Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

येथून पुढें शिवाजीच्या चवथ्या आणि शेवटच्या भागास सुरुवात झाली. नुकताच राज्याभिषेक झाला असल्यानें चोंहीकडे आनंदीआनंद दिसत होता. नवीन स्थापिलेल्या बलिष्ठ हिंदुपदपादशाहीच्या सन्मानार्थ सह्याद्रि पर्वतावरील व समुद्रावरील प्रत्येक किल्यांतून तोफांची सलामी झडत होती. या भागांत शिवाजीस बरीच शांतता मिळाली. विजापुरचें आणि गोवळकोंडचे राज्य घेण्याच्या प्रयत्नास मोंगल सरकार लागले असल्यानें, त्यांनीं शिवाजीस फारसा त्रास दिला नाहीं. गोवळकोंड्यावर मोंगल सेनापतीनें स्वारी केली, पण हंबीरराव मोहिते यांची कुमक वेळेस येऊन मिळाल्यामुळें त्यास माघार खावी लागली. शिवाजीच्या आश्रयामुळें कांहीं काळपर्यंत गोवळकोंडच्या राजाचा बचाव झाला. शिवानीनें कर्नाटकावर स्वारी केली तेव्हा गोवळकोंडच्या राजानें शिवाजीच्या मदतीस आपली फौज पाठविली होती. या स्वारींत शिवाजी अगदीं तंजावरपर्यंत गेला होता. जातां जातां वाटेंत त्यानें वेलोर घेतलें, जिंजी किल्याची डागडुजी केली व म्हैसुरांतून जाणा-या रस्त्यावर फौजेचीं ठाणीं बसविलीं. मोंगलांनीं विजापुरावर सारखी शिस्त धरली. खुद्द विजापूर शहरास वेढा दिला. विजापूरचे आदिलशाही राजे व त्यांचे प्रधान अगदीं गांगरून गेले. त्यांस तरणोपाय कांहीं सुचेना. तेव्हां त्यांनी शिवाजीची मदत मागितली. शिवाजीनें पूर्वीचा वैरभाव विसरून आपली फौज विजापूरच्या साहाय्यास पाठविली. शिवाजीच्या सैन्यानें सुरतेपासून बहाणपुरापर्यंत मोंगलाचा प्रदेश उनाड करून मोंगल फौजेवर पिछाडीनें व दोहोंबाजूंनीं हल्ला केला. अशा रीतीनें कैचींत सांपडल्यामुळें, मोंगल सरदारास विजापूरचा वेढा उठवून औरंगाबादेस परत जाणें भाग पडलें. याच काय त्या या भागांतील मुख्य मुख्य स्वाच्या आणि मोहिमा होत. या भागांत थोडीशी विश्रांति मिळाल्यामुळें शिवाजीस राज्यव्यवस्थेंत मन घालण्यास बराच अवकाश मिळाला. या अवधींत त्यानें ज्या सुधारणा अमलांत आणिल्या व राज्यपद्धति सुरू केली, त्यामुळेंच या भागास विशेष महत्व आलें आहे. कोणकोणत्या सुधारणा शिवाजीनें अमलांत आणिल्या त्यांचें सविस्तर वर्णन पुढच्या प्रकरणांत येईल. येथें एवढें सांगणें जरूर आहे कीं, जो शिवाजी आपल्या कारकीर्दीच्या पहिल्या भागाच्या शेवटीं चाकणपासून नीरेपर्येंतच्या लहानशा प्रदेशाचा मालक होता, तोच शिवाजी त्याच्या निधनसमयीं तापी नदीच्या दक्षिणेकडील प्रदेशांत अति बलाढ्य राजा होऊन राहिला होता. तापीपासून कावेरीपर्यंतचे सर्व हिंदु मुसलमान राजे त्याची सार्वभौम सत्ता कबूल करून त्याचे अंकित होऊन राहिले होते.

मोंगलाचा व विजापूरचा जो तह ठरला त्यांत शिवाजीचा कांहीं संबंध नव्हता. त्यावेळेचा दक्षिणेचा सुभेदार व शिवाजी यांच्यामध्ये अत्यंत सलोखा व प्रेमभाव असल्यामुळें, शिवाजीनें बरेच दिवस टुमणी लावलेले चौथ आणि सरदेशमुखी हक्क विजापूर व गोवळकोंडच्या दरबारांनी मान्य करून त्या हक्कांबद्दल शिवाजीस प्रत्येकी पांच लाख व तीन लाख रुपये देण्याचें कबूल केलें. विजापूर व गोवळकोंडचे राजे, दक्षिणेंतील मोंगलाचे सरदार, वगैरे सर्व पक्षांत वाटाघाट होऊनच ही गोष्ट ठरली असावी. हा योग १६६९ त जमून आला. ह्यावेळीं शिवाजीची सत्ता बरीच जोरावली होती. त्याची पूर्वींची जहागीर आणि बहुतेक सर्व डोंगरी किल्ले त्यास परत मिळाले होते. मोंगल बादशहापासून त्यानें एक जहागीर व मनसव संपादन केली होती. चौथ आणि सरदेशमुखी वगैरे त्याचे हक्क दक्षिणेंतील मुसलमान राजांनीं कबूल केले होते. असा चोहोंकडून त्याचा फायदा झाला असल्यामुळें १६६७ त झालेला तह मोडून अवरंगजेब बादशहानें जेव्हां पुनः लढाईस सुरुवात केली, तेव्हां त्याच्याशीं टक्कर देण्यास शिवाजीस फारसें कठीण गेलें नाहीं. अवरंगजेबानें आपला मुलगा जो दक्षिणचा सुभेदार, यास असा सक्त हुकूम दिला कीं, शक्तीनें अगर युक्तीनें तूं शिवाजीस पकडलें नाहींत, तर तुजवर बादशहाची मर्जी खप्पा होईल.

प्रतापराव गुजर हा यावेळीं आपल्या घोडेस्वारांनिशीं औरंगाबाद येथें होता. मोंगलांचा हा कपटप्रयोग त्यास कळला तेव्हां त्यानें औरंगाबादेहून हळूच पाय काढिला. अशा प्रकारें सार्वभौम मोंगल बादशहाशीं दंड टोकण्यास शिवाजीस पुनः सज्ज व्हावें लागलें. लढाई जुंपली तेव्हां स्वतःचे बचावाकरितां सिंहगडचा किल्ला घेणें शिवाजीस भाग पडलें. या किल्यांत बादशहाची रजपूत पलटण होती तरी, न डगमगतां ऐन मध्यरात्रीचे सुमारास फक्त ३०० मावळे लोकांनिशीं तानाजी मालुस-यानें किल्यावर हल्ला केला. किल्याच्या तटबंदीवरून चढून जाऊन तानाजी किल्ल्यांत शिरला; पण आंतील फौजेनें त्यास ठार मारिलें. तानाजी तर पडलाच; पण ज्या वीराने स्वदेशाकरितां आपले प्राण बळी घातले, त्या वीराच्या भावास साजेल असें अलौकिक शौर्य गाजवून तानाजीचा भाऊ जो सूर्याजी, त्याने तानाजीचें काम तडीस लाविलें. गड मिळाला, पण तानाजीसारखा सिंह खर्ची घालावा लागला. सिंहगड घेतल्यानंतर पुरंदर, माहुली, करनाला, लोहगड व जुन्नर हे किल्लेही शिवानीनें सर केले. जंजिन्यावरही शिवानीनें चाल केली. पण शिद्दाचें आरमार उत्तम असल्यामुळे समुद्रांत शिवाजीचें कांहीं चालेना. सुरतही शिवाजीनें आणखी एकबार लुटली. सुरतेहून परत येत असतां शिवाजीची व त्याचा पाठलाग करणा-या मोंगले सरदारांची गांठ पडली. जरी मोंगलांची फौज त्याच्या फौजेपेक्षां अधिक होती तरी शिवाजीच्या घोडेस्वारांनी मोंगलांचा पूर्ण पराभव करुन सुरतेहून आणलेली लूट सुरक्षितपणें रायगडास पोंचविली. प्रतापराव गुजरानें खानदेशांत शिरून व-हाडच्या अगदीं पूर्वभागापर्यंत खंडणी वसूल केली. यापूवीं खुद्द दिल्लीच्या बादशहाच्या प्रदेशांतून चौथ आणि सरदेशमुखी मराठ्यांनी कधींच वसूल केली नव्हती. मोरोपंत पेशव्यानेंही १६७१ त वागलाणांतील साल्हर वगैरे किल्ले घेतले. १६७२ त मोंगलांनीं साल्हेरास वेढा दिला. मराठ्यांनीं मोठ्या शौर्यानें शहराचा बचाव तर केलाच. पण मोरोपंत पेशवे व प्रतापराव गुजर यांणी त्या अवाढव्य मोंगल फौजेशीं तोंडास तोंड देऊन लढाई दिली व मोंगल फौजेचा पुरा पराभव केला. १६७३ त शिवाजीने पुन : पन्हाळा घेतला. याच वर्षी अण्णाजी दत्तोनें हुबळी शहर लुटलें. कारवारावर आरमार पाठवून त्या बाजूचा समुद्रकांठचा सर्व प्रदेश शिवाजीनें काबीज केला, व गोवळकोंडच्या राजाप्रमाणें बेदनूरच्या राजापासूनही खंडणी वसूल केली. विजापूरच्या राजानें पाठविलेल्या फौजेचा प्रतापराव गुजरानें चांगलाच समाचार घेतला. १६७४ त विजापूरच्या राजानें पुनः सैन्य पाठविण्याचें जेव्हां धाष्टर्य केलें, तेव्हां हंसाजी मोहित्यानें त्याचा पराभव करून त्यास विजापूरच्या अगदीं वेशीपर्यंत हटवीत नेलें. याप्रमाणें लढाई सुरू झाल्यापासून चारच वर्षात शिवाजीनें आपला पूर्वीचा सर्व मुलूख मिळवून शिवाय नवीन पुष्कळ मुलूख काबीज केला. उत्तरेस सुरतेपर्यंत, दक्षिणेस हुबळी बेदनूरपर्यंत व पूर्वेस व-हाड, विजापूर व गोवळकोंड्यापर्यंत त्याणें आपला अम्मल सुरू केला. तापी नदीच्या दक्षिणेकडील मोंगलांच्या सुभ्यांतून चौथ व सरदेशमुखी वसूल करण्यास सुरुवात केली. गोवळकोंडा व बेदनूर येथील राजास अंकित बनवून त्यांनपासून तो खंडणी घेऊं लागला. एकंदरीत बखरकारांच्या ह्मणण्याप्रमाणें, तीन मुसलमान बादशहांस पादाक्रांत करून हिंदुपदपातशाहीचा उपभोग घेण्याचा आपलाच अधिकार आहे, असें त्याणें जगास दाखविलें. ही कल्पना मनांत येऊनच, शिवाजीच्या मंत्रिमंडळानें सरासरी तीस वर्षें अविश्रांत परिश्रम करून जें देशकार्य शिवाजीनें संपादिलें त्या कार्याच्या महतीस अनुरूप अशा थाटानें शिवाजीस राज्याभिषेक करविला व हिंदुपदपादशाहीची प्रसिद्धपणें स्थापना केली. त्यावेळची दक्षिण हिंदुस्थानची स्थिति मनांत आणतां अशाप्रकारें स्वराज्यकल्पना लोकांच्या मनांत बिंबविणें अत्यंत जरूर होतें. ही कल्पना मनांत पूर्णपणें बाणली गेल्यामुळेंच पुढें अवरंगजेबानें जेव्हां दक्षिणेवर जय्यत तयारीनें स्वारी केली, तेव्हां दक्षिणेंतील सर्व मराठे सरदारांनी एकत्र जमून एकदिलानें स्वराज्याचें संरक्षण केलें.

मोरोपंत पेशव्यांनीं जुन्नरच्या उत्तरेकडील मोंगलाचे दक्षिणेंतील अगदी अघाडीचे किल्ले सर केले. अशाप्रकारें दोहोबाजूंनी लढाईनें तोंड जुंपलें. मोंगलाचा सरदार शाईस्तेखान यानें पुणें व चाकण घेतलें आणि पुण्यास आपल्या फौजेचा तळ दिला. पुण्यांतील वाड्यांत शाईस्तेखानाची स्वारी सुखानें आराम करीत असतां, शिवानीनें रात्रीचा छापा घालून त्यास खरपूस मार दिला. मोंगल घोडेस्वारांनी सिंहगडपर्यंत शिवाजीचा पाठलाग केला; पण नेताजी पालकरानें त्यांस वाटेंत गांठून त्यांची पुरी खोड मोडली. ही गोष्ट १६६३ त घडली. १६६४ त त्या वेळचें परदेशाशीं व्यापाराचें मुख्य ठिकाण जें सुरत त्यावर शिवाजीनें पहिली प्रसिद्ध स्वारी केली. हा प्रदेश नरी शिवाजीच्या माहितीचा नव्हता, तरी त्यांस वाटेंत कोठें अडथळा आला नाहीं. याच वेळी मराठ्यांच्या आरमाराने सुरतेहून मक्केस जाणारीं कांहीं यात्रकरूंची जहाजें पकडली. १६६६ त दुस-या एका मराठी आरमारानें गोव्याच्या दक्षिणेकडील एक श्रीमान् बंदर लुटलें. यामुळें उत्तरकानड्यांत शिवाजीची सत्ता पूर्णपणें बसली. शाईस्तेखानानें तर आपला पराभव झाल्यापासून बिलकुले डोकें वर केलें नाहीं. शिवाजीपुढें शाईस्तेखानाचें कांहीं चालेना, तेव्हां त्यास परत बोलावून मोंगल बादशहानें शिवाजीची सत्ता नामशेष करण्याच्या कामीं रणपंडित राजा जयसिंग व दिल्लीरखान यांची योजना केली. या वीरद्वयाच्या फौजेनें मराठ्यांच्या प्रदेशांत शिरून पुरंदास वेढा दिला. महाडच्या मुरार बाजी देशपांडे नांवाच्या एका प्रभु सरदारानें मोठ्या मर्दुमकीनें या शहराचें संरक्षणं केलें. स्वतःचा प्राण खर्ची पडेपर्यंत या समरवीरानें त्या प्रचंड मोंगल सेनेस दाद दिली नाहीं. दिल्लीश्वराच्या पदरच्या हिंदु सरदारांत प्रमुख होऊन राहिलेल्या राजा जयसिंगास शरण जाऊन गोडीगुलाबीनेंच स्वतःचा कार्यभाग साधावा हें चांगलें, अशी सल्ला शिवाजीस यावेळीं कां मिळाली याबद्दल बखरकार किंवा ग्रँट डफ कांहींच लिहीत नाहींत. एवढी गोष्ट खरी कीं, विजयाबद्दल निराश होऊन मात्र शिवाजीनें हा मार्ग स्वीकारला । नाहीं. बखरकार ह्मणतात, राजा जयसिंग हाही परमेश्वराचा आवडता । भक्त असल्यामुळें, त्याच्याशीं युद्ध करून यशप्राप्ति व्हावयाची नाहीं, करितां त्याच्याशीं सलोखा करून मसलत फत्ते करावी अशी देवीभवानीनेंच शिवाजीच्या मनांत प्रेरणा केली. कसेंही असो. ज्या बहादरानें अफझुलखान, शाईस्तेखानासारख्या बड्या मोंगल सरदारांस हतवीर्य केलें, ज्या नृसिंहाच्या रणधुरंधर सरदारांनीं कोणी नेता नसतां किंवा एकाही किल्लयाचा आसरा नसतां, सर्व महाराष्ट्रभर पसरलेल्या औरंगजेबाच्या सैन्यसमुद्रास मागें हटविलें, त्या प्रत्यक्ष वीररसावतार शिवाजीस जयसिंगाबरोबर लढणें अशक्य होतें अशी कल्पना एक क्षणभर तरी करतां येईल काय? या रणवीर शिवाजीनें स्वतः सेनानायकत्व पतकरून ज्या ज्यावेळीं शत्रूवर चाल केली त्या त्यावेळीं विजयीश्रीनें त्यासच माळ घातली आहे. जसजशी वेळ कठीण येई, तसतसें या शिवाजीचें शौर्य आणि योजकत्व अधिक चमकूं लागे. अशी स्थिति असूनही ज्याअर्थी शिवाजीनें जाणूनबुजून जयसिंगास शरण जाऊन आपले बहुतेक किल्ले व प्रदेश त्याच्या हवाली केले, त्याअर्थी त्यास व त्याच्या मंत्रिमंडळास कांहीं अगम्य राजकारस्थान साधावयाचें असावें असें ह्मणावें लागतें. थोडा वेळ जयसिंगास शरण गेल्यानें, दिल्लीस जाण्यास सांपडून तेथील बड्या दरबारांत कांहीं मनसबा करावयास सांपडेल, निदान मोठमोठ्या रजपूत सरदारांची ओळख तरी होईल असे कदाचित् शिवाजीस वाटलें असावें. आपले मोठमोठे बेत सिद्धीस नेण्यास स्वार्थत्यागानें संपादिलेल्या जयसिंगाच्या मैत्रीचा उपयोग बराच होईल, असा कदाचित् त्याचा ग्रह झाला असावा. चौथ आणि सरदेशमुखी हे हक्क मिळविण्याबद्दल तर त्याची एकसारखी खटपट चालू होती. शहाजान किंवा अवरंगजेब यांपैकीं एकानेंही हे त्याचे हक्क उघडपणें कबूल केले नव्हते. पण हे हक्क आपणास मिळतील अशी त्यास बरीच आशा होती, ह्मणून कांहीं काळ जयसिंगास शरण गेल्यानें वरील हक्क आपल्यास अधिक कायदेशीर रीतीनें मागतां येतील असा कदाचित् त्याचा समज झाला असावा. एवढें खरें कीं, ह्यावेळीं ह्या किंवा अशाच प्रकारच्या दुस-या विचारांस पुढील हकीगतीवरून जितकें महत्व येणें रास्त होते असें दिसतें, त्याहून अधिक महत्व शिवाजीनें आणि त्याच्या मंत्रिमंडळानें दिलें. कांहींही असो. मोंगल बादशहाशीं कोणत्याही अटीवर तह करण्याचा शिवाजीचा यावेळीं अगदीं कृतनिश्चय होता. त्याच्या इच्छेप्रमाणें मोंगलाशीं तह ठरला. ३० किल्ले त्याणें मोंगलाच्या हवालीं केले व बारा त्यांच्या सरदाराकडे राहिले. आपल्या तीन अति विश्वासू सल्लागारांनी जिजाबाईच्या विचारानें सर्व कारभार चालवावा अशी तनवीज करून त्याणें मोंगलांची नोकरी पतकरली व जयसिंगाबरोबर विजापुरावर चाल केली. पुढें कांहीं दिवसांनीं त्याच्या जिवास धक्का बसणार नाहीं असें त्यास आश्वासन मिळालें, तेव्हां तो, आपला मुलगा संभाजी, कांहीं घोडेस्वार व मावळे यांसहवर्तमान दिल्लीस गेला. तेथें त्याचा योग्य आदरसत्कार झाला नाहीं. दिल्लीस कांहीं दिवस राहिल्यानंतर त्याची पक्की खात्री झाली कीं, आपल्या एकंदर आयुष्यक्रमांत आपली एवढीच कायती अतिशय मोठी चूक झाली. दिल्लीहून त्याणें कशा युक्तीनें आपली सुटका करून घेतली ही गोष्ट सर्वांस महशूर आहेच. त्याबद्दल सविस्तर हकीकत देण्याचें प्रयोजन नाहीं. ही गोष्ट वाचली ह्मणने संकटसमयीं देखील शिवाजीची योजकशक्ति कशी जागृत असे याची बरोबर कल्पना होते. या गोष्टीवरून त्याच्या अनुयायांच्या स्वामिभक्तीचीही पारख होते. स्वदेश सोडल्यापासून १० महिन्यांनीं जेव्हां शिवाजी स्वदेशी आला, तेव्हां सर्व गोष्टी त्यांस जशा : च्यातशा दिसल्या. त्यांच्या व्यवस्थेंत काडी इतकाही फेरफार झालेला नव्हता. शिवानीचें दिल्लीस जाणें हा मराठ्यांच्या इतिहासांतील पहिला आणीबाणीचा प्रसंग होय. जिकडे तिकडे मोंगलांचा अम्मल सुरू झाला होता. सर्व देश व किल्ले मोंगल फौजेनें व्यापून टाकले होते. शिवाजी आणि संभाजी तर दिल्लींत तुरुंगवास भोगीत होते. अशी वेळ होती तरी एकही मनुष्य स्वेदेशास निमकहराम बनला नाहीं किंवा शत्रूंस जाऊन मिळाला नाहीं. सर्व कारभार नेहमींप्रमाणें सुरळीत चालला होता. जो तो आपआपलें काम इमानें इतबारें बजावीत होता. शिवाजी दिल्लींतून सुटून स्वदेशीं परत आला, ही बातमी जेव्हां हां हां ह्मणतां सर्व देशभर वा-यासारखी पसरली तेव्हां सर्वास नवा दम आला. मोंगल फौजेशीं मराठे अधिक निकरानें लढूं लागले. एकामागून एक सर्व किल्ले मोंगलापासून घेण्याचा त्यांनी झपाट्यानें क्रम सुरू केला. मोरोपंत पेशव्यांनी तर, जयसिंगास परत बोलाविलें ही संधि साधून, शिवाजी स्वदेशीं परत येण्यापूर्वीच पुण्याच्या उत्तरेकडील किल्ले व कल्याणप्रांताचा बराच भाग काबीज केला होता. दिल्लीच्या बादशहानें पुनः एकवार शिवाजीवर तिस-यानें फौज पाठविली. या फौजचें सेनापतित्व खुद्द बादशहाचा मुलगा व जोधपूरचा राणा जसवंत सिंग यांजकडे सोंपविलें होतें. बादशहाच्या मुलास दक्षिणचा सुभेदार नेमिलें होतें. या नवीन सुभेदारांनीं आल्याबरोबर बादशहाच्या संमतीनें शिवाजीबरोबर तह केला. या तहाअन्वयें अवरंगजेबानें शिवाजीस ‘ राजा ' ही पदवी दिली. संभाजीस ५००० घोडेस्वारांच्या पतकाचा मनसबदार नेमिलें. जुन्नर आणि अहमदनगर या शहरांवरील शिवाजीच्या हक्काऐवजीं त्यास वहाड प्रांतांत जहागीर दिली. सिंहगड आणि पुरंदर खेरीजकरून पुणें, चाकण, सुपें या प्रांतांतील त्याची पूर्वीची जहागीर त्यास परत दिली. या ठरावामुळें शिवाजी पादशाही दरबारचा एक बडा सरदार बनला. मोंगल बादशहाची नोकरी करण्याचें त्यानें कबूल केलें. व याजकरतां प्रतापराव गुजरास, त्याच्या हाताखालीं बरेच घोडेस्वार देऊन त्यानें अवरंगाबादेस रवाना केले. सरासरी दोन वर्षें झणजे मोंगलांनीं विजापूराशीं चालविलेली लढाई सन १६६९ त संपेपर्यंत हा तह अमलांत होता.

झाडास फळें येतात.
प्रकरण ६ वें.

१६६२ त शिवाजीच्या कारकीर्दीच्या तिस-या भागास प्रारंभ झाला. हा वेळपर्यंत मोंगल सैन्याच्या वाटेस शिवाजी बिलकुल गेला नाहीं. १६५७ त मात्र त्यानें एकवेळ जुन्नर शहर लुटलें होतें. या हल्याखेरीज दोन्ही पक्षांत उघड वैर दाखविणारी १६६२ पर्यंत दुसरी कोणतीच गोष्ट घडून आली नाही. शहाजहानचे वेळीं तर त्या बादशहास शरण जाण्यास शिवाजी 'एका पायावर तयार होता. असें करण्यांत विजापूर दरबारास दहशत घालून आपल्या बापाची सुटका करून घ्यावी एवढाच केवळ शिवाजीचा हेतु नव्हता. त्यास शहाजहानापासून आपले कांहीं हक्क कबूल करवून घ्यावयाचे होते. हे हक्क शिवाजीस देण्याचें शहाजहानानें अभिवचनही दिलें होते. मात्र त्याबद्दल दिल्लीस येऊन शिवाजीनें दरबारांत स्वत : मागणी करावी एवढीच त्याची अट होती. विजापूरचा वेढा उठवून दिलीतख्ताच्या प्राप्तीसाठीं आपल्या भावावर चाल करून जाण्याचे वेळीं, औरंगजेबानें कोंकणपट्टीवरील शिवाजीचें स्वामित्व कबूल केलें होतें. शिवाय काही निवडक स्वांरानिशीं पादशहाची नोकरी पतकरून नर्मदेच्या दक्षिणेकडील पादशाही मुलखांत शिवाजीनें शांतता राखावी, अशीही त्यानें एकवेळ इच्छा दर्शविली होती; पण सार्वभौम दिल्लीतख्ताचें एकछत्री आधिपत्य हातीं आलें तेव्हां या सर्व गोष्टी तो विसरला. १६६१ त एकाएकीं मोंगल सैन्यानें शिवाजीचें अगदी उत्तरेकडील ठाणें जे कल्याण शहर तें हस्तगत करून घेतलें. शिवाजी या वेळीं विजापूर दरबाराशीं लढण्यांत गुंतला होता. त्यामुळें या अपराधाबद्दल मोंगल सैन्यास योग्य प्रायश्चित्त त्यास देतां आले नाहीं. पुढें १६६२ त विजापूर दरबाराशीं जेव्हां त्यानें तह केला, तव्हां त्याचा सेनापति नेताजी पालकर यानें औरंगाबाद येथील मोंगल फौजेवर पहिला हल्ला केला.

श्रीभवानीचें अभयवचन, जिजाबाईचा आशीर्वाद व सैनिकांची विलक्षण स्वामिभक्ति या त्रिगुणात्मक मात्रेनें प्रोत्साहन दिल्यामुळें, स्वतः पसंत करून ठेवलेल्या जागी आपल्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याची भेट घेण्याचा शिवाजीनें निश्चय केला. इकडे शिवाजीची अशी कडेकोट तयारी चालली होती. पण तिकडे अफझुलखानाचा निराळाच बेत चालला होता. आपल्या अफाट सैन्यापुढें शिवाजी रणांगणांत तोंड द्यावयास उभा रहावयाचा नाही, तेव्हां कसेंही करून त्यास किल्ल्यांतून बाहेर आणून जिवंत धरून विजापुरास न्यावा व युद्धाची कटकट टाळावी याच विचारांत ते मांडे खात होता. कृष्णेच्या आणि कोयनेच्या वळणांत जंगलाच्या आड शिवाजीचें सैन्य दडून राहिलें होतें. अफझुलखानाचें सैन्य मात्र वाईपासून महाबळेश्वरपर्यंत एकसारखें पसरलें होतें. कांहीं आश्रय नसल्यामुळें या सैन्यावर दोहों बाजूनी सहज हल्ला करतां आला असता. शिवाजी आणि अफझुलखान एकमेकांस धरण्यास वाघासारखे टपून बसले होते. कारण सेनापति सांपडला की लढाईचा निकाल झालाच, ही गोष्ट दोघांसही पूर्णपणें अवगत होती. शिवाजीने वकीलामार्फत ‘आपण शरण येण्यास कबूल आहो' असें अफझुलखानास कळविलें. अफझुलखानानेंही या गोष्टीची सत्यता पहाण्याकरतां आपल्या जवळच्या ब्राह्मणपंडितास शिवाजीकडे पाठविलें. या ब्राह्मणपंडिताच्या मनांत स्वधर्म व स्वदेशाभिमानाचें वारें भरवून शिवाजीनें त्यास आपलासा करून घेतलें. या ब्राह्मणाच्या मध्यस्तीनें परस्परांनी एकांतांत एकमेकांची गांठ घ्यावी, कोणीही आपलें सैन्य बरोबर आणूं नये असें ठरलें. या भेटीच्या वेळीं ज्या गोष्टी घडल्या त्याचें वर्णन निरनिराळ्या इतिहासकारांनीं निरनिराळ्या प्रकारानें केलें आहे. वाघनखें चालवून व भवानी तरवारीचा वार करून शिवाजीनें प्रथम विश्वासघात केला, असें मुसलमान इतिहासकार व तदनुगामी गाँटडफ साहेब ह्मणतात. चिटणीस, सभासदप्रभृति बखरकार लिहितात की, खानानें शिवाजीच्या मानेस डावे हातानें हिसडा देऊन त्यास पुढें ओढून आपल्या डावे काखेंत दाबून टाकल्यामुळें निरुपाय होऊन शिवाजीस वाघनखाचा प्रयोग करावा लागला. कसेंही असो त्या काळीं अशा प्रसंगी विश्वासघात करणें ह्मणजे मोठेसें पातक मानलें जात नसल्यामुळें, असा विश्वासघात होईल असें समजूनच दोघेही भेटीस तयार झाले होते. अशा कृत्यास प्रवृत्त होण्यास शिवाजीस बरींच सबळ कारणें होती. आपल्या भावास मारल्याबद्दल व तुळजापूर व पंढरपूर येथील देवालयें भ्रष्ट केल्याबद्दल त्यास खानाचा सूड घ्यावयाचा होता. रणांगणांत उभें राहून अफझुलखानाशी दंड ठोकण्याइतकी त्याची कुवत नाहीं हें तो पक्केपणीं जाणून होता. शिवाय गेल्या १२ वर्षांत त्याणें जो खटाटोप केला, त्याला यश येणें सर्वस्वी या लढाईच्या निकालावर अवलंबून होतें. यावरून शिवाजीच प्रथम कपटानें खानास मारण्यास उद्युक्त झाला असावा. शिवाय या दोघांच्या स्वभावावरूनही हेंच अनुमान खरें ठरतें. अफझुलखान गर्विष्ठ, सैलट व अविचारी होता. शिवाजी मोठा धूर्त, सावध आणि प्रसंगावधानी होता. भेटीअंतीं जो निकाल लागेल त्याचा पूर्ण फायदा करून घेण्याचीही शिवाजीनें आधींच तयारी करून ठेवली होती. खान मेला हें वर्तमान कळतांच शिवाजीच्या सैन्यानें खानाचे फौजेवर हल्ला केला. खानाची फौज बेसावध असल्यामुळें तिची फार गाळण उडाली. वरील सर्व गोष्टींचा विचार केला ह्मणने ग्राँटडफचें” ह्मणणें खरें असावें असें वाटतें. कदाचित् दोघेही परस्पराबद्दल साशंक असल्यामुळें एकमेकाचे वास्तविक हेतू त्यांस बरोबर कळले नसतील आणि यामुळें त्या दोघांत जो विशेष बेसावध होता, त्यास त्याच्या हलगर्जीपणाचें प्रायश्चित्त सहजच मिळालें असेल. कदाचित् कपटानें दुस-यास मारावें असा दोघांचाही आरंभापासून विचार असेल; पण प्रसंगी तो एकानें साधला, दुस-यास तो साधतां आला नसेल. अफझुलखानाच्या पराभवामुळें पन्हाळ्याच्या दक्षिणेकडचा व कृष्णाकिनारचा सर्व प्रदेश शिवाजीस मिळाला. विजापूरदरबारनें पुनः दुस-यांदा शिवाजीवर सैन्य पाठविलें. शिवाजीने याही सैन्याचा पराभव करून अगदी विजापूर शहरच्या वेशीपर्यंत आपलें सैन्य नेलें. त्याच्या सेनानायकांनीं राजापूर व दाभोळ हीं शहरें घेतलीं. विजापूरदरबारनें तिस-यानें शिवाजीवर सैन्य धाडले. यावेळी शिवाजी पन्हाळच्या किल्यांत होता अशी संधि पाहून विजापूर सैन्यानें पन्हाळ्यास वेढा दिला. वेळ कठिण आली; पण शिवाजी मोठ्या युक्तीनें विजापूर सरदाराच्या हातावर तुरी देऊन रांगण्यास पळून गेला. विजापूर सैन्यानें शिवाजीचा पाटलाग केला; पण शूरवीर बाजी प्रभू याणें आपल्या १००० लोकांनिशी या अफाट सैन्याची वाट अडवून धरली. या दोन सैन्यांत सरासरी ९ तास तुमुल युद्ध चाललें होतें. बाजी प्रभूचे तीनचतुर्थांश लोक पडले; पण हा शूरवीर एक पाऊलही मागें सरला नाहीं. शिवाजी रांगण्यास सुरक्षित जाऊन पोंचल्याच्या तोंफा जेव्हां त्याणें ऐकल्या, तेव्हांच त्या रणधुरंधरानें आपलें शिर धारातीर्थी ठेवलें. ह्या पराक्रमास उपमा ग्रीसच्या इतिहासांतील स्पार्टन लोकांचा राजा लीओ निडस यानें आपल्या तीनशें लोकांनिशीं धरमापायतीच्या खिंडींत प्रचंड पर्शियन सेनेबरोबर केलेल्या युद्धाचीच योग्य होय. १६६१ ६२ त विजापूर बादशहा शिवाजीवर स्वत :च चालून गेला; पण या स्वारीचा कांहीं उपयोग झाला नाहीं. यापुढेंही एक दोन वर्षें ही लढाई हळूहळू चाललीच होती. याच सुमारास शिवाजीनें नवीन आरमार उभारून जंजि-याखेरीज समुद्रकांठचे सर्व किल्ले घेतले. सर्व प्रयत्न निर्फळ झाल्यामुळें हताश होऊन विजापूर दरबारनें शहाजीच्या मध्यस्तीनें १६६२ त शिवाजीबरोबर तह केला. या तहाअन्वयें शिवाजीनें काबीज केलेला सर्व मुलूख त्याच्या ताब्यांत राहिला. शिवाजीच्या पहिल्या भागाचे कारकीर्दीच्या अखेरीस शिवाजीच्या ताब्यांत चाकणपासून निरानदीपर्यंतचा सर्व प्रदेश, त्याची स्वतःची जहांगीर व पुरंदरपासून कल्याणपर्यंत सह्याद्रिपर्वतांतील सर्व किल्ले इतका मुलूख होता. दुस-या भागाचे शेवटीं कल्याणापासून गोव्यापर्यंतची सर्व कोंकणपट्टी व याच कोंकणपट्टीस समांतर असा घांटमाथ्यावरील भीमेपासून वारणेपर्यंत उत्तर दक्षिण १६० मैल लांब व सह्याद्रीपासून पूर्वेस १००. मैल रुंद इतका टापू शिवाजीस मिळाला. शिवाजीच्या कारकीर्दीच्या तिस-या भागाच्या शेवटीं शेवटीं विजापूर बादशहानें हा तह मोडला व शिवाजीवर पुन: चाल केली. शिवाजीचा सेनापति प्रतापराव गुजर याणें हा हल्ला फिरविला. पण शत्रुसैन्याचा पाठलाग न करतां त्याणें त्यास परत स्वदेशीं जाऊं दिलें. या स्थानीं सदयतेबद्दल शिवाजीनें प्रतापरावाची बरीच कानउघाडणी केली. प्रतापरावाच्या मनास ही गोष्ट इतकी झोंबली की, विजापूर सैन्यानें जेव्हां शिवाजीच्या मुलुखावर पुन : हल्ला केला, तेव्हां त्या सैन्यावर तुटून पडून त्यांची कत्तल करतां करतां प्रतापरावानें आपला प्राण सोडला. पुढें मोंगलांनीं जेव्हां विजापुराम वेढा दिला, तेव्हां विजापूरच्या बादशहानें मोठ्या कळवळ्यानें शिवाजीची मदत मागितली. शिवाजीनेंही पूर्वीचे सर्व अपराध विसरून त्यास मदत दिली. मोंगलाच्या प्रदेशांत लढाई सुरूं करून व मोंगल सैन्यावर पिछाडीनें व बाजूंनीं मारा करून मोंगलास विजापूरचा वेढा उठविण्यास शिवाजीनें भाग पाडलें. या शिवाजीच्या उदार कृतीमुळेंच विजापूरचें राज्य आणखी २० वर्षे राहिलें. वस्तुत: या गोष्टीचें वर्णन शिवाजीच्या कारकीर्दीच्या तिस-या भागांत करावयाचें, पण वाचकांस विजापूर दरबारशीं झालेल्या संग्रामाची सविस्तर हकीकत एके ठिकाणी वाचावयास मिळावी म्हणूनच त्याचें या प्रकरणांत थोडेंसे दिग्दर्शन केलें आहे.

शहानी कैदेंत होतां तोपर्यंत शिवाजीनें कांहीं ढवळाढवळ केली नाहीं. १६५७ त शहाजी मोकळा झाला तेव्हां शिवाजीने आपला क्रम पुनः सुरू केला. विजापूरदरबारनेंही मोंगलाशी तह करून शिवाजीची खोड मोडण्याची तयारी चालविली. या वेळेपासून शिवाजीच्या कारकीर्दीच्या दुस-या भागास आरंभ झाला. विजापूरदरबाराशी संग्राम हाच काय तो या भागांतील मुख्य कथाभाग होय. या भांडणांत मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वाडीचे सांवत, दक्षिणकोंकणांतील दळवी, ह्मसवाडचे माने, श्रीरंगपूरचे सुरवे व शिरके, फलटणचे निंबाळकर, मालवडीचे घाटगे वगैरे विजापूरदरबारचे पदरीं नोकरीस असलेल्या मोठमोठ्या मराठे सरदारांशीं सामना करण्याचा शिवाजीस प्रसंग आला. या सर्व सरदारांस निरा आणि कृष्णा या दोन नद्यांमधील प्रदेश जहागीर होता. आपल्या जहागिरीच्या आसपासच्या सरदारांत एकी करून त्यास जसें शिवाजीनें आपल्या मदतीस घेतलें होतें, तसें या सरदारांसही घ्यावें असा शिवाजीचा प्रथम बेत होता; पण त्या मानी सरदारांस शिवाजीचें हे ह्मणणें मानवेना. चंद्रराव मो-यानें तर शिवाजीस अचानक धरून मारण्याकरतां विनापूरदरबारनें पाठविलेल्या बाजीशामराजे नांवाच्या ब्राह्मणास व त्याच्या अनुयायास आपल्या जहागिरींत आसरा दिला. विजापूरदरबारचीही मसलत फसली व त्यांची युक्ति त्यांच्याच गळ्यांत आली. चंद्रराव मो-यानें मात्र विनाकारण शिवाजीचा द्वेषभाव संपादला. या अपराधाबद्दल शिवाजीचे सेवक राघो बल्लाळ व संभाजी कावजी यांणीं आपण होऊनच मो-याचा पुरा सूड उगविला. बाजी शामरावास मदत केल्याच्या संशयावरून या जोडीनें मो-याचा असा विश्वासघातानें गळा कापावा ही गोष्ट निंद्य आहे यांत शंका नाहीं. बखरकारांनींही या कृत्याचें समर्थन केलेलें नाहीं. मो-याच्या नाशाची गोष्ट शिवाजीस कळली तेव्हां त्यास फारसें वाईट वाटलें नाहीं खरें ; तरी आनंदाची गोष्ट ही की, मुळापासून त्याचें अंग या कृत्यांत बिलकुल नव्हतें. मो-याचा अशा रीतीनें शेवट झाल्यानंतर त्याच प्रांतांतील जहागिरदार सुर्वे आणि दळवी यांसही शिवाजीनें शरण आणले. शिद्दीवरही त्याणे चाल केली, परंतु त्या स्वारीचा फारसा उपयोग झाला नाहीं.

शिवाजीस जसजशी जयश्री माळ घालूं लागली. तसतसा विजापूर दरबारचा द्वेषाग्नि अधिक भडकत चालला व शिवाजीची आहुति घेण्याची त्यांणीं जय्यत तयारी चालविली. शहाज़ीस त्रास देऊन शिवाजी ताळ्यावर यावयाचा नाहीं, ही गोष्ट त्यांस आतां पक्की कळून चुकली होती. विजापूर दरबारनें शिवाजीचा खून करण्याकरतां पाठविलेल्या बाजी शामरावास तर शिवाजीनें चांगलेंच फसविलें. चंद्रराव मो-यावर विजापूर दरबारची बरीच भिस्त होती. पण मोरे, दळवी, सुर्वे यांचा शिवाजीच्या सैन्यापुढें टिकाव लागेना. इतक्या थरास गोष्ट आली, तेव्हां विजापूर दरबारनें आपला नांवाजलेला हुषार पठाण वीर अफझुलखान यास त्याचे हाताखालीं मोठें सैन्य देऊन शिवाजीवर रवाना केलें. कर्नाटकचे माहिमेंत अफझुलखान होता. या मोहिमेंत असतां शहाजीच्या शत्रूस साहाय्य करून शिवाजीच्या वडील भावास त्याणें मारविलें असा त्याजवर वहीम होता. शिवाजीरूपी उंदरास जिवंत अगर मेलेला धरून आणण्याचा अफझुलनें मोठ्या गर्वानें-भर दरबारांत विडा उचलला होता. विजापूर सोडून अफझुलखान वाईस दाखल झाला. वाटेंत त्याणें तुळजापूर पंढरपूर येथील पवित्र मूर्ति फोडून देवालयें भ्रष्ट केलीं होतीं. यामुळें याच्या या स्वारीस धर्मयुद्धाचें स्वरूप आलें होतें. दोन्हीं बाजूंची मंडळी अगदी चेतावून गेली होती. या युद्धाच्या निकालावर फार महत्वाच्या गोष्टींचा निकाल अवलंबून होता. जो पक्ष विजयी होईल तो जगणार व जो पराभव पावेल तो नामशेष होणार अशी वेळ येऊन ठेपली होती. शिवाजी आणि त्याचे सल्लागार यांणीं ह्या युद्धप्रसंगाचें महत्व पूर्णपणें ताडलें होतें. अफझुलखानाचा बीमोड करण्याची त्याणीं जारीनें तयारी चालविली होती. या संकटांतून मुक्त होण्यास काय उपाय योजावे हें निश्चित करण्यापूर्वी शिवरायानें आईभवानीचें ध्यान केलें. आपण ध्यानस्थ असतां आपल्या तोंडून जगदंबा जे शब्द वदवील त्याप्रमाणें पुढील सर्व व्यवस्था करावयाची असल्यामुळें, हे शब्द बरोबर टिपून घेण्यास शिवाजीनें चिटणवीस यांस सांगितलें होतें.

वर सांगितल्याप्रमाणें शिवाजीच्या कारकीर्दीच्या पहिल्या भागास तोरणा किल्ला हस्तगत झाल्यापासून प्रारंभ झाला. हा किल्ला तेथील किल्लेदारानें शिवाजीचे हवालीं आपोआप केला. तोरणा किल्ला हातीं आल्यानंतर शिवाजीनें रायगड किल्ला दुरुस्त करून तेथें आपलें रहाण्याचें मुख्य ठिकाण केलें. शिवाजीच्या या वर्तनांत कांहीं विशेष वावगें नसल्यानें आपल्या जहागिरीच्या बचावाकरतांच आपण हे किल्ले घेतले अशी त्यास विनापूर दरबारची समजूत घालतां आली. सुप्याची अधिकारी बाजी मोहिते यास शिवाजीनें काढून टाकले. बाजी मोहिते हा शिवाजीचा नोकर होता ह्मणून तिकडे विजापूरदरबानें लक्ष दिलें नाहीं. पुण्याचा रस्ता चाकण किल्याच्या मा-यांत असल्यामुळें तो किल्ला शिवाजीनें तेथील किल्लेदार फिरंगोजी नरसाळा याजकडून आपल्या ताब्यांत घेतला. फिरंगोजीकडेच शिवाजीनें पूर्ववत् किल्लेदारी सोंपविली. फिरंगोजी हा यावेळेपासून शिवाजीचा कट्टा स्वामिभक्त नोकर बनला. सिंहगड येथील मुसलमान किल्लेदारास वश करून तो किल्लाही शिवाजीनें घेतला. याप्रमाणें मावळचा बहुतेक भाग त्याच्या ताब्यांत आल्यावर त्या प्रदेशांतील काटक व शूर मावळे लोकांस त्याणें आपल्या सैन्यांत जागा दिल्या व त्यांच्या पैकींच कांहीजणांस त्यांचे सेनानायक केले. हा सर्व कार्यभाग रक्तस्राव अगर दांडगाई न करतां पार पडला. बारामती, इंदापूर हे दोन परगणेही शिवाजीच्या जहागिरीतच होते. पुण्याहून बारामतीस जाणारा जुना रस्ता पुरंदर किल्याच्या मा-यांत होता. त्यामुळें तो किल्ला घेणेंही शिवाजीस जरूर होतें. हा किल्ला एका ब्राह्मण किल्लेदाराचे हातीं होता. हा ब्राह्मण किल्लेदार दादोजी कोंडदेवाचा स्नेही होता. हा किल्लेदार माठा उद्धट व बेपर्वा असे. त्याच्या पत्नीस त्याचें वर्तन अगदीं आवडत नसे. एक वेळ तिनें त्यास ताळ्यावर आणण्याची खटपट केली. या क्षुल्लक अपराधाबद्दल या दुष्ट किल्लेदारानें त्या गरीब अबला साध्वीस तोफेच्या तोंडीं दिलें. हा नीच मनुष्य मेला तेव्हां त्याच्या तीन मुलांत तंटे सुरू झाले. त्याणीं शिवाजीस पंचायतीस बोलाविलें. शिवाजीनें तिन्ही भावांस कैद करून पुरंदर किल्ला काबीज केला. ह्या कृत्याबद्दल गँटडफनें शिवाजीस विश्वासघातकी म्हटलें आहे; पण ही त्याची चूक आहे. या तिघाही मुलांस चांगलें इनाम देऊन शिवाजीनें नांवारूपास आणलें, ही गोष्ट गँटडफही कबूल करतो. बखरकार ह्मणतात कीं, या तीन भावांच्या भांडणांत आपल्यास त्रास होईल या भीतीनें किल्ल्यांतील शिबंदीनेंच शिवाजीस अशी सल्ला दिली. तिघांपैकी दोन भावांस तर ही गोष्ट । अगदी संमत होती. बखरींतील ही हकीगत वाचली ह्मणजे शिवाजीचा माथा उजळ होतो. शिवाजीनें हा किल्ला नाक्याचा असल्यामुळें घेतला खरा; पण तो किल्ला गँटडफ ह्मणतो त्याप्रमाणें विश्वासघातोंन तेथील शिबंदीच्या संमतीवांचून मात्र त्याणें घेतला नाहीं.

नेहमींच्या पद्धतीस अनुसरून हे किल्लेही शिवानीनें रक्तपात न करतां घेतले. या एवढ्याच गोष्टीवरून त्याच्या जहागिरीच्या आसपासच्या लोकांचा त्याच्यावर किती विश्वास होता हें पूर्णपणें व्यक्त होतें. हिरडेमावळांतील रोहिद किल्ला व सह्याद्रीच्या पट्टींतील उत्तरेकडच्या कल्याण किल्यापासून ते दक्षिणेस लोहगड, रायरी, प्रतापगडपर्यंत सर्व किल्ले शिवाजीनें मिळविले, तेव्हां त्याच्या कारकीर्दीचा पहिला भाग संपूर्ण झाला. शिवाजीनें कल्याणचा किल्ला घेतला तेव्हां विजापूरदरबार जागें झालें व शहाजीस त्रास देऊन शिवाजीस आळा घालण्याची त्यांनें खटपट चालविली. शहाजीस कर्नाटकांतून परत बोलावून त्यास त्यानें एकदम कैद केलें. शहाजीच्या जीवास धोका येतो असे जेव्हां शिवाजीस वाटलें, तेव्हां त्याणें आपले किल्ले सर करण्याचें काम जरा आवरतें घेतलें. व विजापूरदरबारचा सूड उगविण्यासाठीं तो मोंगल बादशहा शहाजहान यास जाऊन मिळाला. विजापुरच्या बादशाहाम ही गोष्ट कळतांच त्यानें शहाजीस एकदम बंधमुक्त केलें. मोंगलास मिळण्यापूर्वी शिवाजीनें त्यानकडे चौथ आणि सरदेशमुखीचें मागणें केलें होतें. शहाजहानानेंही 'तूं दिल्लीस ये ' मग याचा विचार करूं असे त्यास आश्वासन दिले होतें. शहाजहानच्या हयातींत ही गोष्ट घडून आली नाहीं त्यास इलाज नाहीं. ह्या सर्व गोष्टी १६५२ त घडल्या व याच सालीं शिवाजीच्या कारकीर्दीच्या पहिल्या भागाची समाप्ति झाली.

स्वसंरक्षणाचा हा पहिला कार्यभाग, रक्तस्राव न होतां, सर्व पक्षांच्या संमतीने पूर्णपणें तडीस गेल्यानंतर, विजापूर दरबारशीं सामना करण्यास शिवाजीस कंबर बांधावी लागली. विजापूर दरबारनें प्रथम शिवाजीचा बाप शहाजी यास कपटाने कैद केलें. गुप्त हेर पाठवून शिवानीस धरण्याचा प्रयत्न केला व शेवटीं मोठमोठे शूर सरदार पाठवून शिवाजीस जमिनदोस्त करण्याचीही खटपट केली; पण त्यांच्या प्रयत्नास यश आलें नाहीं. १० वर्षे झुजून शिवाजीनें विजापूर दरबारास दाती तृण धरून शरण येण्यास भाग पाडलें. वाटेल त्या शर्ती त्याजपासून त्याणें कबूल करून घेतल्या. अशा प्रकारें विजापूरच्या युद्धांत विजयी झाल्यामुळें शिवाजीची. सत्ता जोरावली. तिला बरेंच कायमचें स्वरूप आलें. त्याच्या अमलांतील मुलूखही वाढला. त्याची कीर्ति सर्वत्र पसरली. इतकें झालें तरी मराठ्यांत एकी करून मराठ्यांच्या मुलुखाचें संरक्षण करावें हा त्याचा मूळचा विचार काडीइतकाही बदलला नाहीं. विजापूर दरबाराशीं उपस्थित झालेल्या भांडणाचा इतिहास हा शिवाजीच्या कारकीर्दीचा दुसरा भाग होय. विजापूर दरबारची खोड मोडल्यानंतर दक्षिणेवर चाल करू पहाणा-या मोंगलाशीं शिवाजीस तोंड द्यावे लागलें. मोंगलाशीं झालेला संग्राम हा शिवाजीच्या कारकीर्दीचा तिसरा भाग होय. या संग्रामास १६६२ त सुरुवात झाली. १६७२ त मोंगलाचा पूर्ण पराभव करून शिवाजीनें नवीन उदयास आणलेल्या मराठेशाईची सत्ता मोंगलास कबूल करावयास लावली. शिवाजीस १६७४ त राज्याभिषेक झाला. यावेळेपासून त्याच्या कारकीर्दीच्या चवथ्या आणि शेवटच्या भागास आरंभ झाला. या भागांत त्याच्या सर्व आशा आणि मनोरथ परिपूर्ण झाले असल्यामुळें, शिवाजीच्या कारकीर्दीचा हा अगदी पूर्णावस्थेचा भाग आहे. या भागांतील इतिहासावरूनच त्यांच्या चरित्राची आणि स्वभावाची बरोबर ओळख होते. या भागांत त्याणें जी शासन पद्धति सुरू केली व ज्या उदात्त राजनीतितत्वांचा कित्ता घालून दिला, त्यावरूनच त्याची खरी पारख करावयाचा आहे. शिवाजीनें आपल्या कर्तव्याचें मुख्य धोरण कधींच बदललें नाहीं. मराठ्यांची पांगलेली शक्ति एकवटून स्वसंरक्षण साधावें हा काय तो त्याचा मुख्य हेतु होता. ज्या इच्छित प्रदेशांत हा हेतु सिद्धीस न्यावयाचा, त्या प्रदेशाची परिस्थि त्यनुरूप मर्यादा वाढत गेली; पण त्याचा हा मूळचा हेतु बदलला नाहीं. शेजा-यापाजा-यांपासून स्वतःचे जहागिरीचें संरक्षण करतां करतां यदृच्छेनें मिळालेल्या नवीन मुलखाचा मोंगलाच्या त्रासापासून बचाव करावा लागल्यामुळें त्याच्या मूळच्या स्वसंरक्षणाच्या कामास राष्ट्रीय संरक्षणाचें स्वरूप आलें. त्याच्या अमलांतील प्रदेश वाढत गेल्यामुळें निरनिराळ्या ठिकाणच्या मराठे सरदारांत एकी करण्याची त्यास संधि मिळाली. परंतु त्याचा वर निर्दिष्ट केलेला हेतु कायमच होता. विजापूर किंवा मोंगल बादशहाशीं भांडण उपस्थित करण्याची त्यास मुळींच इच्छा नव्हती. पश्चिम महाराष्ट्र काबीज करण्याची हाव न धरतां, कर्नाटकांतील व उत्तर हिंदुस्थानांतील आपआपल्या प्रदेशांत हे बादशहा राज्य करते तर शिवाजीनें त्यास सुखानें नांदूं दिलें असतें. गोवळकोंडच्या राज्याचा बचाव करण्याची तर शिवाजीनें हमीच घेतली होती. मोंगलांचे हल्ले फिरवून लावण्याचे कामीं शिवाजीनें विजापूर दरबारासही पुष्कळ वेळ मदत केली आहे. शिवाजीच्या अमलांतील प्रदेशास मोंगल बादशहा त्रास देतेना, तर तो मोंगलांचा मांडलिक होऊन रहाण्यासही राजी होता. मोंगल बादशहाचें स्वामित्व कबूल करण्याकरतां तो दिल्लीससुद्धां गेला होता; पण मोंगलांनी तेथें त्यास कपटानें कैद केलें. मोंगलांनीं अशी दगलबाजी केली तरीही शिवाजी त्यांच्याशी तह करण्यास तयार होता. मोंगल बादशहानें आपल्यास पादशाही दरबारांतील बड्या सरदारांत गणावें एवढेंच कायतें त्याचें ह्मणणें होतें. आर्यावर्तातील सर्व हिंदू रानांत एकजूट करून मुसलमानांची सत्ता नामशेष करावी, ही कल्पना शिवाजीच्या मनांत कधीच आली नाही. शिवानीचे पश्चात् या कल्पनेचा उदय झाला आहे. पंतप्रतिनिधीशीं झालेल्या वायुद्धांत, मोंगलराज्यवृक्षाच्या फांद्या छेदीत न बसतां, या वृक्षाचा मुख्य गड्डा जो दिल्लीपति त्यावर चाल करून या वृक्षाची पाळेंमुळें खणून टाकलीं पाहिजेत, अशी सल्ला जेव्हां शाहूमहाराजांस बाजीराव पेशव्यानीं दिली, तेव्हांच प्रथम या कल्पनेचें बीजारोपण झालें. शिवाजीची कल्पना इतकी दुरवर गेली नव्हती. दक्षिणेत ‘स्वराज्य' स्थापून विजापूर व गोवळकोंडा येथील राजांच्या मदतीनें मोंगलास तापी नदीच्या उत्तरेस घालवून द्यावें एवढाच त्याचा उद्देश होता. पश्चिम हिंदुस्थानांत हिंदुराज्याची स्थापना करून गोवळकोंडा व विजापूर या दोन मुसलमान दरबारांच्या मदतीनें उत्तरेकडील मोंगलाच्या त्रासापासून आपला बचाव करावा व आपल्या देशबांधवांस शांतिसुखाचा व धर्मस्वातंत्र्याचा लाभ करून द्यावा हीच कायती त्याची महत्वाकांक्षा होती. ही गोष्ट बरोबर कळली ह्मणजे शिवाजीच्या कारकीर्दीच्या चारी भागांचा इतिहास पूर्णपणें लक्षांत येण्यास बिलकुल अडचण पडणार नाहीं.

झाडास पालवी फुटते.
प्रकरण ५ वें.

शिवाजीनें १६४६ त तोरणा किल्ला हस्तगत करून घेतला. या वेळेपासूनच त्याच्या कारकीर्दीस खरा आरंभ झाला. यावेळी त्याचें वय अवघें १९ वर्षांचें होते. यावेळेपासून ते तहत मरेपर्यंत त्याणें स्वदेशाकरितां अश्रांत परिश्रम केले, आपल्या हाडांची काडें करून घेतलीं. पण १६८० त मृत्यूचा अकालिक घाला पडल्यामुळें, त्यास आपला कार्यभाग अपुराच टाकून हें नाशवंत जग सोडून जाणे भाग पडलें. याच्या या ३४ वर्षांचे कारकीर्दीचा इतिहास पूर्णपणें समजून घेणें असल्यास त्या कारकीर्दीचे ४ भाग पाडले पाहिजेत व प्रत्येक भागाचा पृथक् पृथक् । विचार केला पाहिजे. कारण तो जसजसा वयोवृद्ध व ज्ञानवृद्ध होत गेला, तसतसें त्याच्या हेतूंत व कृतींत बरेच स्थित्यंतर होत गेलें आहे. साधारणपणें शिवाजीच्या कारकीर्दीस एखाद्या सजीव प्राण्याची उपमा देतां येईल. जसा एकादा प्राणी वाढतां वाढतां सुधारत जातो, त्या प्रमाणें शिवाजीची कर्तव्यकल्पना वाढत जाऊन परिणत होत गेली आहे. वेळ पडेल त्याप्रमाणें स्वकार्य साधण्यास त्यास नानात-हेचीं सोंगें आणावीं लागलीं आहेत. शिवाजीच्या कारकीर्दीचें हे खरें स्वरूप बरोबर न कळल्यामुळें, शिवाजीच्या चरित्रासंबंधानें बराच गैरसमज उत्पन्न झाला आहे. त्यांतून शिवाजीच्या वेळच्या अशांत काळास, सुधारलेल्या युरोप खंडांतही ज्या राजनीतितत्वांनीं आपली छाप नुकतीच बसविली आहे, अशीं तत्वें लागू करण्याचा जो सार्वत्रिक प्रवात पडला आहे, त्यामुळें तर हा गैरसमज अधिकच दुणावला आहे.

मराठ्यांचा वास्तविक प्रदेश दक्षिणेंतील मुसलमान राजांनी कधीच जिंकला नाही. देशावर त्याणीं आपली सत्ता बसविली होती; पण पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश त्यांच्या ताब्यांत केव्हांच गेला नाहीं. या प्रदेशावर ते वारंवार स्वा-या करीत. परंतु तेथील किल्ले सर करून ते दुरुस्त करून त्यांत त्याणीं शिबंदी कधींच ठेवली नाही. हे किल्ले बहुधा या पहाडी प्रदेशांतील मातबर. लोकांच्याच अमलांत असत. हे लोक मन मानेल त्याप्रमाणें वागत. परस्परांशी तंटेबखेडे करीत. दुस-या किल्लेदारांशी लढाया करून त्यांचा प्रदेश काबीज करून घेत. प्रमुख राजसत्तेचा वचक कसा तो त्यांस बिलकुल नव्हता. अशा प्रकारें महाराष्ट्रांत चोहीकडे अराजकस्थिति झाली होती. तशांत मोंगल व विजापूर बादशहांनी, हतवीर्य झालेल्या निजामशाही राज्याचा एक एक भाग गिळंकृत केल्यामुळें तर, महाराष्ट्रांत एकच धुमाकूळ सुरू झाली. मोंगल बादशहा व विजापूर दरबार यांत एकसारखे तंटे होऊं लागले. महाराष्ट्रदेश ह्मणने या दोन लढवय्या मल्लांचें एक रणांगणच होऊन राहिला. ह्या अशा झोटिंगपादशाहीमुळें महाराष्ट्रावर जी अनर्थपरंपरा ओढवली तिचें वर्णन करण्यास आमची लेखणी असमर्थ आहे. वाचकांनीच तिची कल्पना करावी हें बरें. शिवाजीच्या कारकीर्दीची पहिली ६ वर्षे, पुण्याच्या आसपासच्या शिरजोर किल्लेदारांचा समाचार घेण्यांत गेली. मोंगल पादशहाची किंवा विजापूर दरबारची सत्ता झुगारून द्यावी ही कल्पनाही यावेळी त्याच्या मनांत नव्हती. त्यास यावेळीं स्वतःच्या जहागिरीचें संरक्षण करावयाचें होतें व हे संरक्षणाचें काम थोड्या खर्चने व विशेष प्राणहानि न करितां पूर्णपणे शेवटास नेण्यास त्यास आपल्या जहागिरीच्या आसपासचे कांहीं किल्ले काबीज करावे लागले व कांहींची डागडुजी करावी लागली. अशा प्रकारें सर्वतोपरी स्वत: ची स्थिरस्थावर करण्यांत जरी यावेळीं तो गुंतला होता, तरी आपल्या जहागिरीच्या आसपासच्या मराठे सरदारांत एकी करून त्यांची शक्ति एकवटल्याशिवाय आपल्यास शांतिसुखाचा पूर्ण अनुभव मिळावयाचा नाहीं ही गोष्ट तो पक्केपणी जाणून होता.

वरील लोकांप्रमाणेंच कांहीं धर्मप्रसारकांचीही शिवाजीस स्वदेशाची मुक्तता करण्याचे कामीं फार मदत झाली. ह्या पुरुषांची माहिती थोडक्यांत सांगणे जरूर आहे. ह्यांची माहिती आह्मी दिली नाहीं तर हे प्रकरण लिहिण्याचा मुख्य हेतु जो शिवाजीच्या चरित्राची व त्याचेवेळच्या परिस्थितीची वाचकां बरोबर ओळख करून देणें तो पूर्णपणें सिद्धीस जावयाचा नाहीं. चिटणवीसांचे बखरींत अशी पुष्कळ साधूपुरुषांचीं नावें दाखल केलीं आहेत. पण त्यांत चिंचवाडचे मोरयादेव, निगडीचे रघुनाथस्वामी, बेदरचे विठ्ठलराव, शिंगाट्याचे वामनजोशी, दहितान्याचे निंबाजीबावा, धामणगांवचे बोधलेबोवा, वडगांवचे जयराम स्वामी, हैदराबादचे केशवस्वामी, पोलादपुरचे परमानंदबोवा, संगमेश्वरचे अचलपुरी व पाडगांवचे मनीबावा त्यावेळीं फार प्रसिद्ध होते. देहूचे तुकारामबावा व चाफळचे रामदासस्वामी या धर्मोपदेशकांनी तर महाराष्ट्रीयांच्या धर्मबाबींत एकच चळवळ करून सोडली होती. रामदासास शिवाजीनें आपले धर्मगुरू केले होते. व्यावहारिक गोष्टींतही तो त्यांची केव्हां केव्हां सल्ला घेई. या साधुद्वयांनीं महाराष्ट्रीयांच्या धर्ममतांत जें स्थित्यंतर केलें, त्याचें वर्णन आह्मीं एका स्वतंत्र प्रकरणांतच करणार आहोंत. आज एवढेंच सांगणें पुरे आहे कीं, शिवाजीनें चालू केलेल्या राष्ट्रीय चळवळीस धर्मस्वरूप देऊन लोकहितासाठीं स्वहिताचा त्याग करण्याची स्पृहणीय इच्छा महाराष्टूसमाजांत यांणींच उत्पन्न केली. महाराष्ट्राची मुक्तता करण्यांत स्वतःचें सुख साधावें, हा शिवाजीचा बिलकुल उद्देश नव्हता गोब्राह्मणांचे प्रतिपालन करून स्वधर्माची अब्रू राखावी 'एवढ्याकरतांच त्याणें ही खटपट चालविली होती. ह्या गोष्टी लोकांच्या मनावर पूर्णपणें बिबाव्या ह्मणून शिवाजीनें रामदासाच्या उपदेशावरून आपला झेंडा भगवा केला होता. संसारसुखाचा त्याग करणारे यति संन्यासी वगैरे लोक भगवेच कपडे वापरतात. भगवारंग हा मुखत्यागाचें चिन्ह आहे असे हिंदू लोक समजतात, म्हणूनच रामदासांनी हा रंग पसंत केला. रामदासाचे सांगण्यावरूनच परकीयांचे वर्चस्व दाखविणारी सलाम करण्याची पद्धत बंद होऊन रामराम करण्यास सुरुवात झाली; त्यांच्याच सांगण्यावरून पूर्वीचीं मुसलमानी नांवें बदलून शिवाजीनें आपल्या मुख्य मुख्य अधिका-यास संस्कृत नांवें दिली व पत्रव्यवहाराचे मायने बदलले. एके वेळीं तर शिवाजीनें आपलें सर्व राज्य रामदासांच्याचरणी अर्पण केलें. पण रामदासांनीं त्या राज्याची व्यवस्था करण्यास शिवबासच सांगितलें. रामदासाचें आराध्यदैवत 'राम' याच्या पूजेअर्चेकरतां कांहीं कांहीं इनाम जमिनींचा रामदासांनी स्वीकार करावा ह्मणून शिवाजीनें एके प्रसंगी फार हट्ट घेतला. रामदासांनी त्याच्या विनंतीस मान दिला; पण त्याणीं ज्या जमीनी इनाम मागितल्या त्या सर्व परकीयांच्या अमलांतील होत्या. स्वदेशमुक्ततेचें काम अद्यपि अपुरें राहिलें आहे ही गोष्ट शिवाजीस जाणविण्याकरतांच रामदासांनी अशी मागणी केली.

मराठी साम्राज्याच्या प्रभातकालीं उदयास आलेल्या मुख्य मुख्य पुरुषांची जीं चरित्रें वर दिली आहेत त्यांवरून त्यावेळच्या परिस्थितीची वाचकांस बरोबर कल्पना करितां येईल. शिवानीच्या एकट्याच्या चरित्रलेखनापासून हा बोध झाला नसता. शिवाजीच्या सैनिकांत जी हुशारी व जें शौर्य आढळून येई त्यास कारण तरी हीच मंडळी होत. त्यावेळीं महाराष्ट्रांत जी प्रखर जागृती झाली होती तिचा जोर शिवाजीचें केवढेंही मोठें चरित्र लिहिलें तरी कळावयाचा नाहीं. त्यावेळी राष्ट्रांत विलक्षण उत्साह उत्पन्न झाला होता. कोणत्याही राष्ट्रांत राम आहे असें ओळखूं येण्यास त्या राष्ट्रांत केवळ स्वसंरक्षणास पुरेल इतकें सामर्थ्य असलें ह्मणने झालें असें ह्मणतां यावयाचें नाहीं. त्या राष्ट्रांतील पुढच्या पुढच्या पिढ्यांमध्यें अधिकाधिक जोरानें व विजयश्रीनें राष्ट्रोन्नतीचें कार्य सर्व प्रकारें अप्रतिहत चालू ठेवण्याजोगें वीर निर्माण झाले पाहिजेत. कसलीही संकटे आली तरी त्यांतून निभावून जाण्यास मराठे लोकांस त्यावेळीं खातर वाटत नसे. इतकेंच नव्हे, तर शिवाजीनें आरंभिलेलें कार्य शिरावर घेऊन त्यांत यश संपादन करण्यास सर्वतोपरी योग्य असे पुरुष प्रत्येक पिढींत उत्पन्न होऊं लागले होते. सारांश कोणत्याही दृष्टीनें विचार केला, तरी शिवाजीच्या पिढीचे लोक शहाणपणांत किंवा शौर्यात बिलकुल कमी नव्हते. राष्ट्राची उभारणी करण्याचें कामीं शिवाजीसारख्या वीरांस पाठिंबा देण्यास ते लायख होते यांत तिलप्राय शंका नाहीं.