Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

येणेप्रमाणें पांचजण वतनदार हुजूर आणून निवाडा करावयाविशी आज्ञा केली. त्यांणीं मनात आणितां दोन्ही वतनाचें वडीलपण, शिक्के रामोजी शिर्के यांचे असें पंचाईत मतें होतांच देवजीराव शिर्के बोलिले कीं, दोही वतनाचें वडीलपण शिक्का आपला. याप्रमाणें कान्होजी शिर्के यांनीं श्रीकृष्णावेणीसंगमी उभें राहून आमच्या हातावर पाणी घालून दश रात्र पार पडल्यास निमे वतनाशीं व दाभोळ सुभ्याचे देशमुखीचे वडीलपण शिक्याशीं आपणांस संबंध नाहीं त्यावरून तुह्मी शके १६६५ रुधिरोद्गारीनाम संवत्सरी श्रीकृष्णावेणीसंगमीं उदकांत उभें राहून उच्चार केला जे, दोन्ही वतनें पुरातन वडिलांचीं होतीं, तीं कालगतीनें बहुत दिवस जाऊन भोगवटा तुटला होता, त्यास आमचे बाप रामोजी शिर्के याणीं स्वामीसेवा एकनिष्ठेनें करून, कष्ट, मेहनत व टकापैका वेंचून दोनी वतनें साधलीं. वडीलपण शिक्का आमचा ऐसा उच्चार करून देवजीराव शिर्के यांच्या हातावरी तुह्मी पाणी घातलें. नेमास पार पडलेत. त्याजवरून दोन्हीं वतनें दरोबस्त तुह्मांस देऊन हें वतनपत्र करून दिलें असे. देवजी शिर्के यांशीं निमे वतनाशीं व दाभोळ मामलेयाचे देशमुखीचे वडीलपणाशीं संबंध नाहीं ह्मणून व सदरहु दोन्ही वतनाशीं विठोजी व दौलतराव व कान्होजी व बहिरोजी शिर्के यांशीं संबंध नाहीं ऐशीं राजपत्रें तुह्मांजवळ आहेत. त्यांतील अन्वयें मामले दाभोळ येथील देशमुखीचे वतनाविशी राज्याभिषेक शके ४४ चे सालचें राजपत्र राजा शाहू छत्रपती स्वामी यांणीं पिलाजीराव बिन गणोजीराव व देवजीराव बिन पिलाजीराव देशमुख मामले दाभोळ यांशी दिल्हें. वतनपत्र ऐसाजे:- तुमचे चुलते देवजी शिर्के स्वामीसंन्निध किल्ले सातारियाचे मुक्कामीं येऊन विदित केलें कीं, मामले दाभोळ येथील देशमुखीचें वतन पूर्वीं ब्राह्मणाचें. त्यास त्या ब्राह्मणापासून इदलशा पातशहाशीं हरामखोरी जाली याबद्दल त्यास मुसलन केलें आणि देशमुखीचें वतन कितेक वर्षें अमानत असतां श्रिंगारपुरीं सुर्याजी राजे सुर्वे यांणीं पिलाजीराव शिर्के यांसी आपली लेक दिली. त्यांणीं पातशहास विजापुरीं अर्ज पोंचविला. त्यावरून पिलाजीराव यास दाभोळ मामल्याचे देशमुखीचें वतन मऱ्हामत केलें. त्याचा भोगवटा व्हावा तों छत्रपती थोरले स्वामीस तळ कोंकण काबीज जालें यास्तव न जाला. त्या उपरीं कांहीं वर्षीं थोरले शिवाजी महाराज यांणीं आपली लेक राजकुवरबाई गणोजीराव यांसी दिली; व पिलाजीराव शिर्के याची लेक जिऊबाई संभाजी राजांस केली. त्याउपरीं कोंकणांत लखम सावंत फसालत करून वसाहत होऊं न देई. याजकरितां महाराजांनीं पिलाजीरायांस सावंताकडे पाठविलें. त्यांणीं सांवतास आणून राजांस भेटवून तह करून दिल्हा. ते समयीं महाराज कृपाळू होऊन ऊर्जित करावयास आले. ते समयीं चिरंजीव राजकुवरबाईस पुत्र होईल त्यास मामले दाभोळ येथील देशमुखीचे वतनाचा भोगवटा चालत नाहीं तें वतन करून देऊं. त्याजवर राजश्री राजाराम साहेब तांब्राचे दाटीचे प्रसंगें करणाटकांत चंदी प्रांते गेले.

त्यास साहेबीं कृपाळू होऊन तिगस्ताचे कराराप्रमाणें हरकीचा ऐवज घेऊन इनासाफ होऊन निवाडपत्रें तयार जालीं आहेत. त्यांजवर शिक्के करून देऊन निमें वतन आमचें आम्हांकडे चालतें करावें ह्मणून, व लक्ष्मणराव शिर्के याचें बोलणें कीं, कैलासवासी शाहू महाराजांचे वेळेस कान्होजी शिर्के यांणीं सदरर्हू दोन्ही वतनांचें वडीलपण शिक्का आपला ह्मणून श्रीकृष्णेचें दिव्य करून राजपत्रें करून घेतलीं होतीं तीं गळाठलीं यास्तव, सातारियाचे दप्तरचे बार लेहून आणवून भिकाजीराव शिर्के यांचे नांवें साल तिगस्तां निवाडेयाची यादी करून दिल्ली आहे. त्याची गुदस्तां आह्मांपासून आठ हजार रुपये नजर घेऊन पुर्ती चौकशी करणेंविशीं आह्मांस पत्रें दिलीं आहेत. त्याप्रमाणें हल्लीं पुर्ती चौकशी करावी, ह्मणोन आक्षेप केला. त्याजवरून कृष्णराव अनंत, किल्ले सातारा, यांसी पत्रें पाठविलीं. त्यांनी तेथील मजमू दफ्तरी शोध करून दहा पत्रें बार जालियाची यादी पाठविली. त्यांतील अव्ययें स्वामी, याणीं राजश्री कान्होजी राजे व कुवरजी व जयसिंग व बहिर्जी व वाघोजी व उदितसिंग व बाजी बिन रामोजी राजे शिर्के यांसी दिल्हे वतनपत्र ऐसे जे;- शाहूनगर, नजीक किल्ले सातारा, येथील मुक्कामीं विनंती केली कीं, मामले रायरी शिर्काण येथील सरदेशमुखी व सुभा दाभोळ येथील देशमुखी हीं दोन्हीं वतनें पुरातन आपल्या वडिलांचीं होतीं. हीं कालगतीनें कित्येक दिवस चालत नव्हतीं. त्या उपरी महाराज राजारामसाहेब यांसमागमें रामोजीराजे शिर्के चंदीस जाऊन, कष्ट मेहनत करून सेवा केली. त्याजवरून महाराजांनीं सदरहू दोनी वतनें आपले बाप रामोजी शिर्के यांसी अजरामऱ्हामत करून वतनपत्रें दिलीं. त्याप्रमाणें अनभवीत असतां देवजीराव शिर्के, आमचे चुलते विठोजी व दौलतराव शिर्के या त्रिवर्गांचा कजिया वतनसंबंधें लागोन वतनाचे विभाग करून द्यावे ह्मणून विनंति केल्यावरून महाराजांनीं सदरहू वतनपैकीं निमें वतन व दाभोळ सुभ्याचे देशमुखीचें वडिलपण देवजीराव शिर्के यांसि देऊन वतनपत्रें करून दिलीं. आह्मी प्रबुध्द जालियावर त्याजकडे वडीलपण शिक्का चालों दिला नाहीं. सरदेशमुखीचें वतन पुरातन वडिलांचे खरें; परंतु, पातेणा परभू मुतालिक अनुभवीत होता, त्यासी वाद सांगोन, कष्ट, मेहनत व टक्का पैका वेंचून वतन करून घेतलें असतां, देवजीराव व विठोजीराव व दौलतराव शिर्के यांसी वतन विभागून द्यावयासी संबंध नाहीं. जें देणें तें वडीलपणें आपण देऊं. महाराजांनीं पत्रें करून दिल्हीं त्या आश्रयानें देवजी शिर्के आह्मासी कजिया करतात. त्याचा आमचा कजिया मनास आणोन निवाडा केला पाहिजे. ह्मणून विनंति केली. त्यावरून त्यांचा वसुलाचा करीना मनास आणून निवाडा करावयासी पंचाइत नेमून दिल्ही. बी॥:-

१ अप्पाजी बिन विठोजी माने पाटील
कसबे रहिमतपुर संत कोरेगांव, प्रां॥ वांई
१ थटोजी पाटील मौजे वाघेरी, प्रांत क-हाड.
१ काळोजी पाटील मौजे पळसदेव,
प्रां॥ इंदापूर.
१ रावजी जगन्नाथ कसबे सासवड.
१ (नांव लागलें नाहीं) पाटील
मौजे माणकेश्वर प्रां॥ भूम

 

[१५७]                                                                        श्री.                                                          ७ आक्टोबर १७५५.

*यादी भिकाजीराव बिन देवजी राजे शिर्के सरदेशमुख मामले रायरी यांचे नांवें पत्र कीं, तुह्मीं हुजूर कसबे पुणें येथील मुक्कामीं येऊन विदित केलें कीं, मामले रायरी शिर्काण येथील सरदेशमुखी व सुभा दाभोळ येथील देशमुखी ह्या दोन्ही वतनांचे विभागाविशी लक्ष्मणराव बिन कान्होजीराजे शिर्के यांचा व आमचा कजिया लागोन सालतिगस्तां मनसुबी हुजूर पडिली. ते समयीं उभयतांनीं आपलालें वर्तमान लेहून देऊन साधकाचें कागदपत्र आणून दाखविलें. त्याजवरून हुजूर पंचाईतमतें मनास आणितां मामले रायरी शिर्काण येथील सरदेशमुखीचें वतन पुरातन वडिलांचें आहे. तेथील हक्क रुसूम व इसाफत गांव व इनाम जमीनी वगैरे सुदामत चालत असेल त्याचा निमे विभाग वडीलपण लक्ष्मणराजे शिर्के यांजकडे व निमे विभाग आह्माकडे याप्रमाणें निवाडा होऊन सन इहिदे समानीनचें सालीं आह्मास निवाडपत्रें द्यावयाची यादी करार जाली. त्याप्रणें आह्मी सरकारचीं पत्रें तयार केली. कराराप्रमाणें सरकारचे नजरेचा ऐवज देणें त्याचे भरण्याची तरतूद करून पत्रावर शिक्के करून द्यावेत तो इंग्रज बोरघाटावरी आला. पुण्यांत गडबड जाली. त्यामुळें देशी ऐवजाची तरतुद न होय. सबब निवाडयाची यादी जाली ती आह्मी घेऊन ऐवजाचे सोईकरितां नागपुरास गेलों. ही संद पाहोन लक्ष्मणराव शिर्के यांनीं सरकारांत आठ हजार रुपये नजर कबूल करून विनंति केली जे, पेशजी कैलासवासी शाहू महाराज यांचे वेळेस आपले पिते कान्होजी शिर्के यांणीं सदरहू दोन्ही वतनाचे वडीलपण शिक्का आपला ह्मणोन श्रीकृष्णेचें दिव्य करून दिव्यास पार पडले. देवजी शिर्के यांशीं वर्तनाशीं संबंध नाहीं, याप्रमाणें होऊन राजपत्रें जालीं होतीं तीं गळाठलीं. परंतु, तुळाजी आंग्रे सरखेल यांशीं दाभोळचे देशमुखीविशी हातरोखा दिला त्यांत दिव्याचा दाखला लिहिला आहे; व सातारियाचे दफतरीं राजपत्रें बार असतील तीं लेहून आणून शोध करावा. याप्रमाणें आपण ह्मणत असतां ध्यानास न आणितां दिव्याचे पूर्वींल राजपत्राचे अन्वयें भिकाजी राजे शिर्के यांशीं निवाडेयाची यादी करून दिली आहे. ते आणऊन पुर्ती चौकशी करावी. याप्रमाणें निवेदन करून नजरेचा ऐवज सरकारांत देऊन सदरर्हू ऐवज व्याजसुध्दां फिटे तोंपर्यंत दरोबस्त वतन आपणांकडे चालावें व दरम्यान भिकाजी राजे शिर्के यांणीं कजिया करूं नये. ऐसा करार करून घेऊन सदर्हू अन्वयें पत्रें घ्यावयाची यादी करून घेऊन त्याप्रमाणें पत्रें तयार करविलीं. त्याजवर शिक्के व्हावे तों तेच साली पौषमासीं, आपण नजरेचे ऐवजानिशी हजर होऊन विनंति केली त्याजवरून त्यांचे पत्रावर शिक्के व्हावयाचे राहिले.

[१५६]                                                                        श्री.                                                          ७ आक्टोबर १७५५.

आशीर्वाद उपरी. दुसरें पत्र तुमचें आलें, श्रावणवद्य नवमीचें मित्तीचें तेंहि पावलें. सविस्तर वर्तमान लिहिलें तें कळलें. त्याचें उत्तर :-

ताटें व वाट्या रुप्याच्या करवून
घेऊन येऊं.
सत्वर येणें म्हणून लिहिलें. त्यास
आम्ही सत्वर येतों. विलंब करीत
नाहीं. १.
१० ताटें दीड हजारांची.
२५ वाट्या जोड २५ पांचशें रु॥ पावेतों
येणें प्रें॥ करून घेऊन येऊं. १.
 

 

आह्मी देशास यावयाची तयारी करून निघालों तों पातशाह वजीर दिल्लीहून बाहीर निघाले. अंतरवेदींत येऊन अम्मल उठवावा, बखेडा करावयाचा विचार केला. त्यामुळें जागजागा अंतरवेदींत फितूर जाला. डोळेझाक करून, कजिया सोडून, तसेच देशास यावें, तर तमाम दस्त उठेल. याजकरितां आपल्या जमावानसीं इटावेयाकडे आलों. र॥ अंताजीपंत जाटाकडे आगरियासी आलेच होते. त्यांची आमची भेट आगरियाजवळ जाली. वजिरासी रदबदल करून चकले. कुरा व कडा येथील इजारियापैकीं कांहीं पैसाहि देणें आला तो देऊन, वजीर राजी करून, तूर्त सलुख करून कजिया वारला. र॥ अंताजीपंत वजिराकडे आगरियाहून जाणार. आह्मी अंतरवेदींत आहों. वजिराचा कजिया बहुत भारी येऊन पडिला होता. यास्तव सलुख केला. आह्मांस देशास जरूर येणें. कजिया ठेऊन कैसे यावें, याजकरितां चार दिवस राहून वजिराचा कजिया वारला. याजउपर गुंता तिळमात्र नाहीं. दसरियासी येथोन निघोन दरमजलीनीं देशास येतों. याजउपर विलंब नाहीं. र॥ हरीपंत पुढें गेलें, त्या मागें आह्मी येतों. गोपाळराउहि गेले. आह्मी येऊन तों त्यांचा हिशेब देणें. र॥ गंगाधरपंत तात्याचा फडशा जाला. मला पांचा चुकला. बरें उत्तम जालें. तुह्मी फिकीर न करणें. आह्मी दरमजलीनीं येऊन पावलों. ज्यामध्यें श्रीमंत स्वामी उभयतां राजी तें करूं. हरीपंत याजवर खुशाल ? तर हरीपंत याजहून चौगुणे आह्मी खुशाल करूं? फिकीर न करणें. या पत्रामागोंमाग येतों. श्रीमंत स्वामीची फर्मास दिल्लीहून आणिली. चार हजार रुपये खर्च केले. पांच पोरी उत्तम आणविली. त्यांत दोन तीन जें श्रीमंत स्वामीचे खुशीस येईल तें येऊं. तलास बहुत केला. मित्ती आश्विन शुध्द २. हे आशीर्वाद. तुह्मी लिहितां तें उत्तम. राजश्री हरीपंत सर्व सांगतील. मींहि लांब लांब मजली करून येतों. हे आशीर्वाद. पंधरा हजार तात्यांनीं फडणिसास देविले. त्यास, रुपये देणें, अनमान न करणें. रुपये निमित्य आमचा हिशेब होणें, मागील कजिया नाहीं वारला, याजकरितां जरूर पंधरा हजार देणें. पुढें समजोन घेऊं. त्याजला राजी करणें. बिठूरचे काम करून सनद पाठविणें. हे आशीर्वाद.

[१५५]                                                                        श्री.                                                            १२ जानेवारी १७५१.

आशीर्वाद उपरी. हें खरें आहे जे चार वरसें हरिपंतानेंच मला चित्तास येईल तो केला. गोपाळराज व हे दोघे समजले. आह्मास पैसा न दिल्हा. असो. फजित करणें. दुसरेकाळीं श्रीमंताची जोडी आली; त्यांस आह्मास पत्र आलें त्याचीहि नक्कल करून पाठविली आहे. हें पत्र दरबारीं तों कोणास न दाखविणें. परंतु याचा भावगर्भ काय तो तजविजेनें मनास आणणें. दुसरें तुह्मासीहि श्रीमंत बोलतील. त्यास श्रीमंत मोहिमशीर, आणि दोन जोडी त्यांची आली त्यास कांहीं न दिल्हें तर श्रमी होतील. येथील आमचा प्रसंग तर पैसा कोठें वसूल होत नाहीं. परंतु, लाख रुपये पावेतों जरूरच जालें तर मुदतीनें देणें. महिनेयाचे मुदतीनें अगर दरबारचा प्रसंग पहाल तसें करणें लागेल. सारांश, लाख रुपये पावेतों कबूल करणें. कापडकराचे साठ हजार पावेतों दिल्हेच असतील. वरचेवर आह्मास लिहीत जाणें. लाख रुपये देणें, त्यास तुह्माजवळ ऐवज श्रीचा हुंडीचा, वगैरे असेल तो देणें. भरीस ऐवज पाहिजे तेव्हां र॥ जोशीबावापासून घेऊन जाणें.

  तूर्त तुह्मास येथून ऐवज पुणेयांत घ्यावयासी पाठविलें ते घेणें. कापडकराचा ऐवज साठ हजार वरात
जालीं; जरूर देणें आहे, ह्मणून पेशजी तुह्मीं
लिहिलें. त्यांजवर कांहीं ऐवज श्रीचा व चाळीस
हजारांची हुंडी र॥ विठ्ठल जोशी याजवर
पाठविली ते पावलीच असेल. तोही आजी
लाजिमा कसा वारिला तो लिहिणें. १.
रुपये. २००० नरसप्पा देवजी याजवर भोगो
तुळजो यांणीं श्रीकाशीहून हुंडी
केली. ते पुणेयांत आहेत.
त्याजपासून घेणें.
हालीं श्रीमंतांनीं खर्चाविशीं आज्ञा
केली. दोन लाख मागत होते. निदान लाख
रुपये तरी देणें येतील. त्यास कांहीं ऐवज
काशीचे हुंडी बाबत व हे एकोणीस हजार
तीनशें मिळोन व भरतीस लाखाचे शहरीहून
जोशीबावास लिहिलें आहे. त्याजकडे पत्र
पाठवून हुंडी घेऊन जाणें. दरबार राजी
राखणें. कलम १.
७३००  मातुश्री वेणुबाई व मातुश्री ताई व
र॥ कृष्णाजी बल्लाळ व्याही
यांसी र॥ बापूजी बाजीराव
यांणीं देविले ते श्रीस हल्ली शिक्का
हुंडी करून दिली. ते र॥ बापूजी
बाजीराव याजपासून घेणें.
६३०० म॥ हुंडी.
१००० मातुश्री वेणूबाई.
-----------
७३००
र॥ विष्णूपंताने जागा घेतली. तेथील
तूर्त जें जालें तें जालें. पुढें लागूं होईल.
भीती मात्र. आवार ठीक करणें. लाकूड
यापुढें होईल. नवी जागा वाडेयामागें घेतली
तो मात्र सोपा जलदीनें तयार करणें. विहीर
बागांत खंटली ते बांधोन सिध्द करणें. नवा
वाडा थोर आहे. यंदां गडबड आहे. आह्मीं
खर्चाखालें आलों आहों. तेथें काम न
बसवणें. साडिलें तों नाहीं आणि जलदीहि
नाहीं, असें करणें. १.
१०००० शिदाप्पा वीरकर याजवर पेशजी
देविले होते. हुंडी छत्रपूरची
त्याजवर पाठविली होती, ते
पावले असतील. त्यास रुपये
घेतले असिले तर उत्तम जालें,
न पावले असले तर घेणें.

सिहीगडावर घर बांधतों ह्मणून
लिहिलें. उत्तम आहे. १.
--------
१९३०० 
येणेंप्रणें घेऊन जमा करून लिहिणें. १ श्रीमंत र॥ भाऊस्वामी कोठपावेतो गेले
तें, काय त्यांचा मनसुबा होता, लिहिणें. १.
  खालीं कोकणांतील कामें करणें त्यास
माघमास पावेतों दरमहा तुह्मांकडे नेमिला
आहे त्याप्रमाणें देणें. हातरोखे वगैरे कामें
आहेत, ऐवज ज्याजती लागेल, ह्मणोन
त्यांणीं लिहिलें. त्यांस पांच हजार ऐवज
पाहिजे त्याजपैकीं केशवभट लळीत
राजापूरकर याची हुंडी, साडेतीन हजार
रुपयांची, केली आहे. तो ऐवज त्यास
पावला. हजार दीडहजार निदान लागले,
काम तटलें, तर तुह्मी देणें. ज्याजती न देणें.
कलम १.
तुळाजी आंग्रे सावतावर गेले. त्यांणीं काय केलें तें लिहिणें. १.
  श्रीमंत दाभाडियावर गेले. ताराबाईंनी
त्यांजला शह दिली. त्यास पुढें कसकसा त्यांचा ह्यांचा तह जाला तें साद्यंत लिहिणें? १.
 
  नवाब नासरजंग मारले गेले. त्यास
कोणी मारिलें? कसे जाले? पुढें सरदारी
कोणाचे सारिखी जाली? काय त्याचें
वर्तमान? तें सांद्यंत लिहिणें. १.
 


येणेप्रमाणें करणें. मित्ती माघवद्य ११. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे आशीर्वाद.

[१५३]                                                                        श्री.                                                            १२ जानेवारी १७५१.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री विठ्ठलजोशी रघुनाथजोशी स्वामीचे सेवेसी:-
पोष्य गोविंद बल्लाळ स॥ नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कूशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. पुणेयांत तूर्त ऐवज रुपये लाख पावेतों देणें आहे. त्यास कांहीं ऐवज पुणेयांत आहे तो ते देतील. बाकी भरतीस ऐवज पाहिजेसा जाला तर लाखांचे भरतीस ऐवज चिरंजीव बाबूराव आणवितील तो पाठवून देणें आणि आह्मास लिहून पाठविणें. मित्ति माघ वद्य ११. बहुत काय लिहिणें. कृपालोभ असो दीजे. हे विनंती.



[१५४]                                                                        श्री.                                                               ८ डिसेंबर१७५०.

अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य राजश्री गोविंद बल्लाळ गोसावी यासी :-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार, सु॥ इहिदे खमसेन मया अल्लफ. येथें दाभाडियासी कजिया प्राप्त जाला व ताराबाईंनीं राजश्रीस गडावर अडकावून ठेविलें. आमचेठायीं विषम मानून आहेत. नानाप्रकारें मनसबे करितात. असो. श्रीकृपेनें उत्तमच होईल. गुदस्तापासून फौज घरीं बसली, याजमुळें चाळीस लाख कर्ज जालें, पुढेंहि होतच आहे. फौजेचे समजाविशीस तोटा पांच सात लाख जाला. कर्जहि मिळत नाहीं. गुजरातेंतूनहि पैसा येणें दिसत नाहीं. सविस्तर तुह्मी समजून, खावंदाची ओढ जाणून, हरप्रकारें ऐवज प्रविष्ट करावा. कांकीं फौजेनें जसे सरदार मातबर तैसे मुलकाच्या रीतीनें तुह्मी मातबर. या गोष्टीचें अगत्य तुह्मास असावें. सारांश, तुमच्या तालुकियांपैकीं शिबंदीखर्च वगैरे महालमजकूर मिळोन जातो, बाकी सरकारांत थोडा ऐवज येतो. याची माहीतगिरीनें चौकशी करून, रुपया द्यानतदारीचे रीतीनें साधून, सरकारच्या कर्जास हात लावावा. वरकड तुमचे बोलल्यावर सातारा इस्तावे करार केले. त्यांपैकीं तूर्त ऐवज रोजमरियास रवाना करावा; बहा खर्च केवळ तोडून, रुपया जमा करून कर्ज वारावें. तुह्मास करावयासी योग्यता आहे हें जाणोन लिहिलें. या पत्राचें उत्तर तपशिलें न लिहिणें. जेणेंकरून सरकारची वोढ वारेल तैशी तरतूद करणें. जाणिजे. छ १९ मोहरम.

[१५२]                                                                        श्री.                                                             २४ सप्टेंबर १७५५.

आशीर्वाद उपरी. कुरा कडा दिल्लींत इजारा तीन साला करून घेतला. श्रीमंत र॥ दादा स्वामीचें आज्ञेवरून त्यास फाल्गुनमासीं अम्मल सुरूं जाला. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, तीन महिने मामलियत जाली. खरीफ बकरुल्लाखान खाऊन गेले, रब्बीपैकीं कांहीं फौजेनें उजाड जालें, कांहीं राहिलें तें शिवबंदीस खर्च जाला. घोडीं पडिलीं, बक्षिसें दिलीं. त्यास एक पैसा जे रुपये सरकारी भरिले त्यांत- एक पैसा आमचा उगवला नाहीं. सालमजकुरीं दिल्लीत गडबड केली त्याजवर पेशगी दोन लाख व दरबार खर्च पन्नास हजार हे दिल्लींत भरिले. मामला रुपये खराबिला. असो. आह्मीं जे मेहनत केली ते एक ईश्वर जाणत असेल. तीन महिने अम्मल जाला आणि श्रीमंत स्वामींनी घालमेल केली. त्यास मीहि येथून निघालों. इकडे फौज नाहीं. र॥ जयाजी शिंदे यास दगा राठोडांनीं केला. जिवें मारिलें. त्याजवर र॥ दत्ताजी शिंदे यांणीं ठासून राखिलें. अलीकडे जेनगरवाला माधोसिंग राजे यांणीं, गोविंद तमाजी तेथें रहात होते त्याजला, जिवें मारिलें, घरदार लुटलें, समागमें त्यांचे आणीकही मारिले गेले. असें वर्तमान आहे. त्याजकरितां इकडे तमाम रजवाडे जमीदार लबाडीस आले. इटावेयाजवळ जमीदारांशीं व आमचे लोकांशीं झुंज जालें. वीस घोडें ठार जालें. दहा भले माणूस ठार जालें. वीस माणूस जखमी. जमीदाराकडील घोडीं माणसें ठार जालीं, जखमीहि जालीं, मोडून गांवांत पातले. सारांश, गडबड जाली. याजकरितां आह्मी यमुनातीरीं राहिलों, फौज जमा करून त्यांचे मदतीस पाठविली आणि आह्मी यमुना उतरून रायपुरास आलों. आतां दरमजलींनीं पुणेयासी येऊन. र॥ अंताजी माणकेश्वर याजकडील फौज न आली. ते मारवाड प्रांतें गेले. थोडी बहुत कांहीं दिली ते इटावेयाकडे गेले. र॥ गोपाळराउ येथें आहेत त्याजला आह्मीं सांगितलें. सनद श्रीमंत स्वामींनी तुह्मांस करून दिली ते आह्मास प्रमाण, परंतु आमचे रुपये गुंतले हे द्यावे, जामिनी कहाडून द्यावी, सुखरूप अम्मल करणें, हें तुह्मांस न होय तर आह्मी श्रीमंत स्वामीजवळ जातों. आह्मीं कांहीं हरामखोरी केली नाहीं, चाकरी केली, मेहनत केली, झुंज केली, रुपये दिल्हे. असो. सर्व विनंती श्रीमंत स्वामीजवळ करून, जे आज्ञा खावंद करितील ते आह्मी करू. याप्रमाणें होत आहे. परंतु तें मनास येईल त्याप्रमाणें श्रीमंत स्वामीस नालिशी लिहितात. याजकरितां तुह्मी श्रीमंत स्वामीस विनंती करणें जे, आह्मी तुमचे बारगीर आहों, खावंदाची आज्ञा प्रमाण. परंतु, खावंदानें कांहीं तरी आमचे कष्ट, मेहनत चित्तांत आणावी. जे कोणेप्रकारें चाकरी केली आहे आणि रुपये भरिले तो आमचा मजुरा तो श्रीमंत स्वामीजवळ न जाला. उलटी आमची बदनाम नालीस होते. त्यास आह्मी दरमजलींनी श्रीमंत स्वामीजवळ येतों. श्रीमंत स्वामीस साद्यंत वर्तमान विदीत करून आज्ञा होईल त्याप्रमाणें वर्तणूक करून. आह्मी जें कार्य करून तें एक खावंदाचें करून. दूर आहे याजकरितां कोणी बदनामी लिहितील. त्यास, तुह्मी श्रीमंत स्वामीस विनंती करणें. आमची नालीस कोणीं करावें असें कर्म चाकरींत नाहीं. उरूबरू येतों. विनंती करून. र॥ गोपाळराउ यासी सलूख करून येऊन. त्यासी कजिया आह्मी करीत नाहीं. धनी मायबाप आहेत. विनंती आपली करून जे आज्ञा श्रीमंत करतील तेंच आह्मी करून. श्रीमंत स्वामीस माझे चाकरी कशी केली हें तरी मजुरा होईल. झुंजामध्यें कोणेप्रकारें मेहनत केली हें सर्व विनंती करून. हें काम आहे. आणीक चार कामें आहेत. श्रीमंत स्वामीचे किफायतीचीं आहेत. पत्रीं लिहितां येत नाहीं. उरूबरू विनंती करून. उरूबरू जालियास, श्रीमंत स्वामींनीं विनंती आमची ऐकिलियास, बहुत संतोषी होतील. हेंच पत्र श्रीमंत स्वामीस दाखवणें. कामें बहुत आहेत. कांहीं चिंता नाहीं. येथून येतों. सर्व श्रीमंत स्वामीस विदित करून. मित्ती आश्विनवद्य ४. हे आशीर्वाद.

[१५१]                                                                        श्री.                                                             ४ सप्टेंबर १७५५.

श्रीमंत राजश्री बाबा स्वामीचे सेवेसी :- पोष्य गोविंद बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति त॥ भाद्रपद वद्य त्रयोदशी पावेतों आपले कृपे करून येथील वर्तमान यथास्थित असे. विशेष. इकडील सविस्तर वर्तमान पेशजीचे पत्रीं लिहिलेंच आहे, त्याजवरून अवगत जालेंच असेल. आह्मी दिल्लीचे मुक्कामीहून श्रीमंत राजश्री दादास्वामीची आज्ञा घेऊन अंतरवेदींत आलों. याजउपर सत्वरींच देशास येतों. र॥ विठ्ठलराव यांणीं ग्वालियेरीस मोर्चे लाविले होते. त्याजवर किल्लेदारानें गोहदवाला राणा भीमसिंग जाट याजकडे अनुसंधान करून किल्ला त्यास द्यावासा केला. हजार दीड हजार स्वार व प्यादे पांच हजारानशीं भीमसिंग येऊन यांचे मोर्चे उधळून देऊन आपण किल्ल्यांत दाखला जाला. किल्ला भीमसिंगानें घेतला. जमियत करीत आहे. र॥ विठ्ठलराव दो कोशावर आहेत. भीमसिंगानें ग्वालियरच्या जागियांत दंगा करावयाचा विचार केला आहे. होईल वर्तमान तें लिहीत जाऊं भीमसिंगाचें पारपत्य होईल तरीच बंदोबस्त उत्तम आहे. सारांश, श्रीमंत र॥ दादास्वामी जाटावर आले, परंतु मन कोणी घालून, मेहनत करून त्याजला जेर न केलें. सुरजमल्ल जाट स्वामीस ठावका आहे. अपसांत चितशुध्द नाहीं. याजकरितां तो शेर जाला. श्रीमंत स्वामीचा बदनक्ष जाला. चार हजार घोडे, दोन हजार उंट, चार हजार बैल वाणियाचा सुरजमल्लानें नेला. असा बदनक्ष कधींही न जाला. असो. जर श्रीमंत राजश्री यजमान स्वामी, श्रीमंत राजश्री भाऊस्वामी येतात तर नक्ष होतो. पातशा वजीर श्रीमंत आलियावर समागमें दोन हजार तोफ घेऊन येतील. दोन महिनेयांत जाट फडशा होईल. करोड रुपयेयांचा मुलुख सुटेल. आह्मीच देशास येतों. भेटीनंतर साद्यंत विदित करून. वरकड चिरंजीव बाबूराव याजला लिहिलें आहे ते विनंती करतील. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ करीत जावा हे विनंती.

[१५०]      पे॥ आषाढ वद्य २ द्वितीया.                                  श्री.                              १/६*           १४ मे १७५६.

चिरंजीव राजश्री बाबूराव यासी गोविंद बल्लाळ आशीर्वाद. उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत जाणें. विशेष. इकडील वर्तमान तर येणेप्रमाणें आहे :-

चकले कुरा व चकले कडा येथील
निम्मेनिम जागा परगणे ठहराव र॥ हरी
विठ्ठल यांणीं करून दिल्हा. त्याजवर इटावे
सकुराबादेकडे कजिया पडला. सबब आह्मी
इकडे वांटणी झाली नाहीं, परगणे राहिले,
वाटितात तैसेच सोडून, आह्मी गेलों.
अलीकडे तिकडील कार्य करून आलों.
निम्मे परगणेयांत कांहीं त्यांनीं बळकाविलें.
मागो लागलों, न सोडीत. सारांश, उत्तम
प्रकारें सलुखें निमेनिम परगणे वांटून घेतले.
आपलीं ठाणीं बसविलीं. तेथें दरबारी मनास
येईल तसें लिहितील तर सर्व लटकें र॥
नारो शंकर यांचे विद्यमानें निमेनिम परगणे
आह्मीं घेतलें. निमे गोपाळराउ यास दिल्हे.
सलुख उत्तम प्रकारें जाला. ते भोजनास
आले. वस्त्रें दिलीं. एक हत्तीण आह्मांस गळा
पडोन मागितली तेहि दिली. याजउपरी
कजिया नाहीं. ते मनास येईल त्याप्रमाणें
नालीस लिहितील, कीं झुंजलें तर
गोपाळराव, आह्मी एकत्रच होतो, कोठें
कजिया नाहीं, सुरळीतपणें निमे जागा
आह्मीं दिली. श्रीमंत स्वामीस विनंती करणें,
नालीस लिहितील ते सर्व लटकें. बरें!
खावंदाची मर्जी राखणें ह्मणोन निमे जागा
दिली, दिल्लीस वजिरास पैका दिल्हा, येथें
फितूर जाला, सैद आला त्याजला तंबी
केला, शिवबंदी पडिली, सर्व प्रकारें बंदोबस्त
राखिला. याजउपरी गोपाळराउ नालीस
लिहील तर तुह्मी साफ सांगणें कीं, निमे
जागा दिली, आह्मी कजिया एकंदर नाहीं
केला, कजिया करून तर गोपाळराउ निमे
जागियासी पावले. श्रीमंत स्वामीचे
आज्ञेप्रमाणें करणें लागलें. १.
र॥ मल्हारजी बावास तुह्मी एक लाख
सत्तर हजार रुपये दिल्हे. आणीक लाख
रुपये पावेतों त्यांजला देणें. राजी करणें.
लाख रुपयेयांचा ऐवज पाठवून देऊन र॥
सुभेदारास व र॥ गंगाधरपंत तात्यास उत्तम
प्रकारें राजी करणें. बिठूर निमें र॥
गंगाधरपंत तात्याकडे आहे. तें जरूर जरूर
तात्याकडून करून घेणें. एक अंमल
जालियाविनां अंमल सुरळीत होत नाहीं,
जागा बसत नाहीं, याजकरितां जरूर करून
घेणें. उत्तर प॥ १.


आह्मी इकडील बंदोबस्त करून 
श्रावणमासीं देशास येऊन. आम्हावर या 
सालीं मोठी मेहनत पडली. हुकमी फौज
नाहीं. नवी शिवबंदी आणि झुंजावर झुंज 
मातबर! परंतु, हा काळपावेतों श्रीमंत 
स्वामीचे प्रताप व कृपेंकरून दस्तही राहिला, 
नक्षहि जाला, पुढें उत्तमच होईल. ईश्वरकृपेनें 
श्रीमंत स्वामीची सेवा मातब्बराप्रमाणें केली 
आहे. दोन सुभे बुडविले. लहान कार्य न जालें! 
मातब्बरच जालें आहे. श्रीमंत स्वामी चीज 
करतीलच. १


श्रीमंत स्वामी सावनूरचें कार्य करून 
पुढें जातील किंवा देशास पुणेयास येतील 
तें तपशीलवार वर्तमान लिहिणें. पत्रें आह्मी 
श्रीमंत स्वामीस व सर्वांस लिहिलीं आहेत. 
वाचून पाहोन देणें जाली देणें, न देणें जाली
न देणें. १.
श्रीस ऐवज देविलेयाप्रमाणें दिल्हा.
मोरजोशी यासी पंचवीस हजार दिल्हे. कबज
श्रीहून येत होती ते मार्गी काशीद मारला
गेला. दुसरी कबज आणविली आहे.
सत्वरच पाठवून देतो. रुपये श्रीस पावोन
दोन महिने, बलख अडीच महिने जाले.
दुसरे यानें कबज आणविली आहे, ते येतांच
पाठवितों. कबज सत्वर येऊन पावतील.
कलमें दोन चार पाठविलीं आहेत. ज्यास
देणें त्याजला देणें. १
र॥ गंगाधर बाजीराउ याजकडील 
पथकास हत्ती दोन श्रीमंत स्वामींनीं देविले 
ते आह्मीं त्यांचें रजाबंदीनें दिल्हे. र॥येस 
पाटील एळोवकर यांणीं हत्ती घेतला तो 
वृध्द, थोर, नादान त्याणें टाकिला. त्याजवर 
तो अजारी जाला. बरा करून देशास 
पाठविला आहे. सरकारी देणें. कापड रंगीन 
व चुनडीदार, दोन तीन रंगाचे पाठविलें 
आहे. कापड बहुतच वेश रंगवून मोठे 
मेहनतीनें पाठविलें आहे. सरकारी देणें. 
कापड पाहोन श्रीमंत स्वामी राजी होतील. 
सांबरी सुथनेहि दहाबारा पाठविले आहेत. 
परवरेहि प॥ आहेत. १.
श्री गंगाजळाची कावडी पाठविली
आहेत. याद लिहून प॥ आहे. त्याप्रमाणें
सर्वांस देणें. पंधरा कावडी प॥ आहेत.
साखर काशींत मोगल गेला, हंगामा तेथें
आहे, याजकरितां साखर न आली. परंतु,
आणून पाठवून देतो, अगर येतेसमयीं घेऊन
येऊन. १.
कोकणचें वर्तमान लिहिलेत त्याप्रमाणें
र॥ तुळाजी आंग्रे राजमाचीस पाठविले. 
विजयदुर्ग इंगरेजानें बळकाविला त्याचें
काय जालें तेंहि लिहिणें. सातारा श्रीमंत
मातृश्रीस भेटीस जाणार किंवा नाहीं तें
लिहिणें. सावनूरचें काय वर्तमान जालें तें
लिहिणें. १.
आह्मी श्रावणसीं खाईनखाई येतों.
काय करावें ? दिल्लींत वजीर बेइमान झाला!
फौजेविना येथून यावें तर मागें दस्त नाहीं.
असो. सर्व ठीक करून दरमजलींनीं पुणेयास
येतों. भेटीनंतर सर्व बोलोन इटावें,
सकुराबाद, फफुंद येथील कच्चे हिशेब घेऊन
येऊन. कुराचेहि कच्चे हिशेब घेऊन ज्यामध्यें
खावंदाचे मन त्रिशुध्द होय, बहुत राजी होत
तें करून. फिकीर नाहीं. खावंदास आभाव
बहुत आहे. त्यास ज्याप्रकारें आभाव
खावंदास जाला आहे तो सर्व मोडून उत्तम
प्रकारें खावंदाचे मनीं येईल कीं, गोविंदपत
याचा कारभार ठीक आहे, तेंच करून. चिंता
न करणें. आह्मांस पैसा न पाहिजे. अबरू
पाहिजे. अबरूनें जें होईल तें करून. १.
आह्मांस जरूर येणें. एकदां मागील
गंदकी वारून टाकून पुढें ठीक करून घेणें
आहे. सर्व ईश्वर इच्छेनें उत्तमच होईल. १.


संगमेश्वर येथील देशकुळकर्णाचें ठीक
करून घेणें. अम्मल श्रीमंत स्वामीचा जाला
याजउपरी आळस न करणें. तेथील
बंदोबस्त करून सत्वर लिहिणें. वरकड
कोंकणचीं कामें करणें आहेत तीं आह्मी
आलियावर सांगोन त्याप्रमाणें करणें.
पहिलेयापैकीं कांहीं बाकी राहिली असेल
ते पूर्ण करणें. १.


येणेप्रमाणें करणें. मित्ति वैशाख शुध्द १५. बहुत काय लिहिणें. लोभ असो दिजे. हे आशीर्वाद.

[१४९]                                                                     श्री.                                                                 १७५६.

पु।। श्रीमंत राजश्री भाऊ स्वामीचे सेवेशीः- से।। विज्ञापना ऐसीजे. विनंती तपशीलवार लिहिली आहे त्याजवरून विदित होईल.

उभयतां सरदारांत पेच दिसतो.
सुरळीतपणें वर्तणूक होणार नाहीं. अपसांत
कटाक्ष वाढेलसे दिसतें. १.
दिल्लीचा मनसुबा असा येऊन पडला
आहे. पातशाहांत वजिरात अनायासें लागली
आहे. त्याजमुळें सरकारी कार्य जी ह्मणावी
तें होणार. त्यास सरदारांत अपसांत चित्त
शुध्द नाहीं, याजमुळें मनसुबा सिध्दीस जाणार
नाहीं, एकानीं एक ह्मणावें. दुसरेयानीं दुसरेंच
ह्मणावें. यांत मनसुबा कसा सिध्दीस
जाणार? याजकरितां जर दक्षणचा मनसुबा
मोगल सलाबतजंग कजिया न करी, तर
स्वामींनी श्रीमंत र॥ नानास्वामीसुध्दां दिल्लीस
यावें आणि पातशहांत, वजिरांत एकता करून
द्यावी, अगर पातशहाची मर्जी करावी.
आपलें कार्य मातब्बर. द्रव्य, मुलुख घ्यावे
असा समय कधीं येणार नाहीं; आणि
स्वामीखेरीज सरकारी कार्य मातब्बर होणें
नाहीं. जालें तर बंदोबस्त होणार नाहीं. असे
पेच आहेत. स्वामीचे सरकारी धोडप,
रामसेज वगैरे आले, त्याजकरितां मोगल
कजिया करील असें असिलें तर श्रीमंत र॥
दादासाहेबास पाठवावें. परंतु सदर मनसुबा
श्रीमंत र॥ नानास्वामी व आपण येऊन
बंदोबस्त करून जाल तरीच सरकारी कार्य
होईल, आणि स्वामीचा हुकूम राहील. असें
आहे. कितेक वर्तमान पत्रीं लिहितां न ये.
भेटीस येतो, साद्यंत विदित करीन. स्वामी
सर्वजाण आहेत. असलेलें वर्तमान सेवेसी
लिहिलें आहे. १



मीहि येतेसमयीं सरदारांची भेट घेऊन
येईन. वर्तमान सर्व पाहोन येऊन वरचेवर
जें होत जाईल वर्तमान तें लिहीत जाईन.
लक्षमण शंकर अजारी बहुत आहेत.
हातपाय सुजले आहेत. बहुत दिवस रहाणार
नाहीं. बहुत काहाल आहेत. १.
र॥ गंगाधरपंत तात्या व र॥ नारो शंकर
यांचें वर्तमान पेशजी लिहिलें होतें त्यास हे
त्या कश्यपावर आहेतच. अद्याप तो
मनसुबा टाकीत नाहीं. परस्परें पत्रें खेळतात.
भेटीनंतर सेवेसी विदित करीन. कितेक
मजकूर मनसुबे आहेत, पत्रीं कोठवर
लिहावें? वरचेवर वर्तमान सेवेसीं लिहित
जाऊन. १. 
या प्रांतीं स्वामीं आलियाविना बंदोबस्त
व सरकारी कार्य होणार नाहीं. याजमध्यें
सर्व आहे. स्वामी सर्वज्ञ आहेत. ज्याची
फिकिर त्याजलाच असते. १. 

जें वर्तमान आहे तें सेवेसीं लिहिलें आहे. मीहि सत्वरच येतों. सेवेसीं आलिया सर्व विदित करीन. सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञापना.