Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
७२. प्रो. विजापूरकरांनीं जे पांच खंड छापून काढिले त्यांना सरासरी २१०० रुपये खर्च पडला आहे आणि वासुदेवराव जोशांनीं चवथा खंड छापला त्याला ३०० रुपये लागले असावे. पूर्वीचे ३६०० व हे २४०० मिळून आजपर्यंत ५००० रुपये माझे व लोकांचे खर्चून सुमारें ३२०० पृष्ठें ऐतिहासिक मजकूर प्रसिद्ध झाला आहे. शिवाय महाराष्ट्रसारस्वत मासिकपुस्तकद्वारां दासोपंत नामक कवींची ५०० पृष्ठें वाईस प्रसिद्ध केलीं. त्या मासिकाला केवळ ५०/६० च वर्गणीदार मिळाल्याकारणानें, तें बंद करावें लागलें. ह्याखेरीज सुमारें साठ सत्तर ऐतिहासिक मुद्यांवर सुमारें ७०० अष्टपत्री पृष्ठें मीं ऐतिहासिक निबंधांत विवेचन केलें आहे. सारांश, इतिहासाचीं साधनें, सारस्वताचीं साधनें, व ऐतिहासिक टीका ह्या तीन रूपांनीं ५००० रुपयांत ४४०० पृष्ठें नवीन मजकूर शोधून व विवेचून मीं प्रसिद्ध केला आहे. ह्या स्तुत्य उठाठेवींत १५०० रुपये कर्ज म्हणजे नुकसान झालेलें आहे.
७३. हें एवढेंसें काम करावयाला जर १५०० रुपये कर्ज झालें, तर शंभरपट काम अद्याप व्हावयाचें आहे, त्याला सुमारें दीड लाख रुपये कर्ज होईल व पांच लाख रुपये खर्च लागेल, असा साधा हिशोब दिसतो. कारण, सध्यां मजजवळ हजार बाराशें अप्रसिद्ध ग्रंथ व सुमारें ४०/५० हजार महत्त्वाचीं ऐतिहासिक पत्रें जमा झालीं आहेत. त्यांपैकीं बराच भाग प्रसिद्ध होणे अगत्याचें आहे. इतिहाससाधनभूत अस्सल लेख देशांतील सर्व लोक वाचीत नाहींत, इतकेंच नव्हे तर कटाकटी तीन चारशें लोक त्यांच्यावर विहंगमदृष्टि फिरवितात व फार झालें तर, इतिहासाचा सूक्ष्म अभ्यास करणारे वीस पंचवीस लोक त्यांचा आस्थेनें परामर्ष घेतात, अशी ज्याअर्थी वस्तुस्थिति आहे, त्याअर्थी पांचपन्नास हजार पत्रें छापण्याच्या खटाटोपांत न पडून आपल्याला व आपल्या भिडेच्या स्नेह्यांना व्यर्थ नागवून घेऊं नये, अशी कित्येक गृहस्थांची सल्ला आहे. परंतु, ती व्यापक विचार करून दिलेली नसून, केवळ एकदेशी आहे, असें मला वाटतें. तात्त्विक हवेच्या संन्यासप्रवण व मांद्योत्पादक दाबाखालीं चिरडून गेल्यामुळें, प्रपंचाची म्हणजे इतिहासाची हेळसांड करण्याकडे लोकांचा आत्मघाती जो कल आहे, तो घालविण्यासाठीं इतिहासज्ञानप्रसाराची व तत्साधनप्रसिद्धीची आवश्यकता सध्यां विशेषच आहे, असें माझें ठाम मत आहे. काल, देश व कुल ह्या त्रिविध दृष्टीनें भारतवर्षाच्या व महाराष्ट्राच्या नानाविध चरित्राचा अफाट विस्तार पहातां, आजपर्यंत प्रसिध्द झालेलीं साधनें जलाशयांतून एखाद्या बेडकानें मोठ्या प्रयासानें आपल्या क्षुद्र ओंजळींत वाहून आणलेल्या बिंदूप्रमाणें आहेत; त्या बिंदुमात्रानें संन्यासप्रवणतेचीं मलिन पटलें धुवून जाणार कशी? हें मालिन्य साफ नाहीसें करावयाला जलाशयांतून शेकडों मोठमोठे पाट फोडून संन्यासप्रवणतेवर सतत सोडून दिले पाहिजेत. रूपक सोडून देऊन, स्पष्टार्थानें इतिहाससाधनप्रसिद्धीची मर्यादा सांगितली असतां, बराच गैरसमज दूर होईल, असें वाटतें. भारतवर्ष व महाराष्ट्र यांच्या दहा हजार वर्षांच्या चरित्रांतील इतक्या लाखों बाबीं संशोधून व विवेचून सिद्ध झाल्या पाहिजेत कीं, त्यांच्यापासून कार्यकारणरूपी सामान्य नियमांचा पत्ता लागून आर्यसमाजशास्त्र व आर्यसमाजतत्त्वज्ञान निर्माण करणें संभाव्य होईल. ही संभाव्यता शक्यतेच्या कक्षेंत येईतोंपर्यंत लाखों साधनांचें प्रकाशन, विवेचन व संशोधन झालें पाहिजे. भारतवर्षांच्या वर्तमानक्षणापर्यंतच्या गतकालीन चरित्राची सूक्ष्म व व्यापक परीक्षा करण्याचा हा दीर्घ उद्योग नेटानें, धिमेपणानें व एकनिष्ठेनें किंत्येक वर्षें लाखों रुपये खर्चून शेकडों तज्ञ्ज्ञानी तडीस नेण्यास झटलें पाहिजे. ह्याचा अर्थं असा कीं, ज्या भावी कालापर्यंत भारतवर्षांतील आर्यसमाजाचें चरित्र चालूं राहील, तोंपर्यंत हांहि उद्योग चालूच राहील. हा भावी काल सामान्यत: अनंत समजण्यास कोणतीच हरकत नाही ! वाटल्यास अनंताच्याऐवजी अमर्याद शब्द वापरावा म्हणजे नेमस्त व शास्त्रीय भाषा वापरल्यासारखें होईल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
७०. साहाय्य कोणत्या प्रकारचें पाहिजे? द्रव्यसाहाय्य पाहिजे, कीं मनुष्यसाहाय्य पाहिजे, कीं सानुभूति पाहिजे किंवा केवळ भरपूर स्तुति पाहिजे? असा प्रश्न उद्भवणें साहजिक आहे. पैकीं उत्तराला प्रारंभ करतांना, स्तुति व च्युति ह्या दोन जखिणींचीं बि-हाडें जवळजवळ आहेत, हें प्रस्तुत लेखक जाणून आहे. तेव्हां, ह्या, चरम साहाय्याची तो अपेक्षा करीत नाहीं. बाकीच्या तिन्ही प्रकारच्या साहाय्याची दिवसेंदिवस फारच अवश्यकता भासमान होत आहे. ती कशी तें सविस्तर नमूद करण्याची परवानगी घेतो.
७१. शक १८१० त काव्येतिहाससंग्रहादि साधनांची व ग्रांटडफादिरचित पाश्चात्य बखरकारांची मीं तुलना केली. तीवरून अशी खात्री होत चालली कीं, डफादि मंडळीच्या लेखांतून येणा-या अपविचारांची व अपविधानांची दुरुस्ती विश्वसनीय साधनें शोधून करणें जरूर आहे. शक १८१२ पासून अस्सल व विश्वसनीय साधनें शोधण्याच्या खटपटीस प्रारंभ करून १८२० त साधनांचा पहिला खंड प्रसिद्ध झाला. हा खंड तीनदां छापला गेला. पहिली प्रत पुण्यास श्रीविठ्ठल छापखान्यांत १८१९ सालीं छापली, ती सबंदश्रीविठ्ठल छापखान्याबरोबर अग्नयेस्वाह झाली. तिचा सर्व खर्च केवळ अंगावर पडला. सुमारें एक हजार रुपयाचें नुकसान झालें. पैकीं छपाईंचें नुकसान छापखान्याच्या मालकांनीं सोसलें व कागदाचें नुकसान माझें माझ्या अंगावर राहिलें. तें अद्याप तसेंच आहे. दुसरी प्रत पाव अष्टमांश सापकराच्या छापखान्यांत छापिली; परंतु अशुद्ध फार निघूं लागली म्हणून रद्दीच्या भावानें वाण्याला विकली. तिसरी प्रत वांईस भाऊशास्त्री लेल्यांच्या मोदवृत्तांत छापिली व प्रथम प्रसिद्ध केली. तिच्या छापणावळीस श्रीमंत बाळासाहेब मिरजकर यांनीं चारशें रुपयांची देणगी दिली. बाकीचा सहाशें सातशें रुपये खर्च विक्रींतून काढला. हा खंड छापीत असतां शोधानाचें काम चालूंच होतें व अद्यापिही चालूं आहे. पहिला खंड छापल्यानंतर चौथा खंड चित्रशाळेचे मालक रा. रा. वासुदेवराव जोशी यांनीं आपल्या जबाबदारीवर प्रसिद्ध केला. दुसरा, तिसरा, पांचवा, सहावा व आठवा असे पांच खंड प्रो. विजापूरकर यांनीं ग्रंथमालेंतून स्वतःच्या खर्चानें छापून काढिले. पैकीं ग्रंथकाराच्या मेहनतीचा अल्पस्वल्प मोबदला म्हणून ग्रंथमालाकार प्रत्येक खंडाच्या पन्नास प्रति मला देतात. त्या विकून शोधनाचा व प्रवासाचा खर्च मोठ्या काटकसरीनें मी करतों. ह्या पुस्तकविक्रीपासून आजपर्यंत सरासरी सहाशें रुपये प्राप्ति मला झालेली आहे. ह्या अवधींत सुमारे ५०० रुपये श्रीमंत बाबासाहेब इचलकरंजीकर, रा. रा. पांडोबा शिराळकर, रा. रा. रावजी भिडे ह्या तीन मंडळींनी आपखुषीनें व उदारपणानें दिले. शिवाय दोघा तिघा स्नेह्यांकडून प्रवासाकरितां सहाशें रुपये मीं कर्ज काढलें, मिळून आजपर्यंत स्वतः च्या खर्चाने व लोकांच्या देणग्यांनीं मीं सुमारें ३६०० रुपये ह्या कामीं खर्चिले आहेत. पैकीं देण्यांचे व पुस्तकविक्रीचे २१०० रुपये वजा जातां सध्यां मला १५०० कर्ज आहे. ९०० रु. वासुदेवराव जोशांचे, २०० रुपये प्रो. विजापूरकरांचे, ३०० रुपये रा .रा. जनार्दन नीळकंठ पेंडसे यांचे व ४५ रुपये कै. सदाशिवराव परांजपे यांचें कर्ज आहे. पैकीं वासुदेवराव जोशी यांचे मूळचे कागदाचे ५०० किंवा ६०० रुपये होते, ते व्याजानें आठनऊ वर्षात ९०० झालेले आहेत. इतर लोक व्याज घेत नाहींत हें कर्ज पुढील खंडांच्या विक्रीनें फेडावयाचें आहे. मी प्रवासखर्च व चरितार्थ बिनबोभाट कसा चालवितों हें पुष्कळ लोक मला विचारतात. त्यांच्या समाधानार्थ हा कंटाळवाणा तपशील दिला आहे. माझे धनको माझ्यावर बहुत प्रेम करीत असल्यामुळें, त्यांच्या अडचणींच्या प्रसंगींहि त्यांनीं मला फारशी कधीं निकड लाविली नाहीं, हें खरें आहे. परंतु, कर्ज आहे, ही कठोर बाब विसरतां येत नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
शिपाईलोकांचा वर्ग घ्या. हिंदु शिपायांच्या तात्त्विक धर्माच्या आड आलें नाहीं, म्हणजे ज्याचें मीठ तो पोटाला खाईल त्याची चाकरी तो कुत्र्याप्रमाणें एकनिष्ठपणें करील, इतकेंच नव्हे तर, प्रत्यक्ष सोदर भावावरहि शस्त्र उपसावयाला मागेंपुढें पहाणार नाहीं. मात्र, त्याची भाकर त्याला बिनबोभाट मिळाली पाहिजे. हिंदू कारकून वाटेल त्या पाश्चात्याची - मग तो फ्रेंच असो, फिरंगी असो, इंग्रज असो, किंवा मोंगल असो - खर्डेघासी व कारभारीपणा करील, प्रसंगी स्वजनाच्या विरुद्धहि वागेल, फक्त त्याची ओलीकोरडी भाकर व तात्त्विक धर्म हीं दोन त्याला बिनबोभाट मिळाली पाहिजेत. हिंदू वाणी वाटेल त्या देशांत - आफ्रिका, अरबस्तान, चीन, जपान, यूरोप - जाऊन व हिंदुस्थानांत राहून वाटेल त्या परदेशस्थाची दलाली व मुकदमी करील, मात्र त्याचा धर्म व त्याचा नफा त्याला बिनबोभाट मिळाला पाहिजे. हीच कथा हिंदू भिक्षुक, हिंदू सटरफटर लेखक, हिंदू शेतकरी, वगैरे सर्व लोकांची आहे. तात्त्विक धर्माच्या आड आलें नाहीं, म्हणजे हिंदूंच्या संन्यस्त मनोरचनेचा वाटेल त्या मतलबी लोकांनीं फायदा घ्यावा. मनोरचना संन्यासप्रवण असल्यामुळें, स्वजातीयांच्या सुखदु:खाशीं समानशील होऊन एकोप्यानें समाजकार्यं, शिपाईगिरी, मुत्सद्दीपणा, व्यापारधंदा किंवा शेती करुन, उरकण्याची बुध्दी सद्यस्क हिंदूंना होत नाहीं व पोटाची खळी भरण्याकरितां -संन्यासप्रवण झाला तरी ती कशीतरी भरलीच पाहिजे - दुस-याची गुलामगिरी पत्करणें प्राप्त होतें. तेव्हां देशभक्त व कार्यकर्त्या मुत्सद्यांनीं हिंदूलोकांची ही तात्त्विक संन्यासप्रवण मनोरचना बदलण्याचा दीर्घोद्योग केला पाहिजे, अशी सल्ला इतिहासाचा समाजमनोरचनात्मक जो भाग आहे तो सांगतो. मनोरचनेचें दुसरें एक उदाहरण घेतों. इंग्रज लोकांचा हिंदुस्थानांतील स्वभाव दीर्घद्वेषी, खुनशी, संशयी, द्रव्यलोभी व सत्यापलापी आहे, असें त्यांच्या हिंदुस्थानांतील गेल्या तीनशे वर्षांच्या चरित्रावरून दिसून येतें. Honi sua que mali panes अशी त्यांची प्रतिज्ञाच आहे. तेव्हां, त्यांच्या समाजावर जर कोणास कांहीं कार्य घडवून आणावयाचें असेल, तर त्यानें आपली इच्छा ह्या स्वभावाला स्पर्श न होईल अशा बेतानें तडीस नेली पाहिजे किंवा विरोधभक्तीनें त्याला चिडवून सामर्थ्य असल्यास चेपीत व चापीत गेलें पाहिजे. सारांश, समाजरचनात्मक जो इतिहासाचा भाग त्याच्या परिशीलनापासून कार्यकर्त्या मुत्सद्यांना फार फायदा करून घेतां येण्याजोगा आहे. समाजचरित्राच्या निरनिराळ्या इतर भागांच्या परिशीलनापासूनहि असेच महत्त्वाचे फायदे आहेत. उद्योगी, विचारवंत व महत्त्वाकांक्षी राजे जेव्हां कमिशनें नेमतात, रिपोर्ट मागवितात, सद्य:स्थिति दोन दोन चार चार वर्षांनीं जोखून पहातात, लोकसंख्या मोजतात, सांपत्तिक स्थिति अजमावतात, ग्रंथकर्तृत्व परीक्षून पहातात, तेव्हां ते एकप्रकारें समाजाचें चरित्र ऊर्फ इतिहासच तयार करून मनन करीत असतात. अशा हेतूनें कीं अंमलाखालील समाजांवर व पोटसमाजांवर व समाजांतील चळवळ्या व्यक्तींवर इष्ट कार्य घडवून आणण्याचीं साधनें माहीत असावीं. स्वपरसमाजचरित्राच्या सूक्ष्म व व्यापक परिशीलनापासून असे बहुमोल फायदे आहेत. त्यांची प्राप्ति करून घेण्याकरितां, नानात-हेच्या स्वपरेतिहाससाधनांच्या शोधास, संग्रहास, रक्षणास व प्रसिद्धीस कोण कार्यकर्ता योग्य सहाय्य केल्यावांचून राहील?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
६९. प्रस्तावनेच्या प्रारंभीं केलेल्या प्रतिज्ञेंतील तीन्ही प्रकरणांचा संक्षिप्त विचार हा असा आहे. समाजचरित्राच्या हकीकतीचा म्हणजे इतिहासाचा उपयोग काय तें ह्या विचारावरून कळण्यासारखें आहे. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. तेव्हां समाजाच्या धडपडीचा इतिहास कळून घेण्याची इच्छा त्याचेठायीं स्वाभाविक आहे. विष्णुशास्री चिपळोणकर म्हणतात त्याप्रमाणें उच्च प्रतीची करमणूक हाच केवळ इतिहासाचा उपयोग नाहीं. स्वसमाजाचें सबीज व सकारण चरित्र कळलें असतां, सामाजिक गुणदोष दृष्ट्युत्पत्तीस यतात आणि दोषांचा त्याग व गुणांचा परिपोष करण्याकडे प्रवृत्ति होते. दोषत्याग व गुणपरिपोष हा इतिहासज्ञानाचा मुख्य उद्देश आहे. परसमाजांचे चरित्र कळलें असतां, त्याच्यापासूनहि गुणदोषविवेचनद्वारां बोध घेतां येतो. उदाहरणार्थ, शक १२०० पासून १७७९ पर्यंतचें महाराष्ट्रसमाजचरित्र पाहिलें व तदाश्रयभूत कारणांचा शोध केला म्हणजे असें कळून येतें कीं, हीं ५७९ वर्षे महाराष्ट्रसमाज तात्त्विक स्थितींत आहे आणि त्याची गांठ परस्वापहरण करणा-या पाश्चात्यांशी पडली आहे संन्यासप्रवण व समाजद्वेष्ट्या तात्त्विक स्थितींत राष्ट्रीभवन व शत्रुनिर्दलन अशक्य होतें. ह्या दोन गोष्टी साधण्यास प्रपंचप्रवण व समाजसाधक अशा रामदासी तत्त्वज्ञानाचा उपयोग फार होतो. परंतु, शास्त्रीय स्थितींत असलेल्या शत्रूंचे उच्चाटन करण्यास स्वतःचा समाज शास्त्रीय स्थितीप्रत नेला पाहिजे. असे अनेक बीजभूत सिद्धान्त समाजचरित्र, समाजशास्त्र व समाजतत्त्वज्ञान यांच्यापासून होत असतें. समाजचरित्राचीं बीजें कळलीं नाहींत, म्हणजे समाजहित साधण्याची बुद्धि असूनहि समाजहित साधतां येत नाहीं. उघडच आहे, रोगस्थान कळल्याशिवाय औषधोपचार कोठें करावयाचा व शक्तिस्थान कळल्याशिवाय तिची वृद्धि कोठून व्हावयाची? इतिहासज्ञानापासून हा एकच फायदा एवढा मोठा आहे कीं तत्प्रीत्यर्थ देशहितकर्त्यांनीं वाटेल ती घस सोसण्यास तयार व्हावें. समाजचरित्राचीं मुख्य सुत्रें तद्वष्टक व्यक्तींच्या मनोरचनेंत आहेत. ही मनोरचना कळली असतां, सामाजिक शरीरावर विवक्षित कार्य घडवून आणण्याची शक्यता विशेष असते. उदाहरणार्थ, पैशाला खोट न पडतां, इतर कोणताहि अपमान सहन करावा, अशी वाणी लोकांची मनोरचना आहे. अशा वणिक् समाजाला हातीं धरण्यास, त्यांच्या द्रव्याचा अपहार करण्याची किंवा न करण्याची ताकद आपल्या जवळ आहे, हे कार्यकर्त्या मुत्सद्यानें त्यांच्या निदर्शनास आणून दिलें म्हणजे कार्यभाग होण्यासारखा आहे. दुस-याच्या भानगडींत न पडतां व विकतश्राद्धें न घेतां, आपला संसार आपण करून स्वस्थ असावें, अशी सध्यांच्या तात्त्विक हिंदूंची संन्यस्त मनोरचना आहे. ही मनोरचना लक्ष्यांत घेऊन, शेजारचें घर, शेजारची इस्टेट, शेजारचें संस्थान किंवा शेजारची बायको लुटण्याची जर कोणा मतलबी व शिरजोर पुरुषाला इच्छा झाली, तर त्यानें लुटल्या जाणा-या इसमाच्या शेजा-याला त्रास न देण्याची हमी घ्यावी म्हणजे त्याचें काम बिनबोभाट व यथासांग उरकेल तात्त्विक हिंदूंची ही संन्यस्त मनोरचना यूरोपीयन लोकांनीं उत्तमोत्तम पारखली आहे. किंबहुना, ब्रिटिशसरकारच्या राज्यकर्तृत्तवाची सर्व मदार ह्या एका पारखीवर आहे. हिंदूंची ही संन्यस्त मनोरचना हिंदुसमाजाच्या सर्व जातींतून, वर्गांतून व पेशांतून दिसून येते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
६६. समाजचरित्र, समाजशास्र व समाजतत्त्वज्ञान यांच्यावर यद्यपि एकहि सर्वमान्य ग्रंथ मराठींत नाहीं; तत्रापि तो सिद्ध होण्याला लागणारी पूर्वव्यवस्था, मात्र गेल्या चाळीस वर्षांत सुरू झाली आहे. किर्तने, चिपळूनकर, साने, खरे वगैरे लोकांनी इतिहासाचीं साधनें प्रसिध्द करण्याची जी परंपरा घातली ती अद्यापि चालू आहे आणि अशी उमेद आहे कीं, ती परंपरा कित्येक शतकें अशीच चालू राहील आर्यांचे चरित्र दहाहजार वर्षांपलीकडचें आहे. अर्थात्, त्याचें संशोधन शतकेंच्याशतकें चालूं राहील, हें स्पष्ट आहे. माणूस दमेल; परंतु संशोध्य विषय संपावयाला दीर्घ अवधि लागेल, अर्थात् संशोधनाची अपेक्षाहि दीर्घ कालपर्यंत राहील.
६७. इतिहासाच्या उपांगांपैकीं पौराणिक म्हणून जो भाग आहे, त्यावर भाऊ दाजी, भगवानलाल इंद्राजी, राजेंद्रलाल मित्र, डॉ. भांडारकर. रा. रा. देवदत्त रामकृष्ण भांडारकर, तेलंग, मंडलीक, प्रो. पाठक व लोकमान्य टिळक यांनीं आंग्लोइंडियन व यूरोपीयन विद्वानांच्या अनुषंगानें किंचित् व्यासंग गेल्या ऐशी वर्षांत केला आहे. परंतु हा सर्व व्यासंग परभाषाद्वारा झालेला आहे. पुराणेतिहासाचीं साधनें व त्याच्यावर टीका अद्यापि मराठींत प्रसिद्ध होऊं लागल्या नाहींत. ग्रंथमालेच्या द्वारां कांही सटीक मराठी शिलालेख व ताम्रपट मीं मराठींतून प्रसिध्द करण्याचा उपक्रम केला आहे.
६८. स्थापत्य, कायदा, राज्ययंत्र, समाजयंत्र, धर्म, आचार, रूढी, कालगणन, कुलशास्त्र, अखिलमानवसमाजचरित्र, समाजशास्त्र, ऐतिहासिक तत्त्वज्ञान, तत्त्वेतिहास, संस्थेतिहास, वगैरे इतिहासाच्या अंगांवर एकहि ग्रंथ मराठींत नाहीं. अर्थशास्त्र, विनिमय, नीतिशास्त्र, आंकडेशास्त्र, वगैरे उपांगांवरहि मराठींत ग्रंथरचना नाहीं. पद्धतीकर देखील एकहि ग्रंथ नाहीं. सारांश, सर्वत्र नकाराचा पाडा वाचण्याचा प्रसंग आहे. इंग्रज सरकारनें स्थापिलेल्या विश्वविद्यालयांतील विद्वतेची खरी किंमत काय तें ह्या नकाराच्या पाड्यावरून यथास्थित कळून येण्यासारखें आहे. ही शोचनीय स्थिति होतां होईल तों लवकर बदलली पाहिजे अन्यथा तात्त्विक स्थिति जाऊन, शास्त्रीय स्थितीचें राज्य महाराष्ट्रावर होण्यास अमर्याद विलंब लागेल, व अखंड गुलामगिरींत कुचंबणें अपरिहार्य होईल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
रानड्यांनीं महाराष्ट्रसमाजचरित्राच्या नवीन शेकडों बाबी संशोधून काढिल्या अंशांतला प्रकार नाहीं ज्या बाबी ग्रांटडफादि मंडळीनें व मराठी बखरकारांनीं चुकल्यामाकल्या नमूद करून ठेविल्या होत्या, त्यांना संतचरित्रांतील स्थूल बाबींचा जोड देऊन, रानड्यांनीं मनांत शिवपूर्वकालीन व शिवकालीन समाजचरित्राचा पट तयार केला आणि यूरोपीयन इतिहासाच्या विस्तृत व व्यापक वाचनानें सुचलेल्या सामान्य कारणांच्या धोरणानें त्या बाबींना आधारभूत कांहीं नियमित कारणपरंपरा असावीं असा सिद्धान्त बसविला. ग्रांट डफ मराठ्यांच्या समाजचरित्राला कांहीं नियम नाहीं असें जें म्हणत असे तें रानड्यांनीं ब-याच अंशाने खोडून काढिले. रानड्यांचा इतिहास प्रसिद्ध होण्यापूर्वी मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांच्या पहिल्या खंडांत इसवी सन १७५० पासून १७६० पर्यंतच्या महाराष्ट्रसमाजाच्या चरित्रसंबंधानें मीहि असाच सिद्धान्त नमूद केलेला आहे. ह्या सामान्य सिद्धान्ताच्या पलीकडे जाऊन विशेष कारणांचे कथन करण्याच्या कामीं रानड्यांच्या इतिहासांत बरींच भ्रामक विधानें नमूदलीं गेलीं आहेत. संतांची परीक्षा रानड्यांना यथास्थित करतां आली नाहीं, हें मी वारंवार सिद्ध करीत आलों आहे. महाराष्ट्रधर्माची व्याख्याहि त्यांना नीट बसवितां आली नाहीं. शिवाजीच्या अष्टप्रधानात्मक राज्यपद्धतीसंबंधानेंहि त्यांचीं विधानें धरसोडीचीं झालेलीं आहेत. समाजचरित्राचें जितकें सूक्ष्म पृथक्करण केलें पाहिजे तितकें न केल्यामुळें, त्यांच्या सिद्धान्तरचनेंत हे दोष राहिले आहेत, हें उघड आहे. तत्रापि मराठ्यांच्या समाजचरित्राला अव्याहत कारणपरंपरा आहे, हा सिद्धान्त त्यांच्या ग्रंथानें कायमचा प्रस्थापित केला आहे, ह्यांत संशय नाहीं.” मराठ्यांच्या इतिहासांतील काही टिपणे” हा तेलंगांचा निबंधहि समाजशास्राच्या तयारीचा पूर्वसूचक आहे. नांवाजण्यासारखे हे दोन लेख--रानड्यांचा इतिहास व तेलंगाचीं टिपणें--गेल्या बेचाळीस वर्षांत इतिहासावर महाराष्ट्रांत आले आहेत. सटरफटर चरित्रे अधिकारी लेखकांनीं लिहिलेलीं पांचपन्नास झालेली आहेत. परंतु, त्यांत नांवजण्यासारखें एकहि नाहीं. शक १७३९पासून १७७९पर्यंत इतिहासग्रंथ मुळींच झाला नव्हता, त्यापेक्षां १७७९पासून १८२२ च्या काळांत इतिहासलेखनांत रानड्यांच्या व तेलंगांच्या उद्योगानें थोडी तरी प्रगति झाली आहे, हें मात्र नाकबूल करतां यावयाचें नाहीं. ऐतिहासिक तत्त्वज्ञानावर किंवा समाजशास्त्रावर स्वतंत्र असा ग्रंथ महाराष्ट्रांत अद्यापि झालेला नाहीं. महाराष्ट्रसमाजाचें चरित्रहि अद्यापि एकहि निर्माण झालें नाहीं. परसमाजांचा स्वतत्र इतिहासहि मराठींत अजून एकहि नाहीं. गाइकवाडसरकारच्या आज्ञेनें कांहीं अल्पस्वल्पप्रमादक इंग्लिश इतिहासांची गचाळ भाषांतरें झालेलीं आहेत. परंतु तीं स्वतंत्र नसल्यामुळें जमेस धरण्यासारखीं नाहींत ऐतिहासिक नकाशांची इकडे अद्यापि कल्पनासुद्धां नाहीं. सारांश,रानड्यांचा स्थूल इतिहास व तेलगांचा चिमकुला निबंध याखेरीज इतिहासाच्या प्रांतांत गेल्या बेचाळीस वर्षांत स्वतंत्र व नांवाजण्यासारखें कांहीं एक झालेलें नाहीं. आणि दु:खाची गोष्ट कीं दोन्ही लेख इंग्रजींत आहेत.* लिहिणारे महाराष्ट्रांत जन्मले म्हणून त्यांची गणना येथें करावी लागली आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
शास्त्रीय स्थितीचें आगमन संभाव्य होण्यास मुख्य कारण जी समाजाच्या नानाविध चरित्राची इत्यंभूत हकीकत तिची साधनें प्रसिद्ध होण्यास नुकता कोठें आरंभ झाला आहे. ही साधनें झालीं आहेत त्याहून शंभरपट प्रसिद्ध झाल्यावांचून व त्यांची विवेचक दृष्टीनें छाप झाल्यावांचून इतिहासाची व समाजशास्राची निर्मिती होणें शक्य नाही १७८० पासून १८२२ पर्यंतच्या बेचाळीस वर्षात इतिहास, समाजशास्त्र किंवा ऐतिहासिक तत्त्वज्ञान यांवर नांव घेण्यासारखा एकहि ग्रंथ मराठींत किंवा महाराष्ट्रांत निर्माण झाला नाहीं. लक्ष्मणराव चिपळोणकर व रा. रा. गोविंदराव सरदेसाई यांनी शिवकालीन इतिहास लिहिले आहेत; परंतु स्वतंत्र साधनांच्या अभावामुळें, ते नाना प्रकारांनीं व्यंग आहेत. शिवाय, ह्या दोघांहि लेखकांनीं लिहावयाला घेतलेल्या कालाचे मर्म जसें जाणावें तसें जाणलें नाहीं. चिपळोणकरांनीं केवळ डफच्या बखरीचा मराठींत उतारा केला आहे; व डफ जे मराठ्याचे दोष काढतो ते गुण भासविण्याचा अभिमानी प्रयत्न केला आहे. सरदेसायांनीं ब्राह्मणांना व पेशव्यांना निराधार नांवें ठेवण्याचा प्रयत्न करून, ज्याची खाल्ली पोळी त्याची टाळी वाजविण्याचा अप्रस्तुत उद्योग केलेला आहे. तत्कालीन समाजस्थितीचें पृथक्करण दोघांतून एकानेंहि केलेलें नाही. समाजयंत्राच्या किल्ल्या सूक्ष्म पृथक्करण व व्यापक संशोधन केल्याविना सांपडत नाहींत, व त्या जर सांपडल्या नाहींत तर तत्कालीन समाजचरित्राचा संगतवार व सबीज पट यथाभूत चितारतां येत नाहीं, महाराष्ट्र सारस्वताची व ग्रंथकाराचीं जी त्रोटक माहिती सरदेसायांनीं दिली आहे ती अपूर्ण, चुकलेली व असंबद्ध आहे; आणि मुसुलमानांच्या पूर्वीची जी हकीकत दिली आहे, तींत तत्कालीन राज्ययंत्र, समाजयंत्र, व्यापारयंत्र वगैरेची माहिती व बीजें देण्याचा कलहि दाखविलेला नाहीं. डॉ. भांडारकरांच्या दख्खनच्या टिपणवजा निबंधावरून कांहीं राजांच्या यादी देण्यापलीकडे ह्या इतिहासांत जास्त कांही एक दिलें नाहीं. तत्कालीन धर्मग्रंथ, जैनग्रंथ, वेदान्तग्रंथ, काव्यग्रंथ पाहून तत्कालीन समाजाचें चरित्र बरेंच लिहितां येण्याजोगें आहे. हाच धरसोडीचा प्रकार मुसुलमानांच्या अमदानीसंबंधानें व शिवाजीच्या रियासतीसंबंधानें झालेला आहे. यद्यपि स्वतंत्र साधनें अद्यापि प्रसिद्ध व्हावयाचीं आहेत, तत्रापि इतर जी अनुषंगिक शेकडों साधनें मुसुलमानांच्या व शिवाजीच्या कालासंबंधानें उपलब्ध आहेत, त्यांचा यथास्थित परामर्श घेतला असतां, सध्यांदेखील तत्कालीन समाजचरित्र व त्याची कार्यकारणपरंपरा समाधानक त-हेनें सजवितां येण्यासारखी आहे. परंतु, इतका खटाटोप करण्यास दहावीस वर्षे एकनिष्ठपणाने सतत खपले पाहिजे. हे परिश्रम न केल्यामुळें, सरदेसायांची मराठी रियासत शास्त्रीय दृष्ट्या फारशी उपयोगाची नाहीं. सरदेसायांच्यापेक्षां रानड्यांनीं इंग्रजींत रचिलेला शिवाजीचा इतिहास अधिक योग्यतेचा आहे. कारण, त्यांत शिवकालीन समाजाची पूर्वकारणपरंपरा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. समाजाच्या चरित्रांतील शेकडों बाबी प्रामाणिकपणें देणें कोणाहि मेहनती विद्वानाला शक्य आहे परंतु, शेकडों बाबी सामान्य नियमांच्या म्हणजे कारणांच्या सूत्रांत गोवून सुसंगत पद्धतीनें वाचकांपुढे मांडण्यास व्यापक बुद्धि व उच अधिकार लागतात.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
६४. अशी स्थिति शक १७७९ पर्यंत होती. तिचा अंत शक १७७९ व १७८० तील ज्वालामुखीसदृश धडपडीनें झाला. ही धडपड संन्यस्त, तत्त्वज्ञानी व अविचारी हिंदु-मुसलमान पुढारी यांनी बंगाल्यांतील शिपायांच्या साहाय्यानें केली. काल्पनिक तत्त्वज्ञानाचा व सुयंत्रित शास्त्राचा हा झगडा होता. पहिल्याचे पुरस्कर्ते जुने हिंदुमुसलमान पुढारी होते व दुस-याचे पाश्चात्य लोक होते. त्यांत सुयंत्रित शास्राचा विजय झाला. ही धडपड चालली असतां हिंदुस्थानांतील, पंजाबांतील, व कर्नाटकांतील राजेरजवाडे, महाजन, व सामान्य लोक साशंक वृत्तीनें कांहीं काल तटस्थ राहून, शेवटीं विजयी पक्षाला मिळाले. हलक्या, कुलहीन, व उपटसुंभ अशा लहानमोठ्या शिक्षित व अल्पशिक्षित पांढरपेशा परराज्यसेवकांचा जो नवीन वर्ग बनला, किंवा, खरें म्हटलें असतां, बनविला होता, तो विजयी होणा-या व झालेल्या सुयंत्रपक्षाकडेच प्रथमपासून होता. त्यांच्या शिक्षणांत स्वराष्ट्रे, स्वसमाज, वगैरे शब्दच नव्हते. बंगाल, रजपुताना व महाराष्ट्र ह्या तीन प्रांतांतील तत्कालीन कित्येक बडे नोकरलोक असें सांगतात कीं, शक १७७९ तील ह्या प्रचंड धडपडीचा अर्थच कळण्याची आपली ताकद नव्हती; मग स्वपक्ष किंवा परपक्ष घेण्याची किवा टाकण्याची बाब दूरच राहिली ! जुन्याच्या अभिमानाने व स्मरणानें येणारा सहज त्वेषहि ह्या कुलहीन, राष्ट्रहीन, व समाजहीन लोकांच्या ठायीं नव्हता. भाऊ दाजी, विनायकराव वासुदवेजी, नाना मोरोजी, दादोबा पांडुरंग, कृष्णशास्त्री चिपळोणकर, केरो लक्ष्मण छत्रे, ईश्वरचंद्र विद्यासागर, दिनकरराव रानडे, सालारजंग, टी. माधवराव, विश्वनाथ नारायण मंडलीक, विश्राम रामजी घोले, वगैरे कारकुनी पेशाची राष्ट्रहीन आंग्लशिक्षित शेकडो मंडळी ह्याच युगांतील होत. तरुण दादाभाई नौरोजी ह्या राष्ट्रीय आणीबाणीच्या प्रसंगी लंडनांत स्वदेशीयाकरितां नोक-या मागण्याच्या अर्जदारीत गुंतले होते. असल्या मंडळीला स्वदेश, स्वसमाज, व स्वेतिहास ह्यांची मातबरी काय होय! स्वदेशाच्या इतिहासाचा नांव घेण्यासारखा एकहि ग्रंथ ह्या चाळीस वर्षांत झाला नाहीं मॉरिस्कृत स्वेतिहासाची निंदा व डफ् कृत स्वेतिहासविकृति ह्या कालांत सर्वत्र मान्य झालेली होती !
६५. शक १७८० पासून १८२२ पर्यंतचा जो दुसरा भाग त्यांत शास्रीय स्थितीच्या ओनाम्याला किंचित् प्रारंभ झाल्यासारखा दिसत आहे. परंतु अद्यापहि तात्त्विक स्थिति निःशेष संपली, असें निखालस म्हणतां येत नाहीं. अदृश्य व अचिंत्य शक्ति आणून देण्याच्या थापा मारणा-या थियासोफीकडे अद्यापि पुष्कळ समंजस लोकांचा ओढा आहे. समाजाला सोडणा-या संन्यासस्थितीकडे व जगन्मिथ्यात्व प्रतिपादणा-या एकदेशी तत्त्वज्ञानाकडे अद्यापि ब-याच लोकांचें मन धांवते. तत्रापि शास्त्रीय स्थितीची छाप समाजावर आस्ते आस्ते बसत चालली आहे. ह्यांत बिलकुल संदेह नाहीं. अन्वयव्यतिरेकोत्पन्न अनुनयन व निर्णयन पद्धतींच्या जोरावर सद्य:कालीन समाजचरित्रावर निर्भीड टीका होऊं लागल्याचीं स्पष्ट चिन्हें दिसत आहेत. सद्यस्क चळवळीवर चिपळोणकरांच्या निभींड टीका आणि सामाजिक, धार्मिक व राजकीय विषयांवर रानड्यांचे निबंध शास्रीय स्थितीच्या आगमनाचे द्योतक आहेत. परंतु. टीका जितक्या खोल, विस्तृत, सूक्ष्म व व्यापक असावयास पाहिजेत तितक्या अद्यापि होऊं लागल्या नाहींत. अद्यापि सर्वच प्रकार स्थूल व स्फुट असाच आहे. आणि असाच प्रकार असणें प्रथमप्रारंभीं शक्य आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
६२. शक १२३९ पासून १७३९ पर्यंत, इतिहास, समाजशास्त्र व सामाजिक तत्त्वज्ञान ह्यांची हालहवाल महाराष्ट्रांत कशी काय होती, त्याचा संक्षिप्त उल्लेख येथपर्यंत केला. आतां शक १७३९पासून आतांपर्यंत म्हणजे शक १८२२ पर्यंत ह्या तिन्ही शाखांची स्थिति महाराष्ट्रांत कोणत्या प्रकारची आहे, ते सागतों.
६३. शक १७३९ पासून १८२२ पर्यंतच्याकाळाचे दोन भाग केले पाहिजेत. पहिला भाग शक १७७९ त संपतो. ह्या भागांतील चाळीस वर्षांत महाराष्ट्र पूर्वीप्रमाणेंच तत्त्वज्ञानी, संन्यस्त, हटयोगी, विलासी व आलस्यमग्न होतें. अर्थात्, समाजाच्या स्थितीचें व चरित्राचें सूक्ष्म अवलोकन, पृथक्करण, एकीकरण किंवा परिशीलन करण्याचें अवश्यकत्त्वच त्या कालीं कोणाला भासलें नाहीं. शक, १५७९ पासून १७३९ पर्यंत साध्या बखरी अथवा समाजाचे साधे इतिहास लिहिण्याचा जो व्यासंग मराठ्यांनीं स्वीकारला होता, तोहि ह्या कालांत लुप्तप्राय आला. ह्या कालांत तंजावर, सातारा, इंदूर, धार, ग्वालेर, बडोदें, पुणें, कोल्हापूर, नागपूर, बुंदेलखंड, वगैरे स्थलीं असणा-या संस्थानांत मोठमोठ्या क्रांत्या झाल्या; कित्येक संस्थानें सपशेल बुडून गेलीं; कित्येकांचे स्वातंत्र्य सपुष्टांत आलें; आणि कित्येक निव्वळ जमीनदारीच्या स्थितीला येऊन पोचलीं महाराष्ट्रांतील लोकस्थितींतहि मोठे परिवर्तन झालें. लढवय्ये लोक घरी बसले; प्रजा नि:शस्त्र झाली; पांढरपेशा लोकांचा धंदा गेला; व्यापारीवर्गाचा व्यापार बुडत चालला; शिल्प्यांचा रोजगार बसत चालला; सोनें पश्चिमेकडे धांव घेऊं लागलें; शेतीवर सर्व लोकांचा उदरनिर्वाह होण्याचा दुर्धर प्रसंग आला, भटाभिक्षुकांची मिळकत बंद झांली; शास्त्रीपंडीत निराश्रित झाले; सारांश, सर्व दर्जाच्या लोकांत चलबिचल झाली. परंतु, समाजांच होत चाललेल्या ह्या अफाट क्रांतीची परीक्षा करून ती थोपविण्याचें कोणींच लक्ष्यांत आणिलें नाहीं. तत्कालीन समाजाचें चरित्र, समाजाच्या धडपडीचा कार्यकारणसंबंध अथवा समाजाचें शास्त्र, व समाजाचें तत्त्वज्ञान, ह्यापैकीं एकाचाहि पत्ता ह्या चाळीस वर्षात नव्हता. विचारी व तत्त्वजिज्ञासु जे एकदेशी साधुसंत व विरक्त ते संन्यासाच्या अभ्यासांत गर्क झालेले होते; आणि प्रपंचाची धडपड करणारे राजे, संस्थानिक, व्यापारी, उदमी, मुत्सद्दी, व कारकून, तत्कालीन धडपडीचा अर्थ न कळल्यामुळें, कोठें तरी व कसें तरी मोहानें अंध होत्साते प्रपंचाचें व समाजाचें व राष्ट्राचें गाडें हाकोत होते. 'विवेकभ्रष्टानां भवति विनिपात शतमुख:’! आपण करतों आहों काय व चाललों आहों कोठें, ह्याचा ज्यांना नीट उलगडा करण्याची आवश्यकता भासली नाहीं, त्या मोहान्ध लोकांना राष्ट्र कोठलें, प्रपंच कसचा, व इतिहास काय करावयाचा !!!
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
इतकेंच कीं कोणत्यातरी एका स्थितीचा एकाकालीं विशेष वर्चष्मा असतो. त्याप्रमाणें ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंत तात्त्विक ऊर्फ तत्त्वज्ञानात्मक स्थितीचा पगडा महाराष्ट्रावर बेसुमार बसलेला होता. त्यामुळें शास्रीय ज्ञानाचा मुख्य आधारस्तंभ जो इतिहास त्याचा उदय ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंतच्या काळांत झाला नाहीं. ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या, असें मत उराशीं बाळगणारें जें तत्त्वज्ञान त्याला जगत् जो संसार अथवा प्रपंच अथवा समाज त्याचें चरित्र जाणून घेण्यांत कोणता फायदा आहे? परब्रह्माची, विठोबाची प्राप्ति करून घेण्यांत ज्यांनीं तनु, मन व धन अर्पण केलें, त्यांना संसाराची व समाजाची वास्तपुस्त करण्याला सवडच राहणें अशक्य आहे. ज्ञानेश्वरापांसून तुकारामापर्यंतचें तत्त्वज्ञान हें असें इतिहासाला म्हणजे समाजाला म्हणजे प्रपंचाला सोडून होतें. अर्थात्, ऐतिहासिक तत्त्वज्ञानाचा म्हणजे प्रपंच व परमार्थ ह्यांच्या एकवाक्यतेचा उदय त्या कालीं होणें अशक्य होतें. तो उदय रामदासांच्या हस्तें झाला. धार्मिक, तात्त्विक, भक्तिमार्गी, वगैरे सर्व लोकांच्या मंडळ्या करून, म्हणजे त्यांना लोकसंग्रहाच्या यंत्रांत घालून, राज्ययंत्राचीं निर्मिति करावी आणि धर्म, तत्त्वज्ञान व प्रपंच यांचें रक्षण करावें, असें समर्थांचे तत्त्वज्ञान होतें. प्रपंच साधूनच परमार्थाचा लाभ होतो, हा उपदेश समर्थ पदोपदीं करीत आहेत. ह्या उपदेशाचा परिणाम त्या कालीं राष्ट्रीभवनांत झाला. परंतु पन्नास पाऊणशें वर्षे लोटत आहेत नाहींत, तों पुन: धार्मिक व तात्त्विक विचारांनीं महाराष्ट्रांत उचल खाल्ली. रामदासकालीं धर्म व तत्त्वज्ञान ह्यांचा लोप फारसा झालेला नव्हता. फक्त त्यांचा पगडा इतिहास, शास्त्र, प्रपंच, समाज व राष्ट्र यांच्या पगड्याच्या मानानें बराच कमती झालेला होता. तो पुन: कालान्तरानें वरचढ झाला. पुन: प्रपंच व समाज. ह्यांच्यापासून लोकदृष्टि परावृत्त झाली आणि “दों दिवसांची तनु हे साची,” असलें तत्त्वज्ञान लावण्यांतूनहि फडकूं लागलें. ज्ञानेश्र्वरापासून तुकारामापर्यंत तत्त्वज्ञानाला दारिद्रयामुळें सौम्य व कंगाल नीतीची संगति होती. शक १६८० पासून १७३९ पर्यंत कदाचित् शक १७७९ पर्यंत तत्त्वज्ञानाला संपत्ति, विलास, व तज्जन्य आलस्य ह्यांची जोड मिळाली. ही जोड मिळाली असतां शास्त्रीय स्थितींत असणा-या परम व्यवहारज्ञ अशा पाश्चात्य शत्रूंशी तत्त्वज्ञानी, विलासी व शिथिल अशा मराठ्यांची गांठ पडली. सारांश, शक १२३९ पासून १७७९ पर्यंत ऐतिहासिक तत्वज्ञानाचा ऊहापोह करणारा रामदासाखेरजि दुसरा तत्त्वज्ञ महाराष्ट्रांत झाला नाहीं. इतर जे शेंकडों साधुसंत झाले ते प्रपंचाचे म्हणजे इतिहासाचे द्वेष्टे आणि नामरूपातीत किंवा नामरूपांकित परब्रह्माचे एकदेशी भक्त होते. प्रपंचाला शून्य समजून परब्रह्माच्या पाठीमागें लागलेल्या तत्त्वज्ञांच्या व वारक-यांच्या पंथांचा आणि प्रपंच व परमार्थ ह्यांची योग्य किंमत करून एकवाक्यता करणा-या रामदासाचा व रामदासीयांचा विरोध असलेला जगत्प्रसिध्द आहे. बाकी, समाजाला सोडून, विस्खलित, पंगू व असमर्थ बनलेल्या ह्या तत्त्वज्ञांना, साधूंना व त्यांच्या वारकरी अनुयायांना मुसुलमानांच्या जुलमांतून समर्थानीं व रामदासाभिमान्यांनींच सोडविलेलें आहे.