Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ३७
श्री
राजश्री त्रिंबकराव विश्वनाथ स्वामी गोसावी यांसि
विनंति उपरी साता-याचें वर्तमान कांहीं विपरीत ऐकतों तरी काय वर्तमान आहे ते लिहिणें सविस्तर वर्तमान हमेशा लिहीत जावें साता-याचा बंदोबस्त ठीक नसल्यास, तीर्थस्वरूपास विनंति करून ज्या गोष्टीनें दौलतीस उपयोगी पडे ऐसा बंदोबस्त करावा गोविंद शिवराम व तुम्हीं एक होऊन त्या स्थलचा बंदोबस्त जरूर राखावा वडिलांस हि विनंति एकांतीं करीत जावी वडिलांची आज्ञा घेऊन बंदोबस्त राखावा हें पत्र कोणास न कळावें एक गोविंद शिवरामास मात्र पत्र दाखवावें नवलविशेष वर्तमान गुरूजीस लिहित जाणें रा। छ २६ सफर बहुत काय लिहिणें हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ३६
श्रीशंकर
राजश्री गोविंदपंत तात्या स्वामी गोसावी यांसि
विनंति उपरि कितेक प्रकारें घराऊ मजकूर लिहून पत्र जासुदा बा। पाठविलें कीं तेथे श्रीमंतासी एकांती गांठ सर्वदा पडत असेल समयोचित आपले कार्याच्या गोष्टी बोलून आपले कार्य होऊन येई त्या प्रकारावर मर्जी युक्तीने आणून आम्हांस उत्तर आलिया तुम्हीं बलाविल्यास आम्ही हि येऊं त्यास उत्तराची मार्गप्रतीक्षा करीत असों उत्तर पा। सातरियास वेंकाजीपंत राणोजी शिंदे परस्परें एक मिळणींत नव्हते राणोजी शिंदे केवळ जागा जतन करून श्रीमंतांचे पायाशी एकनिष्ठ होते त्यास अलीकडे तो प्रकार नाहीं किल्ल्याचा बंद तुटल्याउपर किल्ला वेंकाजीपंत आपले लगामीं लाऊन घेऊन किल्याचा बंदोबस्त अंतस्तें आबा पुरंदरे करणार वेळ असेल तर मुख्य आपण एक जाल्यावर सर्व गोष्टीस पाणी घालणार ऐसीं खुळें लागली ऐसीं लिहिलीं एकदोघांचीं परिछिन्न आलीं या राजकारणांत हालीं चिंतो अनंत आले हें च लष्करांतून हि सकारपूर्वकाचें पत्र राणोजी शिंद्यास उमेदीचे आणून बुद्धिभेद केला असें स्पष्ट लिहिलें आलें हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ३५
श्रीशंकर
राजश्री गोविंदपंत तात्या स्वामी गोसावी यांसि
विनंति उपरि ता। छ २५ मोहरम पर्यंत वर्तमान यथास्थित असे विशेष श्रीमंती चित्ताचे उत्साहें करून आम्हीं हि श्रीत्रिंबकेश्वरी यावें या आशयें लि।। होतें त्यांचे उत्तर थोडासा आशय सुचऊन व सर्व खुलासा तुमचे पत्रीं लिहून पत्रें तुम्हांकडे तुमचे च नावें लाखोटा करून सरकारचे जासुदा बा। जो आला होता त्या बा। च पा। तीं पावलीं असतील परंतु लोकिकांत उत्तम दिसावें आपले हि चित्तांत उमेद येऊन स्वामिसेवा योग्यतेप्रा। घडावी ऐसा मजकूर जाबसालांत निखालस आढळत असला तर तैसें च ल्याहावें एकनिष्ठतेस अंतर पडूं देणार नाहीं परंतु आणिखी आम्हांपेक्षां अधिक विश्वासू त्याचे च प्रमाण आमचे बोलण्यास संदेह हा प्रकार असल्यास आपण निखालस वर्तत असोन याप्रकारें संशय दिसूं लागल्यास आपले हि चित्तास प्रशस्त युक्ती मनसबा सांगावयास होत नाहीं जेव्हां आमची परिक्षा च पाहाणें तेव्हां सा महिने वर्षभर आमचे वचनीं विश्वास ठेऊन चांगली मसलत श्रीमंतांचे च लगामी सर्व राहून दौलतेस उपयोगी ऐशी सुचेल ती च सांगूं आणि मर्जीप्रमाणें च वर्तणूक करूं नाहीं तर मळमळत दोहीकडे हि उपयोगी पडत नाहीं तर ह्या च गोष्टी खोलून जपून एकांती दुसरा कोणी बोलणारा आहे कीं काय तुम्हीं च बोलून उत्तर पाठवावें त्रिंबकेश्वरीं यावें ऐसें तुमचे विचारें असल्यास येऊं उत्तर लौकर पाठवणें श्रीमंत च एका दोचौ दिवसांत चावडसांत येत असले तर तैसें च लिहिणें राजश्री चिंतोपंत कवर्ग लष्करांतून आले याणीं सप्रऋषचा फितूर केला गमाजीस पुढें करून किल्ला सरकार च देणार परभारें खूळ उभें करून आपण नामानिराळे ही हिकमत मसलत लष्करांत ठरोन या गोष्टीचं वळण बांधोन गमाजी परळीस येऊन राहिले राणोजी शिंद्याचा देखील बुद्धिभेद केला पन्नासपाऊणलक्षाचा सरंजाम राणोजी शिंद्यास देऊ करून जाग्यास दगा करावा अशीं लि।। दोघातिघांची आलीं तर युक्तीनें कानावर घालणें जरूर सूचना करणे हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ३४
पो छ ७ सवाल श्री
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदपंत तात्या स्वामीचे सेवेसीं
पो कृष्णराव बल्लाळ सा। नमस्कार विनंति उपरि येथील वर्तमान ता। छ २५ रमजान पावेतों सुस्वरूप असों विशेष बहुत दिवस तुम्हांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं तर सविस्त(र) ल्याहावें आम्हीं हैदराबादेहून दोनचार पत्रें पाठऊन तेथील कितेक प्रकार लिहिले होते तीं पत्रें आपणास पावलीं किंवा नाहीं हें कळलें नाहीं असो तुम्ही साहेबचाकरीवर च होता त्यासी नबाबाकडील वर्तमान तर ज्याप्रों स्नेह जाहाला आहे त्यापरीस दिवसोदिवस अधिकोत्तर च आहे परंतु मोगलाई कारभार सुस्त फार यास्तव इंगरेज महमदआल्लीखानाकडील कारभार उरकून हैदराबादेस च बसले होते आम्ही गेलियानंतर बाहेर काहाढिले आम्ही श्रीमंताकडे दरमजल येऊन पोहचलों बासालतजंगाकडील मामलियत होऊन पैक्याची निशा न पडे कारभार अप्रमाणिक तेव्हां कौताल भन्नु शिपनुत्कल कोटा वगैरे ठाणींसुद्धां चौपांच लक्षांचा सोडऊन दरमजल शि-यास आले ज्या दिवशीं आले त्या च दिवशीं मीररजा दोतीन हजार फौज तीनचार हजार बार आठ तोफा याप्रमाणें खंदकाचे आश्रयस उतरला होता लडाईस तैयार जाहला इतक्यांत श्रीमंताचे फौजेनें चालून घेऊन त्याची फौज शिकस्त होऊन दोनचारशें घोडे लशकरांत आले सा तोफा सरकारांत आल्या त्यांत दोन तोफा दोन मातबर बार बाराशेर गोळ्याच्या साडेपांच हात लांब नव्या आहेत मिररजा किल्ल्यांत गेल्यानंतर ते च मोर्चे सरकारचे बसले आठ दिवस तोफाचा मार बाहेरून बसला तीन हजार गोळा आंत पडला आठवे दिवशीं मिररजाकडून चाकरीचें राजकारण आले तीन दिवस त्याचे मतलबाचे यादीची घालमेल पडली त्यानंतर यादी करार होऊन आम्हीं च किल्ल्यांत जाऊन त्यास बाहेर काहाडिलें मीररजा हजार फौज हजार बार घेऊन श्रीमंतांचे पदरीं पडला सिरें फत्ते जाहालें सिरें हैदरनाईकानें जबर खंदक दुहेरे करून केलें होंते सरकारचे फौजेचें महिना दीढमहिन्याचें काम होतें परंतु श्रीमंतांचे ताळे समर्थ यास्तव लौकर फत्ते जाहाली पुढें ईश्वरसत्ता प्रमाण हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ३३
श्री
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री त्रिंबकराव मामा स्वामीचे सेवेसी
पो महिपतराव त्रिंबक सां। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लेखन करीत असलें पाहिजे विशेष आपणाकडून बहुत दिवस पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं तरी हें वडीलपणास योग्य नाहीं यानंतर राजश्री तात्यास लिहिले आहें त्यावरून सर्व कळों येईल सर्व प्रकारें आपण वडील आहेत जसें कळे तसें करावें कृपा करावी हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ३२
छ ८ जिल्काद पो श्री
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव तात्या स्वामीचे सेवेसीं
पौष्य मोरो बाबूराव साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जावें विशेष आपण गेल्यातागईत पत्रें येऊन वर्तमान कळत नाहीं तर ऐसें नसावें सदैव पत्रद्वारा संतोषवीत जावें श्रीमंतांनीं आपणां पत्र लिहिलें आहे त्यावरून सविस्तर अर्थ ध्यानांत येईल त्याप्रमाणें कच्चें वर्तमान लिहून पाठवावें श्रीमंताची ममता अकृत्रिम आहे संशय न मानावा बहुत काय लिहिणें कृपा लोभ कीजे हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ३१
पो।। छ १९ रमजान श्री
राजश्रिया तीर्थरूप मातुश्रीबाई वडिलाचे सेवेसी
अपत्ये माधवरायानें चरणावरी मस्तक ठेऊन साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील क्षेम ता। छ ७ रमजान मु।। वटबरी येथें वडिलांचे आशिर्वादेंकरून सुखरूप असों विशेष वडिलांकडून आलिकडे आशिर्वादपत्र येऊन वर्तमान कळत नाहीं तरी हमेशा पत्र पाठवावयासि आज्ञा केली पाहिजे इकडील वर्तमान तर चिकोडी वगैरे ठाणीं घेऊन शेषो नारायण याचे हवाली केली वटमरी ठाणें बळकट होतें यास्तव मरवामोर्चे लाऊन तोफाची मारगिरी देऊन आज प्रातःकाळीं ठाण्यांत लोक घातले ठाणें बळकट तोफाचे लोळे कारागीर न होत परंतु दहशतीनें दिल्हे व परिणाम हि नाहीं यास्तव ठाणें हवाली केलें उदैक कुच करून सत्वर च मनोळीस जात असों मनोळी हि घेऊन द्यावयाची आहे मनोळी घेऊन दिल्ही म्हणजे शेषोपंताकडील पांचलक्ष करार केले त्यापैकीं मनोळी हस्तगत केल्यावर दोन लक्ष अस्तग( त) होतील वरकड ऐवज पावला यास्तव मनोळीस जाऊन ठाणें घ्यावे लागतें पुढें मनसब्याचा प्रकार तर गोपाळराव हलसगीकडे पाठविले होते त्यास तें कार्य करून आणखी हि ठाणीं घ्यावयाचीं आहेत तीं घेऊन येतील व विठ्ठल शिवदेव करवीराकडे ठाणीं घ्यावयास पाठविले होते त्यास व गोपाळरायास बोलाऊं पाठविलें आहे सत्वर येऊन पोहचतील त्यानंतर पुढील कर्तव्याचा प्रकार ठराऊन पुढें जाऊं गोपाळरायास ठाण्यावर जखम खांद्यावर तरवारेची लागली आहे परंतु हलकी च आहे नरसिंगरायास हि गोळी लागली आहे परंतु हलकी आहे वडिलास कळावें हैदरनाईक तरेकिरे घेऊन या फौजेची बातमी आयकून बदनुरास आला मीरफैजुल्ला खोलगडास लाग (ला) होता त्यास त्याचे फिरंगी भेदून गोवेकरांनी नेले व हैदरअल्लीनें मीरफैजुल्लास बोलाऊन पाठविलें यास्तव कुच करून माघारा आला वडिलास कळावें मीररजा म्हणून सिंगनमल्यास आहे त्याची व मुराररायाची लढाई लागली आहे परंतु मुरारराव याची बाजू सेर आहे कळावें पुढें मयदानचे लढाईस हैदरनाईक मीरफैजुल्ला पोहोचल्यावर येणा(र) आहे त्याचा जमाव हि भारी च आहे पंधरा हजार कानडा प्या( दा) व गाडदी पंधरासोळा हजार व मराठी फौज दहा हजार याप्रमाणें सर्व सामान देखील त्याचे सरदार याप्रमाणें आहे मनोलीस गेल्यानंतर त्याचा विचार मनास आणून सत्वर च पुढें जाऊं वरकड राजकारणें हि बहुत आहेत परंतु प्रत्ययास येईल तें खरें. बिदनूरकर राजाचा भाऊ आला आहे त्याची हि भेट आज होईल परंतु हें राजकारण पक्कें आहे ठराव जाहाल्यावर सेवेसीं लिहीन सोंधेचा राजा येणार त्यास कागद व त्याचा कारकून व आपला कारकून पाठविला आहे सत्वर येईल वरकड प्रकार ठरेल ते सेवेसीं लिहीन तीर्थस्वरूप राजश्री दादा साहेबाचे वर्तमान लिहावयास आज्ञा करावी हे १विज्ञापना
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ३०
श्री
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदपंत तात्या स्वामीचे सेवेसीं
पो। विसाजी केशव कृतानेक नमस्कार विनंति येथील क्षेम ता। छ २४ माहे जिल्हेजपर्यंत वर्तमान यथास्थित असे विशेष स्वामीकडून पत्र येऊन सांभाळ होत नाहीं तरी असें नसावें सदैव पत्रीं सांभाळ करावा उभयतां श्रीमंत स्वस्थलास आले आजिपर्यत मार्गप्रतीक्षा करीत होतों पेसजी थोरले श्रीमंत यांस विनंतिपत्र व इकडचे वर्तमान लिहून पाठविले होते त्यावरून धनी मेहरवान होऊन सेवकांस कौल सादर केला तो ताइतांत घालून हृदई धरिला आहे मागें राजश्री राजाराम गोविंद श्रीमंती आमच्या पारपत्यास रवाना केलें त्यानीं येऊन प्रज्यांस पीडा बहुत केली गडकरियाचे कबिले कितेक धरिले बायकापोरें यांस हाणमार करून चोळणे चालविले पोरें सराट्यांवर टाकिलीं कितेक नागवणा घेऊन सोडविलीं गीर्दनवाईचे गांव लुटून जाळून उध्वस्त केले वीसपंचवीस जुझें जुंझले इतकें हि सोसून आजिपर्यंत धण्याच्या पत्रावर खुशाल होते प्रस्तुत धणी गांवास आले आमचें ऊर्जत करून साम्राज्य करितील अशामध्यें धणी आल्यावर सासवडचे फौजेने होते गांव ते जाळिले आणखी हि जाळितात पुढें काय करतील हें नकळे तस्मात् धन्यानें कौल दिल्हा आणि प्रस्तुत अवकृपा दिसती याजवरून बहुत अपूर्व वाटलें कां कीं घनी समर्थ सत्यवक्ते एकवचनीं रामचंद्र अवतार त्यांचा कौल असतां काळादिकांचे हि भय नसावें आणि धनी च दुसरी गोष्ट बोलतात हें च अपूर्व आहे तस्मात् पूर्वी यवनास मिळोन राज्यक्रांत केला पुणें जाळिलें सर्व प्रांत लुटून दहन केलें इतके अन्याय क्षमा करून शेवटीं धनी एकवचनीं म्हणोन त्यांस दौलता देऊन साम्य करून आपलेसे केलें सीहीगडीं पांचा कोडीची दौलत व धन्याचीं पुस्तकें व सर्व राज्याचे हिशेब एकदां च यवनास दान केले ते च मातबर कारभारी धनी घरास आल्यानंतर त्यांचा च गौर केला असें असतां इतके धनी कृपावंत म्हणून आम्ही कौल खरा हें जाणोन अमरप्राय मानीत होतों प्रस्तुत कौलाचें प्रमाण दिसे ना तेव्हां अमरत्व नाहीं क्षणभंगुर असें दिसोन आलें परंतु हा बाह्यरंग दिसतो अंतरंग भिन्न आहे एकवचनें लंका बिभीषणास दिल्ही असतां अंगदानें रावणाची स्नानशिला दिव्य घेऊन आला मग जांबुवंतास पुशिलें त्याणें निषेध करितां च शिला स्वस्थानीं नेऊन ठेविली ते च अंशांशें रघुनाथ अवतार यांचे पत्र मोहरेनसी आहे तें लटके कसें होईल यद्यपि धनी उगें च भाव गर्भ पहात असिले तरी सेवक पदरींचे च आहों प्रसंग पडल्यास चंदावरासारिखें होईल वरकड सेवकांपासून सेवा घ्यावी आम्ही केवळ अप्रयोजक असें नाहीं त्याहिमध्यें निकामी असें आढळोन आलें असेल परंतु येकसमई लघुकार्यास त-ही उपयोगी होऊं स्वामीच्या पत्राची नकल करुन सेवेसी पाठविली आहे ही अवलोकन करून मनन करावें. आपण सर्व-जाण स्वामी-विश्वासूक आहेत यास्तव लिहिलें आहे पत्राचें उत्तर पाठवावें बहुत काय लिहिणें लोभ असो द्यावा हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक २९
श्री
राजश्री गोविंद शिवराम यांसि
सै।। गोपिकाबाई नमस्कार विनंति ऊपरि तुम्ही उदईक भोजनास येथें किल्ल्यावर येणें तुम्हीं भुकाळू फार आहा सबब तेथें च फराळ करून येणें अथवा येथें हि फराळास मिळेल सकाळीं चे येणें हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक २८
पो। छ २ जिल्काद श्री
पु।। विनंति उपरि श्रीमंतांनीं तुम्हांस पत्र लिहिले आहे उत्तर सविस्तर लिहून पाठवावें साता-याकडील प्रकाराचें तेथें संभाळावें येविशीं श्रीमंतांनीं तुम्हांस लिहिलें आहे उत्तर ल्याहावें हे विनंति राजश्री मुरारराव घोरपडे श्रीमंतासन्निध येणार गुतीहून निघाले असें वर्तमान आहे सावनूरवाले पठाण श्रीमंतास सामिल होतात येथून उदैक कुच करून सावनूराकडे जाणार आहेत सारे सामिल करून घेऊन पुढें जावें हैदरनाईक बाहेर आला तरी लढई प्राप्त च जाहाली झाडून सोडिली तर हे छावणी करणार दुसरा प्रकार कांहीं हैदरनाइकानें दिल्हें तरी यंदाचे वर्षी घेऊन माघारें फिरावें असें हि आहे हैदरनाइकाचा वकील येथें होता तो कारभारी यानीं घालविला लाऊन दिल्हा याप्रमाणें वर्तमान आहे पुढें होईल तें लिहून पाठवितों आपण सविस्तर ल्याहावें हे विनंति