[ ३८२ ]
श्री शक १६८० चैत्र शुद्ध १२.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री नाना स्वामीचे सेवेसोः--
सेवक बापूजी माहादेव व पुरुषोत्तम माहादेव कृतानेक सा। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ ११ माहे शाबान मुकाम सिरहंद जाणोन स्वकीय कुशललेखन करीत गेलें पाहिजे. विशेष. आपणांस वरचेवर पत्रें पाठवितों, परंतु प्रत्योत्तर एकही येत नाही. त्यास ऐसें नकरितां सदैव पत्रीं कुशलार्थ लिहीत गेलें पाहिजे. हालीं शाहा अबदाली लाहोरीहुन कूच करून सडे खारीनशी येऊन सिरहंदेनजीक सिखांची लढाई मारून, मग अल्ला जाठाचे मुलकांत स्वारी करून, जाठ मजकुरास धरून मुलकास मारिलें. जाठास समागमें माघारा लाहोरास घेऊन जाऊन कंधारेस पठविलें, ह्मणोन वृत्त आलें. नजिबखानानें सडे खारीनशीं शतद्रूचे मुकामीं जाऊन मुलाजमत करून माघारा दिल्लीस आला. दुसरे : शाहानशाहाचे आह्मास बोलावयाचे तीनचार तालिकचे आले. याजकरितां तिकडे चाललों आहों. तेथें गेलिया वृत्त होईल तें लिहून पाठवू. वरकड वर्तमान चिरंजीवाचे पत्रावरून कळों येईल. सदैव कृपा केली पाहिजे. भेट होय तो सुदीन ! हे विनंति.