श्री.
स्मरण. छ २ साबान अधिक जेष्ठ शु॥ ३ बुधवार ते दिवशीं श्रीचें पत्र चिंचवडीहून लक्षुमणपंत ह्यांच्या नावें आलें आहे की, श्रीमंत राजश्री पंत प्रधान यांचे पत्र आलें आहे कीं, खोल्यास प्राश्चित्त देणें, त्यास आठघरियाचा व धर्माधिकारियाचा कलह लागला आहे, याचा विचार काय करावा तो लि॥. त्याजवरून तेंच श्रीचें पत्र राजश्री जिवाजीपंत आण्णा यास नेऊन रामाजीपंत परसांत अंघोळीच्या जागियाअलीकडे दाखविलें. तें त्यांनी वाचून पाहिलें आणि सांगितलें की, श्रीमंतांनीं श्रीस पत्र दिल्हें आहे त्याप्रमाणें श्रीनीं करावें आणि ब्राह्मणांस मुगत करावें, कोण्हाचा उजूर धरूं नये. ऐसें सांगितलें. त्याजवरून ऐसेंच पत्र श्रीस लेहून लक्षुमणपंताच्या नांवें दिल्हें. सन ११६४.
सन ११६५ शके १६७७ युवानाम संवछरे आषाढमास.
आषाढ वद्य १० मंदवारीं राजश्री शिदोजी नरसिंगराऊ शितोळे देशमूख प्रा। पुणें याचे घरीं श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांनी चौकी बसविली. कारण कीं, देशमूख मजकूरांनीं कलवंतीण राखली आहे, हे खबर त्यास कळली. त्याजवरून चौकी बसविली कीं, कलवंतीण पा। देणें. त्यास, चौकी तिसरा प्रहरपावेतों बसली. दोन चार वेळां श्रीमंताजवळ बहिरोबांनीं विनंति केली; परंतु त्यांणीं ऐकिलें नाहीं. शेवटीं मातुश्री लाडूबाई व जगन्नाथपंत व नरसिंगराऊ दि॥ पागा हुजूर ऐसे भाऊकडे जाऊन चौकी उठवावयाची परवानगी घेऊन चौकी उठविली. भाऊनीं लाडूबाईस ताकीद करून सांगितले कीं, याउपरि ऐसें ऐकलें तरी कामास येणार नाहीं. ऐसें जालें.
आषाढ वद्य १० मंदवारीं वासू देव यासी एकाएकीं तरळेची भावना होऊन मृत्य पावले. त्याचें कर्मांतर निळोबा देव, आपा देवाचे नातू यांनी केलें.
श्रावणमास.
शुद्ध ३ रविवारी श्रीमंत राजश्री रघुनाथपंतदादा हिंदुस्थानांतून स्वारी करून आले. ते रोजमजकुरीं मांजरी बु॥ येथें नदी उतरून अलीकडे आले. त्यांचे भेटीस श्रीमंत राजश्री बाळाजीपंडित व राजश्री भाऊ ऐसे बहुत समारंभेकरून गांवांतून निघोन सामोरे गेले. वानवडीजवळ दीपदर्शनीं भेटी जाल्या. आणि तैसेच देवदेवेश्वराच्या दर्शनास गेले. तेथून दर्शन करून रात्रीं मिरवत समारंभेकरून आपल्या वाडियांत आले. ते दिवशी त्याजला नजर करावयासी राजश्री शिदोजी नरसिंगराऊ व गोविंदराऊ शितोळे देशमुख प्रा। पुणें हे नजर करावयाकरितां पुढें गेले होते. बरोबर राघो विनायक गेले होते. तेसमयीं नजरेचा प्रकार येणेंप्रा। जाला ( पुढें कोरें.)
श्रावण शुद्ध ४ सोमवारीं श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान यांची स्त्री सौ। गोपिकाबाई प्रसूत जाली. पुत्र जाला. श्रावणमासचे दक्षणेकरितां ब्राह्मण जमा जाले होते. त्यास पुत्र जाला ह्मणोन एकएक रु॥ ब्राह्मणास दक्षणा दिल्ही.
श्रावण शुद्ध ६ बुधवारीं श्रीमंतानीं श्रावणमासचे दक्षणेस रमणियांत दक्षणा द्यावयाचा प्रारंभ तिसर्या प्रहरा केला. दक्षणा बरीच उत्तम प्रकरें दिल्ही. ब्राह्मण शुक्रवारी संध्याकाळी सुटले.
शुद्ध ९ मंदवारी राजश्री राघोबादादा, श्रीमंताचे भाऊ, याची स्त्री प्रसूत जाली. कन्या जाली. ती संध्याकाळी वारली.
शुद्ध १२ सोमवारी जयाजी शिंदे याजला माळ्यानें देवपूजा करितेसमयीं मारिलें. ठार केलें ह्मणोन खबर रोजमजकुरीं आली. व राजश्री राघोबादादा यांचे स्त्रीस बरें वाटेना ह्मणोन श्रीमंतानीं हस्तिदान वगैरे दानें गणेशभटाचे घरीं दिल्हीं.