पत्रांक ३०
श्री
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदपंत तात्या स्वामीचे सेवेसीं
पो। विसाजी केशव कृतानेक नमस्कार विनंति येथील क्षेम ता। छ २४ माहे जिल्हेजपर्यंत वर्तमान यथास्थित असे विशेष स्वामीकडून पत्र येऊन सांभाळ होत नाहीं तरी असें नसावें सदैव पत्रीं सांभाळ करावा उभयतां श्रीमंत स्वस्थलास आले आजिपर्यत मार्गप्रतीक्षा करीत होतों पेसजी थोरले श्रीमंत यांस विनंतिपत्र व इकडचे वर्तमान लिहून पाठविले होते त्यावरून धनी मेहरवान होऊन सेवकांस कौल सादर केला तो ताइतांत घालून हृदई धरिला आहे मागें राजश्री राजाराम गोविंद श्रीमंती आमच्या पारपत्यास रवाना केलें त्यानीं येऊन प्रज्यांस पीडा बहुत केली गडकरियाचे कबिले कितेक धरिले बायकापोरें यांस हाणमार करून चोळणे चालविले पोरें सराट्यांवर टाकिलीं कितेक नागवणा घेऊन सोडविलीं गीर्दनवाईचे गांव लुटून जाळून उध्वस्त केले वीसपंचवीस जुझें जुंझले इतकें हि सोसून आजिपर्यंत धण्याच्या पत्रावर खुशाल होते प्रस्तुत धणी गांवास आले आमचें ऊर्जत करून साम्राज्य करितील अशामध्यें धणी आल्यावर सासवडचे फौजेने होते गांव ते जाळिले आणखी हि जाळितात पुढें काय करतील हें नकळे तस्मात् धन्यानें कौल दिल्हा आणि प्रस्तुत अवकृपा दिसती याजवरून बहुत अपूर्व वाटलें कां कीं घनी समर्थ सत्यवक्ते एकवचनीं रामचंद्र अवतार त्यांचा कौल असतां काळादिकांचे हि भय नसावें आणि धनी च दुसरी गोष्ट बोलतात हें च अपूर्व आहे तस्मात् पूर्वी यवनास मिळोन राज्यक्रांत केला पुणें जाळिलें सर्व प्रांत लुटून दहन केलें इतके अन्याय क्षमा करून शेवटीं धनी एकवचनीं म्हणोन त्यांस दौलता देऊन साम्य करून आपलेसे केलें सीहीगडीं पांचा कोडीची दौलत व धन्याचीं पुस्तकें व सर्व राज्याचे हिशेब एकदां च यवनास दान केले ते च मातबर कारभारी धनी घरास आल्यानंतर त्यांचा च गौर केला असें असतां इतके धनी कृपावंत म्हणून आम्ही कौल खरा हें जाणोन अमरप्राय मानीत होतों प्रस्तुत कौलाचें प्रमाण दिसे ना तेव्हां अमरत्व नाहीं क्षणभंगुर असें दिसोन आलें परंतु हा बाह्यरंग दिसतो अंतरंग भिन्न आहे एकवचनें लंका बिभीषणास दिल्ही असतां अंगदानें रावणाची स्नानशिला दिव्य घेऊन आला मग जांबुवंतास पुशिलें त्याणें निषेध करितां च शिला स्वस्थानीं नेऊन ठेविली ते च अंशांशें रघुनाथ अवतार यांचे पत्र मोहरेनसी आहे तें लटके कसें होईल यद्यपि धनी उगें च भाव गर्भ पहात असिले तरी सेवक पदरींचे च आहों प्रसंग पडल्यास चंदावरासारिखें होईल वरकड सेवकांपासून सेवा घ्यावी आम्ही केवळ अप्रयोजक असें नाहीं त्याहिमध्यें निकामी असें आढळोन आलें असेल परंतु येकसमई लघुकार्यास त-ही उपयोगी होऊं स्वामीच्या पत्राची नकल करुन सेवेसी पाठविली आहे ही अवलोकन करून मनन करावें. आपण सर्व-जाण स्वामी-विश्वासूक आहेत यास्तव लिहिलें आहे पत्राचें उत्तर पाठवावें बहुत काय लिहिणें लोभ असो द्यावा हे विनंति