Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१५] श्रीशंकर १९ फेब्रुवारी १७२५
श्रीमंत परमहंसश्री स्वामीचे सेवेशी.
चरणरज चिमणाजी दामोदर कृतानेक साष्टांग नमस्कार. विनंति उपरी येथील कुशल जाणोन फाल्गुन शुध्द नवमी परियंत स्वामीचे आशीर्वादेंकरून क्षेमरूप असो. विशेष. स्वामीनें पत्र पाठविलें तें शिरसा वंदून बहुत समाधान जाहलें. ऐसेंच सर्वदां आशीर्वादपत्र पाठवून परामर्ष केला पाहिजे. विशेष येथील वर्तमान तरी :- राजश्री छत्रपति१६ स्वामी व नबाब निजामुन्मुलूक सेनेसह वर्तमान आजीं कसबें पुणें येथें मुक्काम जाहला. स्वामीस वर्तमान कळावें, याकरितां लिहिले आहे. मौजे पिंपरीविशी स्वामींनीं आज्ञा केली त्यावरून गावांस कौल दिला आहे. गांवची रखवाली करून. कांही अंतर न पडे. बहुत काय लिहिणें. कृपा केली पाहिजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१४] श्री ४ मे १७२९
राजश्री राघोपंत व राजश्री राजीपंत गोसावी यासीं अखंडित लक्ष्मी अलंकृत राजन्य स्ने॥ पिलाजी जाधवराव दंडवत. विनंति येथील कुशल ते॥ छ १२ सवाल१५ १५+ १५++ १५+++ १५++++जाणून स्वकीये कुशल लेखन करणें. यानंतर :- तुह्मी पत्र इंदूरचे मुक्कामीहून चैत्र शुध्द एकादशीचें पाठविलें, तें सुपें वेढा बंगस येथील मुक्कामी छ ९ सवाली पावलें. वर्तमान कळलें. घरचें वर्तमान व महालचें वर्तमान लिहिलें तें कळों आलें. ऐशियास महालावर वराता आहेत. त्यास सरदेशमुखी वगैरे नेमणुकीप्रणें ऐवज ज्याचा त्यास पावणें. अखेर सालीं गवगवा न ठेवणें. आह्मांकडील वर्तमान तरी : - महंदखान बंकस प्रयागचा सुभा छत्रसाल राजस्थान बुंदेलखंड याजवर मसलत करून चालोन आला होता. त्यास आह्मी व ते एकत्र होऊन बंगसास वेढा घालून बसलों होतों. इतकियांत बंगसाचा लेक कायेमखा तीस हजार फौजेनिशी छ ९ रोजी आह्मावर चालोन आला. त्याशी आह्माशी लढाई झाली. ईश्वर इच्छेनें फौजेनिशीं हा बुडविला. तीन हजार घोडे घेतले, व १३ हत्ती पाडाव केले. आपल्या पागेस ८ हत्ती आले, व एक पील व १०० घोडे व १७ उंट याशिवाय लष्करांत शेदोनशे घोडे व ५०-६० उंट आले. आप्पाजी माणकेश्वर यांकडे २ हत्ती आले व दावळजी सोमवंशी सरलश्कर यांजकडे २ हत्ती आले. वरकड आमच्या लश्करांतील सुखरूप आहेत. झुंजांत ठार झाले त्यांची यादी लिहिली आहे. त्याप्रणें ज्याच्या त्याच्या घरी वर्तमान पावतें करणें. आह्मीही मजल दरमजल येतो. बहुत काय. हे विनंति. राजश्री पंत प्रधान याचीं पत्रें, राजश्री बाळाजीपंतास लखोटा आहे, तो त्यास पावता करणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१३] श्री ७ सप्टेंबर १७३२
श्रीमत् महाराजश्री परमहंसबावा स्वामीचे सेवशीं.
चरणरज गणेश बापूजी चरणावर मस्तक ठेऊन शिरसाष्टांग नमस्कार. विनंति येथील वर्तमान :- तागाईत भाद्रपद१४ वद्य चतुर्दशी परियंत यथास्थित असे. वरकड वर्तमान :- राजश्री संभाजी आंग्रे सरखेल गेल्या शनवारी बाणकोटास होते. अद्यापि कुलाब्यास गेले नाहीत. रसाळगडास येणार आहेत. जंजिराजवळ मदतीस इंगरज चार गलबतें मोठीं व लहान सासात घेऊन आला. लिहिलीं श्रीमंत राजश्री राऊ प्रधान यांची आली आहेत. फौजा रवाना करितात. वरकड : राजश्री बाबू राऊ सा महिनेयाच्या बळें काम करितात. कुळ चांगले आहे. गोष्ट आयकिली तर उत्तम आहे. आपलें कांही जात नाहीं. स्वामीनीं गोष्ट केलियानें वाईट नाहीं; असें दिसतें. जजिराची फिकीर फारशी पडली आहे. अंजनवेलीसही एक थोरलें इंगरजाचें गलबत आहे. ऐसें वर्तमान आहे. स्वामीस श्रुत व्हावें ह्मणून सेवेशी लिहिले आहे. निळंभट सांगतां विदित होईल. हे विज्ञापना. श्रीमंत राजश्री आप्पा येणार होते. ते दसरा परियंत येत नाही. राहणें झालें असे. जजिराकडील मजबुदी फौजेचे करावयास लागले आहेत. नाहींतर खोकरी घेतील. गोळे फार खोकरीत मारितात. फारशी त्याची जोरेयाची गोष्ट आहे. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
नक्कल
[१२] श्री ३ मे १७४१
श्रीमंत महाराजश्री परमहंसबाबा स्वामीचें सेवेशी.
चरणरज१३ बाळाजी बाजीराव प्रधान. कृतानेक विज्ञापना. येथील कुशल वैशाख बहुल चतुर्दशी रविवार पर्यंत स्वामीच्या आशीर्वादेंकरून यथास्थित असे. विशेष. स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. स्वामींनीं बुध्दिवाद पुर:सर मागील पुढील कुलगोष्टी पत्रीं लेख करून विशेषें आज्ञा केली व खंडोजी साळवी आला याणीं स्वामीची आज्ञा सांगितली, त्याजवरून सविस्तर कळेल. ऐशियास आह्मी स्वामींची लेकरें आह्मांस स्वामीच्या चरणारविंदावितरिक्त दुसरें दैवत नाहीं. स्वामी ईश्वरी अंश आहेत. आपल्या चरणाजवळ आमचा दुजाभाव नाहीं ह्मणोन पुर्ती खात्री. विनंति कायावाङ्मनसा स्वामीस लिहीत असतां स्वामी रोष्टभावें आज्ञा करितात या गोष्टीस आमचा उपाय काय? तीर्थरूप कैलासवासी थोरले नाना व राव, अप्पा निष्ठापूर्वक श्रीशीं वर्तत आले, त्यापेक्षां विशिष्ट विनीत भावें वर्तावें हेच इच्छा माझी आहे. दुसरा विचार असेल तर स्वामीच्या चरणाची शफत असे. प्रसाद दिल्हा तो माघारा देणें ह्मणोन आज्ञा. तर हे दौलत यत्किंचित् काडीपर्यंत स्वामीची आहे. स्वामीनीं ठेविली तर जतन करीन. पावशेर अन्न व वस्त्र मात्र उपभोग करितों. तेवढेंच आमचें. वरकड सर्व स्वामीच्या आशीर्वादाचा प्रताप आहे. स्वामी उपरोधिक लिहितात तरी वडील आहा. लेंकरूं मांडीवर हगल्यास वडील मांडी तोडितील असें जाहलें नाहीं ! स्वामीही करणार नाही. आह्मी अपराधी तरी स्वामीचेच. स्वामीविना दुसरियास करुणा येणें अथवा आपले मुलाचा गौरव करणें हें सर्व स्वामीकडेच आहे. दुसरियावरी आमच्या माणसाची सत्ता होती व तुझ्या बळें आमचे माणोस दुसरियास मारीत होतें त्याची छळणा तुह्मी केली ह्मणोन. तर स्वामीच्या चरणाजवळ माणसे चाकरी करितात व मजपाशी लोक चाकरी करितात ते सर्व स्वामीचेच आहेत. मी स्वामीचा आज्ञांकित. तेथें व येथें सेवक आहेत ते सर्व माझेच समजतो. मी आपले माणसांस कांहीएक गोष्ट सांगितल्यास स्वामीचे दर्पास न्यून होईल हे काय गोष्ट आहे? मी जिवेंप्राणें स्वामीच्या कार्यास हजीर आहे. जो स्वामीच्या चरणाजवळ अमर्यादेनें वर्तेल त्यास मर्यादपूर्वक वर्तवावें यासच मजला स्वामींनी ठेविले आहे. येविशीची स्वामीनीं चिंता न करावी. सक सुदाबादी टाकण चालला, पाठवणें, व निळी घोडी पाहिली तुह्मास दिल्ही तिचा मुबदला पाठविणें, ह्मणोन आज्ञा. त्याजवरून चिरंजीव राजश्री सदोबापाशी टाकण चांगला चालला होता तो जीन सान सरंजामसुध्दां पाठविला आहे. स्वामींनी ठेवावा. सारांश मी स्वामीचें लेकरूं. मजपासून अंतरही पडलें तरी आपण क्षमा करावी व कृपा करावी हें सर्व सामर्थ्य स्वामीस आहे. चिरंजीव राजश्री जनार्दन याच्या लग्नाची त्वरा जाहली तो अर्थ पहिला सेवेशी लिहिलाच आहे. प्रस्तुत स्वामीस वस्त्रें १ कुडती बादली १, शालजोडी १ किमखाप एकूण सनगें तीन पाठविली असत. कृपा करून घेतली पाहिजे. बहुत काय लिहिणे. कृपा केली पाहिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
नक्कल
[११] श्री ८ एप्रिल १७३०
श्री सकल तीर्थस्वरूप श्रीरपमहंसश्री स्वामीचे सेवेशी.
अपत्यें शाहूजी राजे कृतानेक दंडवत. विज्ञप्ति. येथील कुशल वैशाख शुध्द तृतीया सौम्यवासरे स्वामीच्या आशीर्वादें यथास्थित असे. विशेष. स्वामींनी आशीर्वादपत्र प्रेषिलें येथें आज्ञा जे. श्रीस आपण धारादत्त कुलबाब कुलकानु गांव इनाम दिल्हे असतां राजश्री प्रतिनिधींनी चव्हाणपट्टी रुपये तीनशे साठ घेतले, आणिक इनामपट्टी आठशे रुपये घेणार आहेत ह्मणोन लिहिलें. ऐशियास, पहिले चव्हाणपट्टीचा१२ पैका घेतला तो स्वामीस विदित जाहला नाहीं. विदित होतें ह्मणजे मना केले असतें. हल्ली इनामपट्टीचा ऐवज न घ्यावयाची आज्ञा करून मना केलें असें. श्रीस गांव दिल्हे असतां दुसरा उपसर्ग लागेल असें काय आहे? हे कितेक वृत्त वेदमूर्ती राजश्री सदाशिवभट अग्निहोत्री निवेदितील त्यावरून विदित होईल. सेवेसी श्रुत होय. सेवेशी विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१०] श्री २० एप्रिल १७३३
श्रीमत् महाराजश्री परमहंस बावा स्वामीचें सेवेशी.
चरणरज बापूजी गणेश. चरणावर मस्तक ठेऊन शिरसाष्टांग नमस्कार. विनंति. येथील वर्तमान :- त॥ छ १६ जिलकाद११ परियंत स्वामीचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे. विशेष. स्वामीनें आज्ञापत्र पाठविलें तें पावलें. श्रीमंत राजश्री राऊ कोठें आहेत तें लिहिणें. तर राजश्री राऊ पुणेयांत आहेत. अद्यापि गेले नाहीत. माणूस तेथून आलें नाहीं. बाजारी गोष्ट आहे. माहाड मारिलें. र॥ संभाजी जाधव राऊ राजश्री रावाकडील व राजश्री फत्येसिंग बाबाकडील भोइटे ऐसे जाऊन हाड मरिलें, ऐसें बोलतात. परंतु कागदपत्र नाहीं. राजश्री फत्येसिंग बावा पुणेंयांत गेले आहेत. उभयतांची तयारी है. ये सालीं निश्चयें उतरतात. ऐसे आहे. स्वामीचे आशीर्वादें करून जातात. आज राजगडीं छत्रपती स्वामीनें दोन हजार मावळे रवाना उभयतांकडे केले आहेत. श्रीमत् राऊ प्रतिनिधी जाऊं जाऊं असे ह्मणतात. परंतु तयारी कांही दिसत नाहीं. तयारी हो लागली ह्मणजे स्वामीकडे माणूस पाठवितों. कागद गड्डी खर्ची एक पाठविली असे. रु॥ एक दिल्हा असें. सेवेश्री श्रुत होणे. मातुश्री राधाबाई येथें आली असेत. स्वामीस श्रुत होणें ह्मणून सेवेशी लिहिलें आहे. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[९] श्री १ जुलै १७४०
श्रीमत् महाराजश्री परमहंस बावा स्वामीचें सेवेशी.
चरणरज मल्हार तुकदेऊ. कृतानेक सा॥ नमस्कार. विनंति. येथील कुशल त॥ छ १७ र॥ खर पर्यंत स्वामीच्या आशीर्वादें सुखरूप असो. विशेष. स्वामींनी सोमाजीबरोबर आशीर्वादपत्र पाठविलें तें पावलें. पत्रीं आज्ञा केली कीं, श्रीमंत आप्पास बरें वाटत नाहीं, ह्मणून वर्तमान आईकतों. तरी पत्र पाठऊन त्याकडील उत्तर आणवून आह्मांस लिहून पाठवणें ह्मणून आज्ञा केली. त्यावरून स्वामीच्या पत्राची नक्कल करून आह्मीं आपलें पत्र देऊन पुण्यास मुजरद जासूद पाठविला आहे. त्याचें उत्तर आलें ह्मणजे स्वामीस लिहून पाठवितो. स्वामींनी नारिंगें सु॥ ६ व फणसाचें रोप व रामफळाचें रोप पाठविलें तें पावलें. बहुत समाधान जाहलें. स्वामीच्या पत्रापूर्वी जासूद पुणियास गेले आहेत. तिकडून संतोषाचें वर्तमान येईल तें स्वामीचे सेवेशी लिहून पाठवून विदित जालें पाहिजे. सेवेशी श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[८] श्रीशंकर १५ जानेवारी १७०३
॥छ (दादासाहेब शेखमिरे यांजकडील.)
स्वस्तिश्री शके १६२४ चित्रभानू संवत्सरे माघ शुध्द दशमी गुरुवार तद्दिनी शेखमिरा वलद१० शेखबाबा बिजलीखान फड नाईकवाडी प॥ वाई यांस दत्ताजी केशवजी नाईक देशमुख व शामजी लिंगोजी व गिरजी झुगो देशपांडिये प॥ वाई यांनी लिहून दिल्हें वृत्तिपत्र ऐसेंजे. तुह्मी येऊन जाहीर केलें की आपली वृत्ति डांगीयपणाची कसबा वाई येथील हवेलीसंमत व घाट कळकदरा व कोरली व तायघाट व खांबटकी येथील मिराशी सालाबाद पिढी दरपिढी वडील वडील चालवीत आले. हल्ली आपणही चालवितों. दरीवक्त धामधुमेच्या प्रसंगांत आपण कितेक दिवस पेडगांवाकडे गेलों होतों. तिकडून आलियावरी मनास आणितां आपले कदीम कागदपत्र वतनाचे ठेविले होते तेथून गमावले. ऐशियास तुह्मी वडील भाऊ आहां. आपले वतनाचे हकीगत तुह्मांस जाहीर आहे. त्याप्रणें आपले मिराशीचे सनद करून देऊन वतन दुमालें केले पाहिजे, ह्मणून जाहीर केलें तें मनास आणून सदरहू मिराशी डांगीयपणाची सालाबाद तुमचे वडील वडिलाचे भोगवटा चालत आला आहे. त्याप्रमाणें कसबा येथील हवेलीसंमत व घाट कळकदरा व कोरली व तायघाट व खांबटकी येथील डांगीयपण तुमचे दुमाले बदस्तुर साबीला केलें असे. वतनाचे हक्क लाजिमा सालाबादप्रणें खाऊन दिवाण चाकरी लेकराचे लेकरी करीत जाणें. सु॥ सन हजार १११३ र॥ छ ९ हे सौवल हें लिहून दिल्हें वृत्तिपत्र सहीं मोर्तबसूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[७] श्रीनिवास १७२६
श्रियाविराजित राजन्य राजश्री राजीपंत स्वामी गोसावी याशी.
सेवक केशवराव रघुनाथ कृतानेक नमस्कार८. विनंति. उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. तुह्मी र॥ रुद्रोमेलगीर या समागमें पत्र सुटविले. सुसमयीं प्रविष्ट होऊन लेखनार्थ कळों आला. त्या प्रांतें सुभ्याचे मुक्काचें वर्तमान लिहिलें कळों आलें. व निरंतर तिकडील वर्तमान परस्परें कळतच आहे. राजश्री रावसाहेब व राजश्री वजारमाब व मोगल सर्व एकत्र होऊन मनसबा उत्तमच केला. दौलतेंत कांही ताकद नसतां लौकिक उत्तमच केला. मुख्य गोष्ट राजश्री रावसाहेब पुण्यवंत त्यामुळे सर्वत्र यशच येतें. राजश्री९ नाईक त्या प्रांतींच राहिले. राजश्री आबाजी नाईक मात्र आले. बारामतीस आहेत. फौजबंदी करितात. राजश्री स्वामीस कांही नवा जिल्हा मामला सरंजाम मागावयाच्या विचारांत असेत. देतील न देतील या दावेयामुळें राजश्री राव वजारतमाब याचा लौकिक उत्तम जाला, राजश्री स्वामी निरंतर तारीफ करितात, येणेंकरून घोरपडे त्या प्रांतें आहेत त्याशी बोलावें, सलूक राखावा, ऐंसे जालें. इतके दिवस घोरपडे कोण्हीकडे आहेत ऐसें होतें. राजश्री स्वामींच्या चित्तीं राजश्री रावसाहेबाचा व राजश्री नाइकाचा स्नेह करून द्यावा, ऐसे आहे. अलीकडे राजश्री राव वजारतमाब याकडील पत्रें येत नाहींत. त्याकडील कारकून निराळेच आले असेत. त्याकडे येत असतील. कांही असो. आह्मी प्रसंगोपात्त जें साहित्य करावें तें करितों. हें परस्परें कळतच असेल. त्याचा विश्वास असो नसो. आह्मी आपणापासून अंतर करीत नाहीं. अलीकडे तिकडील वृत्तांत वर्तमान जालें असेल, तें लिहावें. उत्तरही पाठवावें. एकदा जालें येणेंकरून शेवटास गेलें असें नाहीं. या गोष्टीचा पिच्छा भारी असे जाणून, महाराज साहेबांचे पुण्य अधीक असे, हे जाणूनच, वर्तन करावें भलता मार्ग कोठोन मिळोन राहावें. राजनी गुजाबा गेले. मागिती हुडकीत आले ऐसें आहे. बरें! आह्मी तरी चिंता कशास करावी? राव वजारतमाब यांचे वकील यशवंतराव ह्मणून मातबर हजारो रुपये खर्च करून बसले आहेत. ते आपल्या तरतुदेंत आहेत. सर्व गोरीचें गोरेपण जाणवलें. येथील अभिप्राय :- आमचे सामर्थ्य आपण मिरजेच्या तक्तावरी पाहिलें असे. कळावे ह्मणून लिहिले असे. बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[६] श्री
श्रीमत् परमहंस स्वामी यांही.
सहस्त्रायु चिरंजीव भक्तराज यशवंतराऊ७ पवार याशीं आज्ञा केली ऐसीजे :- तुह्मी आमच्या आवडीचे शिष्यादाखल असोन तुह्मास हंड्यास उणें काय आहे आणि आमच्या लिहिल्याचा अव्हेर करून शिवाजी शंकर याणीं मागितले. त्यावरून बुधला-हांडा पाठविलेत नाहीं. एरवी तुह्मापासून अंतर न पडतें. हांड्याचा विषय फारसा न्हवता. पाठवितेत तरी श्रेयस्करच होतें. दुभती ह्मैस चांगली मागाहून पाठवितों ह्मणून पत्रीं लिहिलें होतें, ते तरी कोठें पाठविलीत ? आह्माशीं नष्ट करावें ऐसें तुह्मास उचित नाहीं. तुमचे तीर्थरूपाची निष्ठा होती. त्याप्रमाणें वर्तलियास बरेंच असे. आमचें रिकामें माणूस पाठविलेंत कसें, हें अपूर्व दिसून आलें. जन आमची सेवा काय करितात! पत्राचा अव्हेर करीत नाहीं. बरें उचित तें करणें, विशेष काय लिहिणें हे आज्ञा.