[ ३८३ ]
श्री
शक १६८० चैत्र वद्य २.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोदर माहादेव गोसावी यासीः--
सेवक सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. तुह्मी विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. कारभारीयांनीं पेचपाच केल्यावरून श्रीमंत राजश्री दादासाहेबी इतराजी केली; दबऊन मागती करार केल्याचा विस्तार विस्तारें लिहिला तो कळला. ऐशास, येविशीचें उत्तर तीर्थरूपांनी लिहिलें आहे, त्यावरून कळेल. सारांश तुह्मांकडे अंतरे आहेत, ऐसें सरदारांनी व बहुतांनी सांगितलें तथापि, तितकीहि क्षमाच जाहाली. तुह्मी आपलेकडे दाहा हजार रु॥ आहेत, ह्मणून कतबा लिहून दिल्हा असतां, अलीकडे तों रा॥ बापूजी माहादेवांनी पेचपाच वकिली रीतीनें बहुत बहुत केले. आह्मी दूर आहों ! लिहिणार आपलाले मतलबानरूप लिहितात ह्मणावें, तर प्रत्यक्ष चिरंजीव राजश्री दादा खावंद तिकडे गेले, त्यांचे प्रत्ययास आलें. त्यांनी लिहिलें व बहुतांनी लिहिलें असतां तुह्मी आपलेकडे अंतर नाहीं ह्मणोन विस्तार लिहिल्यास, प्रमाणांत येईल न ये, हे तुह्मांस न कळेसें काय आहे ? थोरथोरांनी खावंदासी पेचपाच केले, त्याचा परिणाम कधीच लागला नाहीं. तेथें, तुमचा विषय बुनियाद किती ? तुमच्या बापांनीं निष्ठापूर्वक चाकरी केली; यास्तव तुह्मांस, तुमच्या बंधूस वकालत सोपिली असतां बापूजी माहादेव यांनी पाया सोडून बेपायाच वर्तणूक केली ! यांत तुमचें कल्याण नाहीं ! अतःपर तीर्थरूपांचे आज्ञेप्रों। व चिरंजीवांचे मर्जीनरूप वर्तलियास कल्याण असे. अन्यथा तुह्मांस न कळेसें काय ? एतद्विषयीं बापूजी माहादेव यास उत्तम प्रकारें सांगून ज्यांत खावंदाची सेवा घडे, तुमच्या सेवेचा मजुरा होय, चिरंजीव तुह्मां उभयतांची तारीफ करीत, तें केल्यास, सर्वहि गोष्टीनें तुमचें बरें येथून व परमेश्वरापासून आहे ! हें पुर्ते समजोन पाया धरून निष्ठापूर्वक वर्तणुक करणें. जाणिजे. * चिरंजीवांनीं बोलाविलें असून बापूजी मनास येईल ते वलगना करून न आले. असो ! पुढें आज्ञेप्रों। सेवा करून दाखविणें; यांतच तुमचें कल्याण आहे. रा॥ छ १६ साबान. बहुत काय लिहिणें ?
( लेखनसीमा ).