झाडास पालवी फुटते.
प्रकरण ५ वें.
शिवाजीनें १६४६ त तोरणा किल्ला हस्तगत करून घेतला. या वेळेपासूनच त्याच्या कारकीर्दीस खरा आरंभ झाला. यावेळी त्याचें वय अवघें १९ वर्षांचें होते. यावेळेपासून ते तहत मरेपर्यंत त्याणें स्वदेशाकरितां अश्रांत परिश्रम केले, आपल्या हाडांची काडें करून घेतलीं. पण १६८० त मृत्यूचा अकालिक घाला पडल्यामुळें, त्यास आपला कार्यभाग अपुराच टाकून हें नाशवंत जग सोडून जाणे भाग पडलें. याच्या या ३४ वर्षांचे कारकीर्दीचा इतिहास पूर्णपणें समजून घेणें असल्यास त्या कारकीर्दीचे ४ भाग पाडले पाहिजेत व प्रत्येक भागाचा पृथक् पृथक् । विचार केला पाहिजे. कारण तो जसजसा वयोवृद्ध व ज्ञानवृद्ध होत गेला, तसतसें त्याच्या हेतूंत व कृतींत बरेच स्थित्यंतर होत गेलें आहे. साधारणपणें शिवाजीच्या कारकीर्दीस एखाद्या सजीव प्राण्याची उपमा देतां येईल. जसा एकादा प्राणी वाढतां वाढतां सुधारत जातो, त्या प्रमाणें शिवाजीची कर्तव्यकल्पना वाढत जाऊन परिणत होत गेली आहे. वेळ पडेल त्याप्रमाणें स्वकार्य साधण्यास त्यास नानात-हेचीं सोंगें आणावीं लागलीं आहेत. शिवाजीच्या कारकीर्दीचें हे खरें स्वरूप बरोबर न कळल्यामुळें, शिवाजीच्या चरित्रासंबंधानें बराच गैरसमज उत्पन्न झाला आहे. त्यांतून शिवाजीच्या वेळच्या अशांत काळास, सुधारलेल्या युरोप खंडांतही ज्या राजनीतितत्वांनीं आपली छाप नुकतीच बसविली आहे, अशीं तत्वें लागू करण्याचा जो सार्वत्रिक प्रवात पडला आहे, त्यामुळें तर हा गैरसमज अधिकच दुणावला आहे.
मराठ्यांचा वास्तविक प्रदेश दक्षिणेंतील मुसलमान राजांनी कधीच जिंकला नाही. देशावर त्याणीं आपली सत्ता बसविली होती; पण पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश त्यांच्या ताब्यांत केव्हांच गेला नाहीं. या प्रदेशावर ते वारंवार स्वा-या करीत. परंतु तेथील किल्ले सर करून ते दुरुस्त करून त्यांत त्याणीं शिबंदी कधींच ठेवली नाही. हे किल्ले बहुधा या पहाडी प्रदेशांतील मातबर. लोकांच्याच अमलांत असत. हे लोक मन मानेल त्याप्रमाणें वागत. परस्परांशी तंटेबखेडे करीत. दुस-या किल्लेदारांशी लढाया करून त्यांचा प्रदेश काबीज करून घेत. प्रमुख राजसत्तेचा वचक कसा तो त्यांस बिलकुल नव्हता. अशा प्रकारें महाराष्ट्रांत चोहीकडे अराजकस्थिति झाली होती. तशांत मोंगल व विजापूर बादशहांनी, हतवीर्य झालेल्या निजामशाही राज्याचा एक एक भाग गिळंकृत केल्यामुळें तर, महाराष्ट्रांत एकच धुमाकूळ सुरू झाली. मोंगल बादशहा व विजापूर दरबार यांत एकसारखे तंटे होऊं लागले. महाराष्ट्रदेश ह्मणने या दोन लढवय्या मल्लांचें एक रणांगणच होऊन राहिला. ह्या अशा झोटिंगपादशाहीमुळें महाराष्ट्रावर जी अनर्थपरंपरा ओढवली तिचें वर्णन करण्यास आमची लेखणी असमर्थ आहे. वाचकांनीच तिची कल्पना करावी हें बरें. शिवाजीच्या कारकीर्दीची पहिली ६ वर्षे, पुण्याच्या आसपासच्या शिरजोर किल्लेदारांचा समाचार घेण्यांत गेली. मोंगल पादशहाची किंवा विजापूर दरबारची सत्ता झुगारून द्यावी ही कल्पनाही यावेळी त्याच्या मनांत नव्हती. त्यास यावेळीं स्वतःच्या जहागिरीचें संरक्षण करावयाचें होतें व हे संरक्षणाचें काम थोड्या खर्चने व विशेष प्राणहानि न करितां पूर्णपणे शेवटास नेण्यास त्यास आपल्या जहागिरीच्या आसपासचे कांहीं किल्ले काबीज करावे लागले व कांहींची डागडुजी करावी लागली. अशा प्रकारें सर्वतोपरी स्वत: ची स्थिरस्थावर करण्यांत जरी यावेळीं तो गुंतला होता, तरी आपल्या जहागिरीच्या आसपासच्या मराठे सरदारांत एकी करून त्यांची शक्ति एकवटल्याशिवाय आपल्यास शांतिसुखाचा पूर्ण अनुभव मिळावयाचा नाहीं ही गोष्ट तो पक्केपणी जाणून होता.