[३९८] श्री. १ अक्टोबर १७५२.
पुरवणी राजश्री दादास्वामीस विनंति.
राजे यांचे मतलब लिहिले ते खरेच ! आपण यश घेतील. सारांश, काशींत आपली फौज राहील तोपावेतों भय नाहीं. फौज गेली ह्मणजे चरणाडीचा किल्ला काशीच्या उरावर नवाबाचा आहे. मोठें भय आहे. रा दिनानाथ गेटे येतील. आपण साह्यता करूं, राजे यानें श्रीमंतास व वडिलांस लिहिलें आहे. व गोपाळराव याचा व राजे यांचा करारमदार जाला, लिहिलीं परस्परे जालीं. त्यांची नक्कल पाठविली आहे. ब्राह्मणांस वांचवून आपलें होईल तर उत्तम आहे. सर्व नदर राजे यांची सर्वां गोष्टींनीं आह्मांवर आहे. त्यांचे कारभारी यांसी पत्र लिहिलें. कळलें पाहिजे. बहूत काय लिहिणें. कृपालोभ असो दीजे. इटावेयांत नव लक्ष रुपये सावकार वगैरे लाविले. तमाम बंद धरिले आहेत. काय ल्याहावें ? वजिराचा परामृष करतील तरी वजीर काशीस लुटूं पहातो. परंतु राजा आहे ह्मणून वांचलों आहों. हे कितीक नानाप्रकारचे उपद्रव करणार. ह्मणून सूचनार्थ अगत्य करून लिहिणें. येथें संकट जाणोन लिहिलें. अयोध्येचेकडे श्रीमंतांच्या फौजा उतरल्यानें सर्वही कामें होतील. राजा बळवंतसिंघही भेटेल. विशेष ह्या कामास अंतर पडलें तरी लक्ष ब्राह्मण मरतील. ह्यास अन्यथा नाहीं. मोगल समवेत उगेच आहेत. यश दहा सहस्र ब्राह्मण वांचविल्याचें पुण्य लागेल. यशही मोठें होईल. बहुत काय लिहिणें. कृपालोभ असो दीजे. हे विनंति. मिति आश्विन शुध्द १३ शुक्रवार. हे विनंति.
चरणरज बापूजी महादेव स॥ नमस्कार विनंति. र॥ बाबानें लिहिलें त्याजवरून घोर न करणें. यश घेणें येईल तरी अगत्य घेणें. श्रीमंतांस राजे यांनीं पत्र लिहिलें त्याची नक्कल व गोपाळपंताचें पत्र, करारनामा लिहून घेतले होते तरी, त्याची नक्कल पाठविली आहे. वाचून पहाणें. चित्तास येईल तरी श्रीमंतांस दाखवणें.