Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१४८] पै. कार्तिकवद्य ४ शके १६७८ श्री. २६ सप्तेंबर १७५६.
चिरंजीव राजश्री बाबुराव यांसी प्रती गोविंद बल्लाळ आशीर्वाद उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहिणें. विशेष. तुह्मी छत्रपुरच्या अजुरदाराबरोबर दक्षिणी मित्ती श्रावण वद्य प्रतिपदेचीं पत्रें पाठविलीं तीं अश्विन शुद्ध द्वितीयेस पावलीं. वर्तमान साद्यंत लिहिलें तें कळलें त्याचें उत्तरः-
आह्मी देशास सत्वर येतों. याजउपर दिवसागत लावीत नाहीं. आह्मांस तुमच्या लिहिल्यावरून जरूरच येणें. विलंब करीत नाहीं. १. |
रसदेच्या भरण्याविशीं तुह्मांस वरचेवर लिहितच आहों. ऐवजहि जोशाकडून देविला आहे तो त्यांनीं पावता केलाच असेल. रसदेचा भरणा करणें. १. |
सरकारी फर्मास येतांना उत्तम घेऊन येऊं. फर्मासीचे तरतुदेंतच आहों. घेऊन येऊं. १ |
शिवभट अचवळ्याचे साडे सोळाशेंचे हुंडीचें लिहिलें तें कळलें. त्यास आह्मी येथून हुंडी करून त्याजकडे श्रीस पाठविली. तो काशीद मार्गी मारला गेला. पांचसा महिने वर्तमान कळलेंच नाहीं. मागतीं कळलियावर श्रीस लिहिलें आहे. व्याज पडेल तें व मुद्दल देऊन कबज घेऊन पाठवून देऊं. ऐवज त्यास देविला आहे. १. |
हुंडी तुह्मी करीत जाणें. हुंडीचा कजिया पडणार नाहीं. अचवळ्याचा मात्र कजिया राहिला, तोही फडशा करू कबजे घेऊन पाठवूं. कजिया ठेवीत नाहीं. शिवभटाचा लाखोटा शिवभटाकडे पाठवून देऊं. १ |
गोपाळ महादेव याजकडील ऐवज तजविजेनें उठावून घेणें. पुढें फिरोन आह्मी गुंतणार नाहीं. १. |
र॥ गंगाधरपंत तात्यांनीं फडणिसास पंधरा हजार रु॥ देविलें. ते आह्मीं येऊं तों पावेतों टाळाटाळ होईल तर करणें. आह्मी आलियावर विचार पाहूं तसा करूं. तूर्त रुपये गतील तर हेंच सांगणें, कीं पंतास लिहितों, ते उत्तर करतील. याप्रमाणें सांगूं ह्मणोन शब्द न गुंततां विचारें करोन सांगोन आह्मी येऊं तो पावेतों थोंबून राखणें. मग आह्मी आलियावर तुमच्या विचारें करणें तें करूं. १. |
फडणीस ऐवज मागतात, धीर पडत नाहीं. त्यास कांहीं थोडाबहुत देणें, राजी करणें. त्यांचा ऐवज तो आह्मांस देणें जरूर आहे. तुह्मीहि त्यास राजी राखणें. कांहीं तूर्त देणें. कांहीं पुढें देणें. १. |
रामाजी महादेव बडतर्फ जाले. असामी रत्नागिरीची करून घेणें. १ |
र॥ गंगाधरपंत तात्याकडील वर्तमान लिहिलें तें कळलें. याउपर वर्तमान होईल तें लिहिणें. १. |
चिरंजीव राजश्री गणेशपंत यांचीं पत्रें पावलीं. वर्तमान कळलें. आदित्याच्या देवालयाचे कामाविशीं लिहिलें तें कळलें. ऐशियासी आह्मी देशास येतच आहों. तिकडे आलियावर सांगणें तें सांगूं. १. |
संगमेशर येथें गुमास्ता पाठवून वतनाचें कामकाज चाली लावणें. १. रंगीन कापड आलें त्याची चौकशी जाली ह्मणोन लिहिलें, त्यास आह्मांस कांहीं नफा खाणें नाहीं. मामलेदार चंदेरीहून माल पाठवून देतात. रंगाई पडती ती आह्मी देतों. ऐसें असोन इतबार नाहीं तर उपाय काय करणार? बरे! जें घेतील तें घेतील. १. |
वरकड तुह्मीं दरबारीं वर्तमान लिहिलें तें कळलें. याजउपर होईल तें लिहीत जाणें. १. |
फर्मास जरूर पाहिजे. त्याचे तलाशांत आहों. फर्मास उत्तम घेऊन येऊं. विस्मरण नाहीं. १. |
आम्ही बहुत निकडीनें येतों. रसदेच्या भरणियासी ऐवज पाहिजे याजविशीं जोशीबावास वरचेवर आह्मीं लिहिलेंच आहे. ते सहा लक्ष पावेतों ऐवज तुह्माकडे पावता करितील. याजमधें जो ऐवज पावला असेल तो पावला, राहिला असेल तो सहा लाखाची भरती करून देतील. इकडेहि प्रजन्य नाहीं, पैसा मिळणें कठिण जाला आणि तिकडील तैसा ओढीचा प्रसंग! उपाय काय करावा? तुह्मी रसदेचा भरणा करणें. आह्मीं जोशास लिहिलें आहे. मित्ती श्रावण शुध्द २. हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१४७] पै छ १० रबिलावल श्री. २२ जानेवारी १७५२.
पु॥ श्रीमंत राजश्री पंत प्रधान स्वामीचे सेवेशी :- कृतानेक विज्ञापना. अबदल हदीखानास रायचूर अदवानीचा मामला पेशजी नवाबानें सांगितला होता. खान म॥रनिलेनें चार लाख रु. पेशगी सरकारांत द्यावी ह्मणोन करार झाला. फिरंगियांचे येण्यामुळें कांहींक दिवस खान म॥रनिले मोकूफ राहिले होते. प्रस्तुत मामलेयावर जाणार. ऐवजास जागा नाहीं. कांहीं निगादास्त केली त्याची तलब चढली. कांहीं ऐवज सावकाराजवळोन घेऊन शिबंदीस दिला. सरकारचा ऐवज द्यावयास जागा नाहीं याजकरितां फसोन राहिलें, प्राणासी गांठ पडली होती. मुसाबुसीचे चित्तांत सदर्हू मामलत ख्वाजे न्यामदुलाखानास सांगावी. अबदुल हजीखानानें अजीजी केली कीं, आपण फसोन राहिलों, अत:पर चार लाख रुपयांच्या कबजा लिहून देतों, आपणास रुखसत करावें. छ ३० सफर व छ १ रबिलावल दोहों रोजांत कबजा सरकारदाखल कराव्या ह्मणोन वाइदा केला असतां छ ३० सफरीं नवाब सलाबतजंगाजवळ जाऊन अर्ज केला कीं, कबजा द्याव्या त्यास लोकांस भरंवसा येत नाहीं, आह्मांस येथून कूच करावयाचा हुकूम करावा, एक मजल गेलों ह्मणजे लोकांस भरंवसा येईल. कबजा लेहून देतील. या गोष्टीवरून नवाबानें कुच करावयाचा हुकूम दिल्हा. हें वर्तमान मुसाबुसीस विदित नाहीं. छ १ रबिलावलीं खानम॥रनिले कुच करून निघाले, हें वर्तमान मुसामुसीस कळतांच रुमीखानास शहानवाजखानाकडे पाठविले आण इकडे गाडदी फिरंगी तयार जाले. रुमीखान शहानवाजखानाकडे व हैदरयारखानाकडे जाऊन, वर्तमान सांगोन अबदलहद्दीखानाजवळ येऊन, त्याजवळोन जबरदस्तीनें मुकाम करविला. सेवक मुसाबुसीजवळ गेलों होतों. रुमीखान येऊन वर्तमान विदित केलें कीं, खानम॥रनिलेंजवळोन मुकाम करविला. चार घटिका मोठा हंगामा जाला होता. याउपर सेवक खाजे न्यामदुलाखानाकडे गेलों. खान म॥रनिले बोलत होते कीं, अदवानीस पांच सहा हजार स्वार व दहा हजार प्यादे जमियत तयार आहे, हदीखानास अंमल देणार नाहीं. हदीखानास पैका मिळणें मुष्कील आहे; आह्मांस मामलेयाची गरज नाहीं, हदीखान जातील, लत खातील मग आह्मी मामला करणें तर करूं, ह्मणोन बोलले. हदीखानाचे लोकासही न्यामदुलाखानाकडोन फिशारत जाली आहे. लोकहि कबजा लेहून देत नाहींत. हादीखानाजवळोन मुकाम करविला याजकरितां सलाबतजंगाहीं खाजे अबदुलरहमानखानास बोलावून नेलें होतें. याप्रकारचें वर्तमान आढळलें. तें सेवेसीं विदित व्हावयाकरितां विनंती लिहिली आहे. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१४६] पै. छ ६ जिल्हेज. श्री. २३ आक्टोंबर १७५१.
पु॥ श्रीमंत राजश्री पंत प्रधान स्वामीचे सेवेसी.
कृतानेक विज्ञापना. विनंतीपत्राचे रवानगीसमयीं एका गृहस्थानें वर्तमान सांगितलें कीं, काल संध्याकाळीं औरंगाबाजेहून वर्तमान आलें. औरंगाबाजेस कजिया जाला; मारामार जाली; कितेक लोक मारले गेले. याजबद्दल मुसाबुसी येहीं येथें शहरांत दरवाजेयास आपले प्यादे बैसविले. पहिले मोंगलाचे प्यादे होते, हालीं आपले प्यादे बैसविले, ह्मणून वर्तमान सांगितलें. शोध घेतां चौक्या बसविल्या खऱ्याच. मागाहून शोध घेऊन विनंती लेहून पाठवितों. सेवकाचे शरीरीं तीन चार दिवस समाधान नाहीं. ज्वर येत असतो. सेवेसी विदित व्हावयाकरितां विनंती लिहिली आहे. छ २१ तेरिखेस दिवसरात्र येथें वृष्टि अद्भुत जाली. कुचकुंदा नदीस पूर आला. कितेक भिंती पडिल्या. लोक बोलतात कीं, ऐसा पूर नदीस तीन चार वर्षें आला नव्हता. प्रस्तुत येथें पर्जन्यवृष्टि होत आहे. सेवेसी श्रुत व्हावयाकरितां विनंती लिहिली आहे. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१४५] श्री. ४ नोव्हेंबर १७१८.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ४५ विलंबीनामसंवत्सरे मार्गशीर्ष शु॥ १० भृगुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी यांणीं समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री नारो पंडित सचीव यांसी आज्ञा केली ऐसीजे :- मले रायरी येथील सरदेशमुखीच्या विभागानिमित्त र॥ पिलाजीराव बिन गणोजीराव व देवजीराव बिन पिलाजीराव, व गुणाजीराऊ बिन बहिरजीराव शिरके यांमध्यें, व र॥ कान्होजीराव व बहिरजीराव व कुवरजीराव बिन रामोजीराव व दवलतराव बिन कान्होजीराउ शिरके यांमध्यें लाथळा लागला होता. त्याचा निवाडा गोतमुखेंकरून निम्में वतन व वतनाचें वडीलपण कान्होजीराव शिरके यांस देऊन निम्में वतन पिलाजीराव शिरके यांस दिल्हें आहे, वतनपत्रें आलाहिदा सादर आहेत. निवाडियाप्रमाणें उभयतां वतनांचा उपभोग आपलाले विभागांत बापभाऊ देखील करितील. ऐशास मामलेजकुरंचे महाल जिल्हेंत आहेत.
१ हिरडसमावळ. १ कानपखोरें. १. मोसेखोरें १. मुठेखोरें.
१ निजामपुर. १ गोरेगाव.
एकूण सहा महाल आहेत. तेथील सरदेशमुखीचें वतन निम्में कान्होजीराव शिरके व निम्में पिलाजीराव शिरके यांस चालविणें. हक्क इनामत निम्मेप्रमाणें उभयतांस चालवीत जाणें; आणि वतनाची सेवा दंडकप्रमाणें याजपासून घेत जाणें. याउपरी उभयतांध्ये गर्गशा होऊं न देणें. निम्मेप्रमाणें सरदेशमुखींचे वतन उभयतांचे दुमाले करून वंशपरंपरेनें चालविणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१४४] श्री. १९ फेब्रुवारी १६९९.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २६ बहुधान्यनामसंवत्सरे. फाल्गुन बहुल दशमी गुरुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजाराम छत्रपती यांणीं राजश्री महादाजी बल्लाळ सभासद, सुभा दाभोळ यांसी आज्ञा केली ऐसीजे :- स्वामी कर्नाटकास मसलतेस जातेसमयीं लष्करच्या लोकांनीं वतनाचे कितेक मुद्दे घातले व पूर्वी स्वामी चंदीस असतां मुद्दे घातले, त्याजप्रणें त्यांचे समजाविशी निमित्य वतनाचे कागद करून दिल्हे आहेत. ये गोष्टीनें एकाचे वतनास एक खटका करावयास उभा राहिला आहे ह्मणून कळों आलें. तरी चंदीच्या प्रसंगें व मसलतेच्या प्रसंगें व समजाविसी निमित्यें वतनाचे कागद ज्यानें जसे मागितले त्यास तसे दिल्हे. कांहीं प्रमाण नाहीं. याजकरितां पूर्वील कागदपत्र वतनाचे विषयीं घेऊन येईल अगर एकाच्या वतनास दुसरे खटके करितील त्यास ताकीद करून कागदपत्र हुजूर पाठवून देणें. स्वामी र॥ कोन्हेरपंडित न्यायाधीश यांस आज्ञा करून बारहक्क मनास आणून तुह्मास आज्ञापत्र सादर होईल त्याप्रमाणें वर्तणूक करणें. तोंवर नूतन वतन एकंदर कोणाकडे न चालविणें. कैलासवासी स्वामीचे वेळेस ज्याचें वतन चालिलें असेल त्यास बिलाकुसूर चालविणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१४३] श्री. ११ नोव्हेंबर १७५९.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाळाजी जनार्दन फडणीस स्वामी गोसावी यांसी :-
पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणें. विशेष. राजश्री कृष्णाजी महादेव यांजकडून दोन हजार माणोस स्वारीबराबर चाकरीस आणविलें आहे. तें घेऊन म॥रनिलें आले असिले तर उत्तम, नसिले तर म॥रनिलेस पत्र पाठविलें आहे तें त्याजकडे पाठवोन त्याचे लोक आणवावें. वरकडहि जागाजागाचे हशमी लोक पुण्यास आणविले होते ते आले न आले त्याचा समाचार घेऊन लोक आले नसतील त्यांस पत्रें पाठवोन जलदीनें लोक आणणें. तूर्त आळंदीची यात्रा भरत असेल, वाणीउदमी यात्रेस येत असतील, त्यांची रखवाली जाली पाहिजे. तरी कृष्णाजी महादेव याजकडील वगैरे जागाचे जे लोक जमा जाले असतील त्यांपैकीं दोनतीनशें माणोस आळंदीचे यात्रेचे रखवालीस पाठवोन देणें. पुण्यामध्यें चोऱ्या होतात ह्मणून कळलें, येविषयींचा तुह्मीं बंदोबस्त कसा कसा केला आहे? जागाजागा चौकीस माणसें ठेवून, हशमी लोक ठेवून चोरांचें पारपत्य करणें. चोरी न व्हे तें करणें. मुलकांत जागा जागा फासेपारधी व कैकाडी कोल्हाटी फिरतात. ते चोऱ्या करतात. तरी ताकीद करून फासेपारधी, कोल्हाटी वगैरे मुलकांतून काढून देणें; मुलकांत, पुण्यांस राहूं न देणें. जाणिजे. छ २१ रबिलोवल. बहुत काय लिहिणें हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१४२] श्री. १९ आक्टोबर १७५७.
आज्ञापत्र समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्यराजश्री बाळाजी पंडित प्रधान त॥ मोकदमानी मौजे बावधन समत हवेली प्रांत वांई सुहुर सन समान खमसेन मया व अल्लफ. कसबे मजकुरीं कृष्णातीरीं सहस्रधारातीर्थासमीप श्री वाकेश्वराचें प्राचीन स्थान होतें त्याचा जीर्णोध्दार राजश्री गोविंद बल्लाळ यांणीं करून नवें देवालय बांधिलें आहे. त्यास देवास नैवेद्यनंदादीपास कांहीं नूतन इनाम जमीन करून दिल्ही पाहिजे ह्मणून म॥रनिल्हेनीं विनंति केली. त्यावरून मनास आणून श्रीस कसबे मजकुरीपैकी नूतन इनाम तीन रुपये धारियाची जमीन बिघे २० स्वराज्य व मोगलाई एकूण दुतर्फा कुलबाब कुलकानू हल्लींपट्टी व पेस्तरपट्टी इनामपट्टी देखील इनाम दिल्ही असे तरी सदर्हूप्रमाणें २० बिघे जमीन श्रीकडे इनाम चालविणें. प्रतिवर्षीं नवीन पत्राचा आक्षेप न करणें. या पत्राची प्रती लेहून घेऊन अस्सल पत्र भोगवटियासी परतोन देणें. जाणिजे. छ. ०५ सफर. आज्ञा प्रमाण.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१४०] श्री. १६ एप्रिल १७५४.
अज स्वारी राजश्री गोविंद बल्लाळ त॥ मोकदमानी मौजे आंबेठाण त॥ चाकण सु॥ अरबा खमसैन मया व अल्लफ. खाजगत सुभा ऐवज येणें, करितां पेशजी मौजे मजकुरास रोखा जाहला होता. त्यास पंधरा दिवशीं रु॥ पाठवितों ह्मणोन अर्जदास्त पाठविली आणि रुपये अद्यापि न पाठविले. ऐसे नादान! हाली देखत रोखा रु॥ २०० दोनशें पाठविणें. उजूर केलिया कार्यास येणार नाहीं. पत्रदर्शनीं रु॥ शिताफ पाठविणें. या कामास लालप्यादा दिमतमजकूर प॥ यासी, मसाला रु॥ २ आदा करणें. जाणिजे. छ २२ जदिलाखर.
[१४१] श्री. ४ दिसेंबर १७५३.
अज स्वारी राजश्री गोविंद बल्लाळ त॥ मोकदमानीं मौजे आंबेठाण त॥ चाकण सु॥ अरबा खमसैल मया व अल्लफ. सरकार श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांचे घरीं लग्न आहे. त्यास सामानाकरितां पेशजी ताकीद जाली असोन, सामान अद्याप आलें नाहीं याजवरून काय ह्मणावें ? हालीं देखत रोखा ताकिदी प्रो। सामान भरून आणणें. या कामास फेरू पांडे प॥ आहे. यासी मसाला रु॥ २ आदा करणें. जाणिजे. छ ८ हे सफर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
पुढें प्रजापतीच्या पौषापासून ज्येष्ठ आषाढमास सलास खमसेन पावेतों मुलेंमाणसें यांणीं किल्यावर जाच सोशिले. माणसें सुटलियावर दादाप्रतिनिधी याणीं जगन्नाथपंतास सातारियास कैदेदाखल ठेविलें. त्यांचीं बायकोमुलें तेथें गेलीं. आमची मातोश्री कोंकणांत बीरबेटास गेली. ती॥ सातारियास जगन्नाथपंतसुध्दां राहिले. जगन्नाथपंतीं बदवकेली कांहीं करूं नये. याप्रमाणें दादाप्रतिनिधीजवळ ती॥ जामीन राहिले. दादा प्रतिनिधी, यमाजीपंत मुतालिक, कांहीं उपाय न चाले. तेव्हां पुणियांत सदाशिव चिमणाजी यांचे विद्यमानें सूत्र लावून तेथून कांहीं स्वार लोक आणून मुलेंमाणसेंसुध्दां पुण्यास गेलों. गोपाळराव यांचे तीर्थरूप व चुलते व बंधू आले असें समजोन, गोपाळराव यांचे सलाबतीवर नानासाहेब सामोरे येऊन बहुमानें करून सत्कारयुक्त पुणियांत नेऊन, जागा व खर्चास दरमहा नेमून देऊन ठेविलें. इकडे मोरोपंतभाऊ हत्तीघोडीसुध्दां होते तेहि पुणियास आले. सर्व एकत्र राहिले. पुढें सरंजाम नेमून द्यावा अशी बोली लागली. इतक्यात मोरोपंत भाऊ याचे आपण चालवितों असें यमाजीपंतीं करून, बोभाटा येऊं देत नाहीं ह्मणून रुद्राजीपंत अप्पा यांसी घेऊन गेले. ती॥ व जगन्नाथपंत पुण्यांत राहिले. दोन वर्षें प्रतिनिधि दादा यांणीं केली; नंतर वारले. त्याचे मागें त्याचे चिरंजीव यांणीं सहा महिने प्रतिनिधी केली. त्या कारभारांत आमचे वतनविषय कांहीं चाललें न चाललें. दादाचे पुत्रहि निवर्तलेयावर पूर्ववतप्रमाणें भवानराव यांसी प्रतिनिधी जाहाली. मुतालकी यमाजी शिवदेव, याप्रमाणें कांहीं दिवस चाललें. आमचा सरंजाम पूर्ववत् नेमून द्यावा ह्याप्रमाणें ठरावांत आलें. ती॥ यांस पुणें यांची हवा न माने ह्यास्तव निघोन मलकापुरास आले. तेथें विशाळगडीं रसद देवून मलकापूर सुभा केला. इकडे पुण्यांत ठराव झाला कीं, गोपाळराव याचे तीर्थरूप व चुलते व बंधू यांसी सरंजाम द्यावा. ह्याप्रमाणें नेमून दिल्हा ते समयीं जगन्नाथपंत यांसी ताकीद जाहाली कीं तुह्मीं गोपाळराव यांचे तीर्थरूप यांचे आज्ञेंत न चालले. जगन्नाथपंतीं माणसें मलकापुरीं आणिलीं. आपणहि आले. तेव्हां तीर्थरूपीं सांगितलें जे तुह्मी स्वतंत्र जाहला, आमचें सांगितलें तुह्मांस मानत नाहीं, पेशजी सांगितलें न ऐकून ढोंग कारभाराचें केलें, पदरचा पैसा खर्च करून सर्वस्व घालविलें, खराबींत आलां, याउपरी ज्यांणीं जें वतन, गांव, जमीन वगैरे मिळविलें असेल त्याचें त्याणें घेऊन विभक्त रहावें, आह्मांस न पुसतां आमचा पैका तुह्मीं जो खर्च केला आहे तो आमचा भरून द्यावा. याप्रमाणें बोली लाविली. गोपाळ विठ्ठल व शिवराव विठ्ठल यांसी आणून, त्यांजकरवी हिशेब करून समजून घेतला. जगन्नाथपंतीं पैका व जमीन व इतर वतन कांहींएक मिळविलें नाहीं, पैक्याची खराबी मात्र केली असें त्याचे माथा आलें. तेव्हां त्याणें आमचे मातुल हणमंतराव सरदेसाई यासी व नारोबा नाईक मुडले स्नेही यासी मध्यस्थींच घातलें कीं, आणावें तो न आणिलें, जगन्नाथपंतीं कांहीं न मेळवितां पैक्याची मात्र खराबी केली हें प्रमाण. परंतु, ज्या प्रभूजवळ गोपाळराव यांणीं पैका मेळविला त्याच प्रभूकार्यावर खर्च केला, यास तुह्मीं द्वैत धरूं नये, आणि अंतरही देऊं नये येविशीं मातोश्री आकाबाईचें सहगमनमयीचं वचन आहे. इ.इ.इ.*
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
ह्मणून मग जगन्नाथपती वस्त्रें घेतलीं. नानासाहेब यांचे सांगणें जें वस्त्रें तुह्मास देतों, परंतु तुह्मीं गोपाळराव यांचे पिते, बंधू यांचे आज्ञेंत चालावें, त्यांस अंतर देऊं नये. याप्रमाणें जाहाले. पुढें कारभार करूं लागले. इतकियांत दादा प्रतिनिधी व यमाजीपंत बाहेर निघाले आणि फैलाव केला. त्यासमयीं भवानराव प्रतिनिधी यांसी जगन्नाथपंतीं आणून किल्ले वसंतगड येथें ठेविलें व आपलीं मुलेंमाणसें, सर्व वस्तवानी, हांडेंभांडें किल्यावर कागदपत्रसुध्दां ठेविलें, आणि आपण फौज धरून ठाणें वांगी येथे राहिलें. कऱ्हाडचें ठाणें गोपाळराव यांणीं मजबूद करून त्यात गोपाळ विठ्ठल मुलेंमाणसेंसुध्दां ठेविले होते. कऱ्हाडांतून बाबजी यांणीं लाख पाऊण लाख रुपये रोकड शिल्लक गोपाळराव यांची होती ते व घोडीपिंडीं सारी मत्ता वांगीचे ठाण्यांत नेली. आपण तेथें राहिलें. तेथें दादाप्रतिनिधी, ...यांची व त्यांची लढाई जाहाली. दाद यांणीं यास हतवीर्य करून जप्त केलें आणि फौज घेऊन कऱ्हाडास आले. ठाणे यासी वेढा दिल्हा. गोपाळ विठ्ठल यांचे वस्तू आंत टिकाव न निघे. तेव्हां गोपाळ विठ्ठल यांचे चुलते निळोपंत हे पंतप्रधान यांजकडे होते. त्यांणीं मध्यस्ती करून मुलेंमाणसें, हत्ती घोडीं ठाण्यांत होतीं तीं मुक्त करून ठाणें खाली करून दिल्हें. त्याणीं आपले मेहुणे मामा यांसी सुभा सांगितला. गोपाळ विठ्ठल यांची माणसें व तीर्थस्वरूप राजश्री मोरोपंत भाऊ, व त्र्यंबाजीपंतआप्पा, वगैरे सारे, हत्ती, घोडींसुध्दा अष्टेवाळवेयासी गेले, तेथे राहिले. दादा प्रतिनिधी कऱ्हाडाहून कोळयाचें ठाणें बापूजीबावा चिटणीस यांजकडे होतें त्यास वेढा देऊन बसले. समागमें जगन्नाथ कृष्ण कैदेंत होते. आमचे ती॥ कऱ्हाडींच होते. हे पहिलेंच दु:खपण करीत होते. हें वर्तमान दादा प्रतिनिधी यासी कर्णोपकर्णी कळोन केवळ त्यांचे वाटेस गेले नाहींत. कऱ्हाडाहून कोळ्यास जाऊन दादा प्रतिनिधी यासी भेटोन, दरबारखर्च करून सख्त भिडेनें जगन्नाथपंत यासी आपण जामीन राहून, सोडवून, आपले जिम्मेस करून घेऊन कोळयावरच होते. पेठ नेरळयावर गोविंदराव चिटणीस व थोरात फौज धरून होते. त्यांजवर दादाप्रतिनिधी चढाई करून गेले. चिटणीस व थोरात यांचा मोड जाहाला. अष्टेवाळवेयाचे ठाणें टाकून थोरात रात्रीं गेले. मोरोपंतभाऊ व गोपाळ विठ्ठल हत्ती, घोडींसुध्दां तेथून निघोन इंगळीस गेले. तेथें शामराव देशमूख यांणीं साहित्य करून आपल्या वाडयांत ठेविलें. तेथून पुढें सालवणास गेले. मागें भवानराव प्रतिनिधी व आपलीं मुलेंमाणसें वसंतगडीं विश्वासू तुकजी शेवाळे हवालदार व कारभारी आपले जमेचे चिटको रामचंद्र ठेविले होते. तेथेंच असतां कोणाचा आश्रय नाहीं; सबब ताराआऊसाहेब यांजकडे सूत्र केलें. आऊसाहेब यांनीं आपला भाचा कानोजी मोहिते यासी पाठविलें. त्यानें हवालदार व चिटको रामचंद्र यांसी जप्त करून किल्ला आपणच बळकाविला. भवानराव यांसी किल्लेयाजवरून उतरून मोहिते याणें सातारियासी पाठविलें. आऊसाहेब यांणीं भवानराव यांस दादाप्रतिनिधी याचे स्वाधीन केलें. आमचीं मुलेंमाणसें मोहिते याणें किल्यावर कैदेंत ठेविलीं. त्यांची सुटका न हो. तेव्हां आमचे तीर्थरूप महादाजीपंत सातारियासी आईसाहेबांकडून बोलणें करून, पांच सात हजार रुपये ऐन खंड, शिवाय दरबारखर्च करून, फक्त माणसें प्राण मात्र सोडवून घेतले. वरकड दौलत सारी मालमत्ता मोहिते याणें लुटोन घेतली. माणसें खालीं उतरलियावर, कुटुंब मातबर तेव्हां जशी ज्यास जिकडे सोय पडली तिकडे राहिले. जगन्नाथपंतीं मुतालकीं प्रमोद संवत्सर वैशाख मासापासून प्रजापतीसंवत्सर सन इसन्ने खमसेन पावेतों नऊ महिने केली.