Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५] श्री २० डिसेंबर १७२५
आशीर्वाद. उपरी राजश्री रघोजी भोसले सेनासाहेब सुभा आजीं छ २५ र॥लाखरीं नागर६ कर्नोळास सा सात हजार फौजेनशी येऊन सामील जाले. मोंगलांनीं कर्नोळ घेऊन तेथील बंदोबस्ती करून कृष्णा उतरून कृष्णेअलीकडे दोन मजली पेठ पल्लीवर आला. बुणगे कांही लाऊन दिल्हे. त्यास आह्मांस तफावत पंधरा कोसांची आहे. राजश्री जानोजीराव निंबाळकर व राजश्री जानोजी ढमढेरे व लिंबाजी अनंत व महमद हाफी मोंगलाकडे पाठविले असे. ते बहुतकरून सौरष्टच होईल असें आहे. हे न करितां कल्हा करितील तर त्याही गोष्टीस आह्मीं सिध्दच आहों. घडेल तें मागाहून लिहिलें जाईल. राजश्री उदाजी चव्हाण दो चहू रोजांत येतील. बहुताप्रकारें सत्वरच सलुखा होईल. छ २९ रविलाखर. हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४] श्री
श्रीमंत परमहंसश्री स्वामीचे सेवेशी.
विनंति. श्रीमंत सकल सौभाग्यादिसंपन्ना जिजाबाई५ साष्टांग दंडवत. विनंति. अत्रत्य कुशल जाणोन स्वानंदवैभवलेखन करावें. विशेष. कुसाजी कदमासमागमें आशीर्वादपत्र पाठविलें व प्रसाद नारळ १ उत्तम काली येऊन प्रविष्ट जाले. कित्येक अमृतवचनें लिहिली, श्रवण करून बहुत संतोष जाला. अवशधाकारणें जुनें तूप दहा शेर पाठवावें ह्मणोन लिहिलें त्याजवरून हल्ली कुसाजीसमागमें तूप जुनें वजन ५ पांच शेर पाठविलें आहे. घेतलें पाहिजे. निरंतर आशीर्वादाभिवृध्धी करून परामर्ष करावा. बहुत लिहिणें तरी सूज्ञ असा. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३] श्री
श्रीमत् परमहंस स्वामीचे सेवेशी.
सेवक देवळजी सोवंशी४ हिंदुराव कृतानेक विज्ञापना. येथील कुशल भाद्रपद वद्य दशमी परियंत स्वामीचे आशीर्वादें करून यथास्थित असे. स्वामींनी कृपा करून निंबाजी समागमें आशीर्वादपत्र पाठविलें ते प्रविष्ट होऊन संतोष पावलों. तेथें आज्ञा जे, कृष्णातिरी समाधीस बैसणें जाहलें होतें, तेथून श्रीदयेनें उठोन धावडशीस आलों, शरीर कृश जाले, तक्राकारणें ह्मैस १ पाठवणें, ह्मणून आज्ञा. ऐशीयाशी निंबाजी जबानी सविस्तर वर्तमान पुशिला तो सांगितला. त्याजवरून समाधान झालें. आज्ञेप्रमाणें ह्मैस १ म ॥ समागमें पाठविली आहे. प्रविष्ट होईल. ह्मैस दुधाची तिनसाली आहे. उत्तम जाणून पाठविली आहे. वरकड वृत्त आपलें आशीर्वादें यथास्थित असे. आपला निजध्यास निरंतर स्वामीच्या चरणापाशीं आहे. निरंतर श्रीपाशी अभीष्टचिंतन करून उर्जित होय ऐसें केलें पाहिजे.
कृपा असो द्यावी हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२] श्री २६ एप्रिल १७३३
श्रीमत् महाराजश्री परमहंस बाबा स्वामीचे सेवेशी.
चरणरज बापूजी२ गणेश. चरणावर मस्तक ठेऊन शिरसाष्टांग नमस्कार विनंति. येथील वर्तमान :- त ॥ छ २९ जिल्कादपर्यंत यथास्थित असे. विशेष. आज्ञापत्र पाठविलें :- राजपुरीकडील३ वर्तमान यथास्थित असेल ऐसें लिहून पाठवणें तर अद्यापि राजपुरीस पावलेयाचें पत्र व जासूद आला नाही. अष्टमीहून जासूद आला होता. आपण अष्टमीस पावलों, पुढे जाऊन, ऐशीं शनवारची पत्रें होती. त्याअलीकडे कांही वर्तमान आलें नाहीं. स्वामीनीं डांक सचीवपंत यांचे जिल्हेत एक बसविली आहे; परंतु त्याचें वर्तमान आलें नाहीं. पैकेयाचें लोक ह्मणतात ह्मणून लिहिलें. तर ती गोष्ट लटकी आहे. आमचे यजनास कांही दिलें नाहीं. तेथील अनुसंधानी माणूस मातबर आहे. त्यासी कांही दिल्हे ह्मणून नवाजी आहे. तवताक कांही नाहीं. राजश्री सरखेल अद्यापि येऊन भेटले नाहीत. ह्मणून र॥ जिवबा चिटणीस राजश्री स्वामीनीं त्याजकडे पाठविले आहेत, की तुह्मी शिताबी जाऊन साहेता करून कार्यसिध्दीतें पावणें. ऐशी ताकीद आहे. आज उदईक माणूस येणार ऐसें आहे. काय वर्तमान येईल ते कळेल. कागदगड्डी खर्ची पाठविली असे. मागची किंमत लिहिली आहे, त्याप्रमाणें असे; परंतु कांही कार्य सिध्दीतें पावावें ऐसें आहे. स्वामीचे आशीर्वादें करून कार्य व्हावें ऐसें आहे. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१] श्री २६ जुलै १७४५
यादी१ १+ श्रीदेव परशराम वास्तव्य मौजे पेढें ता. चिपळूण प्रांत दाभोळ येथें कारखाना इमारती बंदिस्तीस प्रारंभ श्रीपरमहंस स्वामी याणीं केला. शासन सन तिसैन ता॥ पौष शुध्द पौर्णिमा शके १६२७ पार्थिव संवत्सरे.
कित्ता वैवाट श्रीपरशरामीं | |
श्रीस्वामी राहिले सालें :- | |
१ सन तिसैन. | २१ सन अशरीन मार्गशीर्षमासी घावडशीस संस्थान वाडा बांधिला |
२ तिसा तिसैन. | |
३ अशर. | २२ तिसा अशरीन. |
४ इहिदे अशर. | २३ सलासीन. |
५ इसने अशर. | २४ इहिदेसलासीन त॥तिसा सलासीन मु॥ सालें ९. |
६. सल्लास अशर. | २५ अर्बैन. |
७ अर्बा अशर. | २६ इहिदे- |
८ खमस अशर. | २७ इसने- |
९ सीत- | २८ सलास- |
१० सबा- | २९ अर्बा- |
११ सन- | ३० खमस- |
१२ तिसा- | ३१ सीत अर्बैन श्रावण शुध्द ९ शुक्रवारी श्रीस्वामी कृष्णातीर वीरडे कैलासवासी जाहाले. शके १६६७ क्रोधन संवत्सरे. |
१३ अशरीन- | |
१४ इहिदे- | |
१५ इसने- | |
१६ सल्लास- | ४९ |
१७ अर्बा- | |
१८ खमस- | |
१९ सीत- | |
२० सबा अशरीन माघमासी शिवरात्रीस हस्तीबद्दल शिद्दीसात बाबाशी याणीं दंगा करून उच्छेद केला. |
|
२९ |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तुतची पत्रें बहुतेक १७०७ पासून १७६१ च्या अवधीतील आहेत. ह्यांत वाई येथील शेखमिरे, ओझर्डे येथील पिसाळ व मुख्यत्वें करून धावडशी, पिंपरी, पेढें व गोठणें येथील ब्रह्मेंद्रस्वामींचे वहिवाटदार वगैरे ग्रहस्तांच्या दफ्तरांतील अस्सल लेख येतील. प्रत्येक लेखाच्या मथळयावर त्या त्या लेखाची इंग्रजी तारीख दिली आहे. क्वचित टीपाही दिल्या आहेत. ह्या दोन चार दफ्तरांतील महत्त्वाची अशी सर्व पत्रें छापण्यास पाच सहाशें डेमी पृष्ठे लागतील. सर्व पत्रें छापून झाल्यावर शेवटी इ. स. १७०७ पासून १७६१ पर्यंतच्या इतिहासाच्या रचनेस कोणतें साहाय्य झालें, तें इत्थंभूत सांगण्याचा विचार आहे. धावडशी येथील दफ्तरासंबंधानें एक गोष्ट मुद्दाम नमूद करून ठेवण्यासारखी आहे. त्या दफ्तरांत इ. स. १७२८ पासून १७४५ पर्यंतची ब्रह्मेंद्रस्वामींची रोजकीर्द बहुतेक शाबूत आहे. अर्थशास्त्र्यांना तिचा उपयोग विशेष होईल. तींतील धान्याच्या किमती, व्याजाचे दर, जमिनीवरील कर, वगैरेंच्या यादी पुढेंमागें देण्याचा माझा संकल्प आहे. प्रथमपासूनच ह्या यादींना प्रारंभ करणार होतो; परंतु पत्रें छापून झाल्यावर मग ह्या यादी हाती घ्याव्या असें कित्येकांचें सांगणें पडलें. तें मान्य करून स्वामींच्या खासगी व राजकीय पत्रांसच सध्यां प्रारंभ केला आहे. स्वामींची रहाणी स्वभाव व चरित्र ह्यांवर ज्यानें कोणत्याही प्रकारचा प्रकाश पडेल असें वाटलें, तें पत्र प्राय: गाळलें नाहीं. ही पत्रें वाचतांना स्वामींच्या स्वभावाची निरनिराळी अंगें वाचकांच्या दृष्टोत्पत्तीस पडतील. कित्येक स्थळी स्वामी एखाद्या पाटलाशीं भांडतांना दृष्टीस पडतील, तर कित्येक ठिकाणी छत्रपतीसारख्यांनाही चापतांना आढळतील. कोठें धाबळीकरिता भिक्षा मागताना स्वामींना पहावें, तर कोठें लाखों रुपयांचें जडजवाहीरही करताना ते दिसतात. असें शेकडों आविर्भाव स्वामींच्या स्वभावाचे आहेत. ते ज्या ज्या पत्रांतून दिसून आले, तें तें पत्र संग्रहांत सामील केले आहे. स्वामींच्या पत्रांशिवाय १७०७ पासून १७६१ पर्यंतच्या इतर पत्रांचाही येथें समावेश केला आहे.
पत्रांच्या मथळ्यावर इंग्रजी तारखा घातल्या असल्यामुळें व प्रत्येक पत्र तुटक असल्यामुळें, पत्रें, सालवारीनें लावण्यापासून विशेष फायदा दिसत नाही.
कालानुरोधानें संगतवार न लावण्याचें एक कारण आहे. तें हें कीं, १७०७ पासून १७६१ पर्यंतच्या अवधींतील पत्रें दर आठवडयास नवीं नवीं उपलब्ध होत आहेत. आजपर्यंत मिळालेली पत्रें संगतवार तेवढीच प्रथम छापून काढण्याचा संकल्प केल्यास तो संकल्प फारच अडचणीचा होतो. नवी सांपडलेली कांही चिटोरी जुन्या संगतवार लावलेल्या पत्राहून १७०७ च्या जवळची कधी कधी असतात. ही १७०७ च्या जवळचीं चिटोरी अगोदर छापणे हीच खरी संगति होय. सारांश पत्रांची संगत अमूक एका पध्दतीनें सोयीची व कायमची लागेलच अशी खात्री नसल्यामुळें, केवळ उपलब्धि व महत्त्व यांजकडे दृष्टी देऊन ही पत्रें छापिली आहेत. बहुतेक प्रत्येक पत्राची तारीख पत्राच्या मथळयावर दिली असल्यामुळें, पत्राचें अनुसंधान कळण्यास विशेष अडचण पडावी, असें वाटत नाहीं. ज्या पत्रांची इंग्रजी तारीख काढण्यास अंतस्थ चिन्ह कांहीच नाहीं ती पत्रें तारखेशिवाय छापिली आहेत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
पत्रें, यादी वगैरे.
१७०० पासून १७६१ पर्यंत.
उपोद्धात
इतिहासाची मुख्य साधनें ह्मटली ह्मणजे पत्रें, यादी वगैरे अस्सल लेख होत. लेख जितके जास्त मिळतात, तितकी इतिहासाची गुंतागुंत जास्त उलगडली जाते. मराठयांच्या इतिहासासंबंधानें पाहिलें तर, आजपर्यंत असले अस्सल लेख फारच थोडे छापले गेले आहेत. ठोकळ मानानें हिशेब केला गेला तर असे दिसून येईल कीं, आजपर्यंत मराठयांच्या इतिहासासंबंधानें, फार झाले तर, दोन हजार इंग्रजी व मराठी लेख प्रसिध्द झाले आहेत. ह्या लेखांच्या द्वारा आपल्या इतिहासांतील कांहीं प्रकरणें जास्त स्पष्ट झालीं आहेंत हें खरें आहे; परंतु ज्यासंबंधीं अजून कांहींच माहिती नाहीं किंवा जी माहिती आहे, ती चुकीची व अपूर्ती आहे, अशीं प्रकरणें आपल्या इतिहासांत शेकडों आहेत. ह्या शेकडों प्रकरणांवर प्रकाश पाडण्यास पांचपंचवीस वर्षे दहावीस मासिकपुस्तकें सारखीं उद्योग करीत राहिलीं पाहिजेत. मराठ्यांच्या इतिहासाच्या रचनेस उपयोगी पडणारे लेख लाखोंनें मोजतां येतील असा मला, सातारा जिल्ह्यातील पांचपन्नास दफ्तरें पाहून, अनुभव आला आहे. हे सर्व लेख छापून काढण्यास दहा वीस मासिक पुस्तकें अवश्य हवींत. इतकेंच कीं, हीं मासिकपुस्तकें चालण्यास दोन गोष्टींची विशेष जरूर आहे. इतिहासज्ञांनी ही मासिक पुस्तकें चालविण्यास तयार झालें पाहिजे. ही पहिली जरूर आहे, व ह्या मासिक पुस्तकांना आश्रय मिळाला पाहिजे, ही दुसरी जरूर आहे. ह्या दोन्ही जरूरी पुष्कळ दिवसपर्यंत अशाच राहतील असें वाटत नाहीं. दिवसेंदिवस इतिहासाची गोडी महाराष्ट्रांतील लोकांना जास्त जास्त लागत चाललेली आहे. तेव्हां ह्या लोकांच्या आश्रयानें ही मासिकपुस्तकें चालतील असा तर्क करण्यास जागा होते. ह्याच तर्कावर व आशेवर दृष्टी ठेवून, प्रो. विजापूरकर यांच्या साहाय्यानें मी कांही अस्सल लेख प्रसिध्द करितों.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
७६. कार्यभागाचीं मुख्य अंगें तीन:--- (१) इतिहाससाधनसंशोधन, (२) साधनसंग्रह, (३) साधनप्रकाशन. मराठ्यांच्या व हिंदुस्थानांतील इतर समाजांच्या इतिहासाचीं साधनें हिंदुस्थानांत शेंकडो स्थलीं व यूरोपांतील पांचचार राजधान्यांत सांपडण्यासारखीं आहेत. तीं शोधून काढावयास प्रथमारंभीं निदान दहा तज्ञ्ज्ञ गृहस्थ लावले, तर प्रत्येकीं अन्नखर्च व प्रवासखर्च मिळून वर्षाला ६०० रुपये धरल्यास ६००० रुपये पाहिजेत. अशा दहा लोकांच्या सतत व अविश्रांत खटपटीशिवाय हें अवाढव्य काम समाधानकारक रीतीनें उरकणार नाहीं. शोधून आणिलेल्या साधनांचा संग्रह करण्यास इमारत पाहिजे. तिचा खर्च सुमारें १०,००० रुपये. आणि दरवर्षाला १०,००० अष्टपत्री पृष्ठें ऐतिहासिक अस्सल साधनें प्रकाशण्यास १०,००० रुपये.
मिळून, प्रथम इमारतीप्रीत्यर्थ कायम बुडित खर्च ---- १०,००० रुपये.
दरवर्षास संशोधनास व प्रकाशण्यास ---- १६,००० रुपये.
इमारत व साधनसंग्रह यांच्या व्यवस्थेस
लागणा-या एका कारकूनाचा व एका हमालाचा
वार्षिक पगार १५ व १० रुपये दरमहाप्रमाणें ---- ३०० रुपये.
आणि सादिलवार खर्च दिवा, बत्ती, कागद वगैरे ---- ५०० रुपये.
एकूण १६,८०० रुपये वार्षिक चालता खर्च व १०,००० रुपये कायमचा इमारतीप्रीत्यर्थ बुडित खर्च लागणार आहे. चालक मंडळींनें व तज्ञ्ज्ञांनीं साधनें निवडण्याचें, संपादण्याचें व प्रकाशनार्थ तयार करण्याचें काम फुकट करावयाचें आहे. प्रकाशनाचें काम केलें नाहीं. तर १०,००० रुपये अर्थात् लागणार नाहींत. केवळ ६८०० रुपये वार्षिक खर्च संशोधन, व्यवस्था व संरक्षण यांच्याकरितां लागतील. हा सर्व अंदाज स्थूल आहे. चालक व अभिमानी मंडळीच्या सल्ल्याप्रमाणें यांत योग्य फेरफार करणें जरूर पडेल.
७७. प्रस्तुत हें सर्व मनोराज्य आहे. पंधरावीस हजारांची रक्कम दरवर्षास खर्चणारी स्वतंत्र लोकसंस्था क्रांग्रेसखेरीज दुसरी या देशांत नाहीं. कांहीं खासगी शाळा वगैरे संस्था वीस पंचवीस हजारांचा विनियोग करणा-या आहेत. परंतु पांच दहा हजार रुपयांकरितां त्या सरकारच्या मिंध्या अतएव लोकहितदृष्ट्या निरुपयोगी बनल्या आहेत. तसा प्रकार ह्या भावी संस्थेचा होऊं नये, अशी सर्वांची इच्छा आहे. कर्ता करविता स्वदेशांतील अभिमानी समाज आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
७५ एकेकट्याच्या सान्निपातिक तडफेनें काम फार तुटपुंजें, असमाधानकारक व कनिष्ट प्रतीचें होतें, ही गोष्ट अलीकडील चाळीस वर्षांच्या अनुभवानें कायम ठरल्यासारखी आहे. तेव्हां संघशक्तिचा आश्रय करण्यावांचून दुसरा उपाय नाहीं. कलौ संघ: प्रकीर्तित: संघशक्ति अनेक प्रकारांनीं योजतां येईल. इतिहासाचें आस्थापूर्वक परिशीलन करणारे जे पांचपन्नास लोक सध्यां देशांत आहेत, त्यांनीं पंचवीस किंवा पन्नास रुपये वार्षिक वर्गणी प्रत्येकीं देऊन हजार दोन हजारांची रक्कम आपसांत उभारावी व प्रकाशन, संग्रहण व शोधन करावें, ज्या विषयाची देशांतील लहानथोर लोकांना गोडी नाहीं, त्याविषयीचीं साधनें व पुस्तकें प्रकाशण्यास यूरोपांत असले तज्ञ्ज्ञसमाज स्थापिलें जातात. यूरोपांत पाली सोसायटी अशाच प्रकारची आहे. पाली भाषेचीं पुस्तकें व साधनें प्रसिद्ध व्हावीं, अशी ज्या पन्नास शंभर तज्ञ्ज्ञांची इच्छा आहे, त्यांनीं एकदोन गिनी वार्षिक वर्गणी देऊन, हा पालीसमाज स्थापिला आहे. असल्या तज्ञ्ज्ञसमाजापासून एक फायदा असतो. तो हा कीं, मारूनमुटकून कोण्या अतज्ञ्ज्ञाला भागीदार केला नसल्यामुळें, पाली पुस्तकें छापून काय होणार आहे, छापलेलें पुस्तक गचाळ आहे, वगैरे अज्ञ व अर्धवट टीका होण्यास जागा रहात नाहीं. संघशक्ति योजण्याचा दुसरा प्रकार ह्याहून किंचित् निराळा आहे. दहा पांच तज्ञ्ज्ञांनीं स्वतः च्या भिडेनें श्रीमंत च सामान्यलोक ह्यांच्याकडून देणग्या व वर्गण्या घेऊन मंडळी स्थापावयाची व कमिटीद्वारां इष्टकार्य संपादावयाचे. ह्या प्रकारांत श्रीमंत व सामान्य लोक यांना इष्ट विषयाची थोडीबहुत गोडी आहे व अवश्यकता वाटते, असें गृहीत धरून चालावें लागतें किंवा अशी वस्तुस्थिति असते. तिसरा प्रकार दहापांच तज्ञ्ज्ञांच्या मंडळीनें अज्ञ्ज्ञ व तज्ञ्ज्ञ अशा लाखों लोकांकडून पैपैसा वर्गणीनें लाखो रक्कम जुळवून इष्टकार्य तडीस न्यावयाचें. ह्या प्रकारांत लोकांचा तज्ञ्ज्ञांवर विश्वास असावयाला हवा असतो. एकाच धनाढ्य व तद्विषयासक्त मनुष्यानें दहापांच लाखांची कायमची देणगी देऊनहि असल्या मंडळ्या किंवा संस्था चालूं शकतात. आपल्या इकडे पुण्यांतील आनंदाश्रम असल्याच प्रकारची संस्था आहे. एखाद्या सरकारनें जर ही गोष्ट करावयाची मनांत आणली तर ती त्याला सहज करतां येण्याजोगी आहे. हिंदुस्थानांतील इंग्रज सरकारनें फारेस्ट वगैरे लोकांना लाखो रुपये पगार देऊन इतिहाससाधनें प्रसिद्ध केलेलीं महशूर आहेत. इतिहास साधनें छापण्याकरितां हें पांचहि प्रकार इंग्लंडांत सध्यां चालू आहेत व पांचपंचवीस वर्षांपूर्वी चालू होते. Rolls series व Record commission (सरकार), Maitlaced Club, Parkar Society. (धनाढ्य), Hardy's descriptive catalogue of Historical Mss. (व्यक्तिमात्र), English Historical Society (मंडळी), Palı Society (तज्ञ्ज्ञसमाज), असे अनेक प्रकार यूरोपांत आहेत. फैसाफंड मात्र ह्या कामीं योजलेला दिसत नाहीं त्याच्याद्वारां आपल्या इकडील औदासिन्याच्या हवेंत काम चांगलें होईल असें दिसतें. शिवाजी फंडाचे २०/२५ हजार रुपये केसरीकर्त्यांच्या प्रोत्साहनानें सहज जमा झाले. सारांश, ह्या पांचहि उपायांपैकीं एकाचें किंवा साधल्यास सर्वांचे अवलंबन करून एक इतिहासमंडळ स्थापिलें पाहिजे. मंडळासारखा अव्याहतपणें काम चालण्यास दुसरा उपाय नाहीं. गेल्या वर्षांत पांचपंचवीस गृहस्थ मला असे भेटले कीं ज्यांना इतिहासमंडळ स्थापण्याचें अगत्य वाटूं लागलें आहे व तत्प्रीत्यर्थ अल्पस्वल्प द्रव्य खर्चण्याची इच्छा उत्पन्न झाली आहे. अशा अगत्यवान तज्ञ्ज्ञ व तदभिमानी लोकांनीं एखादें इतिहासमंडळ स्थापिलें व पैपैसाफंडद्वारां द्रव्य जमविलें तर कार्यभाग होणार आहे. इतिहासाभिमानी लोकांच्या मननार्थ इष्ट कार्याचा विस्तार केवढा आहे व तत्साधनार्थ द्रव्य किती पाहिजे त्याचा माझ्या मतें अंदाज येणेंप्रमाणें आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
७४. हे प्रचंड व दीर्घकालावर्ती कृत्य साधणार कसें? कोणचा उपाय योजला असतां व कोणतें यंत्र निर्मिलें असतां, हें कार्य तडीस लागण्याच्या मार्गाला लागेल? आमच्यासारख्या एकट्यादुकट्या भुकेबंगालाच्या जीवापाड परिश्रमानें ह्या कामाचा प्रारंभहीं झाला म्हणणें हास्यास्पद आहे. कीर्तन्यांनीं सहा महिने खपून दोन बखरी, सान्यांनी बारा वर्षे खूपन चाळीस बखरी, ख-यांनीं वीस वर्षे खपून दोन हजार पृष्ठें व मीं पंधरा वर्षे खूपन चवेचाळीसशे पृष्ठें प्रसिद्ध केलीं. ह्या सर्वांनीं केलेलें काम, एखाद्या राजानें, महाराजानें किंवा सार्वभौमानें दोन रखेल्यांचा वर्षाभराचा मेहनताना ह्या कामीं खर्चिण्यानें मनांत आणिलें असतें, तर पंधरा हजार रुपयांच्या व्ययानें सहा महिन्यांत सहज आटोपलें असतें. पण बेलिफाचें शिक्षण मिळालेलें व पोलीस शिपायाचे विलास भोगूं इच्छिणारे नृपाधम जोंपर्यंत गाद्यावरून लोळत आहेत, तोंपर्यंत त्यांच्यापासून प्रोत्साहन राहूंद्याच, सामान्य साहाय्यहि मिळण्याची आशा करणें व्यर्थ आहे. बेलिफांनीं न्यायमीमांसा व पोलीस शिपायांनी राजनीति कशाशीं तोंडीं लावावयाची? राजांचा खालचा जो जमीनदार, इनामदार वगैरेंचा वर्ग तोहि अद्यापि निद्रापद भोगीत आहे. शेतकरी, उदमी, कारकून व पंतोजी हे बोलूनचालून काबाडकष्ट करणारे लोक त्यांच्यापासून ह्या कामाला साहाय्य कसें मिळणार? रहातां राहिले आंग्लशिक्षित लोक, मास्तर, वकील, हायकोर्ट वकील, मुन्सफ, जज्ज, इंजिनेर, डॉक्टर, वगैरे जे बूटपाटलोणवाले बडे बडे महंत आहेत, त्यांची तर ह्या कृत्यावर बहुत खपा मर्जी झालेली दिसते. बड्या बड्या विद्वानांचें व महान् महान् देशहितकर्त्यांचें निवासस्थान जें मुंबई शहर त्या राजधानींत पांच पन्नास पृष्ठांचें एखादें ऐतिहासिक मासिक पुस्तक सहज चालेल ह्या आशेनें आमच्या एका हायकोर्ट वकील मित्रानें एक मासिकपुस्तक मोठ्या उत्साहानें सुरूं केलें. महंतांच्या व ऋषींच्या कर्णपथावर आरंभिलेल्या कार्याची वार्ता आदळली व कित्येक विद्वद्रत्नांकडून द्रव्यसाहाय्याचीं आश्वासनेंहि मिळविलीं. आणि एवढा थोरला कडेकोट बदोबस्त होऊन, ह्या मासिकाला सात महिन्यांतच गाभाटावें लागलें? पुरे शंभरहि वर्गणीदार मिळाले नाहींत, आणि जे मिळाले त्यापैकीं शेकडां नव्वद भिडेखातर मिळाले. केवळ स्वदेशाच्या चरित्रप्रेमानें झालेला वर्गणीदार ह्या संतमहंतांतून एखाददुसरा झाला असल्यास न कळे. विद्वान् व देशहितकर्ते म्हणून ज्यांना म्हणतात त्यांची कळकळ असली आहे. केवळ ज्ञानार्जनांतच नव्हे, तर खाण्यापिण्यांत व वस्त्रप्रावरणांत सुधारलेल्या पाश्चात्यांचें सर्वस्वीं अनुकरण करण्याचा बाणा बाळगणा-या ह्या मुंबईंतील देशभक्तांनाहि औदासिन्यानें व संन्यासप्रणवतेनें सोडलें नाहीं. प्रपंच, इतिहास, समाज ह्यांचें हित करण्याचा उपदेश ज्यांनीं पाश्चात्यांपासून घेतला त्यांनीं स्वसमाजाच्या चरित्राच्या प्रसिद्धीकरणार्थ वर्षांतून शांपेनच्या एका अर्ध्या बोतलचीहि किंमत देऊं नये? परंतु, स्वार्थाचा त्याग करण्याला ज्यांना पाश्चात्यांनीं शिकविलें त्यांनीं स्वेतिहासाचा व स्वत्वाचा त्याग करूं नये तर काय करावें ! येणेंप्रमाणें समाजांतील बहुतेक सर्व वर्ग आंग्लभाषाकोविद व अकोविद - औदासिन्यानें घेरलेला आहे. तेव्हां, आतां, हें काम व्हावें कसें?