोघमच घेतली फारखती. बालकृष्णपंतीं करार केला की वहीवर करार अगर खत सांपडेल आणि त्याजवर मुद्दल जे असतील त्यांत दोनशें मजुरा द्यावें, बाकी निघतील ते घ्यावे, ऐसें ते बोलले. त्याजवरून अजमदुल्ला यासी सांगितले की, येणेंप्रो। आहे. त्याणीं कबूल केलें. उमगलियावर जें निघेल तें घ्यावें, ऐसें करार करून फारकत त्याचे स्वाधीन केली असे.
वैशाखमास.
शुद्ध १ मंदवारीं स्वारींतून श्रीमंत राजश्री नाना व भाऊसाहेब थेऊरीं मुक्काम दोन रोज करून तेथून कुच केलें ते ती घटका रात्रीं पर्वतीहून घरास दाखल जाले. राजश्री जिवाजीपंत आण्णा व राजश्री बाबा फडणीस श्रीमंतास सामोरे गेले. त्याजबरोबर रा। शिदोजी नरसिंगराऊ व गेविंदराऊ शितोळे देशमूख भेटीस गेले. तेथे भेटीचेसमयीं गोविंदराऊ ह्मणों लागले की, आपण दुसरी नजर करूं. तेव्हां शिदोजी नरसिंगराऊ यानीं राजश्री जिवाजीपंत आण्णास सांगितले की, आजता। एक नजर वडिलाची होत आली आहे, सांप्रत नवीन गोविंदराऊ दुसरी नजर करूं ह्मणतात याची वाट काय ? तेव्हां अण्णानीं उभयतां देशमुखास आज्ञा केली की, आह्मी श्रीमंतास ये गोष्टीचा मजकूर पुसों, मग तुह्मी नजर करणें, तोंवर उभयतांहि नजर न करणें. ऐसे सांगितले. आणि जिवाजीपंतीं श्रीमंत राजश्री नानासाहेबास विनंति केली की, उभयतां देशमुख नजरेकरितां भांडतात, पुरातन एक नजर वडिलांची घ्यावयाची चाल आहे, हालीं गोविंदराऊ दुसरी करूं ह्मणतात, त्याची आज्ञा काय ? तेव्हां श्रीमंतानी आज्ञा केली की, वडिलानीं नजर करावी एक, ती आह्मी घेऊं, दुसरी घेणार नाहीं ऐसें बोलले. त्याजवरी शिदाजी नरासिंगराऊ यानीं नजरेचीं देन तिवेंट दिल्हीं. त्याजवरी गोविंदराऊ यानी तिवटें द्यावयास काहाडिलीं तीं श्रीमंत माघारी जिवाजीपंताजवळ दिल्हीं की, ज्याची त्यास माघारी देणें, दुसरी नजर आह्मी घेत नाहीं. त्याजवरून जिवाजीपंतीं गोविंदराऊ याची वस्त्रें माघारी दिल्हीं. याप्रों। जालें.
शुद्ध ३ सोमवार. धोंडोपंत कुलकर्णी मौजे माण ता। हवेली हा आपले सुनेशीं गेला. त्याचा लेक गुजराथीस तीन चार वरसें गेला होता. तोहि आला. त्याचे अंगीं लागलियावर सुनेस घेऊन पळोन गांवांतून गेला.
शुद्ध ४ मंगळवारी बाजी कान्हो व सटवाशेट परमळराऊ व तिघेजण माणसें घेऊन तिसर्या प्रहरा जेथें देव आहे ते घरीं चिंतामणभट र्धा। याचे सारवावयासी चिखल केला. तें वर्तमान कळलियावर राजश्री जिवाजीपंत आण्णा यासी वर्तमान सांगितले आणि त्याचें माणूस पाठविलें कीं, तुह्मीं उभयतां आह्मासी भांडतां आणि न पुसत काम करावयासी गरज काय ? आणि काम राहविलें. बाजी कान्हो आण्णाकडे येऊन सांगितलें की, काय आज्ञा ? त्यास, आण्णा बोलले की, तुह्मीं सारवावयासी काय ह्मणोन गेलेस ? ते ह्मणाले कीं, आह्मीं पूर्वापार करीत आलों आहों, याजकरितां गेलों. त्यास जनोबाकडील माणूस काय ह्मणोन नेलें ? वरसास नेत नसतां आणि यंदां काय ह्मणोन घेतले ? त्यास हे ह्मणाले कीं, नानाचें पत्र जनोबास आणिलें आहे, आमचे जिल्हेदार आहेत, ह्मणोन नेले. आण्णा बोलले कीं, जनोबास खावंदाची आज्ञा आहे कीं ? आपल्यापासून माणूस दिल्हें, तेव्हां खावंदाची आज्ञा नाहीं ऐसें कळलें. मग काम राहवलें. खावंदाचेहि कानावर पडले. परंतु जाबसाल जाला नाही. बुळबुळीत जालें. श्रीमंतांचे कानावर घातलें. परंतु कांहीं जाबसाल साफ केला नाहीं. श्रीची कथा राहिली. मांडव घातला नाहीं. गोविंदराऊ यांणी आपले घरी वरसास ब्राह्मणभोजन घालीत असतात. त्यास यंदा बाजी कान्हो याचे घरीं करविलें आहे. ऐसे वर्तमान आहे.
वद्य १४ शुक्रवारीं सकाळचे प्रहरीं लाडूबाईची व राजश्री शिदोजी नरसिंगराऊ याची बोली चाकरावरून जाली. देशमुखांनी चाकरास मारिलें ह्मणोन बाईनीं अबोल केले. त्यावरून देशमुखांनीं घोड्यावर जीन ठेवून सखूबाईस व राजसबाईस घेऊन लवळियास रुसून गेले.
वद्य रुजू. अधिक शुद्ध १ रविवारीं राजश्री शिदोजी नरसिंगराऊ लवळियाहून तिसर्या प्रहरा निघोन संध्याकाळी गुराबरोबर पुणियास आले. सखूबाईस व राजसबाईस लवळियांत ठेविले, आणि आपण व बहिरोबा ऐसे आले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री
स्मरण. चैत्र शुद्ध ११ सोमवार शके १६७७. बापोजी केशव सबनीस याचें तटूं गंगेस न्यावयास मागितलें. त्यानें दिलें.
१ तटू जरदा कि॥ रु॥ २० वीस त्याणीं घेतला ह्मणून भवानबा देशमुख याचे गुजारतीनें सांगितलें.
३ सामान तट्टाचें.
१ खोगीर नवें
१ तंग पुस्तंग
१ लगाम जीन
----
३
त्याच्या भावानी तटू आणून दिल्हेस किंमतहि सांगितली बाजीबांनीं.
शके १६७७ युवानाम संवछरे. चैत्र शुद्ध सन ११६४
शुद्ध १० रविवारी संभाजी चावट श्रीविठोबाचा भक्त विठ्ठलवाडीचा वारला असे. १
शुद्ध १४ सह १६ गुरुवारी अळंदी अलकापुरी गंगेस घरीचीं मुलेंमाणसे गेली. तेथें अलीकडे तुळबाजी ताकपीर याचे वाडीपाशीं मुक्काम केला. आधीं देवदर्शनास गेले. तेथे सिद्धेश्वराचे देवळांत मातुश्री भिवाबाई जातांना डावे हातावर पडली. हात डावा मोडला. दुसरे रोजी पुणेयासी डोली चर्होलीची मिळवून पाठविली. याप्रों। जालें. जिवाजी न्हावी अलकापूरकर दंडापाशीं मोडला असे.
वद्य १२ सह १३ बुधवार त्रिंबकदादा व शिवराम गोविंद र्धा। गोविंदराऊबाबाकडे पाठविले की, श्रीमंत पुढें आले आहेत, तुह्मी व आह्मी भेटावयासी जाऊन, जर एक पहिल्यापासून आहे त्याप्रों। करूं. त्यानीं जाब पाठविला कीं, तुह्मी शेलापागोटें घेणें आणि तुह्मी पागोटें बांधा, आह्मी शेला उकलून अंगावर घालू. त्यास, ही गोष्ट कांहीं पहिल्यापासून जाली नाहीं, तें नवें कसें करावें, असें ह्मटलें. त्यास, ते उठोन वरसास पुढें जातात. त्यांस सांगोन पाठविलें कीं, तुह्मी न जाणें, जेव्हां सिधांत नजरेचा होईल तेव्हां जावें. तैसेंच नरसिंगराऊचा जाबसाल केला की, पहिल्यापासून आह्मी करीत आहों. नवी तुह्मी करूं द्या ऐसें ह्मणतात. आमचे वडील, दवलतराऊबाबा व दाजीबाबा व वरकड भाऊ जमा करूं आणि विचार करून सांगो, ऐसें लांबणीखालीं जाबसाल केले. इतका मजकूर हेच दिवशीं जाला असे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
माघ मास.
शुद्ध १ सोमवार ढोले माळी याच्या शेतांत वस्ती राजश्री जिवाजीपंतआण्णा यानीं केली. त्यास, त्यापाशीं जागा मागोन खासगत घेतली. लांबी हात ९० रुंदी हात ५०. येणेप्रमाणें मोजून घेतली असे.
शुद्ध १० बुधवार आबा देशपांडे यासी देवआज्ञा जाली. दोप्रहरा दिवसा काल जाला असे.
शुद्ध ११ गुरुवार लाडूबाई शितोळे लवळियांत होती. त्यांस बरें वाटत नव्हते. त्यांस देवआज्ञा जाली. खबर आली.
वद्य ९ मंगळवारीं दोप्रहरा दिवसास लक्षुमबाई धडफळियास देवआज्ञा जाली.
वद्य ९ बुधवार त्रिंबकराम धर्माधिकारी याची द्वितीयसमंधाच्या स्त्रीस मधरा जाला. तीस सायंकाळच्या च्यार घटिका दिवसास देवाज्ञा जाहाली,
फाल्गुन मास.
शुद्ध १० शुक्रवार तान्हाजी सोमनाथ हवालदार काशीहून नाशीक त्रिंबक करून घरास रात्रीं आले.
शुद्ध १५ बुधवार.
सुभानजी पा। लोणकर मौजे मौजे वडगांव लोहगांव येथील
कोंढवें याची होळी येडझवेपणें होळी दोन चार वरसें पडली
बाळकृष्णपंतांनी पाड़ली जिवाजी- होती ते शिंदियास लावावयास
मुळें. सांगितली.
वद्य १ गुरुवारी लवळेकरं शेटगा आला कीं, तळजाईजवळ होळीस पोळी देवाची आपण लावीत होतो. त्यास, नागोजीने द्वाही देऊन, होळी लावू दिल्ही नाहीं. गोंवार्या राहिल्या.
वद्य ६ मंगळवार खबर आली कीं, रघोजी भोंसले यास फाल्गुन शुद्ध तृतीयेस देवआज्ञा जाली.
वद्य ३० गुरुवार सह चैत्र शुद्ध १, ते दिवशीं रात्रीं राजश्री जिवाजीपंतआण्णा यांनीं गोविंदराऊ देशमुख व लाडूबाई देशमूख यांज ला बोलावूं पा।. तेथें उभयतांहि गेलीं. त्याजवरी तेथें जाबसाल पडला कीं लवळियांत श्रीतळजाईची होळी होते. तेथें त्या होळीस देवाची पोळी सालास लागत असते. त्यास, यंदा होळी पडावयास कारण काय ? ऐसें त्रिंबकराऊ याजला पुशिलें. त्याणीं जाबसाल केला की, बाईची व आमची चित्तशुद्ध नाहीं. यामुळें आह्मीं दोही दिल्ही. तेव्हां ते बोलले की, चित्तशुद्ध नाही, तर तुह्मी त्याणी जें बोललें तें बोलावें. देवाची होळी पाडावयास गरज काय ? तेव्हां ह्मणाले आह्मापासून अंतर पडिलें. याउपर होळी सुखरूप करावी. त्याजवरी जिवाजीपंत होळी जाळावयाची आज्ञा केली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
कार्तिक मास.
शुद्ध ९ शुक्रवार. बाबदेव भट ( कोरें ).
वद्य ६ बुधवारी राजश्री अयाबा मुजुमदार यांची स्त्री रोजमजकुरीं प्रात:काळीं वारली.
मार्गेश्वर.
मार्गेश्वर वद्य १२ बुधवारी साहा घटका रात्र जाली ते वेळेस बाजी देवाजी यास वैकुंठवास जाला. आमरणपर्यंत सावध होते. अंतसमयीं सव्वाशें रुपये धर्म केला. दहन संगमच्या खड़काअलीकडे वाळूवर केलें. मंत्राग्री दिल्हा. राघो देवाजी याणी क्रिया केली. तीन प्रहर रात्रीं दहन करून घरास आले. सन हजार ११६४, शके १६७६, भावनाम संवछरे, मार्गेश्वर वद्य १२ बुधवार, छ २६ सफर.
पौष मास.
शुद्ध १५ रविवार. राजश्री जनार्दनपंतबाबा फड़णीस याजकडे कल्याणराऊ व बहिरोपंत रात्री जाऊन जेजूरीचे यात्रेचें वर्तमान सविस्तर सांगितले. त्याणीं दिवाणचा कागद लेहून जासूद पाठविला. बापूजी महादेव कमाविसदार यासी दोघां देशमुखाचा काजिया आहे. त्यास श्रीमंतापाशी हुजूर उभयतां गेले आहेत. याजकरितां दोघांच्या गुमास्तियांपासून जत्रेचें कामकाज मोर्तब न करवणें, तुह्मी करा, आणि तेथून विल्हें लागेतोंपर्यंत तुह्मी कामकाज करा. त्यावरून जासूद जाऊने नर्हेर त्रिंबक मोर्तब दोनप्रहर केलें. मग उठोन घरास. बापूजी महादेव मोर्तब करितात व जत्रा अमानत जाली, ऐसें जालें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री गजानन.
स्मरण
आश्विन वद्य ३ गुरुवारी खंडो मार्गेश्वर शुद्ध ४ सह ५
विसाजीची सून महादाजी खंडे- सोमवारी दोन घटका रात्रीं अव-
रायाची स्त्री मृत्य पावली. शीस देवआज्ञा जाली. रंगो मोरे-
आनंदीबाई निंबाळकर, उमा- श्वर कुलकर्णी मौजे लवळें ता।
बाईची लेक, देशमुखाची सासू, कर्यात सासवड.
अकळुजेस होती. तीस बरें वाटत
नव्हतें. तिचा काळ जाला.
तेथून कागद आले. छ २
रा।खर सन ११६४, शके
१६७६ भावनाम संवछरे. माघ
मास.
आश्विन वद्य ३ सह ४स रात्र दाहा घटका जाली. तेवेळेस रामचंद्रबावाचा काल जाला, परलोकास गेले. दोनप्रहर रात्रीं घराहून बाहेर काढून वोंकाराजवळ नेले. तेथें दहन केलें. त्यांची बायको दारकाबाई याणीं सहगमन केलें. श्रीमंत राजश्री भाऊ समागमें गेले होते. वगैरे समस्त मंडळी गेली होती. तीन प्रहर तीन घडी रात्र जाली तेसमयीं अग्न दिधला. उजेड़ावयास घरास आले. शके १६७६ भावनाम संवछरे आश्विन वद्य ३ सह ४. ज्वराची वेथा जाली होती. सातवे दिवशीं काल जाला. चार दिवस बोलत होते. तीन दिवस बोलले नाहीत. येणेंप्रा। जालें.
आश्विन वद्य १० शुक्रवारी आप्पा देव यांजला देवआज्ञा चिंचवड ज़ाली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १७२
श्री १६२० आश्विन वद्य ८
श्री सकलगुणमंडित अखंडितलक्षुमीअलंकृत राजमान्य राजश्री अनाजी जनार्दन देशाधिकारी व देशलेख(क) वर्तमान व भावी सुभा प्रांत वाई गोसावी याप्रती श्रीकराचार्य पंडितराउ आसीर्वाद राज्याभिषेक शके २५ बहुधान्य सवत्सरे आश्विन बहुल अस्टमी रविवासरे ह्मैशगिरी गोसावी याणी सिधनाथवाडीस समाधी घेतली आहे ह्मणोन सागरगिरी याणे हुजूर सातारेयाचे मुकामी येऊन विदित केले जे तेथे समाधीस अतीतअभ्यागत येतात त्यास अन उदक द्यावे लागते आणि आपण अतीत आहे तरी स्वामीने काही इनामभुमि दिलीयाने अतीत अभ्यागतास अनउदक देऊन स्वामीच्या राज्यास कल्याण इछून राहून ह्मणोन श्रुत केले त्यावरून मनास आणिता अतीत अभ्यागत येतात त्यास अनउदक द्यावे लागते यानिमित्य यास इनाम जमीन नूतन मौजे मजकूर ता। प्रा।मजकूर पैकी जमीन बिघे ५ पाच रास दिले असे सदरहू पड जमीन विसा पाडाचे मोइनने नेमून + + तीन प्रतीने नेमून देणे कुलबाब कुलकानू हालीपटी पेस्तरपटी खेरीज हकदार करून दिल्हे असे याचे शिष्यपरपरेने चालवीत जाणे प्रतिवरस नूतन पत्राचा आक्षेप करीत नव जाणे तालिक लिहोन घेऊन मुख्य पत्र परतोन देणे जाणिजे छ २० रबिलाखर सुहूर सन तिसा तिसैन अलफ पा। हुजूर* हे आशीर्वाद
छ ६ रमजान मुकाम सिधनाथवाडी
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री.
शके १६७६ . हालीं पातशहा जाला आहे त्याचें नांव, मौजेद्दिनाचा लेक, उमर सा वरसें. नांव शिक्कियांतीलः-
बीजरजसीक्के साहेब कीरानी
ऐनुद्दिन बादशा अलमगीर सानी
रुपयावर येणेंप्रमाणें सुरती रुपयावर लिहिलें आहे. मूळ नांव ऐनुद्दिन.
आश्विनमास.
शुद्ध ४ शुक्रवारी हात तोडिले, तांब्रपत्रामुळें.
शुद्ध ७ सह ८ सोमवारीं वासदव जोशी यासी देवआज्ञा सकाळच्या प्रहरीं जाली.
शुद्ध १० गुरुवारी कनोजी यादव माळी हे माळवियांत पांचसात वरशें गेले होते. त्यास त्याजला देवआज्ञा जाली ह्मणोन खबर आली.
शुद्ध १२ मंदवारी अबळेकर दरेकर याचें दिव्य पिलाजी दरेकराच्या भांडणाबाबत घ्यावयास राजश्री नारोपंतनाना व देशमुख देशपांडे गेले. रविवारीं दिव्याचें साहित्य करून जेजूरीस श्रीच्या कासवावरीं होमास आरंभ केला. पुढें होमादिक कर्म जाल्यावरी कढई ठेवावी तों भोंवरगांवचे गोत व देशमुख देशपांडे भानगडीस पडोन, दिव्याचा मजकूर राहून दोघांची समजाविषी केली.
शुद्ध १३ सोमवारी जेजुरीहून निघून मालशिरस प्रा। सुपें व मौजे पिसाव प्रा। पुणें येथील शिवेचा कजिया होता. तो मनास आणावयास गेले. ते दिवशीं मालशिरसांत जाऊन मु॥ केला. तेथें आठ नव रोज मु॥ होता. गोपाळपंत मोकाशी याचे घरीं राहिले होते. जमिनीची पाहणी तेथून केली. त्याजवरी तेथून कुच करून भांडणाचे जमिनीवरी पासर आहे तेथें ओढियाअलीकडे मु॥ केला. तेथें पंधरा ( पुढें गहाळ )
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
भद्रपद मास.
शुद्ध ३ बुधवार.
बापूस बरें वाटत नव्हतें, राणोजी बावकर शेताहून
त्यामुळें हैराण होऊन पोट रात्रीं घरास आला आणि
दुखत होतें. पाहटे मेला. पाहटे मेला.
शुद्ध ९ मंगळवार. श्रीदेव चिंचवड, वानवडीहून पर्वतीस आले. श्रीमंतांनीं डेरे राजश्री मोरोपंत नाना याचे बागांत दिल्हे. श्रीमंत भाऊ डेरेयासीं देवाकडे येऊन गेले.
शुद्ध १० बुधवार, श्रीमंत नाना व भाऊ श्रीचें दर्शन करून गेले.
शुद्ध ११ सह १२ गुरुवार. श्रीमंत उभयता प्रसादास आले. त्यांस वस्त्रे देऊन वाटे डेरियांतून लाविले.
शुद्ध १३ शुक्रवारीं श्रीदेव श्रीमंताच्या वाडियांत येऊन, भाऊ दरवाजियापावेतों सामोरे येऊन, वाडियांत नेऊन, श्रीस शाल १ व धोतरजोडा १, मोतींस पदकें सुमारे २ दोन, मुलास त्यांचे कडीं सुमार ३ तीन दिल्हीं. वस्त्रे अवघे भाऊबंद वगैरे मिळोन गाठोडीं बांधोन दिल्हीं. तिवटें २५ व शेले २५ एकूण पन्नास सणगें दिल्हीं. याखेरीज देवाचे बायकांस लुगडीं सुमार १२ बारा दिल्हीं. ऐसा बहुमान करून नदीपार चिंचवडास गेले.
शुद्ध १५ रविवार. खामगांव बु॥ व येवतकर यांचे शिवेचे भांडण होतें. यासी गोत भरतगाऊ व राहू व दहीटणे व माळशिरस मिळवून जामीनकतबे घेतले. आणि खामगांवकर निळनाक महार याणें मान घेऊन शिवेनें चालेला. त्यास कांहीं खताखानत जाली नाहीं. खामगांवकर खरे जाले. येवतकर खोटे जाले. येवतकरापासून कतबा लेहून घेतला कीं, आपण खोटे. दिवाणांत कतबा घेतला. असें जालें.
वद्य २ मंगळवारी अवशीस रात्रीं भिऊबाई टुल्लीण, खंडो रघुनाथ याचे सासूस देवआज्ञा जाली. राघो देवराऊ याणें हातीं मडकें घेऊन विस्तो नेला.
वद्य ३ बुधवार. मावजी इंगळे दिम्मत देवजी ताकपीर, पा। मौजे चिखली, ता। हवेली, यासी न्हावी गोसावी यांची माणसे लावून पागोटें काहाडून पिसोडे बांधोन बाजाराबाजार हिंडोन माथा शेंदूर व मुलापासून माळ घातली. त्यावर नारोपंतनानानीं माणसें पाहून चावडीस नेलें.
वद्य ४ गुरुवार. मुजफरजंग गारदी याजकडील दिवाण होता खासगत. त्यास ती प्रहरी रात्रीं त्याचें डोकें कापलें. श्रीमंत उभयतां थेऊरास गेले होते. त्यांची कफन आणोन त्यास माती दिल्ही. डोकें कोण्ही मारलें त्याचें ठिकाण लागत नाहीं.
वद्य ११ गुरुवारीं बहिरोबा रात्रीं परसांतल्या माळ्यावरी भेऊन माळ्याखालें उडी टाकिली. खाले माकणीवर पडोन मांडी जाया जाली. मग कमानगार आणोन बांधली.