[ ३७५ ]
श्री शक १६७९ पौष.
राजश्री दामोधरपंत गोसांवी यांसिः--
स्ने॥ मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि. तुह्मास जाऊन आज पाच रोज जाले. आदियाप निर्गमाची गोष्ट करून आले नाहीत. पातशाहास आर्जी आणविली. त्यास तुह्मी गेलेस तेव्हां आर्जीचा मजकुरही नवता. खिलत बहुमान देखील आणावया कांहीं विलंबाची गोष्ट नवती. हालीं तुमची चिट्ठी विलंबाचीसी दिसोन येती. तर हे गोष्ट कार्याची नाही. याउपरि आह्मांस दिरंगाखालें आणि दिसगतीवर टाकावयासी अनकूळ पडत नाही. याजकरितां श्रीमंताचीही चिट्टी आली आहे. आणि याउपर विलंब न लावितां यादीप्रों। कामकाजाचा गुंता उरकून जल्दं येणें. जर दिसगतीचीच गोष्ट असली तर साफ जाब घेऊन येणें. परंतु याउपरि एक दिवस दिरिंग कार्याचा नाही. जे याद ठराऊन मोकरर करून दिल्ही त्यापैकी एक गोष्ट उणीअधीक केली कार्यास येणार नाही. तसेच असेल तर तुह्मी साफ उठोन येणे. विलंबाखाले घालून न राहणें. बहुत काय लिहिणें ! हे विनंति.
मोर्तब
सूद.