पत्रांक ३१
पो।। छ १९ रमजान श्री
राजश्रिया तीर्थरूप मातुश्रीबाई वडिलाचे सेवेसी
अपत्ये माधवरायानें चरणावरी मस्तक ठेऊन साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील क्षेम ता। छ ७ रमजान मु।। वटबरी येथें वडिलांचे आशिर्वादेंकरून सुखरूप असों विशेष वडिलांकडून आलिकडे आशिर्वादपत्र येऊन वर्तमान कळत नाहीं तरी हमेशा पत्र पाठवावयासि आज्ञा केली पाहिजे इकडील वर्तमान तर चिकोडी वगैरे ठाणीं घेऊन शेषो नारायण याचे हवाली केली वटमरी ठाणें बळकट होतें यास्तव मरवामोर्चे लाऊन तोफाची मारगिरी देऊन आज प्रातःकाळीं ठाण्यांत लोक घातले ठाणें बळकट तोफाचे लोळे कारागीर न होत परंतु दहशतीनें दिल्हे व परिणाम हि नाहीं यास्तव ठाणें हवाली केलें उदैक कुच करून सत्वर च मनोळीस जात असों मनोळी हि घेऊन द्यावयाची आहे मनोळी घेऊन दिल्ही म्हणजे शेषोपंताकडील पांचलक्ष करार केले त्यापैकीं मनोळी हस्तगत केल्यावर दोन लक्ष अस्तग( त) होतील वरकड ऐवज पावला यास्तव मनोळीस जाऊन ठाणें घ्यावे लागतें पुढें मनसब्याचा प्रकार तर गोपाळराव हलसगीकडे पाठविले होते त्यास तें कार्य करून आणखी हि ठाणीं घ्यावयाचीं आहेत तीं घेऊन येतील व विठ्ठल शिवदेव करवीराकडे ठाणीं घ्यावयास पाठविले होते त्यास व गोपाळरायास बोलाऊं पाठविलें आहे सत्वर येऊन पोहचतील त्यानंतर पुढील कर्तव्याचा प्रकार ठराऊन पुढें जाऊं गोपाळरायास ठाण्यावर जखम खांद्यावर तरवारेची लागली आहे परंतु हलकी च आहे नरसिंगरायास हि गोळी लागली आहे परंतु हलकी आहे वडिलास कळावें हैदरनाईक तरेकिरे घेऊन या फौजेची बातमी आयकून बदनुरास आला मीरफैजुल्ला खोलगडास लाग (ला) होता त्यास त्याचे फिरंगी भेदून गोवेकरांनी नेले व हैदरअल्लीनें मीरफैजुल्लास बोलाऊन पाठविलें यास्तव कुच करून माघारा आला वडिलास कळावें मीररजा म्हणून सिंगनमल्यास आहे त्याची व मुराररायाची लढाई लागली आहे परंतु मुरारराव याची बाजू सेर आहे कळावें पुढें मयदानचे लढाईस हैदरनाईक मीरफैजुल्ला पोहोचल्यावर येणा(र) आहे त्याचा जमाव हि भारी च आहे पंधरा हजार कानडा प्या( दा) व गाडदी पंधरासोळा हजार व मराठी फौज दहा हजार याप्रमाणें सर्व सामान देखील त्याचे सरदार याप्रमाणें आहे मनोलीस गेल्यानंतर त्याचा विचार मनास आणून सत्वर च पुढें जाऊं वरकड राजकारणें हि बहुत आहेत परंतु प्रत्ययास येईल तें खरें. बिदनूरकर राजाचा भाऊ आला आहे त्याची हि भेट आज होईल परंतु हें राजकारण पक्कें आहे ठराव जाहाल्यावर सेवेसीं लिहीन सोंधेचा राजा येणार त्यास कागद व त्याचा कारकून व आपला कारकून पाठविला आहे सत्वर येईल वरकड प्रकार ठरेल ते सेवेसीं लिहीन तीर्थस्वरूप राजश्री दादा साहेबाचे वर्तमान लिहावयास आज्ञा करावी हे १विज्ञापना