[१५०] पे॥ आषाढ वद्य २ द्वितीया. श्री. १/६* १४ मे १७५६.
चिरंजीव राजश्री बाबूराव यासी गोविंद बल्लाळ आशीर्वाद. उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत जाणें. विशेष. इकडील वर्तमान तर येणेप्रमाणें आहे :-
चकले कुरा व चकले कडा येथील निम्मेनिम जागा परगणे ठहराव र॥ हरी विठ्ठल यांणीं करून दिल्हा. त्याजवर इटावे सकुराबादेकडे कजिया पडला. सबब आह्मी इकडे वांटणी झाली नाहीं, परगणे राहिले, वाटितात तैसेच सोडून, आह्मी गेलों. अलीकडे तिकडील कार्य करून आलों. निम्मे परगणेयांत कांहीं त्यांनीं बळकाविलें. मागो लागलों, न सोडीत. सारांश, उत्तम प्रकारें सलुखें निमेनिम परगणे वांटून घेतले. आपलीं ठाणीं बसविलीं. तेथें दरबारी मनास येईल तसें लिहितील तर सर्व लटकें र॥ नारो शंकर यांचे विद्यमानें निमेनिम परगणे आह्मीं घेतलें. निमे गोपाळराउ यास दिल्हे. सलुख उत्तम प्रकारें जाला. ते भोजनास आले. वस्त्रें दिलीं. एक हत्तीण आह्मांस गळा पडोन मागितली तेहि दिली. याजउपरी कजिया नाहीं. ते मनास येईल त्याप्रमाणें नालीस लिहितील, कीं झुंजलें तर गोपाळराव, आह्मी एकत्रच होतो, कोठें कजिया नाहीं, सुरळीतपणें निमे जागा आह्मीं दिली. श्रीमंत स्वामीस विनंती करणें, नालीस लिहितील ते सर्व लटकें. बरें! खावंदाची मर्जी राखणें ह्मणोन निमे जागा दिली, दिल्लीस वजिरास पैका दिल्हा, येथें फितूर जाला, सैद आला त्याजला तंबी केला, शिवबंदी पडिली, सर्व प्रकारें बंदोबस्त राखिला. याजउपरी गोपाळराउ नालीस लिहील तर तुह्मी साफ सांगणें कीं, निमे जागा दिली, आह्मी कजिया एकंदर नाहीं केला, कजिया करून तर गोपाळराउ निमे जागियासी पावले. श्रीमंत स्वामीचे आज्ञेप्रमाणें करणें लागलें. १. |
र॥ मल्हारजी बावास तुह्मी एक लाख सत्तर हजार रुपये दिल्हे. आणीक लाख रुपये पावेतों त्यांजला देणें. राजी करणें. लाख रुपयेयांचा ऐवज पाठवून देऊन र॥ सुभेदारास व र॥ गंगाधरपंत तात्यास उत्तम प्रकारें राजी करणें. बिठूर निमें र॥ गंगाधरपंत तात्याकडे आहे. तें जरूर जरूर तात्याकडून करून घेणें. एक अंमल जालियाविनां अंमल सुरळीत होत नाहीं, जागा बसत नाहीं, याजकरितां जरूर करून घेणें. उत्तर प॥ १. आह्मी इकडील बंदोबस्त करून श्रावणमासीं देशास येऊन. आम्हावर या सालीं मोठी मेहनत पडली. हुकमी फौज नाहीं. नवी शिवबंदी आणि झुंजावर झुंज मातबर! परंतु, हा काळपावेतों श्रीमंत स्वामीचे प्रताप व कृपेंकरून दस्तही राहिला, नक्षहि जाला, पुढें उत्तमच होईल. ईश्वरकृपेनें श्रीमंत स्वामीची सेवा मातब्बराप्रमाणें केली आहे. दोन सुभे बुडविले. लहान कार्य न जालें! मातब्बरच जालें आहे. श्रीमंत स्वामी चीज करतीलच. १ श्रीमंत स्वामी सावनूरचें कार्य करून पुढें जातील किंवा देशास पुणेयास येतील तें तपशीलवार वर्तमान लिहिणें. पत्रें आह्मी श्रीमंत स्वामीस व सर्वांस लिहिलीं आहेत. वाचून पाहोन देणें जाली देणें, न देणें जाली न देणें. १. |
श्रीस ऐवज देविलेयाप्रमाणें दिल्हा. मोरजोशी यासी पंचवीस हजार दिल्हे. कबज श्रीहून येत होती ते मार्गी काशीद मारला गेला. दुसरी कबज आणविली आहे. सत्वरच पाठवून देतो. रुपये श्रीस पावोन दोन महिने, बलख अडीच महिने जाले. दुसरे यानें कबज आणविली आहे, ते येतांच पाठवितों. कबज सत्वर येऊन पावतील. कलमें दोन चार पाठविलीं आहेत. ज्यास देणें त्याजला देणें. १ |
र॥ गंगाधर बाजीराउ याजकडील पथकास हत्ती दोन श्रीमंत स्वामींनीं देविले ते आह्मीं त्यांचें रजाबंदीनें दिल्हे. र॥येस पाटील एळोवकर यांणीं हत्ती घेतला तो वृध्द, थोर, नादान त्याणें टाकिला. त्याजवर तो अजारी जाला. बरा करून देशास पाठविला आहे. सरकारी देणें. कापड रंगीन व चुनडीदार, दोन तीन रंगाचे पाठविलें आहे. कापड बहुतच वेश रंगवून मोठे मेहनतीनें पाठविलें आहे. सरकारी देणें. कापड पाहोन श्रीमंत स्वामी राजी होतील. सांबरी सुथनेहि दहाबारा पाठविले आहेत. परवरेहि प॥ आहेत. १. |
श्री गंगाजळाची कावडी पाठविली आहेत. याद लिहून प॥ आहे. त्याप्रमाणें सर्वांस देणें. पंधरा कावडी प॥ आहेत. साखर काशींत मोगल गेला, हंगामा तेथें आहे, याजकरितां साखर न आली. परंतु, आणून पाठवून देतो, अगर येतेसमयीं घेऊन येऊन. १. |
कोकणचें वर्तमान लिहिलेत त्याप्रमाणें र॥ तुळाजी आंग्रे राजमाचीस पाठविले. विजयदुर्ग इंगरेजानें बळकाविला त्याचें काय जालें तेंहि लिहिणें. सातारा श्रीमंत मातृश्रीस भेटीस जाणार किंवा नाहीं तें लिहिणें. सावनूरचें काय वर्तमान जालें तें लिहिणें. १. |
आह्मी श्रावणसीं खाईनखाई येतों. काय करावें ? दिल्लींत वजीर बेइमान झाला! फौजेविना येथून यावें तर मागें दस्त नाहीं. असो. सर्व ठीक करून दरमजलींनीं पुणेयास येतों. भेटीनंतर सर्व बोलोन इटावें, सकुराबाद, फफुंद येथील कच्चे हिशेब घेऊन येऊन. कुराचेहि कच्चे हिशेब घेऊन ज्यामध्यें खावंदाचे मन त्रिशुध्द होय, बहुत राजी होत तें करून. फिकीर नाहीं. खावंदास आभाव बहुत आहे. त्यास ज्याप्रकारें आभाव खावंदास जाला आहे तो सर्व मोडून उत्तम प्रकारें खावंदाचे मनीं येईल कीं, गोविंदपत याचा कारभार ठीक आहे, तेंच करून. चिंता न करणें. आह्मांस पैसा न पाहिजे. अबरू पाहिजे. अबरूनें जें होईल तें करून. १. |
आह्मांस जरूर येणें. एकदां मागील गंदकी वारून टाकून पुढें ठीक करून घेणें आहे. सर्व ईश्वर इच्छेनें उत्तमच होईल. १. संगमेश्वर येथील देशकुळकर्णाचें ठीक करून घेणें. अम्मल श्रीमंत स्वामीचा जाला याजउपरी आळस न करणें. तेथील बंदोबस्त करून सत्वर लिहिणें. वरकड कोंकणचीं कामें करणें आहेत तीं आह्मी आलियावर सांगोन त्याप्रमाणें करणें. पहिलेयापैकीं कांहीं बाकी राहिली असेल ते पूर्ण करणें. १. |
येणेप्रमाणें करणें. मित्ति वैशाख शुध्द १५. बहुत काय लिहिणें. लोभ असो दिजे. हे आशीर्वाद.