[३] श्री
श्रीमत् परमहंस स्वामीचे सेवेशी.
सेवक देवळजी सोवंशी४ हिंदुराव कृतानेक विज्ञापना. येथील कुशल भाद्रपद वद्य दशमी परियंत स्वामीचे आशीर्वादें करून यथास्थित असे. स्वामींनी कृपा करून निंबाजी समागमें आशीर्वादपत्र पाठविलें ते प्रविष्ट होऊन संतोष पावलों. तेथें आज्ञा जे, कृष्णातिरी समाधीस बैसणें जाहलें होतें, तेथून श्रीदयेनें उठोन धावडशीस आलों, शरीर कृश जाले, तक्राकारणें ह्मैस १ पाठवणें, ह्मणून आज्ञा. ऐशीयाशी निंबाजी जबानी सविस्तर वर्तमान पुशिला तो सांगितला. त्याजवरून समाधान झालें. आज्ञेप्रमाणें ह्मैस १ म ॥ समागमें पाठविली आहे. प्रविष्ट होईल. ह्मैस दुधाची तिनसाली आहे. उत्तम जाणून पाठविली आहे. वरकड वृत्त आपलें आशीर्वादें यथास्थित असे. आपला निजध्यास निरंतर स्वामीच्या चरणापाशीं आहे. निरंतर श्रीपाशी अभीष्टचिंतन करून उर्जित होय ऐसें केलें पाहिजे.
कृपा असो द्यावी हे विज्ञापना.