[ ३७६ ]
श्री शके १६७९ पौष वद्य ६.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री बाबूराव दादाजी गोसांवी यांसिः---
सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार सु॥ समान खमसैन मया व अलफ. राजश्री बापूजी महादेव यांची जप्ती पेशजी केली होती. यास कांहीं करारमदार मशारनिल्हेवर करून मोकळीक केली. ती पत्रें अलाहिदा सादर आहेत. त्यास, सदरहू ऐवजपैकी पांचालाखाची निशा राजश्री चिंतामण दीक्षित यांहीं केली. त्या ऐवजी झांशीस जप्तीची वस्तभाव मशारनिलेची होती ते गहाण दीक्षितांहीं घेतली आहे. तरी तुह्मी वकिलाची वस्तभाव वगैरे जें जप्तींत आणिलें असेल तें दीक्षिताचे हवाला करणें. जाणिजे. छ १९ जमादिलावल. आज्ञाप्रमाण.