पत्रें, यादी वगैरे.
१७०० पासून १७६१ पर्यंत.
उपोद्धात
इतिहासाची मुख्य साधनें ह्मटली ह्मणजे पत्रें, यादी वगैरे अस्सल लेख होत. लेख जितके जास्त मिळतात, तितकी इतिहासाची गुंतागुंत जास्त उलगडली जाते. मराठयांच्या इतिहासासंबंधानें पाहिलें तर, आजपर्यंत असले अस्सल लेख फारच थोडे छापले गेले आहेत. ठोकळ मानानें हिशेब केला गेला तर असे दिसून येईल कीं, आजपर्यंत मराठयांच्या इतिहासासंबंधानें, फार झाले तर, दोन हजार इंग्रजी व मराठी लेख प्रसिध्द झाले आहेत. ह्या लेखांच्या द्वारा आपल्या इतिहासांतील कांहीं प्रकरणें जास्त स्पष्ट झालीं आहेंत हें खरें आहे; परंतु ज्यासंबंधीं अजून कांहींच माहिती नाहीं किंवा जी माहिती आहे, ती चुकीची व अपूर्ती आहे, अशीं प्रकरणें आपल्या इतिहासांत शेकडों आहेत. ह्या शेकडों प्रकरणांवर प्रकाश पाडण्यास पांचपंचवीस वर्षे दहावीस मासिकपुस्तकें सारखीं उद्योग करीत राहिलीं पाहिजेत. मराठ्यांच्या इतिहासाच्या रचनेस उपयोगी पडणारे लेख लाखोंनें मोजतां येतील असा मला, सातारा जिल्ह्यातील पांचपन्नास दफ्तरें पाहून, अनुभव आला आहे. हे सर्व लेख छापून काढण्यास दहा वीस मासिक पुस्तकें अवश्य हवींत. इतकेंच कीं, हीं मासिकपुस्तकें चालण्यास दोन गोष्टींची विशेष जरूर आहे. इतिहासज्ञांनी ही मासिक पुस्तकें चालविण्यास तयार झालें पाहिजे. ही पहिली जरूर आहे, व ह्या मासिक पुस्तकांना आश्रय मिळाला पाहिजे, ही दुसरी जरूर आहे. ह्या दोन्ही जरूरी पुष्कळ दिवसपर्यंत अशाच राहतील असें वाटत नाहीं. दिवसेंदिवस इतिहासाची गोडी महाराष्ट्रांतील लोकांना जास्त जास्त लागत चाललेली आहे. तेव्हां ह्या लोकांच्या आश्रयानें ही मासिकपुस्तकें चालतील असा तर्क करण्यास जागा होते. ह्याच तर्कावर व आशेवर दृष्टी ठेवून, प्रो. विजापूरकर यांच्या साहाय्यानें मी कांही अस्सल लेख प्रसिध्द करितों.