[४४४] श्रीवाडेश्वर समर्थ. २४ सप्टेंबर १७५४.
पो आश्विन शुध्द १५ मंगळवार
शके १६७६ भावनामसंवत्सरे.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
सेवक भिकाजी मराठे कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल आश्विन शुध्द ८ सोमवार पावेतों जाणोन स्वकीय लिहून संतोषवीत असिलें पाहिजे. विशेष. स्वामीचे शरीरास सावकाश नवतें, ह्यामुळें भारी चिंता लागली होती. वेदमूर्ति राजश्री नारायण जोशी आले. आश्विन शुध्द १ रविवारी येथें आले. त्यांनी आरोग्याचें वृत्त सांगितलें तेव्हा परम संतोष जाला. राजश्री रामाजीपंत यांची भेटी मात्र श्रीमंतांची केली. पातशहास पहावयाची आज्ञा केली आहे. जालियावर सेवेसी वृत्त लिहून पाठवितों. आह्मी श्रीमंतांची भेटी घेतली. गुदस्ताचीं खतें आपल्यापाशीं आहेत. त्याचें व्याज द॥ १५ सरकारांतून घ्यावे लागतें. पाठवून द्याल तर हिशोब करून घेऊं. जर विचारास येईल कीं न घ्यावें तर कांही चिंता नाहीं. तैसा जाब लिहून पाठवावा. दरबारचा विचार यथास्थित आहे. खोल पार जाला आहे. जालें वर्तमान सविस्तर मागाहून लिहून पाठवितों. प्रां येदलाबारचेविषयी वेदमूर्ति राजश्री हरी दीक्षित श्रीमंतांस हटकिलें. त्यांनी उत्तर दिल्हें कीं, चिरंजीव राजश्री रघुनाथपंत दादाचें अद्यापि आलें नाहीं. जाब आलियावर जें कर्तव्य तें केलें जाईल. राजश्री वासुदेव जोशी मुरुडकर यांचे शरीरास असाध्य व्यथा आहे. ईश्वर कृपा करील तर पुनर्जन्म होईल. धर्मही दाहा वीस सहस्त्र केला. गजदानही केलें. कळावें. ह्मणोन विनंति लिहिली आहे. चिरंजीव राजश्री सखाराम नाईक यांचा व चिरंजीवाचा परामर्ष व दुकाणाचा सर्वस्वें स्वामी करीतच आहेत. मीं ल्याहावेसें काय? कृपालोभ कीजे. हे विनंति. १०००००.