Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२७] श्री १३ मे १७३९
श्रीमंत महाराजश्री परमहंस बाबा स्वामीचे सेवेशी.
आपत्ये चिमाजींने कृतानेक सा॥ नमस्कार२६. विज्ञापना येथील कुशल ता॥ वैशाख बहुल प्रतिपदा पर्यंत मुक्काम वसई स्वामीचे आशीर्वादेकरून सुखरूप असो. विशेष. स्वामीचे अभयावरून वसईस मोर्चे घ शु॥ दशमीस लाविले. त्यादारभ्य मोर्चे चालविले व धमधमे चार पांच बांधले. सुरंग चालविले. जे जे उपाय स्थल हस्तगत करावयाचे ते केले. फिरंगी यांनी निराकरणाचा मंत्र पूर्वी युध्दप्रसंगी मोठ्या मोठ्या सुरांनी केलें. तदन्वयें फिरंगियांनीं सुरंगांवर व धमधमे यावर गरनाळा टाकिल्या. सुरंग विच्छिन्न केलें. पनळ लावून पाणी सोडिले. आगीचे ओंडे जळके टाकून त्यावर तेल, दारू, राळ टाकून चार चार रोज डोंबराही सारखा करी. बरकंदाजी व तोफाजी फिरंगियाची निस्सीम ह्मणावी तैशी. तथापि स्वामीचा आशीर्वाद व दंड हें सबळ शास्त्र आह्माजवळ. त्याचे प्रतापें इकडून तोफा लागून फिरंगियांच्या तोफा मना केल्या. सफेल पाडून लेश केली. वसई जागा बाका बुलंद. सुरुंगांचा उपाय नाहीं. परंतु स्वामीचे कृपा कटाक्षें सुरंग चालवून दोही बाजूंनीं खांब, वरती तक्तपोशी, त्यावर दोन अडीच हात रेती टाकून सुरंग नेऊन पोहोंचाऊन, दोनशे पाथरवट लावून, मोठे मोठे चिरे फोडून सुरंगाचे बुधलियास जागा करून, वैशाख शु॥ पंचमीस सकल सिध्दता करून, सुरंग लोकांस बाजू वांटून देऊन, नगारेयाची इशारत करून, सुरंग उडतांच सर्वांनीं येलगारास उठावें, बुरजावर चढावें, शिडया टेकून चढावें, ऐसा करार करून, वैशाख शु॥ ६ बुधवारी दोन घटका दिवस प्रात:काळचा येतांच सुरंगांस बत्या दिल्या. डावे बाजूचे सुरंग कांही उडाले, कांही उडणे होते, तोंच लोकांनीं उतावळी करून कोटावर चालून घेतले; तों दुसरें सुरंग तेच बाजूचे उडाले, त्याणी लोक दडपले व जाया व ठार झाले. तसेच उजवे बाजूचे सुरंग उडाले, एक दोन उडतांच बुरजास वाट जाहलीशी देखून लोक वरतें चढले, तों दुसरे सुरंग उडाले, त्यांणीं वरतें लोक चढले होते ते उडोन गेले. लोक कचकरले. हिरमोड होऊन काम बंद पडिलें. फिरगी यांणीं संभाळून हुके व गरनाळा व रेजगरीचा मार न भूतो न भविष्यति केला. त्याणें लश्करचे लोकांस व हषमांस अवसान राहिलें नव्हतें. उजवे बाजूचा मातबर सुरंग राजेश्री मल्हारजी होळकर यांजकडील उडणे होता, त्याचा शोध करून, पुन्हा त्यांत बुधले घालून रंजक दुरस्त करून लोकांची निवड केली. आणि सुरंग उडतांच खामखा निशाणें चढवावींसा कारार करून वैशाख शु॥ ७ गुरवारीं उजवे बाजूचा सुरुंग उडविला. तेच समयीं लोक जाऊन बुरूज अर्धा उडाला. त्याजवर चढले. फिरंगीयांनी सफेलीच्या आंतून मेंढा घालून पेटी भरून तोफा जाऊन तयार होतांच तेथे फिरंगी बळाऊन होके गरनाळाचा दारूच्या पोत्यास आग लाऊन मार केला, व रेजगिरीचा मार सीमे परता केला. लोकांवरी अग्नीचा पर्जन्य करून भाजून काढिले. तथापि स्वामीचे अभय आशीर्वादाचें वज्रकवच लोकांचे आगीं होतें. तेणेंकरून आगीची तमा न धरितां लोकांनी हत्यार बरे वजेनें केलें. फिरंगीयांनीं मरदुमी शिपाईगिरी करावी तैशी केली. त्याप्रमाणें इकडील लोकांनी भारती युध्दाप्रणें युध्द केलें. या मागें युध्दें बहुत झाली. परंतु या लढाईस जोडाच नाहीं. सर्व स्वामीचा आशीर्वाद. लोक बुरूज सोडीनातसे जाहले. तेव्हा स्वामीच्या दंडकप्रहारें करून फिरंगी धर्मद्वेष्टे बेहिमत होऊन अष्टमीस प्रहर दिवसास कबूलास आले. कबूल घेतला. आठ दिवसांत कबिलासुध्दां झाडून जातोसें करार केले. याजवरून मार महकूफ केला. फिरंगी यांणीं कबिले वस्तभाव गलबतांत भरिली. काल वे॥ पोर्णिमेस फिरंगी झाडून गेला. स्वामीचे पुण्येकरून जागा फत्ते झाली. लश्करचे व हषमाचे लोक सुरंगानें उडाले व जाया ठार अदसें पांच हजार किंबहुना विशेष होतील. तैसेंच फिरंगीयाचे सात आठशे मालीस ठार व या निराळे जखमी झाले. भारती युध्दाप्रणें युध्द झालें. वसई बांकी जागा, पश्चिमेकडून समुद्र, दक्षिणेकडे खाडी, पूर्वेकडे खाजणचाखल, तिहीकडून किमपि इलाज नाहीं. एक उत्तरेकडून उपाय. तिकडेही रेती, धर नाहीं. स्वामी साक्षात्कार ईश्वराचा अंश. स्वामींनीं वसई दिली. त्रिवार लिहिले, ते शब्द अन्यथा कसे होतील? वरकड वसईची गोष्ट मानवी लोकांनीं ह्मणावी असें नाहीं! वसई स्वामीचे आशीर्वादें फत्ते झाली. श्रींचे सुदर्शन धर्मद्वेष्ट्याचे मस्तकीं वज्रप्रहार होऊन टोपीकर म्लानत्व पावलें. अन्यथा वसई वसई होती! व फिरंगी आगीचा पुला होता! स्वामीचे कर्तृत्वास पार नाहीं! स्वामीचा महिमा स्वामी जाणत! आह्मा मानवीं लोकांस काय कळे? वसई फत्ते होतांच सव्वाशे पुतळी पाठवून देणें व श्रीभुलेश्वरास सव्वाशे रुपयांचा मुगुट घातला ह्मणोन आज्ञा केली. याजवरून स्वामीचे आज्ञेप्रमाणे वसई फत्ते होतांच श्रीनिवास केदार याजबरोबर पुतळ्या सव्वाशे व श्रीभोलोबास मुगुट सव्वाशे रुपयांचा घातला ते रुपये १२५ सव्वाशे स्वामीचे सेवेशी पाठविले आहेत. प्रविष्ट होतील. आह्मीं लेकरें स्वामीची असो. सर्व प्रकारें कृपा करणार स्वामी समर्थ आहेत. स्वामीचे वितरिक्त दुसरे दैवत आह्मां काय आहे? सारांश, स्वामीच्या आशीर्वादें व दंडाच्या प्रतापें कार्य सिध्दीनें पावलें असे. स्वामीचा महिमा आह्मी वर्णावयास सामर्थ्य धरीत नाहीं. श्रीनिवास केदार पुतळ्या व रुपये देऊन रवाना केले आहे ते लवकरच पावतील. वर्तमान त्वरेनें विदित व्हावें यास्तव हें पत्र पुढें रवाना केले असे. सेवेशी श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२६] श्री १ जून १७३०
श्रीमत् परमहंस स्वामीचे सेवेशी.
आपत्ये बाजीराऊ२५ कृतानेक साष्टांग नमस्कार. विनंति. येथील क्षेम ता॥ छ २५ जिलकाद स्वामीच्या आशीर्वादें करून यथास्थित असे. विशेष :- स्वामीनीं आशीर्वाद पत्र पाठविलें तें उत्तम समयीं पाऊन बहुत समाधान झालें. पांच हजार रुपये कर्जाचें ऐवजी पाठवणें ह्मणोन आज्ञा. त्यास, तूर्त येथील विचार र॥ अंतोबा सांगतील त्यावरून कळेल. स्वामीची आज्ञा तों न उलंघावी, याकरितां राजेश्री अंबाजीपंताकडोन तूर्त दोन हजार रुपये देविले आहेत. ते घेऊन पावलियाचें उत्तर त्याजपाशी घ्यावयास आज्ञा केली पाहिजे. वरकड कितेक अर्थ र॥ अंतोबापाशी सांगितला आहे ते निवेदन करतील. त्याचा विचार काय करणें तो केला पाहिजे. आणि आह्मांस काय आज्ञा करणें ते करावी. त्या प्र॥ वर्तणूक करू. तीन हजार रुपये श्रावण भाद्रपदांत पावतें करूं. सर्व प्रकारें एकनिष्ठेनें सेवा केली तिचें फळ प्राप्त झालें! त्याचें त्यास दिले हे उत्तम! परंतु आह्मांस कर्जानें बुडविलें. एवढे गोष्टीकरिताच प्राण जाता तरी बरें होते! विष खाऊन मरावें इतकेच! किंवा स्वामीचे पाय धरून बसावें इतकाच पदार्थ उरला आहे. दरबारी सर्व साहित्य आमचे करणार सर्व आपल्यास विदितच आहे! तरी स्वामीस कृपा येईल. तरी आह्मी कर्जापासून मुक्त होऊं. लोकांचे नरकवासापासून दूर होऊन तो पदार्थ करावा. तरीच मज बालकावर दया पूर्ण आहे. आता प्रस्तुत सातारियास जात नाहीं. तेथें जाऊन काय करावें? आमचे उरावर पाय देऊन कार्य करितील. यास्तव जात नाहीं. काळें करून बसलों आहों! सर्व लज्या आह्मां कोकण्यांस आली! तूं भार्गव आमचा साहाकारी असतां ऐशी कर्मे अवलंबिली! तेव्हां तुझें वाचल्याचें सार्थक काय? ज्या स्त्रीस पुरुष नाही तिची गत होत्ये तैशी तुह्मी असतां आमची गत सा-यांनी मांडली आहे! बरें! चित्तास येईल तरी आपलें ब्रीद रक्ष हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२४] श्री १६ फेब्रुवारी १७४५
श्रीमत् परमहंसश्री स्वामीचे सेवेशी.
चरणरज रघुनाथ बाजीराव कृतानेक सा॥ नमस्कार. विनंति. स्वामींच्या कृपावलोकनेंकरून आशीर्वादप्रभावें माघ व॥ १२ पर्यंत वर्तमान यथास्थित असे विशेष. ती॥ राजेश्री नाना यांची स्त्री सो॥ मातोश्री गोपिकाबाई वहिनी माघ व॥ ११/१२ सह मंदवारी प्रात:काळीच्या अकरा घटका दिवसास प्रसूत२४ होऊन पुत्र जाहला. स्वामीच्या आशीर्वादाचें फळ आहे. संतोषवृत्त स्वामीचे सेवेसी विदित व्हावें या करितां पत्र पाठविलें आहे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
[२५] श्री
तीर्थस्वरूप श्री स्वामीचे सेवेशी.
आपत्ये सन शाहू राजे कृतानेक दंडवत. विनंति. उपरी. आपण न विचारितां गेले ही गोष्ट वडीलपणास उचित की काय? आपले जाण्यामुळें आमचे चित्त स्वस्थ नाहीं. यास्तव हें पत्र आपणांस लिहिलें आहे तरी वडीलपणें दर्शनाचा लाभ देऊन आमचे चित्ताचा संतोष करून गेले पाहिजे. वडिलांस आमचे गळ्याची शफथ असे. अनमान न करितां घारें आलें पाहिजे. एवढा लाभ आह्मांस द्यावा. यांत आमचें समाधान. वडिलांसही उचित आहे. आपण आह्मांस न पुसतां स्वाम गेल्या कारणें चित्तास समाधान नाहीं. तर पत्रदर्शनी येऊन दर्शन देऊन समर्थ करण्यास स्वाम अनमान करतील तर आमची शफथ असे, हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२३] श्रीभार्गवराम १७३२
श्रीमत् स्वामी याहीं.
चिमणाजी व जगन्नाथ जयसिंगाची२३ निष्ठा उत्तम. पालखी व पलंग हस्तीदंताचा, पलंग छपरपलंग, पडदे किनखापी केले व मखलीनें आंतोन बाहेरोनं मढून दिला. गोठण्या रवाना करूं. कृष्णंभट देसाई याची देशमुखी देवविली. व दत्ताजी कानोजी यांस हवाला जयगडचा दिला. व समाधीची कोपी व जपाची माळ कृष्णंभटाचे बंधूबरोबर पाठविली आहे. या बरोबर शिवराम व भास्कर व अंतोबा समागमें देऊन छत्रपतीचे भेटीस पाठवणें. तुझे गांवास कांही कोणी तगादा केला असेल त्याची चिठ्ठी यात घालून पाठवणें. सणगें पाठविली तीन.
१ अतलस हात चवदा.
१ पातळ पैठणी हात सोळा.
१ सोळे काढावयाचे एक.
३
येणेप्रमाणें पाठविली असेत. आह्मी कार्तिक जाहलीवर येऊं. कळावें ह्मणोन लिहिले असे. हे आज्ञा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२२] श्री २२ आगष्ट १७४०
श्रीमत् परमहंसश्री स्वामी याहीं.
चिरंजीव जगन्नाथ यासी आज्ञा. आह्मी निघालों तें छ १० रोजीं श्रीस्थळीं पावलों. वेट्याबरोबर सुंभ, काथ्या वजन २ दोन मण, असोले नारळ सु॥ ५ पाठविले आहे. काथ्या, सुंभ निगेनशी ठेवणें. व नारळ पाठविले आहेत, यांजपैकी चिरंजीव शाहूस दोन देणें, व चिरंजीव सौ॥ सगुणाबाईस२१ दोन देणें, व तुह्मी एक घेणे. येणेंप्रमाणें करणें. चिरंजीव चिमाजीअप्पा२२ याजकडे श्रीचे जामदारखान्यापैकी ऐवज येणें आहे. त्याचा हिशेब त्यांणीं करून पाठविला होता. तो पाहून त्यांजकडे दोन माणसें बरी हुशार पाहून पाठविणें. रुपये आणून ठेवणें. राजेश्री यशवंतराऊ पवार यांजकडून भिक्षेबद्दल दुचाला तीन हजार रुपये येणें. त्यांजकडे केसोबा रवाना करणें. अनेवाडी येथील झाडांची नीट रखवाली करणें ह्मणोन अंतोबास सांगणें. आह्मीं तर एवढे तुह्माकरितां श्रम करितों. चिमणाजीचें पुत्रवत् पालगृहण केलें. तो तर आह्मांस टाकून गेला. हा मृत्युलोक, आमचा भरवसा आहे असें नाहीं. काय ते आमचे पुत्र व शिष्य तूंच आहे. मेळविले गांव, शीव, पैका पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें खाणें. तुह्मांस कोणी उपद्रव देणार नाहीं. मजमागें तुमचें शाहू चालवील. कोणते गोष्टीचे चिंता न करणें. जो उपद्रव देईल त्याचा निर्वंश होईल, हें समजणें. आह्मी वैशाखमाशीं येऊं. चिरंजीव शाहूस पत्र पाठविलें आहे. तुह्मीं जाऊन देणें व नारळ देणें. आणि जे इंदापूरचे तळ्याचा बंदोबस्त ठेवणें ह्मणोन सुलतानभाईस लिहिणें. वाड्यातील चौकी पहारा नीट बंदोबस्त ठेवणें. जाणिजे. हे आज्ञा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२१] श्री
श्रीमत् परमहंस स्वामी याहीं.
चिरंजीव जगन्नाथास२० आज्ञा केली ऐसीजे. बाबा शेटी बरोबर पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वर्तमान विदित झालें. तर तुह्मीं खुशाल राहणें. तुह्माजवळ चार पांच चाकर पाहिजेत तर ठेवणें. दोन बंदुका घेणें. न घेस तर माझ्या पायाची आण असे. व तुह्मास निमच्या घ्यावयास अप्पा जोशी याजबरोबर रुपये तीन पाठविले आहेत. त्याचा निमच्या खंडू करवू आणवणें. सकलादीनें अगर मखलीनें मढवून देणें. विदित झालें पाहिजे. बहुत काय लिहिणें हे आज्ञा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१९] श्री ७ अक्टोबर १७३२
श्री सकल तीर्थस्वरूप श्रीमत् परमहंस स्वामीचे सेवेशी.
अपत्ये समान शाहूजी राजे कृतानेक दंडवत. विनंति येथील कुशल :- आश्विन बहुल अमावास्या मंदवासरें स्वामीचे आशीर्वाद यथास्थित असे. विशेष. स्वामींनी आशीर्वादपत्र प्रेशिलें पाहून समाधान जाहलें. राजश्री अंबाजीपंत यांणीं स्वामीचीं वचनें सांगितली, त्यावरून हर्षोत्कर्ष जाहला. परंतु गोमूत्र प्राशन केले नाहीं, ह्मणोन कळलें. ऐशियास गोमूत्र त्यागावेंसें नाहीं. आह्मीही सेवेशी येतों. परंतु आजी अमावास्या, उद्यां प्रतिपदा, परवा सोवारी भाऊबीज आहे. या करितां तीन रोज झालिया उपरी तृतीयेचे रोजी दर्शनास येतों. कुणब्याचा हिशेब आहे असें नाहीं, स्वामीचें विचारें इनसाफ करणें तेंच केले जाईल. तरी स्वामींनी गोमूत्र अगत्य प्राशन केले पाहिजे. अनमान सर्वथैव न करावा. वरकड वर्तमान अंबाजीपंत१८ लिहितील व खंडोजी निवेदील, त्याजवरून कळेल. सेवेशी विनंति.
[२०]
सेवेसी विज्ञापना१९. स्वामीकड विसाजी रघुनाथ पाठिल आहेत. देखत्त पत्र बाबाकारभारी व खंडोजी व सोमाजी यास देखत्तपत्र पाठवल. जरूर जरूर याबरोबर कांही विनत्ती सागो पाठल आहे विनत्ती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१८] १९ फेब्रुवारी १७२५
१
स्वस्तिश्री१७शके १६४३ प्लव नाम संवत्सरे कार्तिक वद्य त्रयोदशी मंदवासरे आरंभ जाहाला.
२
श्रीमंत सौभाग्यवती वीरूबाईसाहेब चरणीं तत्पर ।
बसवंतराव निरंतर ॥
३
श्री शके १६४६ क्रोधीनाम संवत्सरे फाल्गुण वद्य द्वितीया बुधवार सप्त काम जाहालें.
४
श्री भवानीशंकर प्रसन्न. शुभं भवति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१७] श्रीशंकर १७२१
तीर्थरूप राजश्री तपोनिधी परमहंसबाबा स्वामीचे सेवेशी.
अपत्यें सौभाग्यादिसंपन्न विरूबाई यांनीं दंडवत. उपरी निंबाचे विहिरीचे इमारतीचे काम आहे. तरी अगत्येरूप पाथरूट दोघे पाठऊन दिल्हे पाहिजेत. त्याचा महिना जो तुह्मीं देत असाल तो लिहून पाठवणें. त्याप्रमाणें आह्मी देऊं; परंतु कामाचा खोळंबा बहुत जाहला असे. याजकरितां जरूरीनें लिहिले असे. पंधरा रोजाच्या बोलें पाठऊन देणें. मागती तुह्माकडे पाठऊन देऊं. आमचें अगत्य असलें तरी पत्रदर्शनी दोघे पाथरूट पाठवून देणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
नक्कल
[१६] श्री २ जुलै १७३३
श्रीमत् महाराजश्री परमहंसबाबा स्वामीचे सेवेशी.
अपत्ये बाजीराव बल्लाळ प्रधान कृतानेक विज्ञापना. येथील कुशल आषाढ शु॥ २ पर्यंत स्वामीचे आशीर्वादेकरून यथास्थित असे. विशेष. स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें पावलें. बहुत समाधान जाहलें. राजश्री येऊन बहुत समधान केलें. राजश्री सचिव पंताकडून माळसिरसच्या सनदा दिल्ह्या. सचिवपंतांनी नम्रत्वे फारच विनंति केली. राजश्रीनी विनंति अतिशय केली, त्याजवरून क्षौर केलें, गोत्र चालतें केले ह्मणोन लिहिलें. ऐशियास, राजश्री स्वामी येऊन स्वामीचें समाधान केलें, स्वामीनीं राजश्रीची विनंति मान्य करून क्षौर केलें, गोत्र चालतें केले, हे गोष्ट बहुत उत्तम केली. येविशीचा आह्मांस अतिशय संतोष जाहला. सचिव पंताकडील सनद आली हे गोष्ट बहुत बरी जाहली. स्वामी थोर पुण्यपुरुष तपस्वी जे मनावरी धरितील ते सिध्दीस पावलेंच, येविशी संदेह नाहीं. तुळ्याविशीं व वाशियाविशीं आज्ञा. त्याजवरून तुळ्या सात व वासे शंभर स्वामीचे आज्ञेप्रे॥ माळशिरसास पाठविले आहेत. स्वामीस विदित जाहलें पाहिजे. कृपा केली पाहिजे. हे विज्ञापना.