[४३९] श्री. २९ जून १७५४.
पौ आषाढ वद्य ९ शनवार
शके १६७६
छ २२ रमजान.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव बाबा दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
सेवक रघोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. स्वामीनीं पत्र पाठविलें ते प्रविष्ट होऊन सविस्तर अर्थ निवेदन जाहाला. वेदमूर्ति राजश्री शिवभट साठे यांनी बंगालियाहून आपल्या जोगाच्या दोन लक्ष रुपयांच्या हुंडया पाठविल्या आहेत. त्याचा ऐवज नागपुरी चलनी देऊन, सरकारची लाखास कसर पांच हजार रुपये राहातात ते जमा करून ठेवणें, ह्मणोन शिवभटांनी लेहून पाठविलें आहे. त्यास आपण सराफास ऐवज देविला. ते हुंड्यांप्रमाणें रुपये मागतात ह्मणोन लिहिलें, ऐशियास लवकर अवगत जाहालें. ऐशियास येथील सावकाराचा ऐवज आह्मी नक्त घेतला आहे आणि त्यास ऐवज आपणांकडे देविला आहे, येविशीं पूर्वीच पत्रें व हुंड्या पाठविल्या आहेत. तरी हुंड्यांप्रमाणें आज येथील सावकाराचा ज्याचा त्यास पावता केला पाहिजे. रा छ ७ माहे रमजान. हुंड्यांची मुदत होऊन गेली. ज्या मित्तीस हुंड्या सकारिल्या त्याच मुदतीस रुपये आपले कबज देऊन सराफास देविले पाहिजेत. यांचा संवदा रोकड्या रुपयांचाच केला आहे. हिंदुस्थानाकडील वर्तमान लिहिलें त्यास आपण लिहिलें, त्याप्रमाणेंच येथेंही वर्तमान आलें आहे. निरंतर स्वामीनीं आशीर्वादपत्र पाठवून लोभ करीत असावें. छ मजकूर. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.