[१५६] श्री. ७ आक्टोबर १७५५.
आशीर्वाद उपरी. दुसरें पत्र तुमचें आलें, श्रावणवद्य नवमीचें मित्तीचें तेंहि पावलें. सविस्तर वर्तमान लिहिलें तें कळलें. त्याचें उत्तर :-
ताटें व वाट्या रुप्याच्या करवून घेऊन येऊं. |
सत्वर येणें म्हणून लिहिलें. त्यास आम्ही सत्वर येतों. विलंब करीत नाहीं. १. |
१० ताटें दीड हजारांची. २५ वाट्या जोड २५ पांचशें रु॥ पावेतों येणें प्रें॥ करून घेऊन येऊं. १. |
आह्मी देशास यावयाची तयारी करून निघालों तों पातशाह वजीर दिल्लीहून बाहीर निघाले. अंतरवेदींत येऊन अम्मल उठवावा, बखेडा करावयाचा विचार केला. त्यामुळें जागजागा अंतरवेदींत फितूर जाला. डोळेझाक करून, कजिया सोडून, तसेच देशास यावें, तर तमाम दस्त उठेल. याजकरितां आपल्या जमावानसीं इटावेयाकडे आलों. र॥ अंताजीपंत जाटाकडे आगरियासी आलेच होते. त्यांची आमची भेट आगरियाजवळ जाली. वजिरासी रदबदल करून चकले. कुरा व कडा येथील इजारियापैकीं कांहीं पैसाहि देणें आला तो देऊन, वजीर राजी करून, तूर्त सलुख करून कजिया वारला. र॥ अंताजीपंत वजिराकडे आगरियाहून जाणार. आह्मी अंतरवेदींत आहों. वजिराचा कजिया बहुत भारी येऊन पडिला होता. यास्तव सलुख केला. आह्मांस देशास जरूर येणें. कजिया ठेऊन कैसे यावें, याजकरितां चार दिवस राहून वजिराचा कजिया वारला. याजउपर गुंता तिळमात्र नाहीं. दसरियासी येथोन निघोन दरमजलीनीं देशास येतों. याजउपर विलंब नाहीं. र॥ हरीपंत पुढें गेलें, त्या मागें आह्मी येतों. गोपाळराउहि गेले. आह्मी येऊन तों त्यांचा हिशेब देणें. र॥ गंगाधरपंत तात्याचा फडशा जाला. मला पांचा चुकला. बरें उत्तम जालें. तुह्मी फिकीर न करणें. आह्मी दरमजलीनीं येऊन पावलों. ज्यामध्यें श्रीमंत स्वामी उभयतां राजी तें करूं. हरीपंत याजवर खुशाल ? तर हरीपंत याजहून चौगुणे आह्मी खुशाल करूं? फिकीर न करणें. या पत्रामागोंमाग येतों. श्रीमंत स्वामीची फर्मास दिल्लीहून आणिली. चार हजार रुपये खर्च केले. पांच पोरी उत्तम आणविली. त्यांत दोन तीन जें श्रीमंत स्वामीचे खुशीस येईल तें येऊं. तलास बहुत केला. मित्ती आश्विन शुध्द २. हे आशीर्वाद. तुह्मी लिहितां तें उत्तम. राजश्री हरीपंत सर्व सांगतील. मींहि लांब लांब मजली करून येतों. हे आशीर्वाद. पंधरा हजार तात्यांनीं फडणिसास देविले. त्यास, रुपये देणें, अनमान न करणें. रुपये निमित्य आमचा हिशेब होणें, मागील कजिया नाहीं वारला, याजकरितां जरूर पंधरा हजार देणें. पुढें समजोन घेऊं. त्याजला राजी करणें. बिठूरचे काम करून सनद पाठविणें. हे आशीर्वाद.