वर सांगितल्याप्रमाणें शिवाजीच्या कारकीर्दीच्या पहिल्या भागास तोरणा किल्ला हस्तगत झाल्यापासून प्रारंभ झाला. हा किल्ला तेथील किल्लेदारानें शिवाजीचे हवालीं आपोआप केला. तोरणा किल्ला हातीं आल्यानंतर शिवाजीनें रायगड किल्ला दुरुस्त करून तेथें आपलें रहाण्याचें मुख्य ठिकाण केलें. शिवाजीच्या या वर्तनांत कांहीं विशेष वावगें नसल्यानें आपल्या जहागिरीच्या बचावाकरतांच आपण हे किल्ले घेतले अशी त्यास विनापूर दरबारची समजूत घालतां आली. सुप्याची अधिकारी बाजी मोहिते यास शिवाजीनें काढून टाकले. बाजी मोहिते हा शिवाजीचा नोकर होता ह्मणून तिकडे विजापूरदरबानें लक्ष दिलें नाहीं. पुण्याचा रस्ता चाकण किल्याच्या मा-यांत असल्यामुळें तो किल्ला शिवाजीनें तेथील किल्लेदार फिरंगोजी नरसाळा याजकडून आपल्या ताब्यांत घेतला. फिरंगोजीकडेच शिवाजीनें पूर्ववत् किल्लेदारी सोंपविली. फिरंगोजी हा यावेळेपासून शिवाजीचा कट्टा स्वामिभक्त नोकर बनला. सिंहगड येथील मुसलमान किल्लेदारास वश करून तो किल्लाही शिवाजीनें घेतला. याप्रमाणें मावळचा बहुतेक भाग त्याच्या ताब्यांत आल्यावर त्या प्रदेशांतील काटक व शूर मावळे लोकांस त्याणें आपल्या सैन्यांत जागा दिल्या व त्यांच्या पैकींच कांहीजणांस त्यांचे सेनानायक केले. हा सर्व कार्यभाग रक्तस्राव अगर दांडगाई न करतां पार पडला. बारामती, इंदापूर हे दोन परगणेही शिवाजीच्या जहागिरीतच होते. पुण्याहून बारामतीस जाणारा जुना रस्ता पुरंदर किल्याच्या मा-यांत होता. त्यामुळें तो किल्ला घेणेंही शिवाजीस जरूर होतें. हा किल्ला एका ब्राह्मण किल्लेदाराचे हातीं होता. हा ब्राह्मण किल्लेदार दादोजी कोंडदेवाचा स्नेही होता. हा किल्लेदार माठा उद्धट व बेपर्वा असे. त्याच्या पत्नीस त्याचें वर्तन अगदीं आवडत नसे. एक वेळ तिनें त्यास ताळ्यावर आणण्याची खटपट केली. या क्षुल्लक अपराधाबद्दल या दुष्ट किल्लेदारानें त्या गरीब अबला साध्वीस तोफेच्या तोंडीं दिलें. हा नीच मनुष्य मेला तेव्हां त्याच्या तीन मुलांत तंटे सुरू झाले. त्याणीं शिवाजीस पंचायतीस बोलाविलें. शिवाजीनें तिन्ही भावांस कैद करून पुरंदर किल्ला काबीज केला. ह्या कृत्याबद्दल गँटडफनें शिवाजीस विश्वासघातकी म्हटलें आहे; पण ही त्याची चूक आहे. या तिघाही मुलांस चांगलें इनाम देऊन शिवाजीनें नांवारूपास आणलें, ही गोष्ट गँटडफही कबूल करतो. बखरकार ह्मणतात कीं, या तीन भावांच्या भांडणांत आपल्यास त्रास होईल या भीतीनें किल्ल्यांतील शिबंदीनेंच शिवाजीस अशी सल्ला दिली. तिघांपैकी दोन भावांस तर ही गोष्ट । अगदी संमत होती. बखरींतील ही हकीगत वाचली ह्मणजे शिवाजीचा माथा उजळ होतो. शिवाजीनें हा किल्ला नाक्याचा असल्यामुळें घेतला खरा; पण तो किल्ला गँटडफ ह्मणतो त्याप्रमाणें विश्वासघातोंन तेथील शिबंदीच्या संमतीवांचून मात्र त्याणें घेतला नाहीं.
नेहमींच्या पद्धतीस अनुसरून हे किल्लेही शिवानीनें रक्तपात न करतां घेतले. या एवढ्याच गोष्टीवरून त्याच्या जहागिरीच्या आसपासच्या लोकांचा त्याच्यावर किती विश्वास होता हें पूर्णपणें व्यक्त होतें. हिरडेमावळांतील रोहिद किल्ला व सह्याद्रीच्या पट्टींतील उत्तरेकडच्या कल्याण किल्यापासून ते दक्षिणेस लोहगड, रायरी, प्रतापगडपर्यंत सर्व किल्ले शिवाजीनें मिळविले, तेव्हां त्याच्या कारकीर्दीचा पहिला भाग संपूर्ण झाला. शिवाजीनें कल्याणचा किल्ला घेतला तेव्हां विजापूरदरबार जागें झालें व शहाजीस त्रास देऊन शिवाजीस आळा घालण्याची त्यांनें खटपट चालविली. शहाजीस कर्नाटकांतून परत बोलावून त्यास त्यानें एकदम कैद केलें. शहाजीच्या जीवास धोका येतो असे जेव्हां शिवाजीस वाटलें, तेव्हां त्याणें आपले किल्ले सर करण्याचें काम जरा आवरतें घेतलें. व विजापूरदरबारचा सूड उगविण्यासाठीं तो मोंगल बादशहा शहाजहान यास जाऊन मिळाला. विजापुरच्या बादशाहाम ही गोष्ट कळतांच त्यानें शहाजीस एकदम बंधमुक्त केलें. मोंगलास मिळण्यापूर्वी शिवाजीनें त्यानकडे चौथ आणि सरदेशमुखीचें मागणें केलें होतें. शहाजहानानेंही 'तूं दिल्लीस ये ' मग याचा विचार करूं असे त्यास आश्वासन दिले होतें. शहाजहानच्या हयातींत ही गोष्ट घडून आली नाहीं त्यास इलाज नाहीं. ह्या सर्व गोष्टी १६५२ त घडल्या व याच सालीं शिवाजीच्या कारकीर्दीच्या पहिल्या भागाची समाप्ति झाली.