श्री.
स्मरण, मानाजी पोकळे मौजे धायरी याणें येऊन विदित केलें कीं, रखमाजी पोकळा याची ह्मैस १ व टोणगा १ ऐशीं आवाडामध्यें भुसावर आलीं होती. त्यास दसु पोकळा याणें ढोरास पिटतेसमयीं भुसावर चढोन ह्मैस पडली. त्यामुळें फाटली. मग तीस उठवावयासी लामला तो उठेना. मग त्याचे घरास जाऊन रखमाजीचा भाऊ परसोजी पोकळा यासी आणोन ह्मैस दाखविली. मग खंडोजी बोलला कीं, आपल्यास ह्मैस लागत नाहीं. तूं बरें कर, वाईट. ऐसें ह्मणोन तैशी रात्री तेथें पडली. मग दुसरे रोजी खंडोजीचे दारी उचलोन नेली. रात्री मेली. त्यास मोकाशियाकडे फिर्याद रखमाजी व खंडोजी जाऊन सांगितलें. त्यांनी गांवकरी मिळून वर्तमान पुसिलें. त्यावर आवजी पोकळे व कुळकर्णी व मोकाशी यांसी बोलिले की, ज्याने ह्मैस मारली त्यास प्रायश्चित्त देऊं. त्यावर पारावर येऊन दसू पोकळा व मानसिंग पोर यासी आणोन चौकशी केली. केली तेव्हां दसूकडे प्राश्चित्त ठरवलें. मानसिंगाकडे कांहीं नाहीं. दसू पोकळा एक महिनाभर बोडका हिंडतो. मोकाशी गंगेस गेले आणि गांवकरी निकाल करून सोयीस लावीत नाहीत, ह्मणोन मानाजी पोकळे याणें सांगितले. शके १६७७ युवानाम संवछरे, चैत्र वद्य ८, गुरुवारी येऊन सांगितले. छ० २० जा।खर.
वद्य १४ गुरुवार. राजश्री जिवाजीपंत अण्णा यास उभयतां देशमुख व बाई व बहिरोपंत व रामाजीपंत याजकडील विठोबा व आबाजी बाजी, सटवोजी वाणी ऐसे फरासखाना होता तेथें गेले. नजरेचा मजकूर गकारपूर्वकास पुसिला. त्याणीं पूर्वी पा। गुमास्ते आहेत त्याणीं पागोटें बांधावें, आणि उभयतांनीं रामराम करावा, नाहींतर दोन करीत आलों, ऐसे सांगितले. जाबसाल उभयतांचे जाले. शेवटीं सिधांत कीं, श्रीमंताचे भेटीस जावें, त्यांस पुसोन भेटीचा निर्वाह होणें तो होईल. ऐसे करार आण्णानीं केला असे.
शुक्रवार वद्य ३०.
अबूलखेर पीरजादे दर्गा शेख सल्ला याजकडोन कर्ज राजश्री जिवाजी आण्णा याचें विसावरसाचें होतें. मुद्दल रु॥ २०० दोनशें होते.
त्याबद्दल बुरजपट्टी व सेवापट्टी गहाणवट होती. त्यांना मध्यें खात होते. सांप्रत्य रदबदल करून दोनशें रुपये देऊन फारकती लेहून घेऊन, शेत अबुलखेर याचा लेक शेख चांदपीरजादे याच्या हवाला करूं, असें सदरहूचें खत अगर वहीवर हिशेब कितेब आहेत, त्यांचे ठिकाण लागलें नाहीं. मोघमच घेतली फारखती. बालकृष्णपंतीं करार केला की वहीवर करार अगर खत सांपडेल आणि त्याजवर मुद्दल जे असतील त्यांत दोनशें मजुरा द्यावें, बाकी निघतील ते घ्यावे, ऐसें ते बोलले. त्याजवरून अजमदुल्ला यासी सांगितले की, येणेंप्रो। आहे. त्याणीं कबूल केलें. उमगलियावर जें निघेल तें घ्यावें, ऐसें करार करून फारकत त्याचे स्वाधीन केली असे.
वैशाखमास.
शुद्ध १ मंदवारीं स्वारींतून श्रीमंत राजश्री नाना व भाऊसाहेब थेऊरीं मुक्काम दोन रोज करून तेथून कुच केलें ते ती घटका रात्रीं पर्वतीहून घरास दाखल जाले. राजश्री जिवाजीपंत आण्णा व राजश्री बाबा फडणीस श्रीमंतास सामोरे गेले. त्याजबरोबर रा। शिदोजी नरसिंगराऊ व गेविंदराऊ शितोळे देशमूख भेटीस गेले. तेथे भेटीचेसमयीं गोविंदराऊ ह्मणों लागले की, आपण दुसरी नजर करूं. तेव्हां शिदोजी नरसिंगराऊ यानीं राजश्री जिवाजीपंत आण्णास सांगितले की, आजता। एक नजर वडिलाची होत आली आहे, सांप्रत नवीन गोविंदराऊ दुसरी नजर करूं ह्मणतात याची वाट काय ? तेव्हां अण्णानीं उभयतां देशमुखास आज्ञा केली की, आह्मी श्रीमंतास ये गोष्टीचा मजकूर पुसों, मग तुह्मी नजर करणें, तोंवर उभयतांहि नजर न करणें. ऐसे सांगितले. आणि जिवाजीपंतीं श्रीमंत राजश्री नानासाहेबास विनंति केली की, उभयतां देशमुख नजरेकरितां भांडतात, पुरातन एक नजर वडिलांची घ्यावयाची चाल आहे, हालीं गोविंदराऊ दुसरी करूं ह्मणतात, त्याची आज्ञा काय ? तेव्हां श्रीमंतानी आज्ञा केली की, वडिलानीं नजर करावी एक, ती आह्मी घेऊं, दुसरी घेणार नाहीं ऐसें बोलले. त्याजवरी शिदाजी नरासिंगराऊ यानीं नजरेचीं देन तिवेंट दिल्हीं. त्याजवरी गोविंदराऊ यानी तिवटें द्यावयास काहाडिलीं तीं श्रीमंत माघारी जिवाजीपंताजवळ दिल्हीं की, ज्याची त्यास माघारी देणें, दुसरी नजर आह्मी घेत नाहीं. त्याजवरून जिवाजीपंतीं गोविंदराऊ याची वस्त्रें माघारी दिल्हीं. याप्रों। जालें.
शुद्ध ३ सोमवार. धोंडोपंत कुलकर्णी मौजे माण ता। हवेली हा आपले सुनेशीं गेला. त्याचा लेक गुजराथीस तीन चार वरसें गेला होता. तोहि आला. त्याचे अंगीं लागलियावर सुनेस घेऊन पळोन गांवांतून गेला.
शुद्ध ४ मंगळवारी बाजी कान्हो व सटवाशेट परमळराऊ व तिघेजण माणसें घेऊन तिसर्या प्रहरा जेथें देव आहे ते घरीं चिंतामणभट र्धा। याचे सारवावयासी चिखल केला. तें वर्तमान कळलियावर राजश्री जिवाजीपंत आण्णा यासी वर्तमान सांगितले आणि त्याचें माणूस पाठविलें कीं, तुह्मीं उभयतां आह्मासी भांडतां आणि न पुसत काम करावयासी गरज काय ? आणि काम राहविलें. बाजी कान्हो आण्णाकडे येऊन सांगितलें की, काय आज्ञा ? त्यास, आण्णा बोलले की, तुह्मीं सारवावयासी काय ह्मणोन गेलेस ? ते ह्मणाले कीं, आह्मीं पूर्वापार करीत आलों आहों, याजकरितां गेलों. त्यास जनोबाकडील माणूस काय ह्मणोन नेलें ? वरसास नेत नसतां आणि यंदां काय ह्मणोन घेतले ? त्यास हे ह्मणाले कीं, नानाचें पत्र जनोबास आणिलें आहे, आमचे जिल्हेदार आहेत, ह्मणोन नेले. आण्णा बोलले कीं, जनोबास खावंदाची आज्ञा आहे कीं ? आपल्यापासून माणूस दिल्हें, तेव्हां खावंदाची आज्ञा नाहीं ऐसें कळलें. मग काम राहवलें. खावंदाचेहि कानावर पडले. परंतु जाबसाल जाला नाही. बुळबुळीत जालें. श्रीमंतांचे कानावर घातलें. परंतु कांहीं जाबसाल साफ केला नाहीं. श्रीची कथा राहिली. मांडव घातला नाहीं. गोविंदराऊ यांणी आपले घरी वरसास ब्राह्मणभोजन घालीत असतात. त्यास यंदा बाजी कान्हो याचे घरीं करविलें आहे. ऐसे वर्तमान आहे.
वद्य १४ शुक्रवारीं सकाळचे प्रहरीं लाडूबाईची व राजश्री शिदोजी नरसिंगराऊ याची बोली चाकरावरून जाली. देशमुखांनी चाकरास मारिलें ह्मणोन बाईनीं अबोल केले. त्यावरून देशमुखांनीं घोड्यावर जीन ठेवून सखूबाईस व राजसबाईस घेऊन लवळियास रुसून गेले.
वद्य रुजू. अधिक शुद्ध १ रविवारीं राजश्री शिदोजी नरसिंगराऊ लवळियाहून तिसर्या प्रहरा निघोन संध्याकाळी गुराबरोबर पुणियास आले. सखूबाईस व राजसबाईस लवळियांत ठेविले, आणि आपण व बहिरोबा ऐसे आले.