[४०५] श्री. २७ जुलै १७५२.
पौ। आषाढ श्रावण शुध्द ११ शके १६७४.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराऊ प्रधान कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति. येथील क्षेम ता आषाढ वद्य त्रयोदशी पावेतों यथास्थित असों. विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावलें. दरगाहाकुलीखान याजविशीं कितेक प्रकारें लिहिलें व गाजुद्दीखान व राजश्री मल्हारजी होळकर व राजश्री जयाजी शिंदे यांस पत्रें लिहून पाठवावीं ह्मणून लिहिलें, तरी येविशीं आपण पूर्वीं पत्र लिहून पाठविलें होतें. त्यावरून पूर्वींच पत्रें लिहून पाठविलीं आहेत. + तुह्मींही गुप्त प्रकारें सरदारांस पत्र लिहिणें. जे जे ये प्रसंगीं चाकरी करून दाखवतील, त्यांचें बरेंच होईल यांत संशय नाहीं. आपण याअन्वयें निशा करावी. भागानगराकडील आपण वर्तमान लिहिलें. पुढेंही जरूर तिकडील अंतरबाह्य ठिकाणीं लावून, त्वरेनें पावे तें करावें. हे दिवस कामाचे फार आहेत व नर्मदा गाजुदीखान उतरले किंवा नाहीं हेंही जलद लिहावें. कोण इकडे तिकडें हें मनास आणून लिहित असावें. बहुत काय लिहिणें. हे विनंति.