[३९९] श्री. जानेवारी १७५१.
विनंति उपरि आपण सांडणीस्वारासमागमें पत्रोत्तर पाठविलें तें प्रविष्ट जालें. खानाचा आशय दहा पांचांची जागीर द्यावी. वरकड आमच्यानें कांहीं होवत नाहीं. ह्मणून लिहिलें ऐसीयास:-
नवाब थोरले यांची कृपा खानावर आपली इतबारी ऐशी होती; परंतु नवाब कृपण. उत्तमप्रकारें खानास जागीर मनसब देऊन न वाढविलें. नासरजंगाची तों याजवर अवकृपाच होती. हे मात्र रंग राखोन होते. काळगतीनें नासरजंग मेले. आतां फेरोजंगामध्यें सामर्थ्य मजला दिसत नाहीं. त्यास मनसूर अलीखानांशीं बरें येतां कठीण. येथें नासरजंगाचा पुत्र असला अगर भाऊ असला तर उभा करावा. आह्मांस मातबर ऐवज द्यावा. सामील करून घ्यावें. फेरोजंगास ल्याहावें कीं, खामखां तुह्मांस जोर असला तर येणें. आह्मींही जमा होतों. नाना आह्मास रफीक जाले आहेत. फिरोन कडपेकर, नोलकर यांस मारोन घेतों. आले तर बरें. नाहीं तर आह्मीं येकले श्रीकृपेनें पारपत्यास समर्थ आहों. खजाना जमा करावा. तूर्त पंचवीस तीस आह्मांस द्यावा. आपण बाहीर निघावें. आह्मांस भेटावें. वरकडही या देशचे सर्व मोगल जमा करावे. हिदायत मोहिदीखानाचा काय मजकूर आहे ? तिकडे पठाण मातले. लटकी वजीरी करावयापावेतों पातशाहाशीं खुशामत करितात. वजीरी केलिया पातशाहात गेली ऐसी समजावी. इकडे हे पठाण मातले. कोणी वर्षामध्यें आटोपणार नाहीं. रोग नवा आहे तोंच दूर करावा. खानास योग्यता मोठी. आह्मीं जाणतों कीं, नासरजंग मेले तर फेरोजंगाचें नांव घ्यावें. आह्मांस त्यास एक विचार करावें. आमचें कार्य मातबर करावें, आणि हिदायत मोहिदीखान व पठाणास तंबी करावी. पठाण वाढतील, यांनीं दिल्लीस पळत जावें. तेथें यांस कोण पुसतो ? स्थलभ्रष्टता जाहलिया योग्य नाहीं. आमचें कर्ज फेडावें, ह्मणजे सरदार बोलावितों. सर्व एकत्र होऊन पठाणास तंबी करितों. जर न करीत तर मग आहे तें जाऊन उफराटें पठाणाच्या घरी वेरझारा कराव्या लागतील. प्रथम कामापुरतें जवळ या, जवळ या ऐसा बहूमान करितील. पुढें निर्माल्य होतील. आमचें कांहीं जात नाहीं.
आह्मीं तों जप्ती केली. हिदायत मोहिदीखानाबर कमर बांधिली. श्रीकृपेनें प्रसंग पडलियास नवाबाशीं लढाईत वडील वडील न चुकले. आह्मीं हा नव्याचा हिसाब धरीत नाहीं. तेव्हां खान येऊन मिळतील. त्यांत मजा नाहीं व मैत्रीची शान राहात नाहीं. नवाबाचे कबिले सर्व शहरांत ठेवावे. आह्मांस ऐवज मात्र कांहीं शहरावर लोकांपासून तूर्त कांहीं खजीन्यांतून द्यावा. गंगातीरावर येऊन भेटावें. तेच पूर्वेचे सुमारें चालत जावें. शहर आबाद मागें राहील तरच सलाबत पडेल. सुलातानजीचा लेंक हाताखाली घ्यावा. तेथील मराठेही आमचे विचारांत येतीलच. सर्व संवृध्दीची आशा आहे. जर खान हे न करीत तर जे होणें तें तों बरें वायटानें होईलच; परंतु शब्द त्यांवर राहील ऐसें न करावें. तिळमात्र दोष पदरी येत नसतां दिल्ली, लाहोर, मुलतान पावेतों लौकीक खानाचा होईल कीं, खानांनीं, प्रधानास मेळऊन घेऊन नवाबाचे दौलतेचें नांव राखिलें. ऐसें न करितां जोर ज्याचा पोंहचेल त्यास जाऊन भेटल्यास आखर वक्र जाऊन काम कांहीं सज्ज होणें नाहीं. बहुतां दिवसांची त्यांची आमची मैत्री. त्यांचें बरें व्हावें; आमचे कार्य व्हावें. नवाबाचा वंश मुख्य असेल, त्यांचें नांव दक्षिणेंत राहावें. यास्तव लिहिलें असतां कोणता दोष त्यांनीं या मनसब्यास ठेविला ? जर नवाबाचा तोरा कोणी तेथें नसला, व गाजुदीखानांनीं गांडींत शेपूट घातलें, यांणीं आमचेंही न आयकिलें, ह्मणजे येऊन शहर वेढील. त्याचे हवालां करून भेटावें, निरोप घेऊन दिल्लीस जावें, अथवा मक्केस जावें. ऐसें करावें, यांत काय फळ आहे ? जो जवां मर्द आहे त्यानें दोष येत नाहीं. ऐसा समय पाहून, आपलें कार्य व मित्रकार्य संपादून कीर्तीस पात्र व्हावें. उचित असे. १
हें पत्र खानास येकांतीं वाचून दाखविणें. हे विनंति.