[४४८] श्री. २४ डिसेंबर १७५४.
पौ पौष वद्य १ सोमवार
शके १६७६. छ १५ र॥
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम जाणून स्वकीय कुशल लिहीत गेलें पांहिजे. विशेष. आपलें पत्र प्रविष्ट जाहलें. आमचे उदासीनतेचा अर्थ व त्यांचे समाधान करावयाचा विचार लिहिला तो अक्षरशहा अवगत जाहला. आह्मांसही खानाचें पत्र, मक्केस जातों, दस्तक व साहित्यही लागेल तें द्यावें, ह्मणून आलें. ऐशास खान दीर्घदर्शी, खेरीज यासारखें मनुष्य या जिल्ह्यांतून उदासीनतेनें गेल्या आमचें नुकसान व नवाबाचें बहुतच नुकसान. ऐसें शहाणे लोक मानतील. इतकें उदास त्यानें व्हावें हें योग्य नाहीं. विवेकेंकरून नवाबाजवळच रहावें. त्याजविशीं नवाबास आह्मी कधींही सांगायास अंतर करणार नाहीं. व आह्मी सांगितल्यावर नवाबही त्याचें महत्त्व रक्षूनच चालवितील. कदाचित् हा विचार मनास नये तर दिल्लीस जावें. तेथें मातबर शेवा करावी. हाही प्रकार चित्तास नये तर आह्मांजवळ रहावें. हेहीं दौलत स्नेह्याचे मार्गें त्यांचीच आहे. असें कोणतें संकट पडलें कीं, सर्व सांगतात तें न ऐकतां मक्केस जावें ? दोनी पक्षांतून एखादे पक्षाचा बळवोत्तर पाहून, त्याचा अवलंब करून, रहावें, उदास न व्हावें, हा उत्तम पक्ष आहे. तुह्मी त्यांस समजावून सांगून जितकें होईल तितकें करावें. करूं तर नवाबाचा सर्वाधिकार, नाहीं तर कांहींच न करूं, असें ह्मटल्यास कसें कार्यास येईल ? ते खावंद, हे सेवक खावंदाचे व सेवकाचे अढीनें आजपर्यंत कोणाचेंही चाललें कीं काय ? याचा विचार खान पुर्ते जाणतात. तो आपले ध्यानांत आणून, ज्यांत आपलें स्वरूप राहे, नवाबाची चाकरी घडे तें करावें, योग्य आहे. आह्मीही यांचे स्वरूपास अंतर पडे असें कदापि करणार नाहीं. तुह्मीही समजावून सांगोन, ज्यांत त्यांची मर्जी हमवार राहे तें करणें योग्य. सामोपचारें व आपलेकडूनही खानाचें बरें तें करावयास अंतर मागें केलें नाहीं, पुढें करणें नाहीं. परंतु तुटे तों त्यांनींही तोडूं नये. त्यांनीं तोडून गेलियास, शहानवाजखान सूखच मानितील. यास्तव यांनीं तुटे तों न वोढावें, हें अति उत्तम. असें असतां, नच मनास येई तर, सर्व प्रकारें जाहाजाचें साहित्य करूं. मुंबईस साहित्य करून देऊं. इंग्रेजाजवळून साहित्य करून देऊं. जो पक्ष ते अवलंबतील त्याचें सर्व प्रकारें साहित्य करूं. परंतु त्यांनीं न जावें, समजून रहावें, हेंच उत्तम आहे. छ ९ रबिलावल. हे विनंति.