कार्तिक मास.
शुद्ध ९ शुक्रवार. बाबदेव भट ( कोरें ).
वद्य ६ बुधवारी राजश्री अयाबा मुजुमदार यांची स्त्री रोजमजकुरीं प्रात:काळीं वारली.
मार्गेश्वर.
मार्गेश्वर वद्य १२ बुधवारी साहा घटका रात्र जाली ते वेळेस बाजी देवाजी यास वैकुंठवास जाला. आमरणपर्यंत सावध होते. अंतसमयीं सव्वाशें रुपये धर्म केला. दहन संगमच्या खड़काअलीकडे वाळूवर केलें. मंत्राग्री दिल्हा. राघो देवाजी याणी क्रिया केली. तीन प्रहर रात्रीं दहन करून घरास आले. सन हजार ११६४, शके १६७६, भावनाम संवछरे, मार्गेश्वर वद्य १२ बुधवार, छ २६ सफर.
पौष मास.
शुद्ध १५ रविवार. राजश्री जनार्दनपंतबाबा फड़णीस याजकडे कल्याणराऊ व बहिरोपंत रात्री जाऊन जेजूरीचे यात्रेचें वर्तमान सविस्तर सांगितले. त्याणीं दिवाणचा कागद लेहून जासूद पाठविला. बापूजी महादेव कमाविसदार यासी दोघां देशमुखाचा काजिया आहे. त्यास श्रीमंतापाशी हुजूर उभयतां गेले आहेत. याजकरितां दोघांच्या गुमास्तियांपासून जत्रेचें कामकाज मोर्तब न करवणें, तुह्मी करा, आणि तेथून विल्हें लागेतोंपर्यंत तुह्मी कामकाज करा. त्यावरून जासूद जाऊने नर्हेर त्रिंबक मोर्तब दोनप्रहर केलें. मग उठोन घरास. बापूजी महादेव मोर्तब करितात व जत्रा अमानत जाली, ऐसें जालें.