वरील लोकांप्रमाणेंच कांहीं धर्मप्रसारकांचीही शिवाजीस स्वदेशाची मुक्तता करण्याचे कामीं फार मदत झाली. ह्या पुरुषांची माहिती थोडक्यांत सांगणे जरूर आहे. ह्यांची माहिती आह्मी दिली नाहीं तर हे प्रकरण लिहिण्याचा मुख्य हेतु जो शिवाजीच्या चरित्राची व त्याचेवेळच्या परिस्थितीची वाचकां बरोबर ओळख करून देणें तो पूर्णपणें सिद्धीस जावयाचा नाहीं. चिटणवीसांचे बखरींत अशी पुष्कळ साधूपुरुषांचीं नावें दाखल केलीं आहेत. पण त्यांत चिंचवाडचे मोरयादेव, निगडीचे रघुनाथस्वामी, बेदरचे विठ्ठलराव, शिंगाट्याचे वामनजोशी, दहितान्याचे निंबाजीबावा, धामणगांवचे बोधलेबोवा, वडगांवचे जयराम स्वामी, हैदराबादचे केशवस्वामी, पोलादपुरचे परमानंदबोवा, संगमेश्वरचे अचलपुरी व पाडगांवचे मनीबावा त्यावेळीं फार प्रसिद्ध होते. देहूचे तुकारामबावा व चाफळचे रामदासस्वामी या धर्मोपदेशकांनी तर महाराष्ट्रीयांच्या धर्मबाबींत एकच चळवळ करून सोडली होती. रामदासास शिवाजीनें आपले धर्मगुरू केले होते. व्यावहारिक गोष्टींतही तो त्यांची केव्हां केव्हां सल्ला घेई. या साधुद्वयांनीं महाराष्ट्रीयांच्या धर्ममतांत जें स्थित्यंतर केलें, त्याचें वर्णन आह्मीं एका स्वतंत्र प्रकरणांतच करणार आहोंत. आज एवढेंच सांगणें पुरे आहे कीं, शिवाजीनें चालू केलेल्या राष्ट्रीय चळवळीस धर्मस्वरूप देऊन लोकहितासाठीं स्वहिताचा त्याग करण्याची स्पृहणीय इच्छा महाराष्टूसमाजांत यांणींच उत्पन्न केली. महाराष्ट्राची मुक्तता करण्यांत स्वतःचें सुख साधावें, हा शिवाजीचा बिलकुल उद्देश नव्हता गोब्राह्मणांचे प्रतिपालन करून स्वधर्माची अब्रू राखावी 'एवढ्याकरतांच त्याणें ही खटपट चालविली होती. ह्या गोष्टी लोकांच्या मनावर पूर्णपणें बिबाव्या ह्मणून शिवाजीनें रामदासाच्या उपदेशावरून आपला झेंडा भगवा केला होता. संसारसुखाचा त्याग करणारे यति संन्यासी वगैरे लोक भगवेच कपडे वापरतात. भगवारंग हा मुखत्यागाचें चिन्ह आहे असे हिंदू लोक समजतात, म्हणूनच रामदासांनी हा रंग पसंत केला. रामदासाचे सांगण्यावरूनच परकीयांचे वर्चस्व दाखविणारी सलाम करण्याची पद्धत बंद होऊन रामराम करण्यास सुरुवात झाली; त्यांच्याच सांगण्यावरून पूर्वीचीं मुसलमानी नांवें बदलून शिवाजीनें आपल्या मुख्य मुख्य अधिका-यास संस्कृत नांवें दिली व पत्रव्यवहाराचे मायने बदलले. एके वेळीं तर शिवाजीनें आपलें सर्व राज्य रामदासांच्याचरणी अर्पण केलें. पण रामदासांनीं त्या राज्याची व्यवस्था करण्यास शिवबासच सांगितलें. रामदासाचें आराध्यदैवत 'राम' याच्या पूजेअर्चेकरतां कांहीं कांहीं इनाम जमिनींचा रामदासांनी स्वीकार करावा ह्मणून शिवाजीनें एके प्रसंगी फार हट्ट घेतला. रामदासांनी त्याच्या विनंतीस मान दिला; पण त्याणीं ज्या जमीनी इनाम मागितल्या त्या सर्व परकीयांच्या अमलांतील होत्या. स्वदेशमुक्ततेचें काम अद्यपि अपुरें राहिलें आहे ही गोष्ट शिवाजीस जाणविण्याकरतांच रामदासांनी अशी मागणी केली.
मराठी साम्राज्याच्या प्रभातकालीं उदयास आलेल्या मुख्य मुख्य पुरुषांची जीं चरित्रें वर दिली आहेत त्यांवरून त्यावेळच्या परिस्थितीची वाचकांस बरोबर कल्पना करितां येईल. शिवानीच्या एकट्याच्या चरित्रलेखनापासून हा बोध झाला नसता. शिवाजीच्या सैनिकांत जी हुशारी व जें शौर्य आढळून येई त्यास कारण तरी हीच मंडळी होत. त्यावेळीं महाराष्ट्रांत जी प्रखर जागृती झाली होती तिचा जोर शिवाजीचें केवढेंही मोठें चरित्र लिहिलें तरी कळावयाचा नाहीं. त्यावेळी राष्ट्रांत विलक्षण उत्साह उत्पन्न झाला होता. कोणत्याही राष्ट्रांत राम आहे असें ओळखूं येण्यास त्या राष्ट्रांत केवळ स्वसंरक्षणास पुरेल इतकें सामर्थ्य असलें ह्मणने झालें असें ह्मणतां यावयाचें नाहीं. त्या राष्ट्रांतील पुढच्या पुढच्या पिढ्यांमध्यें अधिकाधिक जोरानें व विजयश्रीनें राष्ट्रोन्नतीचें कार्य सर्व प्रकारें अप्रतिहत चालू ठेवण्याजोगें वीर निर्माण झाले पाहिजेत. कसलीही संकटे आली तरी त्यांतून निभावून जाण्यास मराठे लोकांस त्यावेळीं खातर वाटत नसे. इतकेंच नव्हे, तर शिवाजीनें आरंभिलेलें कार्य शिरावर घेऊन त्यांत यश संपादन करण्यास सर्वतोपरी योग्य असे पुरुष प्रत्येक पिढींत उत्पन्न होऊं लागले होते. सारांश कोणत्याही दृष्टीनें विचार केला, तरी शिवाजीच्या पिढीचे लोक शहाणपणांत किंवा शौर्यात बिलकुल कमी नव्हते. राष्ट्राची उभारणी करण्याचें कामीं शिवाजीसारख्या वीरांस पाठिंबा देण्यास ते लायख होते यांत तिलप्राय शंका नाहीं.