मोंगलाचा व विजापूरचा जो तह ठरला त्यांत शिवाजीचा कांहीं संबंध नव्हता. त्यावेळेचा दक्षिणेचा सुभेदार व शिवाजी यांच्यामध्ये अत्यंत सलोखा व प्रेमभाव असल्यामुळें, शिवाजीनें बरेच दिवस टुमणी लावलेले चौथ आणि सरदेशमुखी हक्क विजापूर व गोवळकोंडच्या दरबारांनी मान्य करून त्या हक्कांबद्दल शिवाजीस प्रत्येकी पांच लाख व तीन लाख रुपये देण्याचें कबूल केलें. विजापूर व गोवळकोंडचे राजे, दक्षिणेंतील मोंगलाचे सरदार, वगैरे सर्व पक्षांत वाटाघाट होऊनच ही गोष्ट ठरली असावी. हा योग १६६९ त जमून आला. ह्यावेळीं शिवाजीची सत्ता बरीच जोरावली होती. त्याची पूर्वींची जहागीर आणि बहुतेक सर्व डोंगरी किल्ले त्यास परत मिळाले होते. मोंगल बादशहापासून त्यानें एक जहागीर व मनसव संपादन केली होती. चौथ आणि सरदेशमुखी वगैरे त्याचे हक्क दक्षिणेंतील मुसलमान राजांनीं कबूल केले होते. असा चोहोंकडून त्याचा फायदा झाला असल्यामुळें १६६७ त झालेला तह मोडून अवरंगजेब बादशहानें जेव्हां पुनः लढाईस सुरुवात केली, तेव्हां त्याच्याशीं टक्कर देण्यास शिवाजीस फारसें कठीण गेलें नाहीं. अवरंगजेबानें आपला मुलगा जो दक्षिणचा सुभेदार, यास असा सक्त हुकूम दिला कीं, शक्तीनें अगर युक्तीनें तूं शिवाजीस पकडलें नाहींत, तर तुजवर बादशहाची मर्जी खप्पा होईल.
प्रतापराव गुजर हा यावेळीं आपल्या घोडेस्वारांनिशीं औरंगाबाद येथें होता. मोंगलांचा हा कपटप्रयोग त्यास कळला तेव्हां त्यानें औरंगाबादेहून हळूच पाय काढिला. अशा प्रकारें सार्वभौम मोंगल बादशहाशीं दंड टोकण्यास शिवाजीस पुनः सज्ज व्हावें लागलें. लढाई जुंपली तेव्हां स्वतःचे बचावाकरितां सिंहगडचा किल्ला घेणें शिवाजीस भाग पडलें. या किल्यांत बादशहाची रजपूत पलटण होती तरी, न डगमगतां ऐन मध्यरात्रीचे सुमारास फक्त ३०० मावळे लोकांनिशीं तानाजी मालुस-यानें किल्यावर हल्ला केला. किल्याच्या तटबंदीवरून चढून जाऊन तानाजी किल्ल्यांत शिरला; पण आंतील फौजेनें त्यास ठार मारिलें. तानाजी तर पडलाच; पण ज्या वीराने स्वदेशाकरितां आपले प्राण बळी घातले, त्या वीराच्या भावास साजेल असें अलौकिक शौर्य गाजवून तानाजीचा भाऊ जो सूर्याजी, त्याने तानाजीचें काम तडीस लाविलें. गड मिळाला, पण तानाजीसारखा सिंह खर्ची घालावा लागला. सिंहगड घेतल्यानंतर पुरंदर, माहुली, करनाला, लोहगड व जुन्नर हे किल्लेही शिवानीनें सर केले. जंजिन्यावरही शिवानीनें चाल केली. पण शिद्दाचें आरमार उत्तम असल्यामुळे समुद्रांत शिवाजीचें कांहीं चालेना. सुरतही शिवाजीनें आणखी एकबार लुटली. सुरतेहून परत येत असतां शिवाजीची व त्याचा पाठलाग करणा-या मोंगले सरदारांची गांठ पडली. जरी मोंगलांची फौज त्याच्या फौजेपेक्षां अधिक होती तरी शिवाजीच्या घोडेस्वारांनी मोंगलांचा पूर्ण पराभव करुन सुरतेहून आणलेली लूट सुरक्षितपणें रायगडास पोंचविली. प्रतापराव गुजरानें खानदेशांत शिरून व-हाडच्या अगदीं पूर्वभागापर्यंत खंडणी वसूल केली. यापूवीं खुद्द दिल्लीच्या बादशहाच्या प्रदेशांतून चौथ आणि सरदेशमुखी मराठ्यांनी कधींच वसूल केली नव्हती. मोरोपंत पेशव्यानेंही १६७१ त वागलाणांतील साल्हर वगैरे किल्ले घेतले. १६७२ त मोंगलांनीं साल्हेरास वेढा दिला. मराठ्यांनीं मोठ्या शौर्यानें शहराचा बचाव तर केलाच. पण मोरोपंत पेशवे व प्रतापराव गुजर यांणी त्या अवाढव्य मोंगल फौजेशीं तोंडास तोंड देऊन लढाई दिली व मोंगल फौजेचा पुरा पराभव केला. १६७३ त शिवाजीने पुन : पन्हाळा घेतला. याच वर्षी अण्णाजी दत्तोनें हुबळी शहर लुटलें. कारवारावर आरमार पाठवून त्या बाजूचा समुद्रकांठचा सर्व प्रदेश शिवाजीनें काबीज केला, व गोवळकोंडच्या राजाप्रमाणें बेदनूरच्या राजापासूनही खंडणी वसूल केली. विजापूरच्या राजानें पाठविलेल्या फौजेचा प्रतापराव गुजरानें चांगलाच समाचार घेतला. १६७४ त विजापूरच्या राजानें पुनः सैन्य पाठविण्याचें जेव्हां धाष्टर्य केलें, तेव्हां हंसाजी मोहित्यानें त्याचा पराभव करून त्यास विजापूरच्या अगदीं वेशीपर्यंत हटवीत नेलें. याप्रमाणें लढाई सुरू झाल्यापासून चारच वर्षात शिवाजीनें आपला पूर्वीचा सर्व मुलूख मिळवून शिवाय नवीन पुष्कळ मुलूख काबीज केला. उत्तरेस सुरतेपर्यंत, दक्षिणेस हुबळी बेदनूरपर्यंत व पूर्वेस व-हाड, विजापूर व गोवळकोंड्यापर्यंत त्याणें आपला अम्मल सुरू केला. तापी नदीच्या दक्षिणेकडील मोंगलांच्या सुभ्यांतून चौथ व सरदेशमुखी वसूल करण्यास सुरुवात केली. गोवळकोंडा व बेदनूर येथील राजास अंकित बनवून त्यांनपासून तो खंडणी घेऊं लागला. एकंदरीत बखरकारांच्या ह्मणण्याप्रमाणें, तीन मुसलमान बादशहांस पादाक्रांत करून हिंदुपदपातशाहीचा उपभोग घेण्याचा आपलाच अधिकार आहे, असें त्याणें जगास दाखविलें. ही कल्पना मनांत येऊनच, शिवाजीच्या मंत्रिमंडळानें सरासरी तीस वर्षें अविश्रांत परिश्रम करून जें देशकार्य शिवाजीनें संपादिलें त्या कार्याच्या महतीस अनुरूप अशा थाटानें शिवाजीस राज्याभिषेक करविला व हिंदुपदपादशाहीची प्रसिद्धपणें स्थापना केली. त्यावेळची दक्षिण हिंदुस्थानची स्थिति मनांत आणतां अशाप्रकारें स्वराज्यकल्पना लोकांच्या मनांत बिंबविणें अत्यंत जरूर होतें. ही कल्पना मनांत पूर्णपणें बाणली गेल्यामुळेंच पुढें अवरंगजेबानें जेव्हां दक्षिणेवर जय्यत तयारीनें स्वारी केली, तेव्हां दक्षिणेंतील सर्व मराठे सरदारांनी एकत्र जमून एकदिलानें स्वराज्याचें संरक्षण केलें.